Friday, November 21, 2008

शिवधर्म समजून घेऊ या...


""जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंदकाय आहे शिवधर्म ?
खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील शंभर टक्के लोकांना शिवधर्म काय आहे हे माहीत नाही; शिवधर्म चळवळीतील काही शे लोकांना शिवधर्म चळवळ माहीत आहे (शिवधर्माची विचारधारा या अर्थाने).
पुण्यातील भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा मात्र महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावे एक संघटना आहे याची बऱ्याच जणांना माहीती झाली. अलीकडच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल ऐकायला, वाचायला मिळू लागले आहे. तरीही केवळ मराठा समाजालाच नव्हे तर या चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांनाही शिवधर्म चळवळीची खरी ओळख नाही, हे एक कटुसत्य आहे आणि शिवधर्माचे बलस्थानही.
मराठा समाजाचे हित पाहणारी ही संघटना असावी, असे वाटून मराठा समाजातील काही तरुण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांकडे वळतात, ही खरी गोष्ट आहे. शिवधर्म, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची मातृसंघटना आहे मराठा सेवा संघ. श्री पुरुषोत्तम खेडेकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक समजले जातात. ( आता मराठा सेवा संघ विद्‌वेषमूलक भूमिका घेत आहे असे वाटल्याने डॉ. आ. ह. साळूंखे हे चळवळीपासून दूर झाले आहेत, अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहीती आहे.)
शिवधर्म म्हणजे ब्राह्मणद्‌वेष असे समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. शिवधर्मवाल्या मंडळींकडून प्रकाशित होणारी नियतकालिके आणि पुस्तके यांत किमान 80 टक्के भाग ब्राह्मणद्‌वेषासाठी खर्च केलेली असतात. (ब्राह्मणद्‌वेष का, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शिवधर्म समजून घेताना शिवधर्माची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना शिवधर्माने देवतास्थानी मानले आहे. छत्रपती शिवरायांना देवतास्थानी मानले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा विरोध शिवधर्माने आपल्या कृतीतून चालविला आहे.
हिंदू मनातील तळपत राहणारे महाप्रखर तेजस्वी सूर्य अर्थात शिवप्रभू. त्यांचा तेजस्वी प्रकाश आणि प्रताप महाराष्ट्राच्या डोंगर-दऱ्यातून वाट काढीत अखिल भारताला प्रभावित करीत आला आहे. एका महान आदर्शाच्या रूपात ते यापुढेही अखिल भारतवर्षाला प्रभावित करीत राहतील.
"भारताला छत्रपती शिवरायांच्या मार्गानेच वाटचाल करावी लागेल. आपल्या मुखात एकच घोषणा असू द्या- शिवाजी, शिवाजी आणि थोर शिवाजी', असे उद्‌गार नेताजी सुभाषचंद्रांनी काढले होते.स्वामी विवेकानंद म्हणतात, "छत्रपती शिवराय म्हणजे वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात वर्णन केलेल्या उच्च आदर्शांचे मूर्तीमंत उदाहरण होत. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होतेे.'शिवरायांची हिंदुत्व रक्षणाची कमालीची तळमळ पाहून उत्तर हिंदुस्थानातील कवी भूषण इतका भारावला की, त्याने तो शिवप्रताप आपल्या काव्यात बद्ध करून हिंदुस्थानभर ऐकविला आणि हिंदूंमधली स्फूर्ती जागवली. किती ओजस्वी काव्यपंक्ती आहेत त्या...
""जैसे अरण्यास दावानल
हरीण कळपास चित्ता
भव्य गजास वनराज
घोर तमास सूर्य अन्‌
कंसास श्रीकृष्ण असे
तैसे म्लेंच्छांच्या रानटी
टोळ्यांस राजा शिवछत्रपती !''
याच हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवरायांनी स्वत:च आपल्याकडे कमीपणा घेऊन, दिल्लीश्वराच्या इंगिताप्रमाणे चालून आलेल्या मिर्झाराजा जयसिंहाचे हिंदुत्व व हिंदूपणा जागृत करून, ते कायम राखण्यासाठी त्याच्याशी बोलून गेले की, ""तुम्ही या, मी निर्माण करीत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे अधिपती व्हा नि या औरंगजेबी शासनाला नष्ट करून, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू साम्राज्याची ध्वजा उभारा. मी तुमच्या मदतीला आहेच - तुमच्या अश्वाची लगाम सावरण्याकरिता नि सांभाळण्याकरिता!'' महाराजांच्या मनाचा हा मोठेपणा होता. शिवरायांचा हा धर्माभिमान शिवधर्मवाल्यांनी त्यांचेच नाव घेऊन पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवरायांच्याच नाव घेत हिंदुत्वाला नष्ट करण्याच्या इराद्याने शिवधर्माची स्थापना करण्यात आली आहे. ही मंडळी स्वत:ला हिंदूधर्माचे मानत नाहीत. इतकेच नव्हे तर हिंदू देवदेवतांची ओंगळवाण्या शब्दांत निंदानालस्ती आणि अवमान करण्यात या मंडळींचे आयुष्य चालले आहे. माता तुळजाभवानीचा अवमान करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचे थडगे शिवरायांनी उभारले, परंतु आज शिवधर्मवाले माता जिजाऊ आणि शिवरायांच्या नावाचा जयजयकार करीत सरस्वतीची, गणपतीची अवमानना करीत आहे.
