Pages

Saturday, August 3, 2013

फितूर इस्रायली

आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी अंगवळणी पडलेली आहे. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले. 

१९४७ सालापासून आजपर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये हिंदूच लोक जास्त आहेत. शिवाजी महाराजांविरुद्ध स्वारी करून येणार्‍या मोगली सरदारांच्या सैन्यात मुसलमानांपेक्षा मराठे नि रजपूतच जास्त असायचे. शनिवारवाड्यात इंग्रजांचा युनियन जॅक झेंडा फडकाविणारा आमचाच बाळाजीपंत नातू होता. भारत हे हिंदू राष्ट्र आहे, या संकल्पनेला कडाडून विरोध कोणाचा? मुसलमान किंवा ख्रिश्‍चनांचा नव्हे, आमच्याच सेक्युलर हिंदूंचा. फितुरी, दगलबाजी आमच्या रक्तात अगदी सहजपणे भिनली आहे. त्यात आम्हाला काहीच वाटत नाही.
कारण समजा आमच्या गद्दारीमुळे आमच्या राजाचं राज्य बुडालं, तरी आमचं काही बिघडत नाही. नवा राजा येईल त्याची मुजरेबाजी करायची आमची तयारी असतेच. समजा, नव्या राजाने धर्म बदलायला लावला, तरी काही बिघडत नाही. स्वधर्म, संस्कृती, अस्मिता वगैरे गोष्टी दुय्यम आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी दोनच- सत्ता आणि संपत्ती! त्या आहेत तर सगळं आहे.
पण इस्रायलचं तसं नाही. स्वदेश, स्वधर्म आणि राष्ट्रीय अस्मिता या गोष्टींना ते वेडे लोक सर्वाधिक किंमत देतात. लढाई बिढाई करून नाहक रक्तपात करण्याऐवजी आमच्या पंतप्रधानांनी पहा कसा, चाळीस हजार चौरस मैलांचा हिमालयीन प्रदेश सरळ चीनला देऊन टाकला. अहो, करायची काय ती बर्फाळ जमीन? गवताचं पातं देखील उगवत नाही तेथे! पण इस्रायली वेडपटांनी इंचभर जमीनदेखील अरबांना द्यायला नकार दिला. त्या रेताड वाळवंटासाठी ते रक्ताच्या नद्या वहावतायत.
पण आता इस्रायली लोक देखील हळूहळू शहाणे व्हायला लागलेत असं दिसतं. वेस्ट बँकेच्या हेब्रॉन, नाब्लुस वगैरे भागांमध्ये गेले कित्येक महिने जी घनचक्कर लढाई सुरू आहे, त्यापैकीच ऍडोरा या वसाहतीतला प्रसंग इस्रायली लोकांना धक्का देऊन गेला. ऍडोरा वसाहतीमध्ये गडबड करणार्‍या एका पॅलस्टाईन गटाला जिवंत पकडण्यात आलं. त्यांच्याकडल्या माहितीवरून छापा घालून पॅलेस्टाईनी अतिरेक्यांचा एक मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला. त्याचं निरीक्षण करणारे इस्रायली अधिकारी चकित झाले. कारण त्यापैकी बहुसंख्य हत्यारं आणि दारुगोळ्यावर चक्क इस्रायली लष्कराच्या विशिष्ट खुणा होत्या. ती शस्त्रं त्यांना मिळाली कुठून? तपासाअंती असं निष्पन्न झालं की, ऍडोरा वसाहतीतल्या पाच ज्यू इसमांनी इस्रायली लष्कराची ही शस्त्रं चोरून पॅलेस्टान्यांना विकली. हे पाचही जण काही ना काही निमित्ताने लष्कराशी संबंधित आहेत. पाचही जणांना त्वरित अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी काटेकोरपणे सुरू आहे.
 मल्हार कृष्ण गोखले
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment