वेदप्रताप वैदिक
| Jul 30, 2013, 02:00AM IST
आता इंग्रजीमुळे फायदा होतो आहे की नुकसान या जुन्याच चर्चेला पुन्हा
तोंड फुटले आहे.इंग्रजीमुळे फायदा कमी झाला आणि नुकसान जास्त असे माझे
स्पष्ट मत आहे. कोणतीही नवी भाषा शिकल्याने फायदा होतोच. जर ती भाषा विदेशी
असेल तर थोडा जास्त होतो. जागतिक व्यापार, कूटनीती, व्यवसाय,
ज्ञानविज्ञान आणि संपर्काची नवी दालने उघडली जातात. भारतात तीन ते चार
टक्के लोक कामचलाऊ इंग्रजी जाणतात, याचा त्यांना फायदाही झाला आहे. नोकरी,
व्यवसायात आणि समाजात त्यांचेच वर्चस्व आहे. ते भारताचे धोरण ठरवणारे आणि
भाग्यविधाते आहेत. 125 कोटींचा देश हेच चार-पाच कोटी लोक चालवत आहेत.
इंग्रजाळलेले हे लोक मुख्यत्वे शहरात राहतात. तीन-चार हजार कॅलरीचे
स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण करतात. ब्रँडेड कपडे आणि दागिन्याने मढलेले
असतात. त्यांना वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सुविधा, पर्यटनाच्या सोयी सर्व
उपलब्ध असतात. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळेत शिकतात.