Pages

Sunday, December 18, 2011

मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर...

निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअ‍ॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअ‍ॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.

त्यामुळे पक्षात सामूहिक नेतृत्व आहे. कालच उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी १४३ उमेदवारांची उमेदवारी निश्चित केली. रात्री १० ते ४ पर्यंत सर्वाशी चर्चा करून एकमताने उमेदवार निवडले. हा तर पक्षाच्या इतिहासातला चांगला रेकॉर्डच आहे. माझ्याजवळ सर्व माहिती होती. रिसर्च आणि डेव्हलपमेंट विंग आहे. पाच कंपन्यांकडून सव्‍‌र्हे करून घेतला आणि त्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार तिकिटे दिली. भाजपमध्ये व्यवस्थित आहे पण मीडियात पर्सेप्शन आहे. कदाचित आमच्यात काही कमी असेल पण बऱ्याच गोष्टींबाबत गैरसमज आहेत. ज्यांच्याशी जवळचे संबंध येतात त्यांचे गैरसमज दूर होतात. कोणत्याही स्थितीत नवी दिल्लीतील पुढचे सरकार १०१ टक्के भाजपप्रणीत एनडीएचे राहील, अशी स्थिती आहे.
गिरीश कुबेर - मग पंतप्रधानपदाचे काय?
नितीन गडकरी - पंतप्रधानपदाची अडचण नाही. ज्यावेळी निवडणुका लढवू तेव्हा पाहू. पक्षात अनेक नेते पंतप्रधानपदास पात्र आहेत. निवडणुकीनंतर नेता, मिळणारी संख्या पाहून ठरवू. पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी काही क्षणांचाच अवधी लागेल याची मला खात्री आहे.  नेता ठरविण्यात अडचण नाही. तो कठीण प्रश्न नाही. मात्र आज सर्व प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही.
गिरीश कुबेर - आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहात का?
नितीन गडकरी - मी इच्छुक नाही. माझ्यावर २०० जागा जिंकण्याची जबाबदारी आहे. मला अपघात झाला आणि मी नऊ महिने अंथरूणावर होतो. त्यानंतर उर्वरित आयुष्य बदलले. समाज आणि देशासाठी कार्य करण्याचा मानस मी नक्की केला आहे.
प्रशांत दीक्षित - पर्सेप्शनचे कारण असे दिसते की, भाजपची प्रत्येक विषयावरील भूमिका बदलत गेली. अनेकदा लोकप्रिय होण्याकडे भाजपचा कल राहिला. भाजप आपल्याला फसवतो, असे तुमच्या मतदारांना वाटते..
नितीन गडकरी - पक्षाची भूमिका बदललेली नाही. भाजप जेव्हा निवडणुका हरतो तेव्हा आम्हाला १९ टक्के मते मिळतात; आणि जेव्हा काँग्रेस वाईट स्थितीत हरते तेव्हा त्यांना २७ टक्के मते मिळतात. दोघांमध्ये केवळ आठ टक्के अंतर आहे. मी अध्यक्ष altझाल्यानंतर पाच क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित केले. अनुसूचित जाती, जमाती, असंघटित क्षेत्रात कामगार संघटना उभी केली. भारतीय जनता श्रमिक महासंघाचा कार्यक्रम झाला. दिल्लीत १५ ते २० हजार कामगार आले होते. आम्ही यामध्ये बुद्धिवाद्यांना सामावून घेतले, त्यामध्ये 'फ्रेण्डस ऑफ बीजेपी'ची मदत घेतली. मध्य प्रदेशमध्ये आदिवासींवर लक्ष केंद्रित केले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष आहे. सर्व आदिवासी जागा जिंकलो. ज्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला. इंडिया व्हिजन २०२५अंतिम टप्प्यात आले आहे. आमच्याकडे या वेळी २७ कक्ष आणि प्रकोष्ट आहेत. गूड गव्हर्नन्सपासून कार्यालयातील पद्धती बदलल्या आहेत. नव्या लोकांना भाजपपर्यंत  पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. तरुणांमध्येही पोहोचण्याचा प्रयत्न आहे. जेवढय़ा निवडणुका लढलो त्यामध्ये हवे तितके यश मिळाले नाही तरी सर्व निवडणुका गांभीर्याने लढल्या. माझा स्वभाव आहे की मन लावून काम करायचे. आम्ही मणिपूरच्या निवडणुकाही गांभीर्याने लढत आहोत. आता उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा या चारही राज्यांमध्ये आम्हाला कामगिरी करावयाची आहे. पंजाबमध्ये आमचेच राज्य आहे ते कायम ठेवणे हे आव्हान आहे. उत्तर प्रदेशात आम्ही चांगल्या स्थितीत येऊन प्रगती करून दाखवू.
संदीप आचार्य - काँग्रेसचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार हे मुद्दे घेऊन सत्तेत येणार का?
नितीन गडकरी - लोकशाहीत दोन पक्षात ध्रुवीकरण झाले, ते कसे इंटरप्रिट करावयाचे ते तुमचे काम आहे. लिहिणारे लिहितात, वाचणारे वाचतात, मत देणारे मत देतात. प्रत्येक मत  नकारात्मक आणि सकारात्मक आहे. आम्हाला केवळ नकारात्मक मतांवर निवडून यायचे नाही. आम्ही गाव, गरीब, कामगार, शेतकरी आणि आर्थिक मुद्दा याला प्रधान्य दिले आहे. २१व्या शतकाचे altराजकारण हे विकासाचे राजकारण आहे. यामध्ये दारिद्रय़ निर्मूलन, रोजगार निर्मिंती, शेती, ग्रामीण अर्थशास्त्र बदलवणे याला महत्त्व आहे. त्यामुळे यासाठी काय केले पाहिजे त्याचा विचार करीत आहे. सध्या ३२ विषयांवर डिफरन्स व्हॉट वी मेक अशी मालिका आम्ही तयार केली. त्यामध्ये प्रत्येक राज्यात आम्ही जे चांगले काम केले त्याचा समावेश आहे; जसे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत छत्तिसगडमध्ये सहा हजार कोटीचं धान्य विकत घेतले. मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर कोणी किती धान्य विकले ते कळते. सार्वजनिक वितरण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त केली. त्याची न्यायालयाने आणि पंतप्रधानांनीही तारीफ केली. गुजरातचा शेतीचा विकासदर १४ टक्के आहे. अशा ३२ विषयांवर काय फरक केला त्यावर लिहिले आहे. आमची ज्या राज्यांत सत्ता नाही, तेथे कदाचित कम्युनिस्ट किंवा अन्य पक्षांच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी केली. आतापर्यंत १७ परिषदा घेतल्या. पर्यटन विषयावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. मुंबई आयआयटीचे एक तज्ज्ञ आणि बी. सी. खंडुरी आणि मी रात्री १२ पर्यंत चर्चा केली. माझे स्वप्न आहे की पूर्ण उत्तराखंड, हिमाचल प्रदेशातील
वाहतूक विजेवर झाली पाहिजे. पाच हजार कोटींचे प्रकल्प बिनपैशानी बीओटीवर होऊ शकतात. त्याचवेळी जैवइंधन, सेंद्रीय शेती, निसर्गोपचार, योगविज्ञान आदी नवीन कल्पनांवरही काम सुरू आहे. कारण त्यामध्ये रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता आहे.
संदीप आचार्य - भाजपने राममंदिर मुद्दा सोडला का?
नितीन गडकरी - आम्ही राममंदिर म्हणालो तर तुम्ही हे पुन्हा मंदिराच्या मुद्दय़ावर आले असं म्हणाल. खरी गोष्ट अशी आहे की राममंदिराचा मार्ग आता स्पष्ट झाला आहे, कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो स्पष्ट आहे की तेथे रामाचा जन्म झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तीन मार्गापैकी एका मार्गाने यावर तोडगा निघू शकतो, असे मला वाटते. न्यायालयाचा निर्णय मान्य करणे, संसदेमध्ये दोनतृतीयांश मताधिक्याने घटनादुरुस्ती करणे किंवा हिंदू आणि मुस्लिम मिळून निर्णय करणे. आम्ही निश्चितपणे हा प्रयत्न करू की  पंचक्रोशीबाहेर मशीद व्हावी आणि इकडे मंदिर. आम्ही हिंदुत्व अथवा मंदिर हे राजकारणाचे विषय करू इच्छित नाही. हिंदुत्व हा आत्मा आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणते की हे 'वे ऑफ लाइफ' आहे. हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आम्ही त्याचे राजकारण करायचे नाही असे ठरविले. या विषयाबद्दल समर्थन आहे, पण इच्छा अशी आहे की समन्वयाने तोडगा निघावा.
संदीप आचार्य - काश्मीरच्या मुद्दय़ाचे काय?
नितीन गडकरी - काश्मीरबाबत एक कमिटी तेथे पाठविली होती. गुज्जर मुसलमान तेथे मोठय़ा संख्येने भेटले. मुळात त्यांची पद्धती हिंदू असल्याचे स्पष्ट केले आहे. काश्मीरमधील मुसलमान हिंदुस्थानात राहू इच्छितात. सुंदर पर्यटनस्थळ असून विकास झाला नाही, याचे कारण ३७० कलम आहे. १० हॉटेल्स टाकली तर हजारोंना रोजगार मिळेल. पण उद्योग, आयटी तेथे येऊच दिले जात नाही. त्यामुळे भारतातील उद्योगपतीला उद्योग सुरू करता येत नाहीत. परिणामी रोजगार नाही. तेथे आयटी, इंजिनीअरिंग महाविद्यालये उघडा, पर्यटनासाठी हॉटेल्स तयार करा, रोजगार मिळेल, प्रगती आणि विकास होईल. त्या लोकांना ते हवे आहे. पण काही राजकीय पक्ष तुष्टीकरणाचे व्होट बँकेचे राजकारण करतात त्यामुळे प्रश्न जटिल बनला आहे. आपण चीनमध्ये गेलो होतो, तेथे त्यांच्या अध्यक्षांना भेटलो. त्यांना सांगितले की, अतिरेकी आणि दहशतवाद हे जगापुढील आव्हान आहे. चीनमध्येही अतिरेकी संघटना तयार झाल्या आहेत. पाकिस्तानने स्वत:च्या देशाकडे लक्ष न देता हिंदुस्तानशी सीमेपलीकडून छुपा अतिरेकीवाद सुरू केला आहे. आपण हिंदुस्थानशी युद्धात तीनदा हरलो, त्यांच्याबरोबर जिंकू शकत नाही हे स्वीकारून पाकने हे थांबविले पाहिजे. काश्मीरमधील ज्या संघटना पाकला पाठिंबा देतात, त्यांच्याविरुद्ध सरकारने कठोर धोरण स्वीकारलेच पाहिजे.
गिरीश कुबेर - भाजप सातत्याने भूमिका बदलते याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'एफडीआय'बद्दलची भूमिका. भाजपची धोरणे प्रागतिक होती. मध्यमवर्ग हा पाया आहे तो तुटतोय, असे वाटते का? भूमिका बदलण्याचे कारण काय?
नितीन गडकरी - १०० टक्के 'एफडीआय'चे आम्ही मुळात समर्थन केले नव्हते. एनडीए काळात एक जाहीरनामा निघाला. त्यामध्ये एफडीआय २६ टक्क्यांपर्यंत आले होते. आपला विकासदर सात टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. आपली निर्यात वाढली पण आयातच एवढी वाढली की रुपयाचे अवमूल्यन झाले. शेतीचा विकासदर २.४ वर आला. बेरोजगारी, अन्नधान्य१२ टक्क्यांनी महागले. जगात अमेरिका, इंग्लंड ,मलेशिया, चीन, सिंगापूर यांचे इन्फ्लेशन तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. जपानमध्ये शून्य आहे. आज 'एफडीआय' होते ते देशाबाहेर जात आहे. जे भारतीय गुंतवणूकदार आहेत तेही बाहेर जात आहेत. त्याला कारण भ्रष्टाचार आहे. 'एफडीए'ला मुळात आमचा विरोध नाही. सध्याच्या आर्थिक स्थितीत किरकोळ बाजाराच्या क्षेत्रात एफडीए आला तर येथे बेरोजगारी वाढेल. मुळात, पाच कोटी परिवार असे आहेत की जे आज छोटय़ा उद्योगात आहेत. आपल्या देशात दरवर्षी १० हजार कोटींची फळे सडतात, ५८ हजार कोटींचे अन्न सडते. 'एफडीए' कंपन्या शीतप्रकल्प, गोदामे टाकणार का? सौरऊर्जेत 'एफडीए' आणायचे असेल तर आणायलाच पाहिजे. एफडीए रिटेलमध्ये आणण्यास विरोध आहे, कारण बेरोजगारी वाढत आहे. एफडीआय पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अटलजींच्या काळात राबविली. आजही त्याबाबत प्रगतशील विचारांचे आम्ही आहोत, भूमिकेत आम्ही बदल केला नाही.
गिरीश कुबेर - एफडीआयला विरोध करता तर रिलायन्स, बिर्ला, टाटा मॉल्सना विरोध का करत नाही..
नितीन गडकरी - कारण हिंदुस्तानी उद्योगपतींना हिंदुस्तानात मॉल टाकण्याचाअधिकार आहे. मुळात ही गोष्ट खरी आहे की मोठय़ा रिटेलवाल्यांमुळे छोटे अडचणीत येतात. त्यामुळेच आमचे म्हणणे असे आहे की, रिटेलमध्ये एफडीआय आणण्यासाठी ही अतिशय चुकीची वेळ आहे. पंतप्रधान अर्थशास्त्रज्ञ असूनही अयोग्यवेळी ते निर्णय घेतात. आपली निर्यात वाढेल, पण अशा स्थितीत एफडीआय आणल्याने ग्रामीण, शहरी भागात रोजगारावर परिणामच होणार आहे.
प्रशांत दीक्षित - पर्सेप्शनच्या अनुषंगाने विचारतो, अटलजींचे सरकार आले तेव्हा पूर्वीपेक्षा वेगळ्या धोरणांनी काम करायला तुम्ही सुरुवात केलीत. अमेरिकेशी जुळवून घेतलेत. तरुणांच्या आकांक्षा पूर्ण होतील अशी पावले टाकलीत. आता मात्र तेच तुम्ही अमेरिकेला नाही म्हणताय. अणुकराराला विरोध करता. मग सध्याचा प्रवास अटलजींनी दाखविलेल्या स्वप्नांच्या विरोधात आहे का?
नितीन गडकरी - मी बीओटीचा जन्मदाता आहे. ठाणे-भिवंडी आणि एक्स्प्रेस मार्ग केला. त्याच माध्यमातून मी १६ हजार गावांत पक्के रस्ते करू शकलो. मुंबईच्या उड्डाणपुलांसाठी भांडवली बाजारपेठेतून पैसा उभा केला. माझे पाच ऊर्जाप्रकल्प आहेत. तेथे मी आज ४ रुपये दराने वीज देतो . न्यूक्लिअरची वीज निर्मिती खर्च प्रति मेगावॉट किमान १५ कोटी रुपये आहे. त्यामुळे त्याची किंमत १४ रुपये प्रतियुनिट दर होईल. ही वीज कशी घेणार? दुसरीकडे कोळशाच्या खाणी बंद करता. त्यासाठी सगळा मीडिया चार पानांचे लेख लिहितो. आज देशात चांगला कोळसाच नाही, ४०टक्के त्यामध्ये राख आहे. इंडोनेशियाने किंमत वाढविली. पर्यावरण हवे पण त्याबरोबर विकासही हवा असं म्हणता तर ते कसे शक्य होणार. पाणी, वीज आणि दळणवळणाची साधने असल्याशिवाय उद्योग येणार नाहीत. जे चुकले त्यांच्यावर कारवाई करा. सरकार निर्णय घेत नाही. निर्णय घेतला तर न्यायालय काम करू देत नाही. पुलांबाबत सव्वाशे रिट याचिका न्यायालयात केल्या जातात. वरळी-वांद्रे पुलाबाबत मासे मरणार, altअसे मीडिया सहा कॉलम लिहू लागला. त्यामुळे मीडियाला एकदा माहीमच्या खाडीत नेले तेव्हा नाक दाबायला लागले. गटारात कधी मासा राहतो का, हेच तुम्हाला सांगतो आहे, असे आपण मीडियाला सांगितले. मग तो सागरी सेतू बांधला. प्रथम डॉ. आंबेडकर, त्यानंतर स्वा. सावरकर स्मारकाला धोका असल्याची ओरड झाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्थगिती दिली. ४२० कोटींचा पूल १७००कोटीत गेला. शेवटी तुम्हालाच टोल द्यावा लागणार. विकासाच्यासोबत पर्यावरणही राखायला हवे, हे मान्य. पण काहीवेळा त्याबाबतही अतिरेक होतो. महाराष्ट्रातील ८० टक्के जंगल विदर्भात आहे. जंगल म्हणून लिहिले आहे, पण तिथे एकही झाड दिसत नाही. इंग्रजांच्या काळात महसूल नसलेल्या जमिनींचा झुडपी जंगल असा उल्लेख झाला. आज तेथे एकही झाड नाही, पण जंगल असा उल्लेख आहे. ज्या ठिकाणी मी बायोमासपासून वीज तयार करतो. पण या प्रकल्पासाठी मला जमीनच मिळत नाही, कारण कागदोपत्री ते जंगल आहे. मला तर तेथे झाडे लावायची आहेत. या प्रकल्पातून ४०० मेगाव्ॉट वीज तयार करतो, पण फॉरेस्ट आहे, असे सांगतात. जुने कायदे बदललेच नाहीत तर प्रकल्प होणार कसे? जलसिंचनाचा गोसीखुर्द प्रकल्प आज १२ हजार कोटी रुपये किंमत झाली. ६७० कोटींचा प्रकल्प १२ हजार कोटीवर गेला. पैसा कोणाचा, किती मोठा भरुदड. पूल बांधले तर काँक्रिट जंगले गेली म्हणता. नाही केले तरी बोलता. दोन्हीकडून तबला. महत्त्वाच्या गोष्टींवर मीडिया, राजकीय नेते, पक्ष यांची दिशा एक असेल तर प्रगती होईल आणि विकासाचा दर नक्की वाढेल. सर्वानी मदत केली पाहिजे. मी एकटय़ा मेधा पाटकरांचे ऐकले असते तर एकही पूल मुंबईत झाला नसता, एक्स्प्रेस हायवे कधीच बांधला गेला नसता. १०० वर्षांपूर्वी लाल, काळ्या रंगांच्या घारी पाहिल्या होत्या. एक्स्प्रेस केला तर घारी उडतील, म्हणून तो करू नका, अशी मागणी करणारी एक रिट याचिका होती. त्यावरही इंग्रजी पेपरनेही सहा कॉलम लेख घारींवर लिहिले. दरवर्षी अडीच हजार लोक मरायचे त्या रस्त्यावर, त्याबद्दल कुणालाच काही वाटत नव्हते. मी पुढाकार घेतला तेव्हा एका राजकीय नेत्याचा मुलगा गेला म्हणून तुम्ही हायवे बांधायला आलात असे म्हणाले. कपाळावर हात मारला. दीड वर्षे निर्णय लटकून राहिला.. त्यामुळेच काही गोष्टींवर एकवाक्यता हवी, असे वाटते.
