आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने... हे खरे असले, तरीही काही व्यक्तींना
शब्दांच्या रत्नांमध्येही तोलता येत नाही. संपादकीय नि:शब्द होतात असे
त्यांचे कर्तृत्व असते. शब्दांच्या चिमटीत त्यांना पकडता येत नाही. आधुनिक
संगणक प्रणालीत अक्षरे आणि मधली मोकळी ‘स्पेस’ यांचे ‘कॅरेक्टर’ होते. असे
कितीही कॅरेक्टर खर्च केले तरी त्यांच्या जगण्याची मूल्यं तोलता येत नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांना अशा कुठल्याच उत्कट शब्दांमध्ये बांधता येत नाही.
कितीही अन् काय-काय सांगून झालं तरीही बरंच काही उरतंच... ते एका
भारलेल्या, सामाजिक कळवळ्यानं पेटलेल्या सुसंस्कारित कलंदर कलावंताचे जगणे
होते. कलावंतांच्या पंखांनी आभाळही झाकता येते अन् मग प्रतिज्ञा पूर्णत्वास
जाऊ शकली नाही म्हणून गलितगात्र झालेला एखादा पार्थ अग्निकाष्ठ भक्षण
करायला निघाला असताना आपल्या पंखांनी सूर्य झाकोळून सांज उभी करत हा
पूर्णपुरुष कलावंत निराश पार्थाला सांगतो, ‘‘हा सूर्य अन् हा जयद्रथ...!’’
बाळ केशव ठाकरे नामक कलावंताने विझलेल्या मराठी पार्थांना उपेक्षेने
झाकोळलेल्या सांजेला आपल्या तेजस्वी कुंचल्याने सूर्य साकारून सांगितले,
‘‘हा सूर्य अन् तुम्हाला उपेक्षेने संपविणारे हे सारे जयद्रथ!’’