Pages

Sunday, January 8, 2012

संकटग्रस्त पंतप्रधान !

रविवारच्या लोकसत्तेत रामचंद्र गुहा यांचा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर एक लेख प्रकाशित झालाय. लेख आवडला म्हणून येथे सादर करीत आहे....

आठ वर्षांपूर्वी २००४ मधील सार्वत्रिक निवडणुका आटोपल्यानंतर एक समाजशास्त्रज्ञ आणि एक अर्थतज्ज्ञ नव्या पंतप्रधानांबाबत बोलत होते, तेव्हा मी तेथेच असल्याने मलाही ते ऐकायला मिळाले. १९९० च्या सुमारास त्या समाजशास्त्रज्ञाला, डॉ. मनमोहन सिंग यांच्या मुलीसाठी एक शिफारसपत्र लिहिण्याची विनंती करण्यात आली. तो तिला चांगले ओळखत होता, तसेच तिचे कामही त्याला माहिती असल्याने त्याने पत्र लिहिण्यास लगेच होकार दिला. तिची संपूर्ण माहिती त्याच्याकडे पोहोचली, तेव्हा आपले वडील केंद्रीय अर्थमंत्री आहेत, ही गोष्ट लपविण्याचा तिचा प्रयत्न त्याच्या लक्षात आला. ती आपल्या आई-वडिलांबरोबर आलिशान बंगल्यात राहात होती, तरीही तिने आपला पत्रव्यवहारासाठीचा पत्ता म्हणून पूर्व दिल्लीतील आपल्या एका मैत्रिणीच्या फ्लॅटचा पत्ता दिला होता. ही गोष्ट त्या समाजशास्त्रज्ञाने त्या अर्थतज्ज्ञाला सांगितली.
त्यावर अर्थतज्ज्ञाने मनमोहन सिंग यांच्याबद्दलची आपल्याकडील गोष्ट सांगितली. तो म्हणाला- १९७० च्या दशकात मनमोहन सिंग हे वित्तमंत्रालयात सचिवपदावर कार्यरत होते. एकदा आम्ही दोघांनी 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर'मध्ये भोजन केले. तेव्हा मी डॉ. सिंग यांना विचारले- तुम्हाला साऊथ ब्लॉकमध्ये सोडल्यानंतर तुमची गाडी मी रिंग रोडवरील माझ्या कार्यालयाकडे नेली तर तुमची काही हरकत आहे का? त्यावर
मनमोहन सिंग शांतपणे, विनम्रपणे म्हणाले, 'आणि तसे नाही केले, तर तुमची काही हरकत आहे का?' इतका विनम्र नकार कधी कोणी कोणाला दिला नसावा आणि कोणी कोणाकडून ऐकला नसावा..!
२००४ मध्ये मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. उच्चविद्याविभूषित पंतप्रधान भारताला लाभला होता. जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच विदेशात फिरून, जवळपास  संपूर्ण जग पालथे घातलेला, जगाची चांगली माहिती असलेला ,लालबहादुर शास्त्री यांच्याइतकाच प्रामाणिक, सरकारी कामकाजातील व्यापक अनुभव असलेला, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद सांभाळलेला, केंद्रीय अर्थमंत्री म्हणून चांगली कामगिरी केलेला माणूस ही त्यांची ओळख! त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून साहजिकच मोठय़ा आणि जास्त अपेक्षा होत्या. त्यापैकी काही पूर्णही झाल्या. आर्थिक सुधारणांच्या पहिल्या टप्प्यात तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याबरोबर डॉ. सिंग यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तथापि, पुढच्या टप्प्यात ते धडाडीच्या उद्योजकांना राज्यांच्या नियंत्रणातून मुक्त करतील, अशी आशा बाळगणाऱ्यांची मात्र घोर निराशा झाली. याशिवाय हा अत्यंत कुशल आणि अनुभवी प्रशासक व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन नागरीसेवांचे आधुनिकीकरण करील, दक्षिण -दक्षिण आयोगाचा हा माजी सचिव अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य राष्ट्रांचा दबाव आणि प्रभाव नसलेले असे परराष्ट्र धोरण अवलंबील. शिस्त आणि प्रामाणिकपणा हे गुण अंगी असलेला हा माणूस राजकारणात आणि प्रशासनातही सचोटी, खरेपणा दृढ करील, असे वाटणाऱ्यांचीही निराशा झाली. डॉ. सिंग यांचे हे अपयश पुरेसे बोलके आहे.
त्यानंतर अलिकडच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले. वास्तविक अण्णा हजारे यांच्या तुलनेत मनमोहन सिंग यांची बौद्धिक, वैचारिक दूरदृष्टी खूपच व्यापक आहे. २०११ च्या प्रारंभी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भ्रष्टाचार आणि टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतरही डॉ. सिंग यांनी आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालणे सुरूच ठेवले. अण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रव्यापी आंदोलन आकार घेऊ लागले. तरीही डॉ. सिंग हे काही कृती करायला तयार नव्हते. त्यामुळे पंतप्रधान हे निर्णयक्षमता नसलेले आहेत, असे चित्र दिसू लागले. याउलट सत्तरी पार केलेले अण्णा हजारे यांची प्रतिमा मात्र एक धैर्यशील, निर्भीड, प्रामाणिक आणि त्यागी व्यक्तिमत्त्व म्हणून तयार झाली. मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदाची दुसरी कारकीर्द (२००९-२०१४) ही अशा तऱ्हेने निराशाजनक ठरू लागली.
सुमारे दीड वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, खुशवंतसिंग यांनी मनमोहन सिंग यांची एका लेखात वारेमाप प्रशंसा केली होती. भारताला आजपर्यंत लाभलेल्या सर्व पंतप्रधानांमध्ये डॉ. सिंग हे सर्वात चांगले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. शीख पंथाचा इतिहास, स्कॉच व्हिस्कीचे आकर्षण, महंमद इक्बाल यांची शायरी आणि तत्सम इतर गोष्टींबाबत खुशवंत सिंग यांचे विचार आणि मते विश्वासार्ह आहेत, त्यांच्याकडे बऱ्या-वाईट विनोदाचा मोठा खजिनाही आहे. तथापि राजकीय नेत्यांबाबतची त्यांची मते, निरीक्षणे बऱ्याचदा पटण्यासारखी नाहीत, स्वीकारार्ह नाहीत हे  मुद्दाम सांगावेसे वाटते. कारण संजय गांधी यांच्यासारख्या कमालीच्या वादग्रस्त आणि बदनाम माणसाच्या ठायी ३५ वर्षांपूर्वी खुशवंत सिंग यांना भारताचा तारणहार, मसीहा दिसला होता! म्हणूनच मनमोहन सिंग यांची खुशवंत सिंग यांनी केलेली प्रशंसा जरा जास्तच आणि अप्रस्तुत वाटते, हास्यास्पद वाटते.
२००४ मध्ये मनमोहन सिंग  यांच्या पंतप्रधानपदी झालेल्या नियुक्तीचे व्यापक स्वागत झाले होते; पण आज मात्र, त्यांचे आतापर्यंतचे काम पाहता, अनेकांची निराशा झाल्याचे दिसते, त्याची प्रमुख चार कारणे अशी आहेत-
१) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याच कलाने सतत वागणे. सोनियाजींनी आपल्याला पंतप्रधानपदावर बसविल्याबद्दल डॉ. सिंग हे  त्यांच्याप्रति गरजेपेक्षा जास्त कृतज्ञता दर्शविताना दिसतात. मंत्र्यांची नियुक्ती, राज्यपाल, राजदूत यांची नियुक्ती, कायदे आणि धोरणे निश्चित करणे यासारख्या गोष्टी पूर्णपणे स्वत:च्या अखत्यारीत आणि अधिकार क्षेत्रात असतानासुद्धा त्या करतानाही डॉ. सिंग हे सोनिया गांधी यांच्या मर्जीनुसार निर्णय घेतात, वागतात. खरे तर संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार, काँग्रेस पक्ष राजकारण, यासंबंधात डॉ. सिंग यांना सोनियाजींची जेवढी गरज आहे; तितकीच सोनिया गांधींनाही डॉ. सिंग यांची गरज आहे. आपल्याला सरकारमध्ये काम करण्याचा, किंचितही अनुभव नाही, पंतप्रधानपदासाठी आपण अपात्र आहोत, त्यामुळे आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठका घेणे, इतर देशांचे पंतप्रधान, तसेच राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर येतील, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करणे, हवामानबदलविषयक आणि तत्सम इतर आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन विचार मांडणे ही कामे आपल्याला जमणार नाहीत, झेपणार नाहीत याची सोनिया गांधींना मनोमन पूर्ण जाणीव होती, म्हणूनच २००४ मध्ये त्यांनी पंतप्रधानपद नाकारले आणि पंतप्रधानपदाचा जिरेटोप मनमोहन सिंग यांना चढविला ;आणि ते पद स्वीकारून डॉ. सिंग यांनीही सोनियाजींवर एक प्रकारे उपकारच केले असे म्हणावे लागेल. वास्तविक अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांना पदावरून दूर करण्यासाठी आग्रह धरून, अधिक चांगले काम करून या उपकाराची परतफेड त्यांना करता आली असती.
२) दुसरे कारण म्हणजे लोकसभेची निवडणूक न लढण्याचा भित्रेपणा! माझ्या माहितीप्रमाणे, राज्यसभेचा सदस्य असताना पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मनमोहन सिंग हे पाचवे पंतप्रधान आहेत. तथापि, इतर चौघांनी मात्र शपथ घेतल्यानंतर थोडय़ाच काळात लोकसभा निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. म्हणूनच २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉ. सिंग यांनी लोकसभेची उमेदवारी मागायला हवी होती. अगदी 'सुरक्षित' अशा मतदारसंघातून का होईना, निवडणूक लढवायला हवी होती. परंतु तो विचार त्यांच्या मनाला कधी शिवला सुद्धा नाही. त्यांचा मानसिक कमकुवतपणा, दौर्बल्य येथे दिसून येते. मंत्रिमंडळात आपला दबदबा कायम ठेवणे, काँग्रेस पक्ष, सरकारमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्याकडून त्यांना आदर मिळविता आला असता, पण त्यांनी ते केले नाही.
३) महत्त्वाचे सल्लागार निवडताना डॉ. सिंग यांच्यातील निर्णयक्षमतेचा अभाव हेही एक कारण आहे. पंतप्रधान कार्यालयात दोन प्रधान सचिव नेमताना काय झाले? एका पदावर एका कमालीच्या बदनाम आणि कट-कारस्थानी व्यक्तीची, तर दुसऱ्या पदावर गांधी घराण्याशी निष्ठावंत असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. प्रधान सचिवपदासाठी आवश्यक पात्रता, गुण हे निकष लावले गेले नाहीत. पंतप्रधानांचे दोन प्रसिद्धी सल्लागारसुद्धा कोण आहेत? पीएच. डी. प्राप्त केलेले आणि फक्त संपादकीय (अग्रलेख) लिहिणारे! या दोघांनाही प्रत्यक्ष वृत्तसंकलनाचे (रिपोर्टिग) आणि दूरचित्रवाणीच्या शक्तीचे त्रोटक ज्ञान आहे, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक, त्याजागी प्रसंगी कमी शिक्षण झालेला; परंतु यथायोग्य सल्ला देणारा माणूस हवा. पंतप्रधानांनी देशाच्या ग्रामीण भागांत, मागास भागांत दौरे काढून लोकांमध्ये मिसळावे, 'आमआदमी'शी चर्चा करावी, असा आग्रह धरणाऱ्या 'मीडिया मॅनेजर'ची गरज आहे.
४) पाश्चात्त्य राष्ट्रांच्या नेत्यांकडून प्रशंसा, प्रशस्ती मिळविण्याचा डॉ. सिंग यांचा अट्टहास हे चौथे आणि महत्त्वाचे कारण आहे. भारतातील निरनिराळ्या राज्यांमध्ये दौरे करायला ते उदासीन असतात, उलट जी-२० आणि त्यासारख्या परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी वरच्यावर विदेश दौरे करणे त्यांना अधिक आवडते. भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराची कशी आणि किती भलावण त्यांनी केली, हे सर्वाना माहिती आहे. भारतातील ऊर्जेची गरज भागविण्यात या कराराचा फार मोठा उपयोग होईल, असे वाटत नाही. ''भारतीय जनतेचे तुमच्यावर अपार प्रेम आहे' असे डॉ. सिंग यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना सांगितले होते. आपल्या स्वत:च्या देशांत प्रत्यक्ष कार्यावर, कृतीवर भर देण्यापेक्षा, त्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा पाश्चात्त्य राष्ट्रांकडून, त्यांच्या नेत्यांकडून प्रशंसा प्राप्त करणेच डॉ. सिंग यांना अधिक महत्त्वाचे वाटत, हे यावरून स्पष्ट होते.
पंतप्रधानपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळात (२००४-२००९)  डॉ. सिंग यांनी आपला लौकिक वाढविला नाही, तसेच कमीही होऊ दिला नाही. २००९ मध्ये ते त्या पदावरून दूर झाले असते, तर कदाचित इतिहासाने त्यांची काहीशी चांगली दखल घेतली असती. किमानपक्षी एक अपयशी माणूस म्हणून तरी नोंद केली नसती. आपण त्या पदावर यापुढेही राहण्यास पात्र आहोत, अशी त्यांची स्वत:ची धारणा असेल, तर त्यांनी निदान लोकसभेची निवडणूक लढायला हवी होती; परंतु त्यांनी यापैकी काहीही केले नाही. त्यामुळेच त्यांची विश्वासार्हता हळूहळू ऱ्हास पावत गेली. गेलेली विश्वासार्हता पुन्हा प्राप्त करण्याची संधी त्यांना २०१०-२०११ च्या हिवाळ्यात मिळाली होती. सुरेश कलमाडी (राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भ्रष्टाचार) आणि ए. राजा (टूजी स्पेक्ट्रम घोटाळा) या दोघांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढून टाकले असते; तसेच प्रसंगी यूपीए सरकार पडण्याचा धोका पत्करूनही द्रमुकशी काँग्रेसने संबंध तोडावे, असा आग्रह डॉ. सिंग यांनी धरला असता, तरी त्यांची ठाकुरकी राहिली असती. परंतु त्यांनी त्या वेळी ते केले नाही.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या एकापाठोपाठ एक अशा अपयशातून एकच गोष्ट ध्वनित होते, की बुद्धिमान आणि सरळमार्गी माणसाचे  काही स्वभाव विशेष हे  त्याच्या इतर गोष्टींशी समरूप होत नाहीत. आपला लौकिक, आपला राजकीय पक्ष, आपला देश यांचाही प्रसंगी बळी देऊन फक्त पदाला चिकटून बसणे, कवटाळून बसणे ही वृत्तीच त्याच्यातील सद्गुणांवर मात करते.. आणि हीच गोष्ट सर्वात घातक आहे..!
ramchandraguha@yahoo.in
अनुवाद : अनिल पं. कुळकर्णी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=204056:2012-01-07-16-56-44&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

No comments:

Post a Comment