Pages

Saturday, August 3, 2013

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं?

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा पाकिस्तानी नागरिक. इंजिनीयर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो अमेरिकन नौदलात इंजिनीयर म्हणून नोकरी करतो.

सुट्टीवर आलेला फराझ नमाज पढायला गावाच्या मशिदीत गेला. नमाजानंतरच्या भाषणात मौलवीने अमेरिका आणि अमेरिकेला तालिबानविरोधी लढ्यात मदत करणारं पाकिस्तान सरकार यांच्यावर कडाडून टीका केली. मौलवींचे प्रवचन संपल्यावर फराझ मौलवींजवळ जाऊन एवढंच म्हणाला की, ‘हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा प्रश्‍न आहे. त्याबाबतीत तुम्ही एवढी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती.’ झालं! मौलवीबुवा बिघडले! साहजिकच आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण खेळता खेळता आमच्या दाढीचे केस पिकले नि हा कालचा पोरगा आता मला शहाणपणा शिकवितो? मौलवीबुवांनी आजूबाजूच्या मंडळींना हुकूम सोडला, ‘या पाखंडी फराझ जावेदला त्वरित ठार करा.’
फराज जीव वाचविण्यासाठी गावातून तर पळालाच, पण मिळेल ते पहिलं विमान पकडून पाकिस्तानातूनही पळाला. फराझ वाचला. पण युसुफ अली आणि जाहिद हे त्याच्याइतके भाग्यवान नव्हते.
युसुफ अली हा पाकिस्तानी सेनादलातून निवृत्त झालेला मेजर दर्जाचा अधिकारी होता. मुसलमान आणि हिंदूंमध्ये धार्मिक बाबतीत कसा फरक आहे पहा. आपण सद्गुरू, देव किंवा देवी, अवतार किंबहुना साक्षात परमेश्‍वर आहोत असं जाहीर करणारे बुवा आणि बाया भारताच्या कानाकोपर्‍यात दरवर्षी निर्माण होत असतात. त्यांच्या या जाहीरनाम्यावर कुणीही, कसलाही आक्षेप घेत नाही. उलट प्रत्येकाला मुबलक भक्त आणि भक्तिणी लाभून सगळ्यांचा पारमार्थिक धंदा झकास चालतो. जी खरीखुरी आध्यात्मिक मंडळी असतात, ती या धंदेवाईकांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून परमेश्‍वरी योजनेनुसार जे काही काम त्यांच्यावर सोपविले गेलेले असेल, ते निष्ठेने आणि प्रेमाने करीत राहतात. कालक्रमानुसार ‘दूध का दूध, पानी का पानी’ आपोआपच होतो. काळाच्या ओघात धर्माच्या प्रवाहाला गढळूपणा आलासा भासला, तरी तो गढूळपणा दूर करून मूळचा निर्मळ झरा वर आणणाराही कुणीतरी निघतोच. हेच तर हिंदू धर्माचं सामर्थ्य आहे.
मुसलमानी किंवा ख्रिस्ती धर्मात असं होत नाही. तेथे येशू हा एकटाच देवपुत्र, बाकी सगळे पापी लोक. मुसलमानांच्या म्हणण्याप्रमाणे महंमद हा शेवटचा पैगंबर म्हणजे प्रेषित, त्याच्यानंतर कुणीही प्रेषित नाही. आता मनुष्यस्वभाव सगळीकडे सारखाच. त्यामुळे तिकडेही स्वत:ला अवतार म्हणविणारे, प्रेषित म्हणविणारे लोक निघतच असतात. त्यांना त्वरित काफर ठरवून बहिष्कृत करण्यात येतं, कैद करण्यात येतं वा ठार मारण्यात येतं.
निवृत्त मेजर युसुफ अलीने स्वत:ला प्रेषित म्हणवून घ्यायला सुरुवात केली. त्वरित त्याला अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. त्याने तुरुंगातही स्वत:चा प्रचार सुरू केला. एका कट्टर इस्लामप्रेमी सहकैद्याला इस्लामचा हा अवमान सहन झाला नाही. त्याने मेजर युसुफ अलीला सरळ गोळी घालून ठार केलं. अरेरे! बिचारा प्रेषित!! काय म्हणता, त्या सहकैद्याला तुरुंगात बंदूक किंवा पिस्तूल कुठून मिळालं? अहो, हल्ली तुरुंगातच अशा सगळ्या सुखसोयी मुबलक असतात. त्यातून तो पाकिस्तानातला तुरुंग!
जाहिद तर युसुफ अलीपेक्षा कमनशिबी निघाला. काही संतप्त इसमांनी जाहिदच्या घरात घुसून त्याला खेचत, फरफटत गावाच्या चावडीवर आणले. त्यांच्या जोरजोरात ओरडण्यावरून तेथे बराच म्हणजे सुमारे अडीचशे लोकांचा जमाव जमला. इतक्यात काजीसाहेबही आले. त्या लोकांनी काजीला जाहिदचा गुन्हा सांगितला. काजीसाहेब भयंकर संतापले. त्यांनी शिक्षा फर्मावली, ‘या इसमाला दगड मारून ठार करा.’ जाहिदला धावायला सांगण्यात आलं आणि अडीचशे लोकांनी त्याच्या पाठोपाठ धावत, दगडधोंडे मारून त्याचा जीव घेतला. असा कोणता गुन्हा त्याने केला होता? चोरी, लूट, खून की व्यभिचार? छे, छे! त्याने फारच भयंकर गुन्हा केला होता. पवित्र कुराण ग्रंथात महंमदाचं नाव जेथे जेथे आलं होतं, तेथे तेथे ते खोडून जाहिदने स्वत:चं नाव टाकलं होतं.
काजीसाहेबांच्या मते हा बदनामीचा गुन्हा होता. या गुन्ह्याला शरियतच्या कायद्यानुसार धोंडे मारून जीव घेण्याची शिक्षा आहे का? असावी बहुधा. कारण शरियत कायद्यात तज्ज्ञ असणार्‍या माणसालाच काझी बनता येते.
काजीसाहेब, दारूच्या धुंदीत गाडी चालवून निरपराध गरिबांना चिरडणार्‍या लोकांना शरियतमध्ये कोणती शिक्षा सांगितलीय् हो?
मल्हार कृष्ण गोखले
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment