Pages

Thursday, February 11, 2016

राजकारणात संस्कृतीचे राजदूत - पंडित दीनदयाल उपाध्याय


सिद्धाराम भै. पाटील

‘ज्या समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी रामाने वनवास स्वीकारला, कृष्णाने संकटे झेलली, राणा प्रताप रानावनात भटकत राहिले, शिवाजींनी सर्वस्व समर्पित केले, गुरू गोविंद सिंगांच्या मुलांना भिंतीत चिणून ठार करण्यात आलं, त्यासाठी आम्ही आमच्या जीवनातील आकांक्षा आणि खोट्या आशांचा त्याग करू शकत नाही काय?’’


तारुण्यात पदार्पण केलेल्या दीनदयाळ यांनी आपल्या मामाला लिहिलेल्या पत्रातील ओळी आहेत या. आपल्या मनातील द्वंद्व पत्रातून मांडताना मामाला ते लिहितात,
‘‘परवाच आपलं पत्र मिळालं. तेव्हापासून मनात भावना आणि कर्तव्य यांचे तुंबळ युद्ध सुरू झाले आहे. एकीकडे भावना आणि मोह ओढताहेत तर दुसरीकडे पूर्वजांचे आत्मे हाक देताहेत.’’
सन २०१४ मध्ये जो राजकीय पक्ष निर्विवादपणे देशाच्या नेतृत्त्वस्थानी आला त्या भारतीय जनता पक्षाची पायाभरणी ज्यांनी केली त्यातील एक प्रमुख नाव आहे दीनदयाळ उपाध्याय.
कसेही करून सत्ता आणि स्वार्थ हे शब्द राजकारण या शब्दाला समानार्थी असल्याचा अनुभव रूढ असताना सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या दीनदयाळ नावाच्या व्यक्तीने राजकारणात संस्कृतीचा राजदूत म्हणून आपला ठसा उमटवला. मातृभूमीला जगद्गुरूपदी नेण्याचे ध्येय बाळगून कार्य करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आपल्या तरुणपणीच देश आणि संस्कृतीसाठी संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा दृढनिश्‍चय दीनदयाळजी यांनी केले. त्यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे.

२५ सप्टेंबर १९१६ रोजी भगवतीप्रसाद व रामप्यारी यांच्या पोटी मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला.
अडीच वर्षाचा असताना वडील गेले. सात वर्षाचा असताना क्षयरोगाने आई गेली. आई-वडीलांच्या स्नेहापासून वंचित दीना आणि दोन वर्षाने लहान असलेला भाऊ शिवादयाल यांना सांभाळणारे आजोबा (आईचे वडील) दीना दहा वर्षांचा असतानाच सोडून गेले. मामी मातृवत प्रेम करायची. पण तिही दीना १५ वर्षाचा असताना ईश्‍वरभेटीला निघून गेली. आता दीनाकडे शिवदयालचे पालकत्वही आले. दीना नववीत असताना भाऊ शिवदयाल आजारी पडला. खूप प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही. त्याचेही निधन झाले.आता दीनावर प्रेम करणारी वृद्ध आजीच तेवढी राहिली होती. दरम्यान, दीना दहावी पास झाला होता. आजी आजारी पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. वडिल, आई, आजोबा, मामी, भाऊ, आजी. एकानंतर एक आघात. दीनावर मामे बहीणीची जबाबदारी होती. ती आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी दीनाला कॉलेज सोडावे लागले. पण उपयोग झाला नाही. तिही अकाली गेली. २४ वर्षांचा होईपर्यंत क्रूर नियतीने दीनाची पाठ सोडली नाही. शिशू, किशोर, बाल, युवा मनावर निरंतर आघात होत राहिले.

दीना अडीच वर्षाचा होता तेव्हा एकत्र कुटुंबातील कलहाला कंटाळून वडीलांनी आईला आजोबांकडे पाठवून दिले. तेव्हा दीना वडीलांच्या घरातून बाहेर आला तो कायमचाच. अक्षरश: अनिकेत. क्रूर नियतीचे प्रहार झेलत २५ वर्षांपर्यंत दीनदयाळ यांना राजस्थान व उत्तरप्रदेशातील किमान ११ ठिकाणी रहावे लागले. सुरुवातील ९ वर्षांचा होईपर्यंत शिक्षण नाही. मामाकडे गंगापूर येथे ४ वर्षे राहिले. सीकरमध्ये १० पास झाले. दोन वर्षे पिलानी येथे राहून इंटरमिडीएट बोर्डाची परीक्षा दिली. १९३६ बीएसाठी कानपूरला आले. दोन वर्षांनी एमएसाठी आग्र्याला गेले. २५ वर्षाचे असताना बीटीसाठी प्रयागला गेले आणि तेथून सार्वजनिक जीवनासाठी अखंड प्रवासी बनले.

आपले घर, आनंदी बालपण, सोयीसुविधा, स्थायित्व, माया करणारी माणसं यामुळे लहान मुले बालसुलभ खोड्या करतात. पण दीनाच्या वाट्याला जे आलं, ते पाहता एखाद्याचे बालपण करपूनच जाईल. पण, दीना त्याला अपवाद ठरला. सदैव क्लांत आणि तणावपूर्ण मन. याही स्थितीत तो सेवाभाव जोपासत राहिला. दीना दुसरीत असताना मामा राधारमण खूप आजारी पडले. मामाच्या सेवेसाठी, उपचारासाठी ११ वर्षांचा दीना आगऱ्याला आला. परीक्षेआधी काही दिवस मामासोबत परत गंगापूरला आला. परीक्षा दिली आणि वर्गात प्रथम आला. दीनाची गाणितात अद्भुत गती होती. नववीत असताना दहावीचे विद्यार्थी त्याच्याकडून गणित सोडवून घ्यायचे. दीना दहावीच्या बोर्डात सर्वप्रथम आला. सीकरच्या महाराजांकडून पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

इंटरमिडीएटलाही बोर्डात सर्वप्रथम आणि सर्वच विषयात विशेष प्राविण्य. तेव्हा घनश्यामदास बिर्ला यांनी शिष्यवृत्ती सुरू केली. एम.ए. प्रथम वर्ष पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. बहीणीच्या आजारपणामुळे दुसऱ्या वर्षाची परीक्षा देता आली नाही. प्रशासकीय परीक्षा दिली. मुलाखतीतही उत्तीर्ण झाले. पण नोकरीत रूची दाखवली नाही. कानपूरमध्ये बी.ए. करतानाच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झालेला होता. १९३९ मध्ये संघाचे प्रथम वर्ष प्रशिक्षण आणि १९४२ मध्ये द्वितीय वर्ष प्रशिक्षण पूर्ण केले होते. दरम्यान, १९४० मध्ये मुस्लीम लीगने पाकिस्तानची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली होती. देशासमोर काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज तरुण दीनाच्या द्रष्ट्या मनाने केव्हाच घेतला होता.

दीनाने सरकारी नोकरी करावी, कुटुंबाला हातभार लावावा, असे आजारी मामाला वाटणे स्वाभाविकच होते. त्यामुळे प्रशासक म्हणून नोकरी नाकारली तरी प्राध्यापक म्हणून तरी नोकरी करावी, अशी नातेवाईकांची अपेक्षा होती. बी.टी. करून दीनदयाळ मामाच्या घरी गेले नाहीत. देशासमोरील आव्हानांनी त्यांना संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनवले. मामा आजारी असल्याचे पत्र मिळाले तेव्हा दीनदयाळांच्या मनाची सुरू असलेली घालमेल त्यांच्या पत्रातून व्यक्त झाली आहे.

या लेखाच्या सुरुवातीला त्या पत्राचा उल्लेख केला आहे. त्याच पत्रात दीनदयाळ पुढे लिहितात,
‘‘मला एका जिल्ह्यात काम करायचे आहे. निद्रीस्त असलेल्या हिंदू समाजात असलेली कार्यकर्त्यांची उणीव अशा प्रकारे भरून काढायची असते. संपूर्ण जिल्ह्यात काम करायचे असल्याने एका ठिकाणी दोन चार दिवसांपेक्षा अधिक थांबणे शक्य होत नाही. त्यामुळे नोकरी करणे अशक्य आहे. संघाच्या स्वयंसेवकासाठी प्राधान्य समाज आणि देशाच्या कार्याला असते आणि मग आपल्या व्यक्तिगत कामांचा क्रम लागतो. त्यामुळे समाजकार्यासाठी मला जी आज्ञा मिळाली, तिचे मी पालन करत आहे.’’
आपल्या याच पत्रात संघाच्या बाबतीत ते म्हणतात,‘संघाबद्दल आपल्याला फार माहिती नसल्याने तुम्हाला भीती वाटत आहे. संघाचा कॉंग्रेसशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आणि ही राजकीय संस्थाही नाही. संघ आजकालच्या कोणत्याही राजकारणात सहभागी नसतो. संघ सत्याग्रह करत नाही. कारागृहात जाण्यावरही संघाचा विश्‍वास नाही. संघ अहिंसावादी नाही. तो हिंसावादीही नाही. संघाचे एकमात्र कार्य हिंदूंचे संघटन करणे आहे.’’
‘‘आमच्या पतनाचे कारण आपल्यात संघटितपणाचा अभाव आहे. इतर वाईट गोष्टी निरक्षरता वगैरे तर अधोगतीची केवळ लक्षणे आहेत. ...राहिला प्रश्‍न व्यक्तिगत नाव आणि यशाचा, गुलामांना कसले आलेय नाव आणि यश?’’
युवा दीनदयाळ यांचे हे विचार समजून घेतल्याशिवाय त्यांचे राजकीय योगदान समजून घेणे कठीण जाईल.

१९४२ ते ४५ या काळात दीनदयाळजी हे लखीमपूर येथे संघाचे प्रचारक राहिले. त्यांचे समर्पण, संस्कार क्षमता आणि बौद्धीक प्रखरता पाहून त्यांना १९४५ मध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशचे सह प्रांत प्रचारक करण्यात आलेे. त्या काळात उत्तर प्रदेशचे प्रांत प्रचारक होते भाऊराव देवरस. दीनदयाळजींची संघटनात्मक प्रतिभा आणि संघकार्यातील त्यांचे योगदानाविषय ते लिहितात,
‘‘हे आदर्श स्वयंसेवक! संघाच्या संस्थापकांच्या मुखातून आदर्श स्वयंसेवकाच्या गुणासंबंधी भाषण ऐकले होते. तुम्ही त्या गुणांचे मूर्तीमंत प्रतिक आहात. प्रखर बुद्धीमत्ता, असामान्य कर्तृत्व, निरहंकार आणि नम्रता या गुणांचे आदर्श.’’

गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. पांचजन्यवर बंदी आली. दीनदयाळजी भूमिगत झाले. हिमालयचे प्रकाशन सुरू केले. त्यावर बंदी आली. राष्ट्रभक्त सुरू केले. संघ विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी दोन ललित साहित्यकृती जन्मास घातले. सम्राट चंद्रगुप्त आणि जगद्गुरू शंकराचार्य ही ती दोन पुस्तके. भारताची फाळणी होऊ नये यासाठी घराघरात राष्ट्रीय विचारधारा पोहोचवण्यासाठी ते कार्यरत राहिले. पण प्रचंड रक्तपात होऊन अखेर फाळणी झालीच. यामुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला.

देशाच्या विभाजनाला मुस्लिमांचा फुटीरतावाद, ब्रिटिशांची नीती आणि कॉंग्रेसची राष्ट्रीयतेसंबंधीची विकृत धारणा कारणीभूत असल्याची खात्री दीनदयाळजींना पटली होती. मुस्लिम फुटीरतेचे मूळ कोठे आहे यावर दीनदयाळजींनी सविस्तर लिहिले आहे. देशाची फाळणी होऊनही कोणतीही समस्या सुटली नाही, उलट समस्या जटिल बनल्या. भारताची आंतरराष्ट्रीय शक्ती कमी करण्यात पाकिस्तान गुंतला आहे. हिंदू-मुस्लिम समस्या जशीच्या तशी आहे. मुस्लिम फुटीरता स्वतंत्र्यानंतरही वाढतच आहे. कारण पाकिस्तानचे अस्तित्व त्याला तार्किक बळ देते. यासाठी अखंड भारतासाठी दीनदयाळजी आग्रही होते. ते राजकारणात आले तेव्हाही त्यांचा हा आग्रह कायम राहिला. ते लिहितात,
‘‘वास्तवात भारताला अखंड करण्याचा मार्ग युद्ध नाही. युद्ध केल्याने भौगोलिक एकता होऊ शकते, राष्ट्रीय एकता नाही. अखंडता भौगोलिकच नाही तर राष्ट्रीय आदर्शसुद्धा आहे. देशाची फाळणी द्वि राष्ट्र सिद्धांत आणि तडजोडीच्या वृत्तीमुळे झाली. अखंड भारत एक राष्ट्राच्या सिद्धांतावर मन, वचन आणि कर्माने दृढ राहिल्यास सिद्ध होईल. जे मुसलमान आज राष्ट्रीय दृष्ट्या मागास आहेत, तेही आपले सहयोगी बनू शकतील, जर आपण राष्ट्रीयतेशी तडजोड करणे सोडून दिले तर. आजच्या काळात जे अशक्य वाटते ते कालांतराने शक्य होऊ शकते. परंतु, त्यासाठी आवश्यकता आहे आदर्श आमच्यापुढे सदैव जीवंत ठेवले गेले पाहिजे.’’

त्यांनी ‘अखंड भारत क्यों’ हे पुस्तक संक्रमण काळात लिहिले आहे. प्रत्यक्ष संघ कार्यातून राजकीय क्षेत्रात जात असतानाच्या काळात हे पुस्तक लिहिले आहे. राष्ट्रीयतेशी तडजोड न करण्याची त्यांची मानसिकता अन्य एका लेखातून व्यक्त होते. ते लिहितात,
‘‘जर आपल्याला एकता हवी असेल तर भारतीय राष्ट्रीयता, जी हिंदू राष्ट्रीयता आहे आणि भारतीय संस्कृती जी हिंदू संस्कृती आहे, तिचे दर्शन करा. तिला आदर्श मानून पुढे जात राहा. भागीरथीच्या या पुण्यधारेत सर्व प्रवाहांचा संगम होऊ द्या. यमुनाही येऊन मिळेल आणि आपली मलिनता विसरून गंगेच्या धवल प्रवाहात एकरूप होऊन जाईल.’’
फक्त हिंदू धर्मच अन्य धर्मांचे अस्तित्व मान्य करतो. हिंदू धर्माची ही व्यापकताच सर्वांना सामावून घेईल, यावर दीनदयाळजींचा दृढविश्‍वास असल्याचे यातून दिसते.

इंग्रज निघून गेले. भारतीय राजकारणाला लोकशाहीस अनुरूप आकार येऊ लागला. महात्मा गांधी यांचे मत होते की स्वातंत्र्यानंतर लोकांनी आपापल्या विचारधारेनुसार वेगवेगळे पक्ष स्थापन करावेत. कॉंग्रेस हा पक्ष नव्हता, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांसाठीचे ते व्यासपीठ होते. स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्ष म्हणून काम न करता कॉंग्रेसचे विसर्जन करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तसे झाले नाही. परिणामी, समाजवादी लोक कॉंग्रेसपासून सर्वात आधी वेगळे झाले.

सरदार पटेल आणि पुरुषोत्तम दास टंडनसारख्या नेत्यांना वाटत होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉंग्रेससोबत येऊन काम करावे. पटेल यांनी यासाठी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पत्रही लिहिले होते. १९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वेळी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने संघाच्या स्वयंसेवकांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्यावे, यासाठी प्रस्ताव पारित केला होता. यामुळे कॉंग्रेसमध्ये वादंग माजला. नंतर टंडन यांना राजीनामा द्यावा लागला. याच वर्षी सरदार पटेल यांचे निधन झाले. लोकशाहीने चालणाऱ्या भारतात संघाच्या स्वयंसेवकाला राजकीय योगदान द्यायचे असेल तर त्यांच्यासाठी कॉंग्रेसची दारे बंद झाली होती. त्यामुळे भारतीय जनसंघाची स्थापना झाली. यासंदर्भात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑर्गनायझरमध्ये लिहितात,
‘‘श्री. टंडन हे कॉंग्रेस पक्षातले शेवटचे विचारवान नेते होते. ते पक्षात ‘भारतीय’ तत्त्वाचे प्रतिनिधीत्व करत होते. नेहरू यांच्यासमोर त्यांना निष्प्रभ झाल्यानंतर, त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. विचारधारेच्या दृष्टीने कॉंग्रेस क्रमश: राष्ट्रवादी भारतीय भावनांपासून दूर होत गेली. टंडन जर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर राहिले असते तर कदाचित जनसंघाची स्थापना करण्याची आवश्यकताच पडली नसती.’’

विचारधारेच्या कारणामुळे समाजवादी लोकांनी कॉंग्रेस सोडली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतंत्र भारताच्या मंत्रीमंडळात उद्योगमंत्री होते. नेहरू-लियाकत करारामुळे त्यांनी राजीनामा दिला. २१ ऑक्टोबर १९५१ मध्ये डॉ. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघाची स्थापना झाली. (पुढे त्यातूनच भारतीय जनता पक्ष उदयास आला.) पक्षाची स्थापना करण्यापूर्वी डॉ. मुखर्जी यांनी गोळवलकर गुरुजी यांची भेट घेतली होती. राष्ट्रीयतेची धारणा काय असावी, यावर दोघांचेही एकमत झाले होते. श्री. गोळवलकर यांनी ज्या निस्वार्थी आणि दृढनिश्‍चयी सहकाऱ्यांना नव्या पक्षाचा कार्यभार वाहण्यासाठी मुखर्जी यांना दिले, त्यात सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती होती पंडित दीनदयाळ उपाध्याय.

भारतीय जनसंघाचे पहिले अधिवेशन २९, ३० आणि ३१ डिसेंबर १९५२ ला कानपूर येथे झाले. दीनदयाळजींची या नव्या पक्षाचे महामंत्री म्हणून निवड झाली. येथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.
श्यामाप्रसादजी आणि दीनदयाळजी यांची आधीची ओळख नव्हती. पण अधिवेशनातील दीनदयाळजी यांची कार्यक्षमता, वैचारिक प्रगल्भता आणि संघटनक्षमता पाहून डॉ. श्यामाप्रसाद म्हणून गेले, ‘‘जर मला दोन दीनदयाळ मिळाले, तर मी भारतीय राजकारणाचा नकाशा बदलून दाखवेन.’’

पं. दीनदयाळ यांना वैयक्तिक जीवन नव्हते. संघाचे जीवन समर्पित प्रचारक होते ते. संघाचा स्वयंसेवक म्हणूनच त्यांनी भारतीय जनसंघाचे कार्य आपल्या जीवनाचे ध्येयकार्य म्हणून स्वीकारले होते. संघ आणि जनसंघ सोडून त्यांचे व्यक्तिगत किंवा सार्वजनिक असे जीवन नव्हते. सुमारे १७ वर्षापर्यंत ते जनसंघाचे महामंत्री या नात्याने पक्षाचे संघटक आणि विचारवंत होते.
सत्ताप्राप्ती हे राजकीय पक्षांचे उद्दीष्ट असते आणि दायित्वही. सत्तास्पर्धेसाठी राजकारणात उतरणे आणि आपले सिद्धांत, आदर्श यानुसार सत्ता आणि समाजाला नेतृत्व देण्यासाठी राजकारणात उतरणे या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. यासंदर्भात दीनदयाळजींचे विचार अतिशय स्पष्ट होते. त्यामुळेच डॉ. मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर प्रस्थापित नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत येऊ लागली तेव्हा दीनदयाळजींनी स्पष्टपणे म्हटले की,
‘‘आमच्यासमोरील आदर्शवाद आणि त्यातून उत्पन्न झालेल्या आमच्या अढळ श्रद्धेची आंतरिक शक्ती समजून घेण्यात बहुतेकजण असमर्थ आहेत. त्यामुळेच अध्यक्षपदाबाबत ते मनमानी आडाखे बांधत आहेत. हवेत अनेक नावं उडत आहेत. त्यातील अनेकजण आमच्या पक्षाचे सदस्यही नाहीत. नेत्याच्या शोधात आम्ही फेरफटका मारू आणि जिथे कोठे नेता दिसेल त्याला हार घालू असे कोणी समजू नये. आमच्यासाठी नेता हो कोणी वेगळा नसतो, तो संघटनेचा अभिन्न अंग असतो.’’

राजकीय अनुभव आणि वय पाहता दीनदयाळजी खूपच लहान होते. परंतु, आत्मविश्‍वास आणि संघटनेच्या विचारधारेबद्दल ते खूप स्पष्ट होते. ते साधेभोळे दिसायचे, पण तसे ते नव्हते. यासंदर्भात तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मत विचारात घेण्याजोगे आहे. ते म्हणतात, ‘लोकांना वाटतं ते साधेभोळे होते, पण मला तसे वाटत नाही. साध्याभोळ्या व्यक्तीला कोणीही गंडवू शकतो, पण त्यांना गंडवणे कदापी शक्य नव्हते. त्यांना बोलण्यात कोणी फसवणे शक्यच नव्हते. ते साधे अवश्य होते, पण जे सांगायचे आहे ते अतिशय विनम्र परंतु थेट शब्दांत बोलायचे.’

पं. दीनदयाळ यांनी पहिल्या अधिवेशनात मांडलेला ‘सांस्कृतिक पुनरुत्थान’चा प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रीयतेसाठी केवळ भौगोलिक एकता पुरेशी नाही. एका देशातील लोक तेव्हाच एक राष्ट्र बनतील जेव्हा ते सांस्कृतिकदृष्ट्‌या एकरूप झालेले असतील. भारतीय समाज जोवर एका संस्कृतीचा अनुगामी होता, तोवर अनेक राज्ये असूनही येथील लोकांची मूलभूत राष्ट्रीयता टिकून राहिली. पण द्विराष्ट्र सिद्धांताला मान्यता दिल्याने देशाची फाळणी झाली. पाकिस्तानात गैरमुस्लिमांचे राहणे अशक्य बनले. उर्वरित भारतातही मुस्लिम संस्कृती वेगळी मानून द्विराष्ट्रवाल्या प्रवृत्तीचे पोषण सुरू आहे. हे थांबवण्यासाठी पं. दीनदयाळ यांनी भारताच्या एक राष्ट्रीयत्वाच्या विकासावर भर दिला. कोणत्याही रिलीजनचे नाव न घेता पं. दीनदयाळ आवाहन करतात,
‘‘हिंदू समाजाचे राष्ट्राबद्दल कर्तव्य आहे की भारतीय जनजीवनाच्या आणि आपल्या ‘त्या अंगांच्या’ भारतीयीकरणाचे महान कार्य आपल्या हाती घ्यावे, जे परकीयांमुळे स्वदेशपराङमुख आणि प्रेरणेसाठी विदेशाभिमुख झाले आहेत. हिंदू समाजाने त्यांना स्नेहपूर्वक आत्मसात केले पाहिजे. या प्रकारानेच धर्मांधतेचा अंत होऊ शकेल आणि राष्ट्राचे ऐक्य आणि दृढीकरण शक्य होईल.’’

धर्म वेगळे असू शकतील, मात्र संस्कृती एक आहे. धर्माच्या आधारावर वेगळी संस्कृती जनसंघाला मान्य नाही. कारण अनेक संस्कृती, मिश्र संस्कतीच्या विचारातच फुटीरतेचे मूळ आहे. दीनदयाळजी म्हणतात, ‘जनसंघ हा मुळात संस्कृतीवादी आहे. संस्कृतीच्या आधारशीलेवरच आमचे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक चिंतन उभे आहे.’

१९६४ मध्ये राजस्थानातील एका संघ शिबिरात पं. दीनदयाळ यांचे बौद्धीक व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले, ‘स्वयंसेवकाने राजकारणापासून अलिप्त राहिले पाहिजे, जसा मी आहे.’ रात्रीच्या प्रश्‍नोत्तर सत्रात त्यांना विचारण्यात आले, आपण तर एका राजकीय पक्षाचे अखिल भारतीय महामंत्री आहात. मग राजकारणापासून अलिप्त कसे? त्यावर पंडीत दीनदयाळ म्हणाले, ‘मी राजकारण करण्यासाठी राजकारणात नाही, राजकारणात संस्कृतीचा राजदूत म्हणून माझे काम आहे. राजकारण संस्कृतीशून्य होणे ठीक नाही.’

भारतीय जनसंघ एक संस्कृतीवादी पक्ष म्हणून विकसित व्हावा, असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे संस्कृतीचे राजदूत असणे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून दिसून येते. निवडणूक लढण्यासाठी ते राजकारणात आले नव्हते, पण त्यांना निवडणुकीला उभे करण्यात आले. तेव्हाचे त्यांचे वर्तन संस्कृतीच्या राजदूताला साजेसेच होते. उत्तर प्रदेशचे तत्कालीन प्रांत प्रचारक भाऊराव देवरस यांच्यामुळे योजनेमुळे ते उमेदवार बनले. गुरुजी त्यावर म्हणाले, ‘निकाल काहीही लागो नुकसान आहे. जिंकल्यास अधिक, पराभूत झाल्यास कमी!’

प्रचारात कॉंग्रेसकडून जातीचे राजकारण खेळले गेले. पण दीनदयाळजींनी जातीचा आधार घेणे नाकारले. ते राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरच प्रचार करत राहिले. परिणामी पराभव झाला. विजयी उमेदवाराला लोकहिताच्या कार्यात सहयोग देण्याचे जाहीर करण्यासाठी सभा घेणारे दीनदयाळजी होते.
जवाहरलाल नेहरू यांच्या कॉंग्रेसच्या विरोधात दीनदयाळजींचा पक्ष मैदानात होता. जनसंघ आणि संघाबद्दल जवाहरलालजी यांचा व्यवहार कटुतेचा होता. परंतु, दीनदयाळजींनी अनेक प्रसंगी त्यांच्याप्रति जो व्यवहार केला तो त्यांच्या सांस्कृतिक राजदूताला साजेल असाच होता. १९६२ च्या युद्धात पेकिंग रेडीओवरून नेहरूंचा अपमान करण्यात आला. त्यावेळी दीनदयाळजींची भूमिका, नेहरू पूर्व युरोपच्या दौऱ्यावर गेले तेव्हाची भूमिका पक्षीय राजकारणाच्या वर आलेली दिसते. काही लोकांना हे विचित्र वाटायचे. पण दीनदयाळजींनी त्याची कधी पर्वा केली नाही. संघटन शक्ती आणि वैचारिक चिंतनावर त्यांचा अधिक भर होता.

काश्मीरप्रश्‍न, गोवा मुक्ती आंदोलन, पाकिस्तानला बेरूबाडी क्षेत्र हस्तांतरण करण्याच्या विरोधातील आंदोलन, कच्छ करारापासून ते ताशकंद करारापर्यंत नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांना तीव्र विरोध करत देशभक्तीची भावना दीनदयाळजींनी प्रखर ठेवली होती.

दीनदयाळजी स्वभावानेच सैद्धांतिक व्यक्तमत्त्व होते. परंतु, परराष्ट्रनीतीच्या बाबतीत त्यांनी सिद्धांतशास्त्रावर विश्‍वास ठेवला नाही. विशुद्ध व्यावहारिकता हाच त्यांचा सिद्धांत होता. त्यांच्या दृष्टीने परराष्ट्र धोरणाचा एकच आधार होता, तो म्हणजे ‘राष्ट्रीय हित’. त्यांच्याच शब्दांत, ‘भारतीय जनसंघाची श्रद्धा आहे की कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्राचे हित हे एकमेव उद्देश ठेवूनच आखले पाहिजे. ते यथार्थवादी आणि जगाचे नैसर्गिक वागणे ध्यानात घेऊन ठरवले पाहिजे.’
त्यामुळेच परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत ते कोणत्याही काल्पनिक सिद्धांतवादात अडकत नाहीत. म्हणूनच तटस्थ गटासारख्या निरर्थक धोरणावर ते प्रहार करतात. चीनशी टक्कर द्यायचे तर नव्या शक्तीगटाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करतात. संरक्षणसिद्धतेबद्दलही त्यांचा आग्रह आहे.

सैनिकीकरण आणि अणुबॉम्बच्या आवश्यकतबद्दल त्यांच्या मनात किंतुभाव नव्हता. ‘प्रहारात्मक सिद्धता हीच श्रष्ठ सुरक्षा व्यवस्था’ असे त्यांचे मत होते. राष्ट्राचे सैनिकीकरण आणि सेनेचे आधुनिकीकरण केले पाहिजे. संरक्षणाच्या क्षेत्रात पाश्‍चात्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याला त्यांची आडकाठी नव्हती, आग्रह होता. अर्थकारण, समाजकारण, शिक्षणविषयक धोरण, राजकीय व्यवस्था या सर्व ठिकाणी पाश्‍चात्य आधुनिकतेला ते विरोध करतात किंवा अटी घालतात. परंतु संरक्षणाच्या बाबतीत मात्र आधुनिकीकरणाचे समर्थक आहेत. गरज पडली तर कोणीही तरुण सैनिक होऊ शकला पाहिजे, असे शिक्षण हवे. अनिवार्य सैनिकी शिक्षणाचे ते पक्षधर होते. संस्कृतीच्या नावाखाली भोंगळवाद जोपासणे त्यांना कदापी मान्य नव्हते.

-सिद्धाराम भै. पाटील,
लेखासाठी आधार : आधुनिक भारत के निर्माता पंडित दीनदयाल उपाध्याय, ले. महेश चंद्र शर्मा, प्रकाशन विभाग, सूचना और प्रसारण मंत्रालय, भारत सरकार
http://www.psiddharam.blogspot.in/2016/02/blog-post_11.html

No comments:

Post a Comment