गिरीश कुबेर - अलीकडे प्रणव, सोनिया, पवार अशा तुमच्या भेटी वाढल्या आहेत.. लंडनलाही पवारांबरोबर झालेल्या तुमच्या भेटीची खमंग चर्चा आहे.
नितीन गडकरी - पवारांशी लंडनमध्ये भेट झाली हे खरे आहे. तेथे भारत इंग्लंड क्रिकेट सामना होता. तेथे त्यांना भेटलो. मी काही २४ तास राजकारण करीत नाही, करायचेही नाही.  निवडणुकीच्या दिवसात राजकारण केल्यानंतर माझ्या डोक्यात राजकारण राहात नाही. मी पवारांशी बोललो. विषय शेती हाच होता. दरवेळेला राजकारण नसते. आम्ही मित्र आहोत. निवडणुकीत त्यांनी त्यांचा, आम्ही आमचा प्रचार करू. आता प्रणब मुखर्जींनी रसगुल्ला दिला तो कडू होता की गोड, असेही विचाराल.
सुहास गांगल - पवार शेतकऱ्यांचे मसीहा आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी - ते मोदीच सांगू शकतील. मला माहिती नाही. शरद पवारांना शेतीतील खूप समजते, पण कृषिमंत्री म्हणून ते यशस्वी झाले नाहीत. ते बोलतात, प्रश्न माहिती असतात, पण अंमलबजावणी करीत नाहीत. आज शेतकऱ्यांची राज्यातील स्थिती वाईट आहे. शेजारील गुजरातमध्ये एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. भाजप आणि मोदींच्या नावे प्रसारमाध्यमे खडे फोडत असली तरी गुजरातचा विकासदर १४ टक्के आहे, हे आपण लिहितो का? तिथे मुस्लिमांचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. महाराष्ट्राला सहकार चळवळीचा वारसा लाभला आहे. आपण शेतीचे तज्ज्ञ मंडळी आहोत. पण मग त्याचा उपयोग काय? उत्तर प्रदेशात पाणी, जमीन चांगली आहे. नुसती पिकाची एक जात बदलवली तर तेथील उत्पन्न सहा हजार कोटी रुपयांनी वाढेल. आपण सिंचनाला प्राधान्य दिले नाही. ज्या दिवशी भाजपचे राज्य येईल तेव्हा आमचा पहिला निर्णय असेल, सिंचन आणि पाटबंधारे यांना केंद्र व राज्याच्या संयुक्त सूचीमध्ये आणले जाईल. तसे झाले तरच लोक पुन्हा एकदा गावाकडे जातील.
प्रशांत दीक्षित - राज्यांना वाजवीपेक्षा अधिक अधिकार दिल्याने भारतात केंद्र सरकार सक्षम राहिलेले नाही. त्यामुळे लोकशाही दुर्बळ झाली आहे, असे मत मलेशियाचे पंतप्रधान महातीर यांनी व्यक्त केले होते..
नितीन गडकरी - लोकशाही दुर्बळ झाली नाही. प्रॉब्लेम नेत्यांचा आहे. प्रश्न लोकशाहीचा नाही, नेतृत्वाचा आहे. महातीर यांनी तयार केलेले मलेशियाचे व्हिजन २०१२ हे पुस्तक माझ्या हाती आले. २०१२ पर्यंत शेती, क्रीडा, उद्योग, वाहतूक अशा सर्व क्षेत्रात त्यांच्या देशाची व्हिजन काय असेल याचा उल्लेख होता. मुख्य म्हणजे त्यांनी ते अमलात आणले. आपल्या देशातही आपण सगळ्यांनी मिळून काही केले पाहिजे. वीजक्षेत्रात प्रॉब्लेम नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अनेक गावात १४, १६ तास वीज नाही.
प्रशांत दीक्षित - पण तुमचा मित्रपक्ष शिवसेना म्हणतो की वीज विकत घेऊ.
नितीन गडकरी - वीज नाहीच आहे. त्यांचे काय म्हणणे ते तेच सांगतील. माझे म्हणणे हे की राज्याला विजेची गरज आहे. त्याशिवाय शेती, उद्योग, विकास नाही. सहा हजार मेगावॉटचे जलविद्युत प्रकल्प हिमाचलमध्ये, पाच हजारचे उत्तराखंडमध्ये पर्यावरणाच्या मुद्यावर अडकून पडले आहेत. १८ हजार मेगावॉटचे प्रकल्प असून त्यांचा दर २५पैसे प्रति युनिट पडतो. आपल्या देशात जलविद्युत करू दिली जात नाही. थर्मलला प्रदूषणामुळे विरोध होतो, न्यूक्लिअर खर्चिक म्हणून विरोध. सगळ्यांना विरोध, मग वीज आणायची कोठून? हाताने वाजवून काढायची का?
गिरीश कुबेर -भाजपमध्ये नेत्यांचीच संख्या जास्त असल्यामुळे नेतृत्वाबाबत काँग्रसपेक्षा उलटी समस्या आहे.
