Pages

Friday, November 20, 2015

धर्मनिरपेक्षतेचे नाटक थांबवा

दै. दिव्य मराठीत प्रकाशित मुजफ्फर हुसेन यांचा लेख

जर भारताला सर्व प्रकारची हिंसा आणि असहिष्णुतेपासून मुक्ती द्यायची असेल तर प्रत्येक जाती आणि समुदायाच्या असहिष्णुतेशी लढा द्यावा लागेल. केवळ हिंदूंच्या असहिष्णुतेची निंदा करून चालणार नाही. अलीकडच्या काळात मोदीविरोधाच्या नावाखाली काँग्रेसी नेत्यांनी असहिष्णुतेला हिंदू आवरण चढवून देश-विदेशात बदनामी केली. पण भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडला चांगले माहीत आहे की ‘न्यायप्रिय हिंदू हा मुळातच सहिष्णु आहे. त्याला पुन्हा पुन्हा अवमानित केले तरी तो केवळ आपल्या रक्षणासाठीच शक्तीचा वापर करतो.’ त्यामुळेच मोदींचा पाठलाग करणारे इंग्लंडच्या धरतीवरही गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रवृत्तीचे लोक कोणताही बुरखा पांघरून आले तरी तो बुरखा फाडणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही...
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mujaffar-hussen-column-on-secularism-5172867-NOR.html

भारतात सध्या काँग्रेसच्या हाती केंद्रातील सत्ता नाही. काही मोजक्याचराज्यांत ती सत्तेत आहे. दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या काँग्रेससाठी ही स्थिती असहनीय आहे. खरे तर या काळात आत्मचिंतन करण्याची चांगली संधी आहे. पण त्या पक्षात इतका संयम, परिपक्वता उरलेली नाही. त्यामुळे या पक्षाची स्थिती बावचाळल्यागत झाली आहे. विचार करण्याची शक्ती हरवून बसलेला हा पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी उतावीळ झाला आहे. या उतावळेपणाने वेडेपणाच्या सीमाही पार केल्या आहेत. केवळ आपल्या हातीच सत्ता असली पाहिजे, असे काँग्रेसला वाटते. पण अलीकडच्या काळात काँग्रेसला लोकांनी दूर सारले आहे. त्यामुळे सत्तेत येण्यासाठी कोणाचीही मदत घ्यायला या पक्षाला संकोच वाटत नाही. एक दिवस असा येईल की कट्टर विरोधी असलेल्या भाजपशी हातमिळवणी करण्यासही हा पक्ष कचरणार नाही.
काँग्रेसची सत्तेची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही याचे हीन प्रदर्शन हा पक्ष करत आहे. पंतप्रधानांच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळी तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुतेच्या नावाखाली या पक्षाने धुमाकूळ घातला. आता तर मणिशंकर अय्यर आणि सलमान खुर्शीदसारख्या नेत्यांनी पाकिस्तानात जाऊन ज्या प्रकारे वक्तव्ये दिली त्यातून या पक्षाची पातळी दिसली. एकेकाळी साम्यवादी हे काँग्रेसचे कट्टर दुश्मन होते. गरज पडली तेव्हा पिट्टमथानू पिल्ले आणि नंबुद्रिपाद यांची साथ घेण्यात काँग्रेसला संकोच वाटला नाही. भारताचे तुकडे करून पाकिस्तान बनवण्याचे काम ज्या पक्षाने केले त्या मुस्लिम लीगचीसुद्धा साथ काँग्रेसने केरळमध्ये घेतली. केंद्रात बहुमत दाखवण्याची वेळ आली तेव्हा मुस्लिम लीगच्या मोहंमद कोया यांच्या गळ्यात गळे घालायलाही काँग्रेसला लाज वाटली नाही.
एक काळ असा होता की लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार काँग्रेसला चालत नव्हते. पण भाजपला हरवण्यासाठी त्या दोघांशी जुळवून घेण्यात काँग्रेसला कमीपणा वाटला नाही. जो पक्ष देश तोडणाऱ्या मुस्लिम लीगशी जवळीक साधू शकतो तो सत्ता मिळवण्यासाठी उद्या वेळ पडल्यास भाजपच्या दावणीला स्वत:ला बांधून घ्यायलाही कमी करणार नाही. संघ, भाजप या पक्षाला जवळ उभे करणार नाही हा भाग वेगळा. थोडक्यात, काँग्रेससाठी सत्ता ही सर्वोच्च आहे. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. एवढे सर्व करूनही हा पक्ष राष्ट्रहिताच्या नावावर केवळ आपला पक्ष हाच एकमेव राष्ट्रीय असल्याचा दावा करू शकतो. त्यामुळे काँग्रेसचे नेते इतर देशांत जाऊन काय बरळत आहेत याचे चिंतन करण्याची त्या पक्षाला गरज नाही. चिंतन तर मोदी आणि भाजपने केले पाहिजे की अशा दलबदलूंना आपल्यासोबत घेतल्याने भाजपचे कल्याण होणार नाही की देशाचे भले होणार नाही.
राजीव गांधी यांचा काळ आठवा. मुस्लिमांची गठ्ठा मते मिळवण्यासाठी गरीब आणि तलाकपीडित मुस्लिम महिलांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम कोणी केले? शाहबानोसारख्या घटनांचा विसर पडणे शक्य आहे काय? त्यामुळे काँग्रेसचे दुटप्पी वागणे सारा देश जाणून आहे. सध्याही काँग्रेसचे वर्तन असेच आहे. यापुढील काळात काँग्रेसच्या या वर्तनात बदल होईल याची काय शाश्वती? आज सत्ताप्राप्तीच्या व्याकूळतेने काँग्रेसी लंडनला आणि इस्लामाबादला पोहोचले. तेथे जाऊन भारताच्या पंतप्रधानांचा अपमान केला. त्याची थोडीही चिंता, खंत या पक्षाला नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमोर स्वाभिमान गहाण टाकून जे आज पाकिस्तानात जाऊन मोदींना हटवण्याच्या मोहिमेत सहभागी होत आहेत त्याला गद्दारी म्हणता राष्ट्रहित म्हणता येईल काय? सत्ता मिळवण्यासाठी कौरवांनी आपल्या कुलाच्या साऱ्या मर्यादा सोडून दिल्या होत्या. आज काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली साऱ्या मर्यादा खुंटीला टांगून ठेवण्यास सज्ज आहेत. पण या मंडळींनी ध्यानात ठेवले पाहिजे की एक ना एक दिवस महाभारताचे युद्ध समाप्त होणारच आहे. पुरस्कार परत करण्याच्या शर्यतीत जे आज भाग घेत आहेत ते कौरव सेनेच्याच भूमिकेत आहेत हे विसरता येणार नाही.
हातातून सत्ता निघून गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे किंवा पक्षाचे किती पतन होऊ शकते याचे ओंगळ दर्शन आज आपल्या देशात पाहायला मिळत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि नंतरही काँग्रेस पक्षाचेच देशावर वर्चस्व राहिले. गेल्या निवडणुकीतील पराभवानंतर दिल्लीत काँग्रेसचे सरकार येऊ शकले नाही. या भयंकर दु:खातून काँग्रेसला अद्याप सावरता आलेले नाही. पुन्हा एकदा सत्तेत कसे पोहोचू या एकमेव विचाराने या पक्षाची मती गुंग झाली आहे. समजा काही कारणाने भाजपची सत्ता गेली तरी आपल्या हाती सत्ता येणार नाही याची जाणीव काँग्रेसला आहे. पण तरीही येनकेन प्रकारेण सत्तेत येण्याची धडपड हा पक्ष करत आहे. बिहारचे निकाल लागल्यापासून काँग्रेसला चेव चढला आहे. या निवडणुकीत अल्पसंख्याकांचे रक्षण करण्याच्या नावाने जे राजकारण झाले ते अतिशय भयंकर होते. या वेळी अल्पसंख्याकांच्या कट्टरतेला खतपाणी घातले गेले. याचवेळी बहुसंख्य हिंदू जे कट्टरवादी किंवा हिंदुत्व मानसिकतेचे नव्हते त्या बिचाऱ्यांना भाजपच्या बाजूने ढकलून देण्यात आले. हे लोक ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या दुटप्पीपणामुळे वैतागून गेले होते. हे लोक मोदींच्या मागे तेव्हा गेले, जेव्हा त्यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा दिला. एका समूहाची असहिष्णुता ही दुसऱ्या समूहाच्या असहिष्णुतेचे पोषण करत असते. भारतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.
जर भारताला सर्व प्रकारची हिंसा आणि असहिष्णुतेपासून मुक्ती द्यायची असेल तर प्रत्येक जाती आणि समुदायाच्या असहिष्णुतेशी लढा द्यावा लागेल. केवळ हिंदूंच्या असहिष्णुतेची निंदा करून चालणार नाही. अलीकडच्या काळात मोदीविरोधाच्या नावाखाली काँग्रेसी नेत्यांनी असहिष्णुतेला हिंदू आवरण चढवून देश-विदेशात बदनामी केली. पण भारतावर दीडशे वर्षे राज्य केलेल्या इंग्लंडला चांगले माहीत आहे की ‘न्यायप्रिय हिंदू हा मुळातच सहिष्णु आहे. त्याला पुन्हा पुन्हा अवमानित केले तरी तो केवळ आपल्या रक्षणासाठीच शक्तीचा वापर करतो.’ त्यामुळेच मोदींचा पाठलाग करणारे इंग्लंडच्या धरतीवरही गेले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा प्रवृत्तीचे लोक कोणताही बुरखा पांघरून आले तरी तो बुरखा फाडणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमीचे कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही इतकेच.

मुस्लिम मानस / २० नोव्हेंबर २०१५

m_hussian1945@yahoo.com
राजकीय विश्लेषक

No comments:

Post a Comment