माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा मारणे वगैरे आपण विसरूनच गेले आहोत. कुटुंबं संकुचित होण्यामागे हीच कारणं आहेत. व्यक्तिगत लाभ, उन्नती आणि आनंदाची भावना यालाच आपण विश्व समजून बसत आहोत.