हिंदुस्थानचा बुधवारचा दिवस खेददायकच होता! एकाच दिवशी दोन जणांनी खेद प्रकट केला! या खेदाला ना चेहरा ना मोहरा, ना आगा ना पिछा, ना अर्थ ना अनर्थ, ना शील ना सुशील, ना समोरून ना कॅमेरून! असला खेद काय कामाचा? विनाकारण रस्त्याने जाणार्या सभ्य माणसाला शिवी द्यायची अन् प्रकरण अंगलट येऊ लागले की खेद प्रकट करायचा. निरपराध माणसांना गोळ्या घालायच्या. मुडदेफर्रासाप्रमाणे शेकडो सामान्य माणसांचे निर्घृण मुडदे पाडायचे आणि नंतर कित्येक वर्षांनी शहाजोगपणे खेद प्रकट करायचा. असा हा खेदजनक खेद आहे. बदमाशांना पळवाट काढून देणारा महाबदमाश!