Pages

Wednesday, August 28, 2013

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले ?

साभार : राजू परुळेकर यांचा ब्लॉग 
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या झाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अनेकांप्रमाणे माझाही विश्वास बसला नाही. त्यांचा देह बेवारस असल्या प्रमाणे जवळ जवळ एक तास, पोलिसचौकी समोर पुण्यात ओंकारेश्वराच्या घाटाबाजूला पडून होता. हि सारी सुन्न करणारी बातमी मी तटस्थ पणे पाहु शकत नव्हतो कारण डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध. स्वत: डॉक्टर आणि त्यांची पत्नी शैला ह्यांचा बाबत वाटणारी आपुलकी आणि प्रेमा शिवाय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा हि त्यात होता.

कल्पना करा, डॉक्टरांच सगळ मोठेपण बाजूला ठेवा, आपल्या बापाला सकाळी चालायला गेला असताना, मागून गोळी घालून, सदुसष्टाव्या वर्षी कुणीतरी मारून टाकत आणि तो बेवारस असल्या प्रमाणे तसाच रस्त्यात पडून राहतो आणि आपल्याला कळत हि नाही, किती जीवघेणे आहे हे त्याच्या मागे राहिलेल्या बायको-मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी! माझी पहिली प्रतिक्रिया माझ्या मनाशीच होती जी मी थोडक्या शब्दात माझा मित्र आणि डॉक्टरांचा जावई अनिश पटवर्धनला थोडक्यात एसेमेस केली तोही त्याचा फोन लागला नाही म्हणून. त्यानंतर, आज सकाळी त्याच्या सोबत माझ बोलण झाल. मधल्या काळात मी उलट जाऊन, स्वत:शीच बोलत राहिलो. ह्या स्वत:शीच बोलण्या मध्ये दुख होत तेवढाच संताप हि होता.
डॉक्टरांचे मारेकरी कोण असावेत, ह्यावर पहिली माझी प्रतिक्रिया स्वाभाविक होती आणि ती म्हणजे ‘आपण’. ती प्रतिक्रिया आज हि मला बदलावीशी वाटत नाही. डॉक्टरांच्या किंवा त्यांच्या उंचीच्या अनेकांच्या मतांशी कित्येकदा माझे पराकोटीचे मतभेद झालेले आहेत आणि मी ते लिहिले हि आहेत. पण ह्याचा अर्थ परसपरांमधील स्नेह, आपुलकी आणि प्रेम कमी होत नाही तर वाढतच जातो असा माझा अनुभव. भावनेच्या आणि तर्काच्या दृष्टीने हि हा अनुभव जगभर कसोटीला उतरलेला आहे.
एखाद्या माणसाची निर्मम हत्या करण्यासाठी वैचारिक मतभेद हे कारण असूच शकत नाही. वैचारिक मतभेदात असंस्कृत माणसे गुंतलेली असतील तर फार तर गुद्दागुद्द्दी किंवा हमरातुमरी होऊ शकते. अत्यंत थंड डोक्याने, योग्य ठिकाणी, योग्य जागा आणि योग्य वेळ निवडून मागून गोळ्या घालून हत्या केली जाते तेव्हा निसंशय आणि निसंदिग्धपणे राजकीय खून असतो. प्रत्येक्षात मारेकरी राजकीय नसतील तरीही. खुनाच्या कटवाल्यांची मानसिकता, हि खून करण्याची पद्धत, जागा, वेळ आणि ठिकाणहि निर्देशित करत असते!
डॉक्टरना हितसबंधातल्या विरोधासाठी मारायचे असेल तर त्यासाठी जागा, वेळ आणि ठिकाण एवढ्या थंडपणे आखणी करण्याची गरज पडत नाही. डॉक्टरना पुण्यामध्ये मारण्यात आल. पोलीस चौकी जवळ मारण्यात आल. पौर्णिमेच्या दिवशी, ओंकारेश्वराच्या घाटावर, स्मशानाबाजूला, जिथे लिंबू-मिरची बाहुल्या टाकलेल्या असतात, तिथे मागून गोळ्या घालून मारण्यात आल. फक्त पुणे निवडण्यात आले. डॉक्टर नेहमी निशस्त्र आणि बर्‍याचदा एकटे असायचे. सातारा, मुंबई, पुणे…कुठे हि आखणी न करता त्यांना मारण मारेकर्‍यांना सहज शक्य होत. त्यांना मारण्यासाठी खास जागा, वेळ, ठिकाण निवडण्याची गरज नव्हती. सदुसष्ठ वर्षांच्या निशस्त्र आणि निष्कांचन असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मारण्यासाठी एवढा कट करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण कटवाल्यांनी कितीही अप्रतिम रचना केली तरी हुशार माणसासाठी एक धागा नक्की सोडतात. तो धागा शोधून काढला कि मारेकर्‍यांना शोधण हे काम तितकस कठीण राहत नाही. हा सारा विचार माझ्या मनाशी चालू होता. जादूटोणा विरोधी विधेयक हे ज्यांच्या मुळावर येणार होत त्यांचे हात निष्पापांच्या रक्ताने रंगलेलेच आहेत नि डॉक्टरांच्या हत्येनंतर लगेचच संशयाची सुई ह्या धर्मांध धर्ममार्तंड आणि बुवा-बाबांकडे गेली जी स्वाभाविक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि आहे. परंतु, निसंशय पणे त्यांना गुन्हेगार ठरवून, त्यांच्या वर कोणत्याही प्रकारची कारवाई करणे हि कृती लोकशाही पूर्ण नसून त्यांच्या सारखेच आपण आपल्याला बनवून घेणे आहे.
डॉक्टरना श्रद्धांजली वाहणे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणणे हे डॉक्टरांच्या मुलभूत विचारसरणीशी विसंगत आहे. तरीही भावनेच्या भरात अनेकजण तस करतात. त्यांना आपण एक वेळ समजून घेऊ शकतो. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा पहिल्या दिवशी डॉक्टरांच्या मारेकर्‍यांबद्दल निसंदेह निर्देश करणारे विधान करतात आणि त्या नंतर मारेकर्‍यांना पकडण्यासाठी आता पर्यंत कधीही न लावल्या गेलेल्या रकमेचे, (दहा लाख रुपयांचे) बक्षीस जाहीर करतात. ह्या खुनाच्या राजकीय असण्याबाबत संदेह निर्माण होतो. हेच मुख्य मंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या अंत्य दर्शना करिता सातार्‍यापर्यन्त त्यांच्या घरी जातात, तेच मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टरना जिवंत असताना जादूटोणाविरोधी विधेयकासबंधी चर्चा करण्यासाठी स्वत:च्या केबिन मध्येहि वेळ देत नाही. तेव्हा ह्या घटनांची सुई डोक्यात गरागरा फिरू लागते. ‘महात्मा गांधींच्या हत्येस जबाबदार असण्याची विचारसरणी डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येस जबाबदार आहे ’, असे विधान, पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी केले त्याचा अर्थ पुढे  नेमका काय होणार होता हे जे कुणी कटवाले आहेत त्यांना अचूक माहिती असली पाहिजे! कारण पूर्ण माहिती नसताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार पणे केलेले विधान असे धरता येत नाही. तसे धरायचे झाले तर पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून राजीनामाच द्यावा लागेल (अर्थात तो कोण मागणार आणि कोण घेणार हा प्रश्नच आहे!) कारण एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर एवढ्या बेजबाबदार पणे बोलणार्‍या माणसाला मुख्यमंत्री पदी राहण्याचा हक्क नाही. पण मुख्यमंत्री बेजबाबदार पणे बोलले नसावेत असे मानण्याला जागा आहे. इथे त्यांना संशयाचा फायदा घेऊ देण्यात यावा. गांधीजीच्या हत्येला जबाबदार असणारी विचारसरणी म्हणजे काय? एकतर गांधींना समोरून गोळ्या घालण्यात आल्या त्यामुळे कार्य पद्धतीचा मुद्दा निकालात निघतो. उरलेले  मुद्दे; मारेकरी धर्मांध, हिंदू, ब्राम्हण, सावरकरांना मानणारे ह्यां पैकी कुणीतरी असणे. हि माहिती म्हणजे फारच थेट माहिती आहे. पण ह्याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी, एकवीस ऑगस्ट रोजी, म्हणजे काल संध्याकाळी दाभोळकरांच्या कुटुंबियांना सांगितले. पुण्याच्या पोलीसआयुक्तांकडे, डॉक्टरांचे जावई अनिश पटवर्धन तीन तास बसून होते पण त्यांचाहि पाढा नन्नाचा होता. हे काय गौडबंगाल आहे. राज्यकर्त्यांमधील सारी माणस, मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांच्या नेतृत्वा खाली, डॉक्टरांच्या मृत्यूसाठी एका समाज गटाला जबाबदार धरून तिथे निर्देश करून, पुन्हा स्वत:ला काहीच माहित नसल्याची बतावणी हि करत आहेत. हे जाणीवपूर्वक गोंधळात टाकू इच्छिणाऱ्या प्रचारतंत्राचा एक भाग आहे.
जादूटोणा विरोधी विधेयक आणि त्याचे शिल्पकार डॉक्टर दाभोळकर हे सरकारच्या गळ्याला लागलेला एक काटा  होता. मुळात जादूटोणा विरोधी विधेयक हे अंधश्रद्धा वर आधारलेल्या समजुतीमुळे ज्याचं शोषण होत, त्याचं शोषण थांबवण्याचा डॉक्टरांचा एकाकी प्रयत्न होता. उदाहरणार्थ ह्या विधेयकामधील एक कलम, भोळ्या भाबड्या मुल न होणार्‍या स्त्रिया, लबाड बुवा-बाबांच्या आश्रयाला जातात. त्यांच्याशी लैंगिक सबंध ठेउन हि कृती दैवी आहे अस बुवा-बाबानी भासवण नि त्या स्त्रियांचं शोषण करण्याविरुद्ध आहे. ह्यातली मेख अशी, कि मुल होणे हे निदान लैंगिक सबंधांची थेट परिणीती तरी आहे! पण इथे तर सत्ताधारी पक्षामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रवक्ते, महिलेला न्यायधीश करण्याचे आश्वासन देऊन, स्वत:च्या केबिन मध्येच तीच लैंगिक शोषण करतात हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. असे राज्यकर्ते आपल्या सारख्याच दुसऱ्या शोषकाच्या विरुद्ध (धंदा वेगळा असला तरी!) का बर उभे राहतील? असे नेते सर्व राजकीय पक्षात, सर्वत्र विखुरलेले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या जादूटोणा विरोधी विधेयकाची भीती हि सर्वव्यापी होण्याची होतीच शिवाय धार्मिक मुद्द्यांवर मते मिळवण्याच्या शोषणाला आव्हान देणारी होती. ह्याची भीती सत्तेच्या बाहेर असलेल्या विरोधी पक्षापेक्षा सत्तेत नसलेल्या सत्ताधारी पक्षाला जास्त होती. इथे महात्मा गांधींच्या हत्येपेक्षा कृष्णा देसाईंच्या हत्येची मला तीव्रतेने आठवण येते. कम्युनिस्टांचा सर्वात जास्त त्रास तत्कालीन सत्ताधारी कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांना होता. परंतु प्रत्यक्षा मध्ये कम्युनिस्टांशी कट्टर वैर शिवसेनेन घेतल. शिवसेनेच्या कम्युनिस्ट वैरामुळे प्रश्न कॉंग्रेसचे आणि मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे सुटणार होते. बदल्यात शिवसेनेला राजाश्रय हवा होता. पुढे मुंबईतील कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई ह्यांचा भीषण खून झाला. अंधारात त्यांच्यावर मागून वार करण्यात आले. संशयाची सुई शिवसेनेकडे गेली. बाळ ठाकरेंना अटकसुद्धा झाली. मुंबईत यथेच्च जाळपोळ झाली. पुढे ठाकरे तुरुंगातून बाहेर आले. मृत्यू नंतर ह्याच कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी त्यांना राष्ट्रीय सलामी हि दिली. एक चक्र पूर्ण झाले. पण कृष्णा देसाईंच्या हत्येसरशी कम्युनिस्ट मोडले आणि संपले ते कायमचेच. ह्या प्रक्रियेत सर्वात जास्त फायदा कॉंग्रेसचा झाला (ह्यात आताची राष्ट्रवादी कॉंग्रेस अंतर्भूत). ठाकरे मुंबईत godfather बनले पण कॉंग्रेस एवढे भव्य राजकीय यश कधीच मिळवू शकले नाही. गांधीहत्येच्या बाबत कॉंग्रेसचा आणि आताच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस चा एक वेगळा संदर्भ आहे. जो त्यांना अभिप्रेत आहे. गांधीहत्या म्हटली कि महाराष्ट्रात ब्राम्हण विरोधी आणि मराठी जातीयवादी धृवीकरण असा अर्थ होतो. कॉंग्रेस ह्याचा वापर गांधीहत्ये नंतरच्या जाळपोळ पासून गांधींच्या नव्हे तर गोडसेंच्या मार्गाने करून घेत आलेली आहे! निवडणुका जवळ आल्यामुळे अत्यंत अकार्यक्षम सरकार, दिल्लीप्रिय पण अकार्यक्षम निरुपयोगी मुख्यमंत्री, डबघाईला आलेली देशाची अर्थव्यवस्था, ह्या पार्श्वभूमीवर, डॉक्टर दाभोळकर हत्ये नंतरच्या प्रचाराची साखळी स्पष्ट होत जाते!
पुणे हे ठिकाण कटवाल्यांना सोयीचे आहे. त्याची अनेक कारणे आहेत. आता डॉक्टरांची हत्या ओंकारेश्वराच्या घाटाजवळ, स्मशानाच्या बाजूला, लिंबू-मिरची टाकतात त्या जागेवर, कटवाल्यांनी नेपथ्य अस केलेलं आहे कि डॉक्टरांच्या विरोधकांकडे ‘खुनी’ असा थेट बाण जावा. वास्तवात खून करणारा स्वत:कडे निर्देश करणारे पुरावे लपवतो. इथे ते पुरावे अगदी ढोबळपणे ठळक केलेले आहेत. ह्याचा संशय असा हि असू शकतो कि ह्याहून तिसरी शक्ती जिचा डॉक्टरांच्या खुनामुळे राजकीय फायदा होणार आहे, तिने डॉक्टरांचा खून करून संशयाची सुई नैसर्गिकपणे डॉक्टरांच्या जुन्या वैचारिक शत्रूकडे वळेल अशी सोय करून ठेवलेली आहे. डॉक्टर गेल्यानंतर एक तास बेवारस पडून होते आणि त्यानंतर पोलिसांनी संशयित खुन्याचे चित्रहि जारी गेले जे चित्र महाराष्ट्रात तीन-चार लाख चेहऱ्यांशी जुळणारे आहे! त्यामुळे कुणीतरी पुढे होऊन ‘मी ह्यांना ओळखतो’ असे सांगणारच! लोकांमध्ये संभ्रम पसरवणे एवढेच. दोन्ही सत्ताधारी पक्षांचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांच्या नेतृत्वाखाली करत आहेत. खुनी म्हणून, डॉक्टरांचे मारेकरी म्हणून काही चिल्लर लवकरच सापडतील. दोन-तीन मोठे नगहि उभे केले जातील पण कटवाले मात्र कधीही तुम्हा-आम्हा समोर येणार नाहीत. कृष्णा देसाईंना ज्यांनी मारल, ज्याचं नाव झाल ते तरी खरे मारेकरी कुठे होते?
डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबीय आणि मोजके जवळचे मित्र ह्यांची जी व्यक्तिगत हानी झाली ती कधीही भरून निघणार नाही.
त्या व्यतिरिक्त फक्त दोन गोष्टी निसंदिग्धपणे म्हणता येतील;
- २०१४ च्या निवडणुक प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण ह्यांनी डॉक्टरांच्या खुनाच्या निम्मिताने फोडला.
-आता सरकारने जादूटोणा विरोधी विधायक पास केल तरी सरकारला फायदा! नाही केल तरी मतांचं नुकसान नाही!
डॉक्टरांच्या बाबतीत एवढच म्हणता येईल कि जातीयतेच्या आणि धर्मांधतेच्या विषाची मुळे सत्ताधार्‍यांनी किती खोलवर रुजवली आहेत ह्याचा त्यांना अंदाजच आला नाही. त्या अर्थाने ते आणि त्यांच्याबाबत आपण बेसावध राहिलो हेच खरे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा आज २२ ऑगस्ट २०१३ रोजी मला झालेला उलगडा हा असा.
सत्य ह्याहून वेगळ असू शकत किंबहुना ते असायला हव अशी आपली आशा आहे. ते वेगळ असणार नाही अशी भीतीही आहे. दुर्दैवाने नाकर्तेपणाबद्दल सत्ताधार्‍यांचा राजीनामा घेणे तर सोडा मागणारेहि आज अंशमात्र अस्तित्वात राहिलेले नाहीत.
डॉक्टर दाभोळकर अश्यांपैकी होते म्हणून…
Raju Parulekar
raju.parulekar@gmail.com
(M) 9820124419

No comments:

Post a Comment