Pages

Wednesday, October 5, 2011

ओ... जेरुसलेम!

अलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. 'रूट्स'. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्रिकन पूर्वजांची पाळं मुळं शोधून काढतात. अक्षरश: खिळवून ठेवते ही कादंबरी. मुळांशी घट्ट बांधलेलं असणं हा मानवी स्वभाव असेल कदाचित; पण ज्यूंच्या बाबतीत हे बंध इतरांहून खूप घट्ट आहेत. आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि धर्माशी असलेलं हे नातं त्यांनी प्रसंगी रक्ताची किंमत देत कायम ठेवलंय. गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीने याचाच प्रत्यय पुन्हा दिला. मणिपूर आणि मिझोराममधील सात हजार २०० ज्यू इस्त्राएलला परत जाणार आहेत. भारतातून तिकडे जाणारी ही आजवरची ही सगळ्यात मोठी तुकडी आहे. त्यांच्या जाण्यानं तिथलं त्यांचं नामोनिशाण पुरतंच मिटून जाईल! 
इसाएलने दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर विखुरलेले ज्यू सातत्याने वाळवंटातल्या त्या वैराण भूमीवर जमा झाले. अपार कष्ट आणि दुर्दम्य जिद्दीच्या बळावर त्यांनी हा देश जगाच्या नकाशावर ताठ मानेनं उभा केला. जगभरातल्या बांधवांना परतण्याचं निमंत्रण दिलं. मायभूमीकडे परतीच्या या प्रक्रियेला ते 'अलियाह' म्हणतात. या अलियाहमधूनच ईशान्य भारतातले १७०० ज्यू आधीच मायभूमीकडे रवाना झाले होते. २००७मध्ये हे स्थलांतर थंडावलं होतं, आता ते पुन्हा सुरू होतंय. तिथल्या संस्था या पाहुण्या ज्यूंचं जगणं सर्वार्थाने उभं करतात. आताही या मंडळींच्या पुनर्वसनाची जबाबदारी शवेई इसाएल या संघटनेनं स्वीकारलीय.
ईशान्य भारतातून इसाएलच्या वाटेवर असलेली ही ब्नेई मेनाशे जमात. सध्याचे मिझोराम मणिपूरमधले मिझो आणि कुकी आदिवासी. मूळ उत्तर इस्त्राएलमध्ये राहणारे. असायरियन्सने आता इस्त्राएल असलेल्या भूमीवर हल्ला केला तेव्हा तिथून १० जमाती परागंदा झाल्या, त्यापैकी ही एक. पशिर्या, तिबेट, चीन असा प्रवास करत ही मंडळी ईशान्य भारतात येऊन स्थिरावली, या गोष्टीला आता सत्तावीसशे वर्षं लोटली. काळाच्या ओघात बरेचसे ज्यू ख्रिश्चन झाले. आता पुन्हा एकदा ज्यू धर्म स्वीकारून ते मायभूमीकडे रवाना होताहेत.
ईशान्य भारतातल्या या नव्या स्थलांतराला मात्र केवळ बॅक टू रूट्स एवढाच आयाम नाही. गेल्या काही दशकांतलं तिथलं वातावरणही त्याला तेवढंच कारणीभूत आहे. मणिपूर मिझोराममधले आदिवासी सातत्याने नाकारलेपणाचं जीणं जगताहेत. देशााच्या इतर भागात वाहिलेलं विकासाचं वारं तिथवर कधी पोहचलं नाही. ना वीज, ना रस्ते, ना शिक्षण. दिल्लीची सत्ता मिळवण्यात या लोकांच्या मताने काही फरक नाही पडत हे ध्यानात आल्यावर हे निर्ढावलेपण वाढत गेलं. तिथला दहशतवाद आणि तो काबूत आणण्यासाठी मुक्काम ठोकलेल्या लष्कराच्या करड्या पाहऱ्यात सामान्य माणसाचं जगणं गुदमरून गेलं.
इस्त्राएलने या नव्या तुकडीसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर मणिपूरच्या एका युवकाची प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला, 'रोज बंदुकीचा धाक आणि संचारबंदीत श्वास गुदमरवण्यापेक्षा उरलेलं आयुष्यतरी आम्ही चांगलं जगू...'
ओ... जेरुसलेम' म्हणत इसाएलला निघालेल्या या ज्यू बांधवांना नव्या जगण्यासाठी शुभेच्छा देताना अपराधी वाटतंय, ते त्यामुळेच.
प्रगती
( महाराष्ट्र टाईम्स, ५ ऑक्ट. २०११ )

No comments:

Post a Comment