नितीन गडकरी - नाही. तुम्ही पाहा सर्व कामगिरीवर बक्षिसे मिळाली ती  कोणाला तेपाहा. बिहारमध्ये ११टक्के जीडीपी पोहोचला, मध्यप्रदेश जे बिमरू राज्य होते ते ८.५टक्क्यांवर पोहोचले. मी असा दावा नाही करीत की आमच्यात सर्व आलबेल आहे. अजून पुष्कळ गोष्टी सुधारण्याची गरज आहे. माझा गुड गव्हर्नन्सवर भर आहे. पॉवर, कम्युनिकेशनमध्ये खाजगी, सार्वजनिक गुंतवणुकीला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मी बद्रिनाथ केदारनाथ यात्रा केली तेव्हा वाईट वाटले. मी मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो होतो. २०० पोलीस आमच्या सुरक्षेसाठी होते. त्या अडचणीत जाणारे लोक आवाज देत होते आम्ही महाराष्ट्रातून आलो आहोत. तुमचे हे राज्य दुरुस्त करा.. मी मुख्यमंत्र्यांना म्हटले बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री जमनोत्री हे जगातील चांगले पर्यटनस्थळ झाले पाहिजे. डेहराडून एअरपोर्टवर उतरून दोन दिवसांत बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री-जमनोत्री यात्रा होऊ शकते. सकाळी डेहराडून तेथून हेलिकॉप्टरने हरिद्वार, हृषीकेश करून दोन दिवसांत पुन्हा परत असे पॅकेज केले तर आज इतकी गर्दी आहे की १०० हेलिकॉप्टर रोज चालतील. रोजगार संधी उपलब्ध होतील. पर्यटन हे असे क्षेत्र की ४९ टक्के गुंतवणूक होईल. उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनावर भर द्यायचा. त्याला प्रतिसाद मिळेल. अजित गुलाबचंदला भूतानमध्ये हिलस्टेशन करण्याची ऑफर आहे. मी म्हटले चिखलदऱ्यात करा. मी सांगतो की, पर्यायी महाबळेश्वर प्रकल्प तयार केला होता. तेथे साडेतीन हेक्टर जागा घेतली होती. आज जागा मिळत नाहीत. हॉटेल्स नाही, हेलिपॅड नाहीत. या गोष्टी केल्या तर रोजगार मिळेल. लवासाच्या ठिकाणी तुम्ही नियम पारदर्शक करा. एकटय़ा लवासाने किती रोजगार दिला. त्यामध्ये चुका झाल्या त्या दुरुस्त करा. आज बेरोजगाराचा प्रश्न आहे. सगळ्याच प्रकल्पांना विरोध केला तर गरिबी कशी दूर होईल. पर्यटन क्षेत्रासाठी सरकारकडे पैसे नाहीत. गडकरी तुम्ही आता सरकार बीओटीवर कधी देणार असे त्यावेळी मला विरोधक विचारत होत. मात्र आता या सरकारचा एकही प्रकल्प
बीओटीशिवाय येत नाही.
गिरीश कुबेर - ब्रिजभूषण गडकरी असे नाव त्यावेळी आपल्याला पडले होते.पण रस्त्यावरचे ब्रिज झाले. भाजपच्या नेत्यांमध्ये ब्रिज बांधण्याचे काम केव्हा करणार?
नितीन गडकरी - दोन वर्षांत वर्तमानपत्रात टेबलावरून किती स्टोऱ्या आल्या. भाजपमध्येही ब्रिज बांधले गेले आहेत. पत्रकारांशी कमी बोलणे हे उत्तम राजकीय नेत्याचे लक्षण आहे, असे मी मानतो. हा सल्ला मी आमच्या पक्षातील नेत्यांनाही देतो. दिसला टीव्ही की दे इंटरव्हयू हे आता कमी झाले पाहिजे. पक्षातील वातावरण चांगले आहे. संसदीय पार्टी चांगले काम करते. आम्ही लोकशाही पार्टी आहोत. पितापुत्र, आई मुलाची पार्टी नाही. एक मालक बाकीचे नोकर अशी स्थिती नाही.
दिनेश गुणे - मग गडकरी, मुंडे, तावडे असे गट का?
नितीन गडकरी - असा एकही गट नाही. तसे तुम्हीच म्हणता.
सुनील चावके - संघाचा एफडीआयला विरोध आहे, त्यामुळे तुम्ही विरोध करता. संघाने तुमची नियुक्ती केली आहे म्हणून..
नितीन गडकरी - आर यू अपॉइण्टेज बाय आरएसएस असे कोणी विचारले की मी त्यांना विचारतो की तुमच्याकडे नियुक्तीपत्र आहे का?
सुनील चावके - येथे अनेक मोठे नेते आहेत, जे संघाच्या मागे धावतात..
नितीन गडकरी - मी तोडफोडवाला आहे. संघ काहीही बोलत नाही. मी कोणाच्या आदेशाने कोणतेही काम कधीही केले नाही. कोणाचे ऐकून काम करण्याचा माझा स्वभाव नाही. संघ, विद्यार्थी परिषद हा माझ्या आयुष्याचा भाग आहे. मी दबंग माणूस आहे. मला एकदाही संघाने आदेश दिला नाही. माझ्या दोन वर्षांच्या काळात एकदाच सांगितले की मोदी अडचणीत आहेत, त्यांच्यामागे ताकदीने उभे राहा. याशिवाय काहीही संघाने सांगितले नाही. तुम्ही संघाबद्दल इतके चुकीचे लिहिता. कोणाहीबद्दल लिहा, पण वास्तव तपासून पाहा. मीडिया महत्त्वाचा आहे. लिहायचे त्यांनी लिहा पण त्याची जबाबदारी घ्यावी. खरे असेल तर छापा. नाही ते कसे लिहिता. त्यामुळे कायदा आला पाहिजे. मी कट्टर संघवाला आहे. मला संघामुळे आयुष्यात दृष्टिकोन मिळाला. मी संघाचा पेहराव म्हणजे धोतर नेसत नाही, टिळा लावत नाही, टोपी घालत नाही, मग तरीही संघाचा कसा. मला जे वाटते ते कपडे घालतो. इमेज वर्सेस पर्सेप्शन आहे या गैरसमजातून हे म्हटले जाते.
गिरीश कुबेर - संघाचे संस्कार असलेला मोठा वर्ग पक्षात आला तरीही अन्य पक्षांप्रमाणे तुमच्याकडेही काही वाईट प्रवृत्ती दिसतात..
नितीन गडकरी- सगळ्या पार्टीत चांगले-वाईट असतातच. समाजातील सगळ्या क्षेत्रात आहेत. मीडियात नाही आहेत का? आयएएस अधिकाऱ्याला राजकारणात या असे सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला. आम्ही अनेक लोकांना उमेदवारी देऊ करतो. पण ते तयार नसतात. राजकारण कसे आहे की, विद्वान किंवा विचार करणाऱ्या लोकांवर आमचा भरवसा नाही. माझ्या गावात मी नेता आहे का, तर मी इंटकचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो. भाई और बहनो, दुनियाके मजदूर एक हो, अशी सगळ्यांना समजते ती भाषा बोलावी लागते. काम करणारे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचा स्तर निर्माण केला पाहिजे, त्यामध्ये आम्ही कमी पडलो आहेत.
प्रशांत दीक्षित - काँग्रेस-भाजपमध्ये आठ टक्क्यांचा फरक असतो तर मग काँग्रेसच का टिकते?