सरस्वतीची मूर्ती फोडण्याचे धाडस आता अन्यधर्मीय करू शकत नाहीत, हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत गलिच्छ शब्दांत लिहिण्याचे धाडसही करू शकत नाहीत. हे काम आता शिवधर्माच्या माध्यमातून हिंदूनांच हिंदूविरुद्ध उभे करून केेले जात आहे. हिंदूंच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करा, धर्मश्रद्धा नष्ट झालेला हिंदू कणाहीन, तेजहीन आणि भ्याड बनेल. त्याला यथावकाश आकाशाच्या बापाच्या कळपात किंवा अल्लाच्या दरबारात घेऊन जाणे सोपे राहील, असे यामागे षड्‌यंत्र तर नसेल ना अशी शंका अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.शिवरायांनी "हर हर महादेव'ची ललकारी देतच मावळ्यांना संघटित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते, हे शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाही. (शिवराय हे तुळजाभवानीचे भक्त होते याला पुरावा काय, असे त्यांचे विचारणे असते. त्या काळात तुळजाभवानीची पूजा करताना शिवरायांनी फोटो काढून जपून ठेवायला हवा होता की काय?)हिंदुस्थानात मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी येथील पंथांचे लोक दुसऱ्या पंथाचा आदर करीत. दुसऱ्याची श्रद्धा, विचार यांचा आदर करणे हे हिंदुधर्मीयांचे वैशिष्ठ्ये आहेत. आमच्या दृष्टीने जन्मलेला प्रत्येकजण हा हिंदू असतो, त्यामुळे कोणाचे धर्मांतर करणे किंवा फेरधर्मांतर हे प्रश्र्नच कधी उद्‌भवले नाहीत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर करीत होता. मुस्लिम आक्रमकांनी येथे आल्यावर तलवारीच्या धाकाने असंख्य हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. अशारीतीने मुस्लिम झालेल्यास पुन्हा हिंदू करून घेण्याची कोणतीच सोय हिंदू धर्मात नव्हती. जबरदस्तीने मुसलमान झालेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती, परंतु परतीचा मार्ग उपलब्ध नव्हता. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या ही त्रुटी लक्षात आली. मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेण्याची विनंती महाराजांनी धर्ममार्तंडांना केली, तेव्हा एखाद्याला हिंदू करून घेण्याचा कोणताच विधी नाही असे उत्तर महाराजांना मिळाले. त्यांनी लगेच धर्ममार्तंडांना सांगितले की विधी नसेल तर तुम्ही तयार करा. अशारीतीने मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. बजाजी पुन्हा हिंदू झाला तरी त्याच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी महाराजांनी आपली मुलगी बजाजीच्या मुलास देऊन त्याला व्याही करून घेतले आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजाची गरज असेल अशावेळी समाजाला पचेल, रुचेल अशा नवीन प्रथा सुरू करायच्या असतात. परधर्मी झालेल्यांना पुन्हा हिंदु करून घेऊन शिवाजी महाराजांनी हे केले.आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद आदी संघटना हिंदू धर्मातून ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात आणण्याचे काम करीत आहेत. शिवरायांनी घालून दिलेल्या संकेतानुसार हे कार्य आहे, परंतु शिवधर्मवाली मंडळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात काम करण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. आज पूर्वांचल भारतातील नागालॅंडसारख्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 70 टक्केहून अधिक वनवासी हिंदूंना ख्रिस्ती केले आहे. ओरिसासारख्या राज्यात ख्रिस्ती मिशनऱ्या जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील वनवासी भागच नाही तर पुणे, सोलापूरसारख्या शहरी भागातही ख्रिस्ती मिशनऱ्या फसवून धर्मांतरे करीत आहेत. याविरोधात आंदोलन चालवणे तर दूरच राहिले. याउलट समाजात हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम शिवधर्मवाली मंडळी करीत आहेत.
शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले, जिजामातेने शिवरायांना बालपणी रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार केले या गोष्टी शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाहीत. त्यांच्या मते शिवराय आणि जिजाऊ हे आस्तिक नव्हते. शिवधर्मवाल्या मंडळींच्या मते हिंदू देवदेवतांची पूजा करणे सोडून दिले पाहिजे.
मातेची जो थाने फाडी। तया जोडी कोण ते ।।1।।
वेदां निंदी चांडाळ। भ्रष्ट सुतकीया खळ ।।2।।
वेद श्रृति ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचे वचन न मानी तो ।3।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवा नये ।।4।।
हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ- वेदांसंबंधी संत तुकारामांचे हे विचार आहेत. तरीही त्यांना विद्रोही म्हणून प्रस्तूत करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवधर्मवाले करीत असतात.
"बोलिली लेकुरे। वेडी वाकुडी उत्तरे।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाही विचारिला। अधिकार म्या आपुला।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपे किंकरा।।'
ज्ञानेश्वरांकडे मागणे मागणाऱ्या संत तुकोबारायांना जातीच्या बंधनात अडकावून ज्ञानेश्वर विरुद्ध तुकाराम असे चित्र उभे करण्याचा उपद्‌व्यापही शिवधर्मवाले करीत असतात.
एकूणच काय तर शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा जयजयकार एका तोंडाने करायचे आणि हिंदू धर्माला खिळखिळे करायचे अशी कार्यपद्धती शिवधर्मवाल्या मंडळींची आहे. शिवधर्मवाल्या मंडळींच्या आचार आणि विचारांतही प्रचंड तफावत आहे, यामुळेच त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसावे असे वाटते. उदाहरणादाखल म्हणून काही मुद्दे पाहा...
1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.)
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''


