Pages

Sunday, December 20, 2020

धन्य ते जीवन...

मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.


स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.
११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ.
ही त्यांची शेवटची भेट ठरली.

९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’.
ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.
९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते.
एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?.
सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.
शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.
इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले.

विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.
विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.
हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.

No comments:

Post a Comment