नितीन गडकरी - काँग्रेस पार्टी अशी की ज्यांच्या आईवडिलांची प्रॉपर्टी भरपूर त्यामुळे मुलांकडे कर्तृत्व नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची वडिलांची प्रॉपर्टी कमी पण मुले कर्तृत्ववान (हंशा). आमची पार्टी अशी की आम्ही गरिबीतून आलो. आम्ही दोन होतो, परिश्रमाने वरती आलो. आता ३६ टक्के लोकसंख्या एनडीएकडे आहे. मला वाटते की आम्ही अजून वाढू.
सुनील चावके - २०० जागांचे लक्ष्य कोणत्या राज्यातून पूर्ण करणार ?
नितीन गडकरी - मी उलटा प्रश्न विचारतो, काँग्रेसला अनुकूल अशी राज्ये कोणती ते सांगा. आज एक-दोन राज्ये तामीळनाडू, आंध्र प्रदेशात काँग्रेसचे राज्य आहे. राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात गेल्यावेळी ७० पैकी केवळ ७ जागा जिंकल्या. यावेळी ३५-४० जागा जिंकू. राजस्थानात आम्ही सगळ्या जागा जिंकू अशी स्थिती आहे. सव्‍‌र्हे चांगले आहेत. महाराष्ट्रात एकदोन जागा वाढतील. मध्यप्रदेशात ५-६, गुजरातमध्ये ४- ५ जागा वाढतील. काही ठिकाणी ४ -५ कमी होतील. पण एकूणच उत्तर प्रदेश महत्त्वाचा आहे. या वेळी निवडणुकीतून चित्र
स्पष्ट होईल.
गिरीश कुबेर - भाजपला जातीयवादी म्हटले जाते?
नितीन गडकरी - जोपर्यंत भाजपच्या जागा १७० येत नाहीत तोपर्यंत आम्ही जातीयवादी आहोत. पण १७० च्या वर जागा निवडून आल्या तर आमच्याभोवती पिंगा
घालतील की नाही ते पाहा.
दिनेश गुणे - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे काय?
नितीन गडकरी - त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे काय आरोप आहेत ते सांगा. लोकायुक्तांनी रिपोर्ट दिला, तो वाचा. मुंबईत डिनोटिफिकेशन ऑफ लॅण्डच्या हजारो केसेस आहेत. त्यामुळे इट इज प्रिव्हिलेज ऑफ सीएम. आता एस. एम.कृष्णा, धरमसिंगविरुद्ध एफआयआर दाखल करावयास सांगितला आहे. लोकायुक्तही शेवटी व्यवस्थित हवा. नाहीतर उद्या प्रॉब्लेम होईल. न्यायपालिकेतही प्रॉब्लेम आहेत. सगळं आलबेल नाही. त्यामुळे लोकायुक्तांनी रिपोर्ट दिल्यावर व्यवस्थेचा आदर राखण्याच्या दृष्टीने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. येडियुरप्पांना हटवा असे बोलणारे काँग्रेसचे
प्रवक्ते आता कृष्णा, धरमसिंग यांच्याबाबत काहीच का बोलत नाहीत. सीबीआयचा गैरवापरही अनेक ठिकाणी आहे.
प्रशांत दीक्षित - विकासाच्या आड इतक्या गोष्टी येतात. आता लोकायुक्त आणि लोकपाल येणार त्यांना भाजप पाठिंबा देणार का ?
नितीन गडकरी - देशातील वातावरण भ्रष्टाचारविरोधी आहे. भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई हवी ही लोकभावना आहे. मी सर्व लोकप्रतिनिधींना सांगितले की, राजकारण हा पैसा कमाविण्याचा धंदा नाही. तुमचे घर बरोबर चालवा मग राजकारणात या. जो घर चालवू शकत नाही, तो देश काय चालविणार. नोकरीधंदा करा, उपाशी पोटाने राजकारण करता येत नाही. इतकी कठोर भूमिका स्वीकारली आहे. आमच्या पक्षात १०१ टक्के लोक प्रामाणिक आहेत असा आमचा दावा नाही. पण प्रामाणिक प्रशासन, पारदर्शकता, विकास कामे कशी होतील त्याचा प्रयत्न करू.
सुनील चावके - अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत काय ?
नितीन गडकरी - अण्णांची चळवळ आहे. त्यांना पाठिंबा आहे. काही मुद्दय़ांमध्ये तथ्य आहे. केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, शांतीभूषण, मी, अडवाणीजी, सुषमाजी, अरुण जेटली यांनी बसून त्यांना आमचे मुद्दे सांगितले. त्यांनी ८० टक्के मान्य केले. अण्णांच्या काही मागण्या आम्ही मान्य केल्या. सरकारला सांगितले की, या मान्य करायला हरकत नाही. उद्या लोकपाल हा प्रधानमंत्र्यांचे फोन टॅप करू शकेल हे मात्र योग्य नाही. मला असे वाटते की काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी बसून देशहिताचा तोडगा काढावा आणि सरकारने तो स्वीकारून हा विषय संपवावा. विकास झाला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, ही जबाबदारी चार स्तंभांवर आहे. काही गोष्टीत किमानसगळ्यांनी मिळून एक दिशा घेतली पाहिजे. विविध पक्ष, मीडिया, न्यायपालिकेनेही भूमिका घेतली पाहिजे.
दिनेश गुणे - काळया पैशांबाबत चर्चा आहे, त्याबद्दल भूमिका काय?
नितीन गडकरी - ८५० नावांची यादी आहे. माझे म्हणणे आहे की, एकदा क्लिअर करा. पत्रकार, शिक्षक, कोणीही असो एकदा यादी जाहीर करा.
सतीश कामत - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी २०१४ पर्यत राष्ट्रीय राजकारणात येणार का ?
नितीन गडकरी - आमच्या पक्षाचे ते लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानपदासाठी जी नावे आहेत, त्यामध्ये मोदींचेही नाव आहे. अडवाणी, जेटली, सुषमाजी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग अशी नावे आहेत.
सुनील चावके - पंतप्रधानपदाचा चेहरा हिंदुत्ववादी असेल की?
नितीन गडकरी - आमची लोकशाही पार्टी आहे. मुख्य संपादकाभिमुख नाही तर वार्ताहराभिमुख पक्ष आहे. (हशां)
सतीश कामत - अडवाणी यांच्या रथयात्रेला यंदा प्रतिसाद दिसला नाही?
नितीन गडकरी - रथयात्रेला प्रतिसाद चांगला मिळाला, त्याची दोन कारणे आहेत. लोकांच्या मनात काळ्या पैशांबद्दल चीड आहे. देशाच्या विकासासाठी हा पैसा आला पाहिजे. भ्रष्टाचाराबाबत, महागाईबाबत असंतोष आहे.
