Pages

Wednesday, June 29, 2022

ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन

बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली

‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.


पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्‌‍' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. 

लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार

प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र
लेखक - मिलिंद सबनीस
प्रकाशक - जटायु अक्षरसेवा
मूल्य - ५९९
सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)

पुस्तक मागवण्यासाठी jataau.com/shop/rishi-bankim

9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.

No comments:

Post a Comment