Pages

Sunday, February 7, 2016

#rss_चा_पर्दाफाश भाग ३



#संघाने_पटेलच नाही तर #नेहरू यांनाही ओढले होते जाळ्यात
महात्मा गांधी यांचे मत होते की स्वातंत्र्यानंतर लोकांनी आपापल्या विचारधारेनुसार वेगवेगळे पक्ष स्थापन करावेत.
स्वातंत्र्य मिळेपर्यंत कॉंग्रेस हा पक्ष नव्हता, स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांसाठीचे ते एक व्यासपीठ होते.
स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्ष म्हणून काम न करता कॉंग्रेसचे विसर्जन करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तसे झाले नाही.
परिणामी, समाजवादी लोक कॉंग्रेसपासून सर्वात आधी वेगळे झाले.

सरदार पटेल आणि पुरुषोत्तम दास टंडनसारख्या नेत्यांना वाटत होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कॉंग्रेससोबत येऊन काम करावे.
पटेल यांनी यासाठी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना पत्रही लिहिले होते.
१९५० मध्ये पुरुषोत्तम दास टंडन हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वेळी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने संघाच्या स्वयंसेवकांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश द्यावे, यासाठी प्रस्ताव पारित केला होता.
यामुळे कॉंग्रेसमध्ये वादंग माजला.
नंतर टंडन यांना राजीनामा द्यावा लागला.
याच वर्षी सरदार पटेल यांचे निधन झाले.
पण या इतिहासाची संघाला विरोध करणाऱ्या अनेकांना माहीती नसते.

संघाला विरोध करणाऱ्यांमध्ये अधिकांश लोक हे बिनडोक असतात. विरोध करण्यासाठी का होईना संघाची प्राथमिक माहिती असली पाहिजे, हेही त्यांना कळत नाही.
वागळे, सप्तर्षी, बाळ वगैरे मंडळींवरच हे विसंबून असतात.
त्यामुळे संघावर बिनतोड आरोप करता येत नाही आणि यामुळे संघाचे फावते.
संघावर करण्यात येणारे आरोप इतके बाळबोध असतात की संघाचे विरोधक सहज खोटे पडतात. यातीलच एक आरोप म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनात कुठे होता संघ, असा सवाल नेहमीच करत राहतात.
मागील लेखांकात म्हटल्याप्रमाणे संघाचे संस्थापकच विदर्भातील काॅंग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात जेल भोगला.
स्वातंत्र्य मिळताना मुस्लीम लीगने देशाचे तुकडे पाडले. दंगली पेटवण्यात आल्या. त्यावेळी जीव धोक्यात घालून लाखो हिंदूंना खंडित भारतात सुखरूप आणण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले.
यात शेकडो अनाम स्वयंसेवकांनी प्राणाचे बलिदान दिले. याचे ढीगभर पुरावेही उपलब्ध आहेत.
याशिवाय फाळणीनंतर काहीच दिवसांत पाकिस्तानच्या टोळ्यांनी आक्रमण केले.
तेव्हा श्रीनगर विमानतळावर साचलेला बर्फ संघाच्या स्वयंसेवकांनी ४८ तासांच्या आत दूर करून भारतीय जवानांना मोठी मदत केल्याची इतिहासात नोंद आहे.
इतकेच नाही तर १९६२ ला चीनने केलेल्या युद्धात सैनिकांच्या मदतीला संघाचे शेकडो स्वयंसेवक धावून गेले.
यामुळे प्रभावित होऊन नेहरूंनी rss ला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीच्या संचलनात सहभागी करून घेतले.
हे सत्य आहे.
असे असताना संघाच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याचा मूर्खपणा संघाचे विरोधक करतात. यामुळेच संघाला सहानुभूती मिळते. परिणामी संघाला संपवणे अशक्य होऊन बसले आहे.

संघ खूप पाताळयंत्री आहे. संघाचे षडयंत्र सहजासहजी समजत नाहीत. यामुळेच पटेल, नेहरूंसारखे दिग्गज संघाच्या जाळ्यात अडकले.
संघाचे लोक कधी आरोपाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण बालिश आरोपांना उत्तर देणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे त्यांना वाटते. यामागे विरोधकांना अनुल्लेखाने मारण्याचे त्यांचे षडयंत्र असते.
संघाचे बहुतांश विरोधक संघाप्रमाणे विधायक सेवाकाम उभे करू शकलेले नाहीत.
त्यामुळेही त्यांचे आरोप हे केवळ बुडबुडे ठरतात.

माणूस जितका स्वार्थी तितका तो अनीतीमान असतो.
अशी माणसं कधी एकोप्याने काम करू शकत नाहीत.
संघाच्या बहुतेक विरोधकांना ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.
त्यामुळे संघाच्या विरोधकांमध्ये कधीच एकी नसते. संघविरोधकांच्या चळवळीत अनेक फाटाफुटी असतात.
याचा फायदा मात्र संघाला होतो.

थोडक्यात, संघाला संपवण्यासाठी संघाचे साहित्य, कार्यपद्धती, बलस्थाने यांचा अभ्यास व्हायला हवा.
पण संघाचे काही विरोधक तर इतके भित्रे असतात की, त्यांना वाटते आपण संघाचा अभ्यास केल्याने संघाच्या प्रेमात पडू. त्यामुळे संघाने प्रकाशित केलेली पुस्तके ते वाचतच नाहीत.
काही विरोधक खूप आळशी असतात, त्यामुळे ते वाचत नाहीत. काही खूप स्वार्थी असतात, केवळ आपल्या संघविरोधी साहेबाला खुष करण्यासाठी संघावर बुळबुळीत झालेले आरोप करत बसतात.
परिणाम काय तर संघाचे फावते.
संघ आक्टोपसप्रमाणे आहे. संघाची षडयंत्रे समजून घेणे अवघड काम आहे. संघाला चिरडून टाकतो म्हणणारे नेहरू आणि पटेलही संघाचे पाठिराखे बनले. म्हणजे संघाने किती कुटीलतेने काम केलं असेल.
हे सारं चक्रावून सोडणारं आहे. पण, मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही.
मी शक्य तेवढं संघाला उघडे पाडणारच.
पर्दाफाश करणारच.
संघाला संपवणं हेच माझे ध्येय आहे.
क्रमश:
- सिद्धाराम

#आपल्या सूचना, टीका, टिप्पणी यांचं स्वागत आहे. पर्दाफाश करण्यास उपयोगी संदर्भ असतील तर psiddharam@gmail.com वर जरूर पाठवा.
***
मागील लेख...

#rss_चा_पर्दाफाश भाग १   

#rss_चा_पर्दाफाश भाग २
 #rss_चा_पर्दाफाश भाग ३





No comments:

Post a Comment