Friday, January 8, 2021

विनाकारण माहोल का खराब कोण करत आहे ?


मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागातून रॅली काढू नका, अशी ही बातमी आहे.

सर्वसामान्य माणूस या बातमीकडे कसा पाहातो? अरे हे योग्यच आहे की. मुस्लिमबहुल भागातून रॅली का काढायची? विनाकारण माहोल का खराब करायचा ?. यामागे एक भावना असते की विनाकारण वाद नको. यामुळे गंगा जमनी तहजीब धोक्यात येईल. समाजाची एकता उसवली जाईल. वरवर पाहता हा विचार योग्यच आहे, असे वाटू शकते.
परंतु, इतका वरवरचा विचार करून सोडून देण्यासारखा हा विषय नाही, असा विचार करणारा एक मोठा वर्गही देशात आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो.
मुस्लिम इलाख्यातून रॅली का काढायची नाही? देशाच्या कोणत्याही भागातून रॅली काढण्याचा हक्क घटनेने दिला आहे की नाही? मुस्लिम इलाख्यातून रॅली काढायचा नाही, ही मागणी मान्य झाली तर उद्या हिंदूंनीही अशीच भूमिका घेतली तर? तर काय होईल? हिंदू इलाख्यात मशिदी नकोत, हिंदू इलाख्यात बांगचा आवाज ऐकायला येऊ नये, अशी मागणी लोकांनी करायला सुरूवात झाली तर देशात ऐक्य राहील काय? असा विचार करणारा एक मोठा वर्ग देशात तयार हाेत आहे.
येथे मला एक उदाहरण आठवते. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील ही घटना आहे. या वनवासी भागात फार मोठ्या प्रमाणात मतांतर झाले आहे. वनवासी बांधवांना प्रलोभने दाखवून, त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. कांॅग्रेस सत्तेत असताना भवानीशंकर नियोगी आयोग नेमला होता. त्यामध्ये याबद्दल फार विस्तृत माहिती आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनीही याबद्दल पुष्कळ लेखन केले आहे.
डांग जिल्ह्यातील एका गावात मतांतर झाल्याने ख्रिश्चन बनलेल्यांची संख्या अधिक झाली. त्या गावामध्ये एका मतांतर न केलेल्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या जागेत मंदिर उभारण्याचे ठरवले. गाव ख्रिश्चनबहुल आहे आणि त्यामुळे तुम्हाला येथे आता नव्याने मंदिर बांधता येणार नाही, अशी भूमिका तेथील ख्रिश्चनांनी घेतली. तेथे यावरून दंगल उसळली. दोन दशकांपूर्वीची ही गोष्ट आहे. देशातील मुख्य वृत्तपत्रे आणि टीव्ही मीडियातील बहुतेकांनी तेथे हिंदुंनाच जातीयवादी ठरवले. ख्रिस्तीबहुल भागात मंदिर बांधायची गरजच काय, अशी भूमिका घेण्यात आली.
अशीच एक घटना कोरोना काळात घडली. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका गावातली ही घटना. ख्रिस्ती झालेल्यांची संख्या त्या गावात ५२ टक्के आहे. त्या गावातील एका मंदिराच्या आवारात भारतमातेची मूर्ती स्थापित करण्यात आली. तेथील काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. रस्त्यावरुन जाताना ही मूर्ती दृष्टीस पडते आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावतात, अशी ती तक्रार होती. लगेच पोलिसांनी कारवाई करत भारतमातेची मूर्ती कापडाने झाकून टाकली. मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावर मूर्ती मुक्त झाली.
आपल्या देशात लाखो गावांमध्ये आजही हिंदू बहुसंख्येने आहेत. जेथे हिंदू बहुसंख्येने आहेत तेथे मशिदी आणि चर्च उभारायला नको, अशी भूमिका हिंदू समाजाने कधी घेतली आहे का? शहरांमधील कोणत्याही हिंदू भागात मशिदी, चर्च उभारू नका, म्हणून कोणत्या हिंदूने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे का? समजा असे निवेदन दिले तर तसे करणे योग्य होईल का? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग समाजात तयार झाला आहे.
असे प्रश्न निर्माण होतातच कशाला? हे समजून घेतले पाहिजे.
जगात एकमेव माझाच रिलीजन किंवा मजहब खरा आहे. इतर सर्व लोकांनी मतांतर करून माझ्याच रिलीजन वा मजहबचा स्वीकार केला पाहिजे, असा विचार एकांतिक रिलीजनकडून शेकडो वर्षांपासून मांडण्यात आला आहे. दुसऱ्या धर्माचे अस्तित्वच स्वीकारायचे नाही, हा तो विचार आहे. जगभरात होणाऱ्या धर्मांतराच्या मागे हाच एकांतिक विचार आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये हा संकुचित विचार प्रबळ आहे. संपूर्ण जग ख्रिस्ती बनले पाहिजे किंवा संपूर्ण जग दार उल इस्लाम बनले पाहिजे, असा विचार त्या त्या पंथांतील प्रमुख गटांकडून राबवण्याचा प्रयत्न होत असतो. यातूनच धर्मांतर, जिहाद वगैरे प्रकार पुढे येतात. आमच्या इलाख्यातून इतर धर्मियांची रॅली नको, गणपतीची मिरवणूक नको, आमच्या गावात मंदिर नको… वगैरे मागणीमागे माझाच एकमेव धर्म खरा हा संकुचित विचार आहे.
हिंदू हा समावेशक धर्म आहे. सर्वच धर्म सत्य आहेत. कोणत्याही मार्गाने तुम्ही इश्वरापर्यंत पोहोचू शकता. ईश्वर कणाकणांत आहे. ईश्वर एक आहे पण तो अनेक रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू विचार आहे. हिंदू धर्म हा इतर धर्मांचे, रिलीजनचे, पंथांचे अस्तित्व मान्य करतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन पंथातील विचारी लोकांनीही इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करावे, यातूनच जगात शांती नांदेल, असे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले होते.
थोडक्यात, गंगा जमनी तहजीब वाढायची असेल, समाजातील एकता वाढीस लागायची असेल तर आमच्या इलाख्यातून रॅली नको.. वगैरे भूमिका न घेता आम्ही रॅलीवर पुष्पवृष्टी करू.. आपण गुण्यागोविंदाने नांदू. मुस्लिम इलाख्यातून जाणाऱ्या मिरवणुका, रॅली यांचे स्वागत करू. सहकार्य करू अशी भूमिका घेतली पाहिजे. यामुळे मूळत:च सहिष्णू असणाऱ्या हिंदूंच्या मनात मुस्लिम समाजाविषयी शतपटीने प्रेमाची भावना निर्माण होईल. हिंदू मुस्लिम एकता ही समस्या राहाणार नाही. राजकीय लोक गैरसमज निर्माण करण्यासाठी पुढे येतील. त्यांना दूर करा. हिंदू – मुस्लिम यांनी एकमेकांचा आदर करणे हीच खरी मानवता आहे. ती वाढली पाहिजे. परंतु, ती वनवे असणार नाही. आमच्या इलाक्यात येऊ नका, असा फुटीर विचार करून विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकत नाही.
सिद्धाराम
080121

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी