Pages

Thursday, May 2, 2013

जर्मन जिहादी सीरियात

जगभरात कुठेही मुसलमान आणि त्यांचा लढा म्हटलं की अल्-कायदा संघटना आलीच. फेब्रुवारी २०१२ मध्ये अल्-कायदाचा प्रमुख ऐमान अल् जवाहिरी याची एक चित्रफीत इंटरनेटवरून प्रसिद्ध झाली. तिच्यात त्याने स्पष्टपणे म्हटलं होतं की, सर्व मुसलमानांनी सीरियातल्या आपल्या बंधूंना शक्य ती मदत करावी. सीरियातल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय जिहादी उतरायला तिथून सुरुवात झाली. संघर्ष सुरू होऊन अकरा महिने उलटल्यावर हे घडलं, म्हणजे, खरं पहाता उशीरच झाला.



सीरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर आसदविरुद्ध बंड झालं, त्याला आता दोन वर्षे होऊन गेली. इजिप्त, लिबिया यांच्या पाठोपाठ सीरिया या अरब देशातल्या जनतेने आसद राजवटीविरुद्ध उठाव केला होता, तो मार्च २०११ मध्ये.पहाता पहाता दोन वर्षे उलटली. इजिप्त आणि लिबियातल्या प्रस्थापित राजवटी उलथून पडल्या. इजिप्तचा हुस्नी मुबारक तुरुंगात गेला. लिबियाचा मुहम्मद गद्दाफी अल्लाघरी गेला. पण बशर आसद काही सत्ता सोडायला तयार नाही. बशरचा बाप हाफीज आसद याने सीरियावर तीस वर्षे सत्ता गाजवली होती. १९७० ते २००० आता बशर गाजवतो आहे. बशरला साथ आहे त्याचा धाकटा भाऊ मेहर आसद याची. दोघेही भाऊ अत्यंत क्रूरपणे बंडखोरांना चिरडून टाकत आहेत. पण बंडखोरही पुन: पुन्हा उठाव करीत आहेत.
अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार जुलै २०१२ मध्ये सीरियात किमान १०० विदेशी अतिरेकी उतरले होते. आता नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार ही संख्या साडेपाच हजारांवर पोहोचली आहे. यातले किमान ५०० अतिरेकी युरोपीय देशांमधले आहेत आणि त्यातले किमान २० जण जर्मन आहेत.
जर्मनीचे अंतर्गत सुरक्षा मंत्री हान्स पीटर फ्रिडरिश यांनी अधिकृतपणे मान्य केलं की जर्मन अतिरेकी सीरियामध्ये आहेत. फ्रिडरिश यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली की, हे अतिरेकी आता प्रशिक्षित होऊन जर्मनीत परततील आणि इथे जिहाद सुरू करतील.
म्हणजे पहा. जर्मनीच्या मंत्र्याला चिंता आहे, ती अखेर आपल्या देशाच्या सुरक्षिततेची, आपल्या नागरिकांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या संरक्षणाची.
आता ते चित्र पहा आणि हे चित्र पहा. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, तर गृहमंत्री म्हणाले की, एवढ्या मोठ्या शहरात अशा छोट्या-मोठ्या घटना व्हायच्याच. चीनने भारताच्या सीमेवर अतिक्रमण केलं, तर पंतप्रधान म्हणाले की, ही स्थानिक समस्या आहे आणि इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत शेकडो शिखांना ठार मारण्यात आल्यावर राजीव गांधी म्हणाले होते की, एखादा महावृक्ष कोसळल्यावर आजूबाजूची जमीन उखडली जाणारच.
चंगेजखान आणि तैमूरलंग हे अत्यंत क्रूर कत्तलबाज होते. शत्रूला नुसतं पराभूत करून त्याचं समाधान होत नसे. शत्रूंची मुंडकी उडवून त्या मुंडक्यांचे मोठमोठे मनोरे रचले की, त्यांना फार आनंद होत असे. मुसलमानी सुलतानांच्या क्रौर्याच्या कथा आम्ही भयचकितपणे वाचतो; पण माणसाच्या जिवाला काही मोल आहे, हे मूल्य आमच्याही फारसं खिजगणतीत असल्याचं अनुभवाला येत नाही. मला आठवतंय् ८० च्या दशकाचा सुरुवातीचा काळ होता. पंजाब प्रांत खलिस्तानी अतिरेक्यांच्या कारवायांनी धगधगत होता. रोज वृत्तपत्रांत पहिल्या पानावर अतिरेक्यांनी केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या कत्तलीच्याच बातम्या झळकायच्या. आज काय ६५ लोकांना ठार केलं; उद्या काय एका प्रवासी बसमधल्या सर्व उतारूंना रांगेत उभं करून गोळ्या घातल्या; परवा काय ७८ जणांना ठार केलं. लोक मिटक्या मारत या बातम्या वाचायचे. एखादा दिवस अशी बातमी आली नाही, तर म्हणायचे, हॅ! आज पेपर वाचायला काय मजा नाही आली!
या आणि अशा अनेक उदाहरणांवरून असा निष्कर्ष काढता येईल की, माणसाच्या जिवाला काही मूल्य आहे, हे वैचारिक मूल्य आमच्या समाजात अजून फारसे रुजलेले नाही. जसा समाज, तसे त्याचे नेते!
युरोपीय आणि अमेरिकन लोक शत्रूंच्या भले कत्तली उडवतील, पण स्वत:च्या समाजातल्या हर एक व्यक्तीला प्राणपणाने जपतात. म्हणून तर सीरियातल्या बंडात उतरलेल्या पाच-साडेपाच हजार विदेशी अतिरेक्यांपैकी ५०० जण युरोपीय आहेत, म्हणून युरोपीय महासंघाचे उच्च सुरक्षाधिकारी चिंता व्यक्त करतात आणि त्या ५०० पैकी २० जण जर्मन आहेत, म्हणून जर्मनीचे केंद्रीय अंतर्गत सुरक्षा मंत्री जाहीरपणे चिंता व्यक्त करतात.
आता, जर्मनीत मुसलमानी अतिरेकी ‘सलाफिस्ट’ चळवळ कशी पोहोचली, तो एक वेगळाच किस्सा आहे. जनसमूह कोणकोणत्या कारणांनी आणि कसकसे स्थलांतरित होतात, त्यांच्या स्थलांतराचा त्यांच्या मूळ देशावर आणि नव्या देशावर कसकसा सामाजिक परिणाम होतो, हे विषय जगभरच्या समाजशास्त्रज्ञांना नेहमीच कुतूहलाचे ठरत आलेले आहेत. १९१४ ते १९१८ च्या पहिल्या महायुद्धात एका बाजूला इंग्लंड-फ्रान्स-अमेरिका हे दोस्त होते, तर दुसर्‍या बाजूला जर्मनी आणि तुर्कस्तान हे दोस्त होते. महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. त्यामुळे तुर्कस्तानचाही पराभव झाला. या महायुद्धातूनच १९३९ ते १९४५ चे दुसरे महायुद्ध उद्भवले. या महायुद्धातही जर्मनीचा दारुण पराभव झाला. जवळपास तीन पिढ्या रणांगणावर कापल्या गेल्या. युद्धोत्तर जर्मनीत अन्न-वस्त्र-निवारा यापेक्षा सुद्धा अभाव होता तो पुरुषांचा. पुरुष शिल्लकच राहिले नव्हते. हीच स्थिती इंग्रज आणि फ्रेंचांची होती. पण त्यांच्या वसाहती जगभर पसरलेल्या होत्या. त्यातून त्यांना माणसं मिळाली. जर्मनीला तो मार्ग बंद होता. अशा स्थितीत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर माणूसबळ आयात केलं, ते तुर्कस्तानमधून. युद्धोत्तर जर्मनीत तुर्की कुशल आणि अकुशल कामगार मोठ्या संख्येने स्थलांतरित झाले.
या गोष्टीला आता ६५ वर्षे उलटून गेली आहेत. तुर्की स्थलांतरितांची तिसरी पिढी आता जर्मनीत नांदते आहे. जर्मनीच्या स्वतंत्र, मोकळ्या सामाजिक वातावरणाचा फायदा घेत या स्थलांतरितांनीही आपला सामाजिक, आर्थिक उत्कर्ष करून घेतला आहे. पण...
पण आपण मुसलमान आहोत, ही गोष्ट काही हे लोक विसरू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय जिहादी चळवळीला कार्यकर्ते मिळतात, ते यांच्यातूनच. सलाफी चळवळ ही एकनवीच चळवळ युरोप आणि आफ्रिकन देशांमध्ये फोफावते आहे. इब्राहिम अबू नेगी हा जर्मनीतल्या सलाफिस्ट चळवळीचा एक म्होरक्या आहे. तो म्हणाला, आमचे इस्लामी स्त्री-पुरुष बंधू-भगिनी जगभर सर्वत्र ठार केले जात आहेत. कारण, ते मुसलमान आहेत. सीरियातल्या आपल्या बंधू-भगिनींना आपल्या मदतीची गरज आहे.
थोडक्यात, ‘इस्लाम खतरे मे’ ही जी कायमची भडकवणारी भाषा तीच त्याने पुन्हा एकदा वापरली आहे आणि एका महत्त्वाच्या मुद्याला सफाईने बगल दिली आहे. तो मुद्दा हा की, सीरियातल्या बंडखोर मुसलमानांना चिरडून कोण टाकतोय्, तर त्यांचाच बशर आसद! आता यात पुन्हा एक अंतर्गत भानगड आहेच. सलाफी, अल् कायदा इत्यादी आगखाऊ अरब मंडळी सुन्नी आहेत, तर बशर आसद अरब असला तरी शिया आहे. नुसता साधा शिया नव्हे, तर शियांमधल्या अलावीस किंवा अल्वाईट किंवा अन्सार या गुप्त तांत्रिक उपपंथाचा अनुयायी आहे.
जर्मनीच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख गेरहार्ड शिंडलर याने २०१२ च्या डिसेंबरमध्ये राजधानी बर्लिनमध्ये एक बैठक घेतली. युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांचे उच्च सुरक्षाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. शिंडलरने एका फार महत्त्वाच्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. युरोपीय महासंघातले देश आणि तुर्कस्तान यांच्यामध्ये प्रवासाकरिता व्हिसा लागत नाही. युरोपातले जिहादी अतिरेकी नेमका या गोष्टीचा फायदा घेतात. ते कोणत्याही युरोपीय देशातून तुर्कस्तानच्या दक्षिणेतल्या एखाद्या शहरात जातात आणि मग सरहद्द ओलांडली की सीरिया. तालिबानांना सामील होण्यासाठी अफगाणिस्तानातल्या दुर्गम प्रदेशात जाण्यापेक्षा हे फारच सोपं पडतं. इब्राहिम आर नावाचा नैऋत्य जर्मनीच्या फॉर्झहाईम गावातला एक सलाफिस्ट चळवळ्या. मार्च २०१३ पर्यंत जर्मन गुप्तचर त्याच्यावर व्यवस्थित नजर ठेवून होते. पण एप्रिल २०१३ च्या सुरुवातीला तो तुर्कस्तानात पळून गेला. आता त्याचा माग लागत नाहीये. रेडा सियाम नावाचा बर्लिनचा रहिवासी (जर्मन मुसलमानांत माणसांना रेडा सुद्धा नाव ठेवतात?) व्यवसायाच्या निमित्ताने वारंवार तुर्कस्तानमार्गे सीरियात जातो. त्याच्या बॅगेत जर्मनीतल्या इस्लामी सहानुभूतिदारांकडून गोळा केलेले बरेचसे पैसे आणि अन्य साहित्य असतं.
या सगळ्या घटनाप्रवाहात जर्मन सुरक्षा तज्ज्ञ पुन: पुन्हा काळजी व्यक्त करीत आहेत, ती अनुभव घेऊन परत येणार्‍या जिहादींबद्दल. म्हणजे हे जर्मन जिहादी गुपचूप सीरियात जातायत, तिथे माणसं मारतायत्, याबद्दल त्यांना फारशी चिंता नाही. जर्मनीच्या अंतर्गत गुप्तहेर खात्याचे प्रमुख हान्स जॉर्ज मास्सेन काय म्हणतात पहा. ‘हे भ्रमितचित्त झालेले लोक आता परत युरोपातल्या आपापल्या देशात येतील’, मास्सेन म्हणतात. ‘आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यार हाताळण्याचा अनुभव असेल. विविध प्रकारची आधुनिक आणि पारंपरिक स्फोटकं वापरण्याचा अनुभव असेल आणि त्यांच्याकडे अतिरेकी कारवाया करण्याचा पक्का निर्धार असेल. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर काटेकोर नजर ठेवावी लागणार.’
युरोपातले देश समर्थ का होतात, महायुद्धात पाय बेचिराख झाले तरी पुन्हा समृद्ध, सबल का होतात, याचं कारण वरील मनोवृत्तीत दिसतं. त्यांना जगायचंय्, मोठं व्हायचंय्, शत्रूवर मात करायचीय्, स्वत:च्या समाजातली प्रत्येक व्यक्ती सुरक्षित ठेवायची आहे.
आम्हाला मोठं होण्याची, समर्थ, सबल, समृद्धी होण्याची किंबहुना कसलीच इच्छा नाही, कसलीच ईर्ष्या नाही. वा! नाही कशी? आमच्यापैकी प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार आर्थिक घोटाळे करण्याची जबर ईर्ष्या आहे ना!
 मल्हार कृष्ण गोखले
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment