विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे केले आयोजन
प्रतिनिधी । सोलापूर
निसर्गाच्याव्यवस्थेतील प्रत्येक घटक विघटित होतो. माणसांचे केंद्रीकरण अन्् प्रगतीच्या दिखाव्यामुळे कचऱ्याची निर्मिती होते. स्वत:ला वगळून कचऱ्याचे निर्मूलन अशक्य आहे. कचारानिर्मितीच होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी (कुडाळ, रत्नागिरी) यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, नगरप्रमुख प्रा. प्रशांत स्वामी डॉ. वासुदेव रायते पर्यावरण मंडळाचे प्रमुख अजित आेक आदी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, "इंधन, धूर, रासायने, आैष्णिक ऊर्जा, किरणोत्सर्ग यासारखे प्रदूषित घटकांचाही कचऱ्यामध्ये समावेश होतो. प्लास्टिकला नाही म्हणणे अन्् त्या भूमिकेवर ठाम राहणे, ही कचरा व्यवस्थापनाची पहिली सुरुवात आहे. आपण घरातला कचरा घंटागाडीमध्ये देऊन मनपाने तो शहराबाहेर टाकणे म्हणजे कचरा निर्मुलन नव्हे. कचरा निर्माण करणे हाच त्यावरचा मुलभूत उपाय आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली जर का आपण शहर स्वच्छ करून त्यातील कचरा खेड्यात टाकला जाणार असेल तर ते लोकांना मुर्ख बनवण्यासारखे आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैली अवलंबल्यास कचराच निर्माण होणार नाही.'
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दिलीप कुलकर्णी यांचे हे व्याख्यान आकाशवाणी सोलापूरच्या fm band 103 वर प्रसारित होणार असल्याचे केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते वल्लभदास गोयदानी यांनी सांगितले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत माळगे, गजानन परळकर, अक्षय बारंगुळे, मृगजा कुलकर्णी, मेघा नागणसुरे या युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केले.
गेल्या पंधरा वर्षांपासून प्लास्टिकचा वापर नाही
श्री. कुलकर्णी म्हणाले, "मी गेल्या पंधरा वर्षांपासून प्लास्टिकचा वापर कटाक्षाने बंद केला आहे. कोणत्याही स्थितीत मी प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पीत नाही. स्वत: घरून नेलेलेल्या काचेच्या बाटलीतील किंवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध पाणीच पितो. दुकानांतून घेतलेला माल कापडी पिशव्यांमधून घरी नेतो.'
लोकप्रतिनिधींचेअसहकार्य
पालिकाआयुक्त काळम म्हणाले, "लोकसहभागाशिवाय कचरा समस्या सुटणार नाही. मुंबईत कचरा करणाऱ्यांना २० हजारापर्यंत दंड आहे. सोलापुरात १०० रुपयांपर्यंतच दंडाची तरतूद आहे. ती वाढवून १० हजार करण्याचा प्रस्ताव मी सादर केला. त्याने कचरा करणाऱ्याला भीती वाटेल. पण पदाधिकारी सदस्यांकडून सहकार्य मिळाले नाही.'
दिव्य मराठी, १८ डिसेंबर २०१५, दिव्य सिटी पान ३
No comments:
Post a Comment