Pages

Monday, September 26, 2011

स्पर्धा : प्रधानमंत्रिपदासाठी

मा. गो. वैद्य यांचे भाष्य
आमच्या गावाकडे एक मार्मिक म्हण आहे. ती शहरी भागातही असेलच. म्हण आहे : ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.'' एक दिवस एका भिक्षुकाला जरा बर्‍यापैकी दक्षिणा मिळाली. त्याने बाजारातून तुरी आणायचे ठरविले. त्याने पत्नीला विचारले, ''तुरीचे काय करशील?'' ती म्हणाली, ''त्याची डाळ करीन आणि छानपैकी वरण करीन.'' भटजी म्हणाला, ''नाही, तू त्याचे पुरण कर.'' पत्नी म्हणाली, ''नाही, वरणच करणार.'' पती म्हणाला, ''पुरणच कर.'' दोघांचा वाद मिटला नाही. शब्दाने शब्द वाढला आणि भटजीने, आपला नवरोजीपणा दाखवीत पत्नीला मारले. घरी तुरी आल्याच नाहीत, तरी त्यावरून वाद आणि वर पत्नीला मारणे, हा प्रकार पाहून म्हण पडली, ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.''