Pages

Sunday, March 20, 2011

आत्मविश्‍वास देणारी संस्था - तरुण भारत

रामदेव बाबा यांच्यासमवेत सिद्धाराम पाटील(स्वत:), माजी संपादक अरुण करमरकर आणि विजयकुमार पिसे. (छाया: शिवकुमार पाटील)

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. रामदेव बाबा सोलापुरात आले होते. त्यांचे शिबीर सुरू होते. दुपारी आम्ही त्यांच्या भेटीस गेलो होतो. संपादक अरुण करमरकर आणि आम्ही सहकारी पत्रकार रामदेव बाबांना भेटलो. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला.रामदेव बाबा म्हणाले,
‘मी सोलापुरात आल्यापासून तरुण भारत वाचतोय. मला मराठी वाचता येतं. सर्वप्रथम मी तरुण भारत वाचतो आणि मग इतर वृत्तपत्रं. याचं कारण तरुण भारत हे राष्ट्रीय विचारांना प्राधान्य देणारं वृत्तपत्र आहे. तरुण भारतच्या वाटचालीस माझ्या शुभेच्छा !’ इति.

तरुण भारत वाचणार्‍या वाचकांची भावनाच रामदेव बाबांनी व्यक्त केली. माझं गाव (शिर्पनहळ्ळी) सोलापूरपासून २० कि.मी. अंतरावर आहे. घरचा दुधाचा व्यवसाय होता. वडील दूध घेऊन रोज सोलापूरला यायचे. कधीतरी एका रविवारी सोलापूरहून येताना त्यांनी तरुण भारत आणला होता. त्यातील मा. गो. वैद्य यांचा लेख मला आवडला. त्यानंतर अधूनमधून दूध घालायला सोलापूरला येऊ लागलो. रविवारचा तरुण भारत वाचण्याची ओढ यामागे असायची. पुढे जाऊन आपण तरुण भारत परिवाराचा एक सदस्य होणार आहे, हे तेव्हा मला कुठं ठाऊक होतं.

कॉलेजला असताना तरुण भारतमधील ‘सावरकर एक धगधगते यज्ञकुंड’ ही वा. ना. उत्पात यांची लेखमाला, मा. गो. वैद्य यांचे भाष्य, चं. प. भिशीकर यांचे मनाला भावणारे लेख यांचा मी नियमित वाचक राहिलो. या लेखांनी माझ्या मनाची मशागत झाली. पुढे एम.एससी.साठी प्रवेश घेतला. परंतु घरची आर्थिक ओढाताण बघवेना. तेव्हा शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. टेक्स्टाईल संबंधीत उत्पादनाची चाचणी करणार्‍या एका संस्थेत दोन-चार महिने काम केलं. त्याच सुमारास उमरग्याला बी.एड.साठी नंबर लागला आणि तरुण भारतात उपसंपादक पदासाठी पदवीधर पाहिजेची जाहिरात वाचली. माझे मामा जे अडचणीच्या प्रत्येक टप्प्यावर माझा आधार बनले होते, त्यांना मी सांगितलं की, ‘मला तरुण भारतात काम करायची इच्छा आहे. मुलाखतीला जातोय.’

अर्थातच मामांनी प्रोत्साहन दिलं. चांगलं क्षेत्र आहे जा म्हणाले. आणि ऑक्टोबर २००३ मध्ये मी तरुण भारतात दाखल झालो. पत्रकारितेतील ‘ओ की ठो’ माहित नाही. तेव्हा संपादक अनिल कुलकर्णी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकाच्या बातम्या करण्याचे धडे घेऊ लागलो. त्यानंतर चारेक महिन्यांनी अरुण करमरकर संपादकपदी आले. संपादकीय पान आणि रविवार पुरवणीचे दायित्व आले. या ठिकाणी मला एका प्रसंगाचे स्मरण होते. लेख लिहिणे म्हणजे विचारवंतांचे काम असते. आपल्यासारख्या सोम्या-गोम्याचे ते काम नाही असे वाटायचे. आलेले लेख आणखी चांगले करून (संपादन करून) पुरवणी काढायची हे आपले काम. रविवारी कोणत्या विषयावर कव्हर स्टोरी (मुख्य लेख) करायची याची संपादकांशी चर्चा झाली. मुंबईचे कोणीतरी लेख लेख लिहिण्याचे मान्य केले होते. गुटख्यावरील बंदी कोर्टाने उठविल्याच्या पार्श्‍वभूमीवर तो लेख येणार होता. पण ऐनवेळी लेख आला नाही. आता काय करायचे? उद्याच पुरवणी तयार करायचीय. संपादकांकडे गेलो. त्यांना म्हटलेे तुम्हीच लिहा. ते म्हणाले तू लिही. मला धक्काच बसला. मी कसा लिहू शकेन? ते म्हणाले, तू लिहून मला दे, मी बघतो पुढे काय करायचे ते.त्या दिवशी रात्र जागलो. लेख लिहायचा आणि चांगला झाला नाही म्हणून फाडून टाकायचा. असे पाच वेळा झाले. शेवटी पहाटेच्या सुमारास कसाबसा लेख पूर्ण करून झोपी गेलो. सकाळी संपादकांना दाखवला. त्यांनी किरकोळ दुरुस्त्या करुन मथळा दिला - ‘मृत्युदूताचे पुनरागमन’. आणि कव्हर स्टोरी करण्याची सूचना दिली.कव्हर स्टोरी छापून आली आणि मी लेखक झालो. तेव्हाचे आमचे कार्यकारी संचालक संजय कुलकर्णींसह अनेकांचे शाबासकीचे फोन आले.

माझा आत्मविश्‍वास वाढला आणि मी लिहू लागलो. माझ्या लेखी तरुण भारत म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढविणारी संस्था ठरली आहे.गेल्या सात वर्षांत जीवनावर ठसा उमटविणारे अनेक प्रसंग घडलेत. समिधा ग्रंथाची निर्मिती हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. श्रीगुरुजी यांच्या जीवनकार्यावरील या ग्रंथाच्या निर्मितीने अनुभवविश्‍व समृद्ध केले. अरुण रामतीर्थकर, अरविंद जोशी, अरुण करमरकर, अनिल कुलकर्णी यांच्यासारख्यांचं केवळ मार्गदर्शनच नाही तर प्रेमही मिळवू शकलो. जीवाभावाचे पत्रकार मित्र मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष परिचय नसतानाही केवळ हिंदुत्व विचारांशी असलेल्या बांधिलकीपोटी, तरुण भारतचा पत्रकार आहे म्हणून हृदयापासून प्रेम करणारे शेकडो वाचक भेटले. या वाचकांचे लेखांवरील अभिप्राय ही कामाची ऊर्जा बनली आहे.कॉलेज जीवनात विवेकानंद केंद्राचे काम करीत असताना वैचारिक बैठक पक्की होत गेली. कॉलेज जीवनात अधाशासारखं वाचत गेलो. त्या वाचनाचा आज प्रत्यक्ष लिखाणात उपयोग होत आहे.‘जनभ्रांती को युक्ती-बुद्धीसे सहज रूप में दूर करे... संघटना का रूप देखने एकत्रित नित हुआ करे...’ या ओळींप्रमाणे आजच्या वैचारिक आक्रमणाच्या काळात जनभ्रांती दूर करण्याकामी तरुण भारतच्या माध्यमातून मी माझा खारीचा वाटा उचलतोय याचे समाधान आहे. आज तरुण भारत रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. तरुण भारतवर प्रेम करणार्‍या हजारो सर्वसामान्य वाचकांनी यापुढेही तरुण भारतवर सक्रीय प्रेम करावे असे आवाहन याप्रसंगी करावेसे वाटते. धन्यवाद!

-सिद्धाराम भै. पाटील ९३२५३०६२८३

रामदेव बाबा यांच्यासमवेत सिद्धाराम पाटील(स्वत:), माजी संपादक अरुण करमरकर आणि विजयकुमार पिसे. (छाया: शिवकुमार पाटील)

No comments:

Post a Comment