Pages

Wednesday, May 10, 2017

ज्ञानप्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा ताम्हणकर यांचे निधन


प्रतिनिधी । सोलापूर
ज्ञानप्रबोधिनीचे  ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत सीताराम तथा आण्णा ताम्हणकर (वय ८५) यांचे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निधन झाले. मायस चिनिया ग्रेविस या आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी येथील वैद्यकीय महाविद्यालयास देहदान केले होते. ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात देहदान विधी झाल्यानंतर त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले. ताम्हणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, ज्ञानप्रबोधिनीचे द्वितीय संचालक, अनेक वर्षे कार्याध्यक्ष आणि ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी (ता. लोहारा) येथील केंद्राचे प्रमुख होते.
वयाच्या विशीत रा. स्व. संघाच्या संस्कारामुळे आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित करायचे ठरवले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झटत राहिले. पुणे विद्यापिठातून सुवर्णपदकासह एमए एमएड केल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र या विषयात आण्णांनी विजिगीषु प्रेरणा हा संशोधन प्रबंध सादर करुन डाॅक्टरेट मिळवली. १९६२ मध्ये कै. आप्पा पेंडसे यांनी शिक्षण, संशोधन, ग्रामविकास आणि उद्योग या क्षेत्रात नवरचना व मनुष्यघडणीचे कार्य करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी या संघटनात्मक संस्थेची स्थापना केली.
१९६३ ते ६८ या काळात पुणे विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागात अध्यापन आणि त्यानंतर ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्य केले. १९६९ ते १९८२ या संपूर्ण एका तपात आण्णांनी पुण्याजवळील शिवगंगा खोऱ्यात यंत्रशाळेचे प्रशासक म्हणून कार्य केले. एक हजार ग्रामीण तरुणांना यांत्रिकी विद्येतील प्रशिक्षण दिले. यंत्रशाळा उभारून अल्पशिक्षित ग्रामीण तरुणांतून अनेक उद्योजक उभे केले. १९७२ ते १९८३ या काळात ज्ञानप्रबोधिनी या मातृसंस्थेचे कार्यवाह झाले. १९८३ मध्ये आप्पा पेंडसे यांच्या निधनानंतर आण्णा यांनी प्रबाधिनीचे द्वितीय संचालक म्हणून सहा वर्षे धुरा वाहिली.
१९८९ मध्ये सोलापुरात ज्ञानप्रबोधिनीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी आण्णा आपल्या कर्तत्वशाली कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी शिवगंगा, गुंजवणी नद्यांच्या परिसरात पुण्याजवळी विविध ग्रामविकास कार्यांची उभारणी केली. दारुबंदी आंदोलन, बिहार भूकंपानंतर ११५ कार्यकर्त्यांसह तेथे जाऊन सेवाकार्य, खलीस्तानी अतिरेक्यांच्या चळवळीने पेटलेल्या पंजाबात सद््भावयात्रा, कोचीन येथील १९८३ च्या सर्वधर्म परिषदेत सहभाग, युरोपात तीन महिन्यांचा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास, प्रबोधिनीच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी अमेरिका दौरा असे कार्य केले. पुणे, सोलापूर, निगडी आणि हराळीत प्रबोधिनीच्या कलशविराजित वास्तू निर्माण केल्या.
सोलापुरात आण्णा आणि डाॅ. स्वर्णलता भिशीकर यांच्या मार्गदर्शनातून प्रबोधिनीच्या रुपाने शिक्षण व संस्कार केंद्र उभे राहिले. फेब्रुवारी २००० पासून दक्षिण मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हराळी या भूकंपग्रस्त गावी आधुनिक साधनांनी संपन्न शिक्षणतीर्थ उभे करण्याचा संकल्प करण्यात आला. हराळी, नारंगवाडी, तोरंबा, किल्लारी या परिसरातील अनेक गरजूंना कर्जे देऊन त्यांचे व्यावसायीक पुनर्वसन केले. तसे १९९५ ला हराळीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केली. ३०० विद्यार्थ्यांचे निवासी गुरुकुल सुरू केले. १९९५ ते २००० या काळात ७ हजार फळवृक्षांची लागवड, नऊ एकरचे सत्तर एकर झाले. शेतकऱ्यांसाठी बाजार माहिती केंद्र, रोपवाटिका, शेततळी, गांडूळ खत निर्मिती, फलप्रक्रिया उद्योग, कृषी पदविका अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम सुरू झाले.
**
आजवर मिळालेले पुरस्कार
शैक्षणिक योगदानाबद्दल डोंबिवलीच्या टिळक शिक्षण संस्थेतर्फे कै. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते तेजस पुरस्कार, औरंगाबादच्या नवनीत प्रकाशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार, माधवराव चितळे यांच्या हस्ते पुण्याचा निसर्गमित्र पुरस्कार, अंबरनाथचा दधीची पुरस्कार, कऱ्हाडचा प्रभुणे पुरस्कार.

No comments:

Post a Comment