-सिद्धाराम भै. पाटील

6 comments:

  1. ha lekh pune yethun prakashit honarya chaparak chya 2008 saalachya diwali ankat prasiddh zala ahe.

    ReplyDelete
  2. Anonymous29.12.08

    गेल्या आठवड्यातच मी शिवधर्मची साइट बघितली.ती वाचून मला फार वाइट वाटलं.त्यानंतर त्यावर अजून काही माहिती मिळतीये का ते पहात होतो.तूमचा लेख वाचून खूप माहिती मिळाली.मी माझ्या ब्लॉग मध्ये आधी या बद्दल लिहिलं होतं.पण त्यावेळी मला इतकी माहीती नव्हती.त्यांच्या ह्या चळवळी विरूद्ध आपण जरूर आवाज उठवायला हवा.पण आपण जर आपल्या ब्लॉग मध्ये त्यांच्याबद्दल लिहिलं तर आपणच त्यांना प्रसिद्धी देउ असं मला वाटतं , म्हणून मी त्यावर लिहिणं बंद केलं.आपल्याला या कामात माझी काही मदत झाली तर मला फार आनंद होइल.
    http://pune-marathi-blog.blogspot.com/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%20%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%20%20%E0%A4%95%E0%A4%BE%3F%3F

    ReplyDelete
  3. अतिशय अभ्यासपूर्ण लेख असे मी या लेखाला म्हणेन.लेख आवडला.ब्लोगवर आजच आलोय.या संभाजी ब्रिगेड लोकांबद्दल मी इथे लिहिले आहे.

    http://sagarkinaraa.blogspot.com/

    ReplyDelete
  4. सिध्दरामजी नमस्कार,
    तुमचे सर्व लिखाणअतिशय माहितीपुर्ण व अभ्यासपुर्णअसते.उत्तम लेखनासठी तुम्हाला खुप खुप
    शुभेच्छा...

    ReplyDelete
  5. अगदी मनातलं लिहिलंत.

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी