Pages

Friday, November 4, 2011

कष्टाशी तडजोड न करण्यातच जीवनाचे खरे सौंदर्य - प्रकाश पाठक

सोलापूर. दिव्य मराठी नेटवर्क. जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवी मूल्यांवर श्रद्धा, कष्टाशी तडजोड न करता निरंतर कष्ट करण्याची वृत्ती आणि समर्पण भावना असल्यास जीवन ख-या अर्थाने फुलते. याचवेळी वैयक्तिक अपमान विसरून सामूहिक अपमानाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही असला पाहिजे, असे मत भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार दिवाळी अंक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित 'आयुष्यावर ऐकू काही' या विषयावर पाठक यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-KOL-vivek-vichar-diwali-issue-2541614.html
यावेळी व्यासपीठावर केंद्राचे प्रांत संघटक विश्वास लापालकर, दीपक पाटील, विवेक विचार संपादक सिद्धराम पाटील आदि उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए पी जे कलाम, रघुनाथ माशेलकर, लता मंगेशकर आदी महापुरुष प्रसिद्धीत येण्यापूर्वी त्यांचे जीवन किती कष्टमय होते आणि त्यांचे जीवन कसे घडले, याचा वेध पाठक यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून घेतला.
आज ग्लामरच्या नावाखाली कोणतीही गोष्ट सहज आणि पटकन मिळाली पाहिजे असा विचार तरुणाईसमोर बळावताना दिसत आहे. या जेवणातील फोलपणा ध्यानात येईपर्यंत उशीर झालेला असतो म्हणून जीवनाकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. अशा शाश्वत विचारांना घरोघरी पोहोचविण्याचे कार्य विवेक विचार करीत आहे असे पाठक म्हणाले.
स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष साजरे करण्यासाठी देशात अनेक संस्था आणि संघटना पुढे येत आहेत. देशाचा आध्यात्मिक प्रवाह आणि विवेकानंदांचे देशभक्तीचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांना ही सुवर्ण संधी आहे. तरुणांनी अधिकाधिक संख्येने विवेकानंद केंद्राच्या सेवाकार्यांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वास लापालकर यांनी यावेळी केले.
विवेकानंद केंद्र हे एक वैचारिक आंदोलन आहे. वैचारिक स्पष्टता जपणारे, मनाला उन्नत करण्यास सहाय्य करणारे, देशभक्ती जागविणारे विचार घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न विवेक विचार मासिकाच्या माध्यमातून सुरु असल्याचे सिध्दाराम पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
विवेक विचार प्रसारात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रणव शेंडे, मधुलिंग पुजारी, योगेश सूर्यवंशी, महेश दिड्डी, कृष्णाहारी नक्का आदी तरुणांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रीशिवछत्रपती रंगभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास सोलापूरकर मोठ्या संख्येत उपस्थित होते. विवेक घळसासी, अरुण रामतीर्थकर, बसवराज देशमुख, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कुलकर्णी, गीत प्रा. शिवराज पाटील, प्रार्थना श्वेता और्संग यांनी केले.

No comments:

Post a Comment