सुनील चावके - अण्णांच्या आंदोलनाचा लाभ घेणार का ?
नितीन गडकरी - अण्णांच्या आंदोलनाचा फायदा हवा, असे मी कधीही म्हटले नाही. थोडा राजकारणाच्या वर जाऊन विचार करतो. आमच्या लोकांनी निवडून आले पाहिजे. हा देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी अण्णा आंदोलन करीत आहेत त्याला पाठिंबा देऊ, पण आम्ही त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी कागद घेऊन जाणार नाही. चांगले काम करणाऱ्याला पाठिंबा देऊ.
सुनील चावके - याचे निकालांवर परिणाम होतील ?
नितीन गडकरी - निकाल काहीही लागोत आपण प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले पाहिजे.
सतीश कामत  - उत्तर प्रदेशात कायम धरसोडीचे राजकारण पक्षात सुरू असते. उमा भारती, कल्याणसिंग यांची उपयुक्तता काय असा मुद्दा पुढे आला आहे.
नितीन गडकरी - 'ओल्ड इज गोल्ड' असे म्हणतात. पण आता वेस्ट इज गोल्ड  असे म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ करण्याचे काम करावयाचे आहे. माझ्याकडे कचऱ्यापासून वीज तयार होते आहे. आमच्या कारखान्याला बक्षीस मिळाले. आता नथिंग इज वेस्ट, टाकाऊ नाही. पक्षात सर्व प्रकारचे कार्यकर्ते हवेत. विद्वानही पाहिजेत आणि पैलवानही. प्रत्येकाची उपयुक्तता आहे. उमाजींची प्रतिमा आहे. अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडून काम करून घेण्यात कमी पडत आहे का, हे मी बघतो. त्यानुसार प्रत्येकाला काम देण्याचा प्रयत्न करतो.
दिनेश गुणे- गोपीनाथ मुंडे आणि तुमची नेहमी चुकामूक कशी होते?
नितीन गडकरी - गोपीनाथ मुंडे माझ्याहून ज्येष्ठ नेते आहे. त्यांचा भाजपमध्ये पूर्ण सन्मान ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मनातील काही गैरसमज होते ते दूर झाले आहेत. त्यांना महाराष्ट्रात काम करण्यास सांगितले आहे. मी खरेच त्या दिवशी आजारी होतो. त्यामुळे केवळ मुंडे यांचीच भेट घेऊ शकलो नाही, असे नाही तर अन्य एका विवाह समारंभालाही उपस्थित राहू शकलो नाही.
गिरीश कुबेर- शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आपले दूरध्वनी घेत नाहीत. शिवसेना आता एक ओझं बनून राहिली आहे. पार्टी वाढण्यात अडथळा येतो आहे, असे वाटते का ?
नितीन गडकरी - आता युतीची भूमिका आहे ती महाराष्ट्र भाजप घेईल. मी अटलजींइतकेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानतो. त्यांच्याबद्दल आदर आहे. शिवसेना-भाजपचे संबंध चांगले आहेत. दोन पक्षात थोडय़ाबहुत कुरबुरी होतातच.
शेखर जोशी- महाराष्ट्रात महायुतीसमवेत मनसेला घेणार का?
नितीन गडकरी - महायुतीत रामदास आठवले यांना घेतले तेव्हा शिवसेना-भाजप दोघांनी मिळून तो निर्णय घेतला. त्यामुळे आता मुनगंटीवार, मुंडे, खडसे, उद्धव ठाकरे व रामदास आठवले यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. माझा उपयुक्ततावाद हा दिल्लीसाठी आहे.
सुनील चावके - मायावतींच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश कसा वाटतो?
नितीन गडकरी - मला वाटते उत्तर प्रदेशचे नुकसान जातीय राजकारणाने केले. माणूस जातीने नव्हे तर गुणाने श्रेष्ठ असतो. मी भाजप अध्यक्ष झाल्यावर जात, पंथ, धर्म, भाषा, लिंग यावर आधारित राजकारण न करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशाचा विकास altहाच आमच्या राजकारणाचा अजेंडा असेल. आम्हाला वाराणसी, अलाहाबादचा धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकास करायचा आहे. आमच्याकडेही पक्षात खूप लोक जातीबद्दल बोलतात. त्यांना सांगितले की हे बंद करा. यादव समाजाने नीतीशकुमार यांना विकासाच्या मुद्दय़ावर मते दिली. चांगले काम करणारे, रोजगार देणारे सरकार पाहिजे असे तरुण पिढीला वाटायला लागले आहे. जातीयवादाने उत्तर प्रदेशचे नुकसान झाले. मायावतींनी जातीय राजकारण केले आणि त्याला सोशल इंजिनीअरिंग असे नाव दिले. पण आता लोक कंटाळले आहेत. मुलायमसिंग यांचे गुंडाराज नको म्हणून ब्राह्मण- वैश्य- ठाकूर त्यांना मतदान करणार नाही. भाजप आणि काँग्रेस असे पर्याय आहेत. बिहारमध्ये सोनिया, राहुल गांधी जेथे गेले तेथे काँग्रेस हरली.
गिरीश कुबेर - पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत कोणती गोष्ट राहिली, कोणती केली?
नितीन गडकरी - पुष्कळ गोष्टी झाल्या. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. विकास प्रकल्प सुरू झाले. व्हिजन डॉक्युमेंट पूर्ण होत आले आहे. दिल्लीत दोन एकर जागेवर रिसर्च इन्स्टिटय़ूट काढतो आहोत. आनंदपूर साहिब येथे पाच टॉवर उभे करण्यात आले आहेत. ध्वनी आणि विजेच्या सहाय्याने ५०० वर्षांचा शिखांचा इतिहास तेथे जिवंत करण्यात आला आहे.  त्याप्रमाणे भाजपचा पूर्ण इतिहास दाखविण्याचे स्वप्न आहे. त्या कार्यालयासाठी एक लाख लोकांकडून ३० कोटी रुपये गोळा करावयाचे आहेत. परदेशातील फ्रेण्डस ऑफ बीजेपी, प्रत्येकाला सांगणार तुम्ही किमान १०० डॉलर, ५०० डॉलर, १० हजार, पाच हजार द्या. गरिबातील गरीब कमीत कमी एक लाख लोकांकडून पैसे घेऊन हे कार्यालय बांधायचे आहे, असे माझे स्वप्न आहे. कार्यकर्त्यांना लढा, आक्रमक व्हा, असे सांगितले आहे. राजकारण महत्त्वाचे आहे. जलसंधारण कार्यक्रम हाती घेतले आहेत. राजकारण म्हणजे सत्ताकारण ही व्याख्या बदलली पाहिजे. राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा आहे. विकास आणि सुशासन ही मोहीम आणि अंत्योदय हे आमचे उद्दिष्ट असून राष्ट्र प्रथम, नंतर पार्टी आणि नंतर मी असा क्रम असला पाहिजे. एका गोष्टीत यश नक्की मिळविले की दिल्लीत तिकीट वाटपाची गर्दी कमी झाली आहे.
