Pages

Wednesday, April 29, 2020

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी

Aparna Ramtirthkar
चला नाती जपुया आणि आईच्या जबाबदार्‍या हे कौटुंबिक विषय घेऊन ज्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यांत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली, लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकलेल्या शेकडो मुलींना अलगद बाहेर काढून त्यांच्या पालकांना सोपवलं, शेकडो कुटुंबे घटस्फोटापासून, उद्ध्वस्त होण्यापासून ज्यांनी वाचवली त्या अ‍ॅड. अपर्णा  अरुण रामतीर्थकर तथा अपर्णाताई यांचे मंगळवार, दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.45 वाजता सोलापूर येथील अश्विनी रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. यानिमित्त सिद्धाराम भै. पाटील यांचा लेख 

पक्षाघाताचा झटका आल्याने गुढी पाडव्याच्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिली अन् अखेर वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या मागे मुलगा आशुतोष, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी.
पती, पत्नी दोघेही विचारांचे पक्के होते. आपण घेतलेल्या भूमिकेसाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. किंबहुना आपण स्वीकारलेला मार्ग हा खडतर आहे, काट्याकुट्याचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कटु असलेले सत्य मांडताना आडपडदा ठेवायचा नाही. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. सत्य थोडेही डायल्यूट न करता, तीव्रता कमी न करता थेट मांडणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.


कटु सत्य भेदकपणे मांडण्याची रामतीर्थकर शैली महाराष्ट्रातील सामान्य माणसाने सहज स्वीकारली. आपली मानली. पण, काही मतलबी बुद्धीजीवींनी आपल्या मनातील संकुचितता अपर्णाताईंना चिटकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अपर्णाताई या मध्ययुगीन मानसिकतेच्या समर्थक आहेत येथपासून ते त्या स्त्री जातीच्या शत्रू आहेत, येथपर्यंत अनेक आरोप होत राहिले. पण याच वेळी समाजाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.
महिन्यातील किमान 25 ते 28 दिवस प्रवास करणे ही त्यांची दिनचर्याच बनून गेली होती. पायात जणू भिंगरी. अफाट जनसंपर्क. महाराष्ट्रातील गावोगावी आणि बहुतेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांत शिवसेना, भाजपा, हिंदू जनजागरण समिती, विविध ज्ञाती संस्थांचे कार्यकर्त  होते. तसे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पडद्यामागून आयोजन करणारे कार्यकर्तेही होते. मठ-मंदिरांचे विश्वस्त, महिला मंडळे, प्रगतशील शेतकरी असे विविध थरातील कार्यकर्त्यांसाठी अपर्णाताई दैवत बनल्या होत्या.  
सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली आणि चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ मांडला होता. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. काही सभांना 30 ते 40 हजारांची उपस्थिती.
एखादी सामान्य स्त्री मनात जिद्द बाळगून पुढे आली तर ती असामान्य काम उभे करू शकते याचे अपर्णाताई या जीवंत उदाहरण. अपर्णाताई या मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून सोलापूरला आल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
रोज व्याख्यान म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारत, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली. दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करत.
कामाची गरज ओळखून त्यांनी आपले जीवन अनेक अंगांनी फुलवले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तित्वाला त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचा पाया होता. जे काही करायचं ते समाजासाठी. आर्थिक स्थिती बेताची असतानाही जी निस्पृहता त्यांनी शेवटपर्यंत दाखवली त्याला तोड नाही. पैशाविषयीचा जो भाव श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ठायी होता तोच भाव रामतीर्थकर दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या अंगी असलेले धाडस यातूनच आले असावे.
अपर्णाताई यांचा सहवास मिळालेला प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभावाने बांधला जात असे. खंबीर बोलणार्‍या अपर्णाताई मनाने खूपच हळव्या होत्या. सुलभ, सोप्या भाषेत लिहिणार्‍या अपर्णाताई सिद्धहस्त लेखिका होत्या. कुठे तरी चुकतंय हे दै. पुण्य नगरीतील साप्ताहिक सदर अनेक वर्षे महाराष्ट्रात गाजलं. दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या पत्नींशी हितगुज करणारे सदरही पत्रकारितेतील त्यांचा अधिकार सांगणारे ठरले. मराठी माध्यम जगताला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा अपर्णाताई यांनी वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत मंथन नावाने प्रबोधन करणारी साप्हाहिक मालिका चालवली. प्रभावी वक्त्या म्हणून परिचित असलेल्या अपर्णाताई या हौशी कलावंत होत्या. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.
नाटक, समाजसेवा, कायदा,  समुपदेशन असे कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हते. सोलापुरात पाखर संकुल आणि उद्योगवर्धिनी या संस्था नावारूपास आणण्यात अपर्णाताई यांचा वाटा सिंहाचा होता. या संस्थांनी हजारोंच्या संख्येने महिलांना स्वावलंबी बनवले. अंगी संघटन कौशल्य होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पु. भा. भावे हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे जीवन अनुकरणीय होते.  त्यांच्या व्याख्यानांवरून अनेकदा वादळ उठले तेव्हाही त्या अतिशय शांत होत्या. आपले संतुलन त्यांनी ढळू दिला नाही. सनातन संस्थेचे  संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावर अपर्णाताई यांची श्रद्धा होती. अपर्णाताई यांचे जीवन हे एका तपस्विनीचे जीवन होते.

संघ गीताच्या पुढील ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात...
पतझड के झंझावातों में
जग के घातों प्रतिघातों में
सुरभी लुटाता सुमन सिहरता
निर्जनता में भी खिलता है
दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवनभर अविचल चलता है.


तीन जिस्म मगर एक जान

Shubhangi Buwa, Aparna Ramtirthkar & Chandrika Chauhan

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर, चंद्रिका चौहान आणि शुभांगी बुवा ही तीन नावे सोलापूरच्या सामाजिक विश्वात एकत्रितरीत्या घेतली जातात. सुमारे दोन तप म्हणजे 24 वर्षांहून अधिक काळ या तिघींनी पाखर संकुल, शुभराय मठ आणि उद्योगवर्धिनी या तिन्ही संस्था एकदिलाने नावारुपास आणल्या. कुटुंबपद्धती टिकून राहावी. देशभक्ती आणि हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये रुजावी, ही तळमळ तिघींची समान प्रेरणा. या बाबतीत अपर्णाताई अगदी कट्टर होत्या. याबद्दल चंद्रिका चौहान म्हणतात, आम्ही तिघी खूप भांडत होतो. नंतर रडतही होतो. पण बाहेर समाजासमोर येताना आम्ही तिघी एकत्रच. तीन जिस्म मगर एक जान है हम, असे आम्ही गंमतीने म्हणत असू. बाबा म्हणजे अपर्णाताईंचे पती अरुण रामतीर्थकर बुद्धीवादी. मोठे विचारवंत. मी बायको, मला काही येत नाही. मी तर सामान्य गृहिणी, अशी अपर्णाताईंची भावना. शिक्षणही अर्धवट होतं. पण पतीकडून शिकण्याची जिद्द मात्र होती. पतीकडून सर्वकाही शिकल्या. पतीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंजून वैचारिक प्रबोधन करू लागल्या. बाबा गेले. ताई खचू लागल्या. मार्चच्या शेवटच्या दिवसांत पक्षाघाताने गाठलं. अपर्णाताई कालवश झाल्या. त्यामुळे तीन पैकी एक खांब निखळला.


अपर्णाताई यांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत
1. वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेर्‍या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. हे उदाहरण अपवाद नाही. किचन नका संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.
2. लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत. अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.


महत्वाचे लेख पुढील लिंकवर 
अपर्णा ताई यांनी स्वत:विषयी लिहिलेला लेख
 वादळाशी केला संसार 

लव जिहाद संबधी अपर्णा ताई यांची मुलाखत
लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

No comments:

Post a Comment