Pages

Tuesday, May 28, 2013

धर्मांतर आणि मातंग समाज


दैनिक दिव्य मराठीत (दि. 25 एप्रिल) ओबीसींच्या धर्मांतराबाबत अँड. डी. आर. शेळके यांचे विवेचन विचारप्रवर्तक आहे. सामाजिक परिवर्तनाचा अभाव सर्वच जातीत आढळतो. मी मातंग समाजातील असून माझा धर्मांतराबाबतचा अनुभव असा आहे- पाच वर्षांपूर्वी मातंग समाजातही हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा विचारप्रवाह सुरू झाला होता. त्या दृष्टीने एकनाथ आवाड, जी. एस. कांबळे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली विभागीय मेळावे झाले. या मेळाव्यात मातंग समाजाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विचार मांडले की, बौद्ध समाजातील वरिष्ठ जाती आमच्याशी धर्मांतर केल्यानंतर रोटीबेटी व्यवहार करतील काय? खेदाची बाब अशी की, या त्यांच्या प्रश्नाला बौद्ध धर्मांतरित वरिष्ठ जातीतील एकाही नेत्याने होकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आमच्या सामाजिक परिस्थितीत फरक पडत नसेल तर हिंदू धर्मातच राहणे ठीक आहे, असा निर्णय आम्ही घेतला आणि ते अभियान थांबले. प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ या लेखात बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे जातिव्यवस्था मोडण्यास मदत होईल काय? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही,’ असे असल्याचे म्हटले आहे. तथापि विषयाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबतीत विचारमंथन होणे गरजेचे आहे. 
पुंजाराम काळुंखे, औरंगाबाद 

No comments:

Post a Comment