Pages

Saturday, June 26, 2010

आणि शिक्षणाचे बाजारीकरण

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांनी अमेरिकेतील शिक्षण संस्थांना आवाहन केले. अमेरिकेतील शिक्षण संस्थांनी भारतातील उच्च शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी तयार राहावे, असे ओबामा म्हणाले. त्यांचे म्हणणे आहे की, भारतात शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यांच्या योग्यतेमुळे रोजगाराच्या साऱ्या संधी त्यांनाच मिळत आहेत आणि सर्वसामान्य अमेरिकी तरुण शिक्षणात मागासलेला असल्यामुळे व्यावसायिक स्पर्धेत तो मागे पडत आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी याच संदर्भामध्ये "बंगळूरला ना आणि बफेलोला हो' असे व्यक्तव्य केले होते. यावरून मोठा वादही निर्माण झाला होता, परंतु या वक्तव्यावर भारतात कोणीही आक्षेप घेतला नाही. भारतीय मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग कदाचित ओबामा यांच्या अज्ञानामुळे गोंधळून गेला असेल. आमच्या देशात तर शिक्षण क्षेत्रातील स्थितीमुळे सारे विचारवंत चिंतित आहेत. कोठेही वेळ मिळाला की, भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या गोष्टी आपण करीत असतो.
बदललेल्या परिस्थितीमध्ये कोणीही व्यापक प्रयत्न केले नसतानाही काही बदल घडून येताना दिसत आहे. हे सर्व बदल सकारात्मक आणि योग्य आहेत असे मात्र म्हणता येणार नाही. परंतु देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार मात्र होताना दिसत आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगीकरणापेक्षा बाजारीकरण अधिक झाले आहे. परिणामी याचा नकारात्मक प्रभाव जाणवत आहे. संख्यात्मकदृष्ट्या प्रशिक्षित तरुणांची मात्रा प्रचंड वाढली आहे, परंतु त्यांच्या योग्यतेबद्दल चिंता करावी अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून परदेशी संस्था तसेच तेथील पद्धती भारतात लागू करण्याच्या गोष्टीही आम्ही भारतीय करीत असतो. या विसंगतीचे कारण काय? विदेशी लोक आपल्या शिक्षणपद्धतीची स्तुती करीत आहेत. आपल्या शिक्षणपद्धतीचा त्यांनी धसकाच घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच आपल्या शिक्षणपद्धतीवर असंतुष्ट आहोत.
आपण जेव्हा आपल्या स्वभावानुसार कार्य करतो तेव्हा थोडीशी सफलतादेखील समाधान देऊन जाते, परंतु जेव्हा आपण आपल्या स्वभावाच्या विपरित कार्य करू लागतो तेव्हा उच्चतम सफलता मिळाली तरीसुद्धा जीवनात एक पोकळी जाणवत राहते. हीच गोष्ट राष्ट्राच्या बाबतीतही सत्य असेल असे वाटते. या आधुनिक शिक्षणाने आम्हाला रोजगार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापाराच्या क्षेत्रात मोठी सफलता प्रदान केली आहे. आज भारतीय प्रतिभा पाहून विश्व आश्चर्यचकित झाले आहे. आम्ही संधी मिळताच आमच्या देशातही प्रत्येक क्षेत्रात चमत्कार केले आहेत, परंतु तरीही शिक्षणतज्ज्ञ समाधानी नाहीत. याचे एक कारण असे आहे की, गुणवत्तेच्या स्तरावर भारतात प्रचंड विषमता दिसून येते. एकीकडे राष्ट्रीय संस्थान (आय.आय.टी., आय.आय.