Pages

Monday, June 21, 2010

क्ष- किरण टाकणारे पुस्तक

पुस्तकाचे नाव : सच्चर समितीचा अहवाल अर्थात धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेलाच सुरुंग
लेखक : समीर दरेकर
प्रकाशक : अभिनव निर्माण प्रकाशन, पुणे.
पृष्ठे : 168 मूल्य : 100/- सवलतमूल्य : 50/-

या देशासमोर अनेक समस्या आहेत. काही समस्या या अतिशय गंभीर आहेत. अतिशय गंभीर समस्यांपैकी एक आहे हिंदू-मुस्लिम यांच्यातील सामंजस्याची समस्या. ही समस्या या देशाला गेल्या हजार-बाराशे वर्षांपासून छळते आहे. असे असूनही दुर्दैवाने या देशात या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रामाणिक आणि तटस्थ प्रयत्न फारच कमी लोकांनी केल्याचे दिसते. काही लोक (त्यातल्या त्यात पत्रकार आणि लेखक मंडळी) या प्रश्नाचा अभ्यास न करताच लेखणी झिजवताना दिसतात. समस्या समजून न घेता राजकीय नेतृत्त्वाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे ही समस्या सुटण्याऐवजी आणखीन गंभीर रूप धारण करीत आहे.
9 डिसेंबर 2006 ला राष्ट्रीय विकास परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, "भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा पाहिजे.' पंतप्रधानांच्या या एकाच वाक्यावरून हिंदू-मुस्लिम ऐक्यावर ही मंडळी कोणत्या प्रकारचे उपाय योजत आहेत याची कल्पना येते. अशा नेभळट पुढाऱ्यांमुळेच 1947 साली 23 प्रतिशत मुस्लिमांसाठी या देशाची 30 प्रतिशत भूमी पाकिस्तानच्या स्वरूपात तोडून देण्यात आली होती, हे इथे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
पाकिस्तानविरुद्ध सैन्य लढेल... कसाबविरुद्ध पोलीस लढतील... पण आपल्याच लोकांनी मतांच्या राजकारणासाठी केलेल्या राष्ट्रद्रोही कृत्यांविरुद्ध कोण लढणार? अशी कृत्ये सुरू आहेत याची तरी जनतेला माहिती व्हायला नको काय? अशा प्रश्नांनी अस्वस्थ झालेल्या एका तरुण अभियंत्याने - समीर दरेकर यांनी उपरोक्त पुस्तक लिहिले आहे.
वृत्तपत्रांतून, वरवरच्या चर्चेतून सच्चर अहवालाची भीषणता ध्यानी येत नाही. सच्चर समितीचा विषय हा केवळ हिंदू-मुस्लिम विषय म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा विषय नाही. या देशाच्या राज्यघटनेलाच सुरुंग लावणारा, या देशावर आघात करणारा विषय आहे, हे उपरोक्त पुस्तकातून साधार सांगितले आहे. लेखक स्वत: अभियंता असल्यामुळे पुस्तकात फापटपसारा नाही. छायाचित्रे, विविध राष्ट्रीय वृत्तपत्रांतील कात्रणांचा आवश्यक तो वापर, नेमक्या ठिकाणी नेमके संदर्भ यांमुळे पुस्तक एकदा वाचायला घेतले की, पूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही. लेखकाने कष्टपूर्वक सारे संदर्भ एकत्रित करून प्रवाही मांडणी केल्याचे प्रत्येक पान वाचताना जाणवल्याशिवाय राहात नाही.
स्वत: काहीही अभ्यास न करता राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे विषय "अरे यात राजकारण असते' असे म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या पढतमूर्खांची एक जमात असते. या पुस्तकाची मांडणी, त्यातील पुरावे इतक्या बिनतोड आणि प्रभावीपणे सादर केले आहेत की, पढतमूर्खांच्याही डोळ्यांत अंजन पडेल.
न्या. सच्चर यांचा भूतकाळ पुस्तकाच्या सुरुवातीलाच पुराव्यासह मांडला आहे. सच्चरांचा देशविरोधी शक्तींशी असलेला लळा पाहिला की, मती गुंग होऊन जाते. सच्चर महाराजांच्या कुंडलीवरून सच्चर समितीचे मनसुबे सहज ध्यानात येतात. थोडक्यात सांगायचे तर हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील मराठी भाषेतील माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकांत सर्वात प्रभावी असे हे पुस्तक आहे.
भारतीय राज्यघटना, खरी धर्मनिरपेक्षता, देशाचे हित यांना नख लावणारे एक राष्ट्रद्रोही कृत्य सच्चर समितीच्या माध्यमातून झाले आहे. सच्चर समितीच्या अहवालातील देशघातक विषयांवर क्ष- किरण टाकणारे हे पुस्तक सतत चर्चेत येणाऱ्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील संदर्भग्रंथ म्हणूनही मोलाचे वाटते. त्यामुळेच पत्रकार, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वकील, लोकप्रतिनिधी, दलित चळवळीतील नेते, सक्रिय कार्यकर्ते, सैन्याचे अधिकारी, विचारवंत, लेखक, कवी, हिंदू-मुस्लिम समस्या कायमस्वरूपी सुटावी असे वाटणारे समाजहितैषी आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना अशा पक्षांतील तसेच मुस्लिम समाजातील देशप्रेमी कार्यकर्ते या साऱ्यांनी आवर्जून वाचलेच पाहिजे, असे हे पुस्तक आहे.
हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले पाहिजे यासाठी अभिनव निर्माण प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने प्रयत्न करीत आहेत. केवळ 35 दिवसांत 5 हजार पुस्तकांची आवृत्ती संपली. दुसरी आवृत्तीही संपण्याच्या मार्गावर आहे.
लेखक - समीर दरेकर हे स्वत: या विषयावर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये व्याख्याने देत आहेत. आपल्या शहरातही अशा व्याख्यानांच्या आयोजनासाठी आणि पुस्तकासाठी संपर्क : 9822971079, 9922131889
-सिद्धाराम भै. पाटील

No comments:

Post a Comment