सुनील चावके - जनसंघाच्या काळात इंदिरा गांधी यांचे जनसंघाशी सौहार्दपूर्ण संबंध होते..
नितीन गडकरी - संबंध सौहार्दाचेच असले पाहिजेत. मतभिन्नता असू शकते. सोनियांना सकाळीच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, सायंकाळी त्यांच्यावर टीकाही केली. विरोधी पक्षाच्या नात्याने माझे ते कामच आहे.
मधु कांबळे - सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा भाजपने सोडला..
नितीन गडकरी - आता त्या निवडून आल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी तो मुद्दा प्रकर्षांने मांडला होता.
प्रशांत दीक्षित - काँग्रेसपुढील मोठा प्रश्न कोणता आहे ?
नितीन गडकरी - भ्रष्टाचार, महागाई, काळा पैसा याबाबत काँग्रेस उत्तर देऊ शकत नाही. टूजी, कॉमनवेल्थ घोटाळा यामुळे काँग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अर्थशास्त्राच्या आघाडीवर वाईट स्थिती आहे. काँग्रेस आणि यूपीए आघाडी सरकारच्या पहिल्या टप्प्यांत डाव्यांमुळे धोरणे ठरवू शकत नाही असे म्हणण्यास वाव होता. पण यूपीए सरकारच्या दुसऱ्या टप्प्यांत तसे नाही. अटलजींनी एनडीच्या काळात केलेला कारभार, ग्रामसडक योजना, ऊर्जाप्रकल्प, किसान क्रेडिट कार्ड योजना, निर्यातीत वाढ झाली, विकासदर वाढला. त्यामुळे अटलजींच्या काळातील भारत आणि सोनियांच्या काळातील भारत यामध्ये मोठा फरक आहे. आम आदमीच काँग्रेसने संपविला. प्रधानमंत्री अर्थशास्त्रज्ञ आहेत, पण ते आर्थिक आघाडीवर अनुत्तीर्ण विद्यार्थी ठरले आहेत.
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ - दलित आणि शेतकऱ्यांचे विषय आणि अन्नसुरक्षा विधेयकांबाबत..
नितीन गडकरी - आम्ही कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत देतो आणि १ टक्का दराने कर्ज. मध्य प्रदेश ३ टक्के दराने कर्ज देते. आज शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. अन्नसुरक्षेच्या बाबतीत देशात ५८ हजार कोटी रुपयांचे अन्न सडते. अशा वेळी गरीब, बेरोजगारांची किमान उपासमार होऊ नये म्हणून ही सुरक्षा दिली पाहिजे आणि सरकारने सबसिडी दराने जीवन  जगण्यापुरते अन्न दिले पाहिजे. दारिद्रय़ रेषेची व्याख्या बदलली पाहिजे. खरोखर गरीब कोण हे ठरविले पाहिजे, गरिबांना स्वस्त दरात अन्न दिले पाहिजे. लोक उपासमारीने मरतात हे चांगले नाही. आजही छत्तिसगड सरकार एक रुपयाने तांदूळ देत आहे. पंजाब, हरयाणात किती गहू सडतो तो गरिबांना फुटक द्या सांगितले. भारताने पेट्रोल- डिझेलमध्ये स्वयंपूर्ण झाले पाहिजे. कृष्णा खोऱ्यातील गॅस काढला पाहिजे, इथेनॉल, जैविक इंधनाला महत्त्व दिले पाहिजे, जलविद्युत प्रकल्पात वाढ केली पाहिजे.
शेखर जोशी - अफझल गुरूच्या फाशीबाबत भाजप देशात, संसदेत काय करणार ?
नितीन गडकरी - अतिरेक्यांना जात, धर्म, पंथ, भाषा नसते. आपल्या घटनेतही तेच आहे. अफझल गुरूने संसदेवर हल्ला करूनही सरकार फाशीची शिक्षा देत नाही. राष्ट्रपती गृहमंत्रालयाने निर्णय घ्यावयाचा आहे. राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडे व गृहमंत्रालय राष्ट्रपतींकडे बोट दाखवितात. सरकारला हे टाळता येणार नाही. व्होट बँकेसाठी सरकार हे टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.
दिनेश गुणे - तुमचा पेहराव पक्षाच्या चौकटीपेक्षा वेगळा आहे ?
नितीन गडकरी - माझ्याबद्दल चुकीचा समज आहे की मी उद्योगपती आहे. मी उद्योगपती नाही, सोशल एन्टरप्रेनर आहे. मी 'एनजीओ'चे काम करतो. त्यामुळे अनेकदा माझ्याबद्दल कॉर्पोरेट आहे, असे म्हटले जाते. मी १० हजार लोकांना रोजगार दिला. पुढील वर्षी ४० हजारांना रोजगार देणार आहे. ट्रॅक्टर घेतले आहेत. मला काहीही मिळवायचे नाही, गमवायचे नाही. जे मिळेल त्यामध्ये आनंद आहे. नाही मिळाले तर दु:ख नाही. मी ढोंगी नाही, मला पंचतारांकित हॉटेलपेक्षा पदपथावरीलवरील आणि छोटय़ा हॉटेलमधील खाणे आवडते.
सतीश कामत- महाराष्ट्राची व्यक्ती राष्ट्रपती झाली, आता पंतप्रधान कधी होणार?
नितीन गडकरी -मी काय सांगणार, मी त्यामध्ये नाही.
प्रश्न - आम्ही तर शरद पवारांबद्दल म्हणतो आहोत..
नितीन गडकरी - (काहीसे हसून) शरद पवार यांना शुभेच्छा.
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे मुक्तचिंतन
संकलन : केदार दामले, रविवार, १८ डिसेंबर २०११



( साभार : लोकसत्ता )
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200185:idea-exchange-----------&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

No comments:

Post a Comment