एम.) आहेत. येथे जगातील सर्वोच्च संस्थांच्या तोडीचे शिक्षण मिळते. दुसरीकडे सर्वत्र पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे उगवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले अभियंते आणि अन्य पदव्या घेतलेले तरुण दिसतात. आपल्या विषयातील अगदी किरकोळ ज्ञानही यांच्यामध्ये नसल्याचे आढळून येते. योग्यतेतली ही दरी निराशेचे एक कारण आहे, परंतु अधिक सूक्ष्म स्तरावर जाऊन पाहिले तर या पोकळीमागील कारण आहे, आमचे आपल्या मुळांपासून उखडले जाणे. भारताचा स्वभावच ज्ञान-प्रदान आहे. आम्ही ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाच्या अनेक वैज्ञानिक पद्धतींचा विकास केला. आध्यात्मिक ज्ञान-परा विद्येच्या सोबतच व्यावहारिक भौतिक ज्ञान-अपरा विद्येच्या प्रशिक्षणाच्या अत्यंत परिणामकारी पद्धतींचा विकास आणि प्रयोग भारतामध्ये 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत होत राहिले.
गांधीजींचे शिष्य आणि विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाने सिद्ध केलेआहे की, हे शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे, चारित्र्य निर्माणात प्रखर आणि अत्यंत प्रभावी होते. साऱ्या देशात सुलभपणे उपलब्ध असणारे हे शिक्षण होते. त्यांनी 1823 मध्ये इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले आहे की, (ज्यांना आज आपण वंचित किंवा दलित म्हणतो त्यांच्यासहित) शिक्षक आणि शिष्य लाखो शाळा आणि विद्यापीठांमधून शिकत होते. सारा देशच साक्षर होता. शिक्षणपद्धतीदेखील वैज्ञानिक होती, ज्ञानाला अंतःकरणापासून प्रकाशित करणारे प्रशिक्षण मिळत होते. आजच्या विकृत पद्धतीनुसार "माहितीची' देवाण-घेवाण एवढ्यापुरतेच ज्ञानदान मर्यादित नव्हते. आमच्या परंपरेनुसार गुरू म्हणजे असा की, जो आपल्या शिष्याची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी आईप्रमाणे कष्ट करतो, शिष्याचे संपूर्ण दायित्व गुरू ग्रहण करतो. शिष्याच्या चित्ताच्या गुणधर्मितेनुसार प्राणाची प्रतिष्ठा करून गुरू त्याला मार्ग दाखवितो. इतकेच नाही तर गुरू त्याच्यासोबत त्या मार्गावरून चालतोदेखील. आवश्यकता पडली तर गुरू शिष्याचे बोट धरेल, कडेवरही उचलून घेईल. ठाकूर श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांसोबत असेच केल्याचे दिसते. कुणाला केवळ मार्ग सांगून स्वतःच्या भरवशावर सोडून दिले. कुणाला बोट पकडून मार्ग दाखविला. गिरीश बाबूंचे संपूर्ण दायित्वच आपल्यावर घेतले. त्यांच्या शिष्यांनी देखील या परंपरेचे पालन केले.
आध्यात्मिक क्षेत्रात ही परंपरा दक्षिणामूर्तीला प्रारंभ करून व्यास महर्षींपर्यंत आणि तेथून वर्तमान आचार्यांपर्यंत जिवंत असल्याचे दिसते. काही अपवाद सोडले तर आज देखील अधिकांश पारंपरिक आचार्य शास्त्रीय विधीचा अवलंब करीत असल्याचे दिसतात, परंतु अपरा विद्येच्या क्षेत्रात ही परंपरा लोप पावली आहे. जीवनात आलेल्या पोकळीचे, निराशेचे हेच मुख्य कारण आहे. शिक्षणाची ही वैज्ञानिक पद्धती पुनजीर्वित करण्यात आली तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि अन्य गोष्टी बदलल्या नाहीत तरी चालू शकेल. मुख्य गोष्ट तर "गुरू'ची आहे. शिक्षणसेवकांना शिक्षक बनविल्यानंतर गुरू बनण्याचे प्रशिक्षण प्रदान करणे हाच यावरील एकमेव उपाय आहे. शिक्षणाला केवळ "रोजी-रोटी'चे साधन मानून शिक्षणाच्या बाजारीकरणाची स्पर्धा सुरू आहे. या "स्थितीत गुरु-शिष्य' ही वैज्ञानिक परंपरा पुनःस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
केवळ दार्शनिक गोष्टी बोलण्याने काहीही होणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चारित्र्य निर्माणाची न्यूनता भरून काढण्यासाठी आपल्या स्तरावर विनम्र प्रयत्न सुरू करणे आवश्यक आहे.
-सिद्धाराम भै. पाटील.

No comments:

Post a Comment