Pages

Monday, June 1, 2009

स्मरण गोनीदांच्या साहित्याचे


मराठीतील विख्यात लेखक आणि कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या साहित्यकृतींची ओळख करून देणारे "पुनर्भेट - गोनीदांच्या साहित्यकृतींची' हे पुस्तक त्यांच्या स्मृतिदिनी, सोमवार, दि. 1 जून रोजी सायं. 6.30 वा. सोलापुरातील शिवस्मारक येथे प्रकाशित होत आहे. गोनीदांच्या साहित्यावर प्रेम करणारे ऍड. आनंद देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांची प्रस्तावना असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...
ज्ञानसागरात मनुष्याने जीवनभर जरी चालायचे म्हटले तरी तो फारतर गुडघाभर पाण्यापर्यंत पोहोचू शकतो, अशा आशयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक उक्ती आहे. खरेच आहे ते. एका आयुष्यात खूप काही करायचे ठरविले तरी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. जसजसे आपण विविध क्षेत्रांतील अधिक ज्ञान मिळवू पाहतो, तसतसे आपले अज्ञान उघडे पडत जाते.
पुस्तक हे ज्ञान मिळविण्याचे एक प्रमुख साधन आहे. वाचन ही अशी साधना आहे, की जी साधकाला तात्काळ वरदान देते. मनुष्याच्या घडणीमध्ये पुस्तकांचे स्थान खूप महत्त्वाचे असते. पुस्तके माणसाला विवेकी बनवतात. विविधांगी वाचनाने मनुष्य प्रगल्भ बनतो. असे असले तरी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत इच्छा असूनही अनेक चांगली पुस्तके वाचणे राहून जाते. यावर चांगला उपाय म्हणजे काही व्यासंगी लोकांनी मौल्यवान पुस्तके वाचली पाहिजेत आणि ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत.
छत्रपती शिवराय आणि गड-किल्ले यांना दैवत मानून भ्रमंती केलेल्या ऍड. आनंद देशपांडे यांनी नेमके हेच केले आहे. तपस्वी लेखक गो. नी. दाण्डेकर यांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. फुले सुंदरच असतात, पण ती कलात्मकतेने गुंफल्यावर जी माला तयार होते तिचे सौंदर्य हे मोकळ्या फुलांहून अधिक असते आणि त्याचे श्रेय ती माला वेधक रीतीने गुंफणाऱ्या कलाकाराला असते. "गोनीदां'चे संस्कारशील साहित्य, त्यांचा संपन्न जीवनानुभव, अभिजात कल्पनाशक्ती हे सारे अत्यंत प्रभावीपणे वाचकांसमोर आणण्याचे श्रेय आनंद देशपांडे यांना आहे.
1 जून 1998 ला गोनीदांचे निधन झाले. त्यानंतर सोलापूर तरुण भारतमधून आनंद देशपांडे यांनी गोनीदांच्या साहित्याचा परिचय करून देणारी लेखमाला लिहून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. गोनीदांच्या निवडक 28 पुस्तकांचा परिचय करून देणारे 28 लेख देशपांडे यांनी लिहिले आहेत. ""वाघरू, रानभुली, माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत, मृण्मयी, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, मोगरा फुलला, शितू, बया दार उघड, तुका आकाशाएवढा, वादळातील दीपस्तंभ'' आदी मराठी मनाला संस्कारित करीत आलेल्या कादंबऱ्यांचा यात समावेश आहे.
येथे विशेष नोंद करण्यासारखी बाब म्हणजे लेखकाची गोनीदांवर विशेष भक्ती आहे. महाराष्ट्राच्या मातीवर, संस्कृतीवर गोनीदांचे असलेले गहिरे प्रेम, भटकेपणाची दाण्डेकरांची प्रवृत्ती, इतिहासासंबंधी आत्मीयता या सर्वांबद्दल आनंद देशपांडे यांच्या मनात श्रद्धा आहे. ही श्रद्धाच त्यांच्या पुस्तकाची प्रेरणा आहे. शिवचरित्र आणि किल्ल्यांची तीव्र ओढ ही लेखकाची जमेची बाजू आहे. याशिवाय कोणी गोनीदांच्या पुस्तकांचा परिचय करू पाहील तर त्यात जिवंतपणा येणे शक्य नाही. भटकंती ही गोनीदांच्या लिखाणामागील प्रेरणा आहे. गोनीदांच्या साहित्याने आनंद देशपांडे यांचे भावविश्व बनले आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना पानोपानी येते.
पुस्तकातील प्रत्येक प्रकरण साधारणपणे तीन-चार पानांचे आहे. प्रत्येक प्रकरण मूळ कादंबरी वाचल्याचा आनंद देते आणि मनात मूळ कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण करते. पराग घळसासी यांनी रेखाटलेल्या जिवंत चित्रांमुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे. मनोविश्व समृद्ध करणारे हे पुस्तक नव्या पिढीला जीवनदृष्टी देणारे आहे.

No comments:

Post a Comment