Sunday, March 20, 2011

मा. गो. वैद्य यांचा लेख

श्री अडवाणी यांचे चुकीचे मूल्यांकन

भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी परत एकदा, ६ डिसेंबर १९९२ ला जो बाबरी ढाचा पाडण्यात आला, तो त्यांच्या जीवनातील सर्वाधिक क्लेशदायक दिवस होता, असे जाहीर केले आणि वर असेही म्हटले की, त्यामुळे, भाजपाच्या विश्‍वासार्हतेला तडा बसला. यावेळी, हे वक्तव्य करण्याचे कारण काय होते, हे तेच जाणोत. सर्वोच्च न्यायालयाने, या प्रकरणात, त्यांना नोटीस पाठविल्यामुळे, त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी असे निवेदन केले असेल, तर धीरोदात्त व गंभीर व्यक्तित्व ही जी त्यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आहे, तिला त्यांनी छेद दिला, असेच म्हणावे लागेल. हे खरे आहे की, ६ डिसेंबर १९९२ ला, बाबरी ढाचा पाडण्याची कसलीही योजना नव्हती. काही लोक, कारस्थानाचा (कॉन्स्पिरसी) आरोप करतात. पण कारस्थान करण्याकरिता लाखावर लोकांना एकत्र करावे लागत नाही. त्यासाठी जाहीर आवाहनही करावे लागत नाही. कारस्थान गुप्तपणे केले जात असते आणि त्या योजनेत ४-५ जण पुरेसे असतात. तेव्हा ६ डिसेंबरला, तो ढाचा पाडण्याचे कारस्थान होते, हा आरोप इतका ठिसूळ आहे की, त्याची गांभीर्याने दखल घेण्याचीही आवश्यकता नाही. तात्पर्य हे की, त्या दिवशी ढाचा पाडण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची कोणतीही गुप्त वा प्रकट योजना नव्हती, हे शंभर टक्के सत्य आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर १९९२ ला, तत्कालीन सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस यांनी जे वक्तव्य प्रकाशित केले, त्यातही ही बाब स्पष्ट करण्यात आली होती.शोकाचे कारण काय?मात्र, तो ढाचा पाडला गेला, याचे दु:ख, एक अडवाणी वगळता, कुणाला झाल्याचे दिसले नाही; जाणवलेही नाही. ज्यांचा राजनीतीशी अजीबात संबंध नाही, अशा लोकांनीही, या घटनेचा आनंद प्रकट केला. अनेक कॉंग्रेसजनांनीही आपापल्या परीने, राजनीतीच्या मर्यादा सांभाळीत, आपला आनंद प्रकट केला होता. आणि खरेच, बाबरी ढाचा पडल्याचे किंवा पाडल्याचे दु:ख कशाला करायचे? वस्तुत:, सांप्रदायिक गुंडगिरीचे एक चिन्ह त्या दिवशी मिटले होते; त्याचा आनंद मानायचा की दु:ख? श्री. अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथवरून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती. कशासाठी? अयोध्येला जाण्यासाठीच ती का काढली? श्रीनगरला किंवा कन्याकुमारीला जाण्यासाठी का काढली नाही? त्या यात्रेचा एवढा गाजावाजा तरी का करण्यात आला? कारण, शतकांपासून हिंदू-मनाला डाचत असणारे एक शल्य त्यांना नाहीसे करावयाचे होते. अयोध्या ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी आहे. तेथे त्यांचे एक मंदिर होते. पवित्र मंदिर. राजवाडा नव्हे. बाबराच्या आज्ञेने ते पाडण्यात आले; आणि त्या ठिकाणी एक मशीद उभी करण्यात आली. हा इतिहास आहे. अडवाणीजी, हा इतिहास खरा आहे की खोटा? मी, स्वत:, तो ढाचा बघितलेला होता. त्याच्या खांबांवर मूर्ती कोरलेल्या होत्या. कोणत्या मशिदीच्या खांबांवर मूर्ती खोदलेल्या असतात? बरे, बाबराचे कृत्य अपवादात्मकही नव्हते. पश्‍चिम आशियातून किंवा मध्य आशियातून आलेल्या सर्वच इस्लामी आक्रमकांची ही नीती राहिलेली आहे की, इस्लामहून अन्य धर्मावलंबियांची पवित्रस्थळे भग्न करावयाची. पवित्र कुराणात मूर्तिपूजेचा निषेध केला आहे. त्या शिकवणुकीला धरूनच, इस्लामी आक्रमक आणि राज्यकर्ते वागत आलेले आहेत. बाबराच्या पूर्वी गुजरातमधील सोमनाथचे मंदिर, गजनीच्या महमदाने पाडले होते की नाही? महमदाने ते का पाडले? पैशासाठी पाडले म्हणावे तर हिंदू लोक त्याला पाहिजे तेवढा पैसा द्यावयाला तयार होते. पण तो प्रस्ताव त्याने स्वीकारला नाही. त्याला मूर्तिविक्रेता बनायचे नव्हते. मूर्तिभंजक व्हावयाचे होते. कारण, पवित्र कुराणाच्या शब्दावर त्याची श्रद्धा होती, विश्‍वास होता. सोमनाथचे कब्रस्थान म्हणजे महमदाच्या सांप्रदायिक गुंडगिरीचे एक प्रतीक होते. म्हणून तर सरदार वल्लभभाई पटेलांनी ते हटविले व तेथे आजचे भव्य सुंदर मंदिर उभे केले. सोमनाथचा हा स्फूर्तिदायक प्रसंग अडवाणींच्या मनोविश्‍वात नक्कीच ठसलेला असला पाहिजे. एरवी, आपली रथयात्रा, सोमनाथपासून आयोजित करण्याचे कारण काय? सोमनाथ, किंवा अयोध्या हे गजनी किंवा बाबराचा सेनापती मीरबाकी, यांच्या वैयक्तिक वेडेपणाची चिन्हे नव्हती. ती एका धर्मवेडाने निर्मिलेल्या असभ्य, असंस्कृत, असहिष्णू, अहंकाराची प्रतीके होती. हे केवळ हिंदुस्थानातच घडले असे नाही. स्पेनमध्येही घडले होते. तेथे साडेतीनशे वर्षे मुसलमानांचे राज्य होते. त्या काळात, तेथील सर्व कॅथेड्रलांचे रूपांतर मशिदीत झाले होते. गजनीचा महमद आणि बाबर यांचाच कित्ता औरंगजेबाने गिरविला, आणि काशी व मथुरा येथील मंदिरांचा विध्वंस करून मशिदी उभ्या केल्या. त्या मशिदी आक्रमणाची चिन्हे आहेत. ती कायम राहावी, असे म्हणता येईल काय? खरे म्हणजे, कारणे कोणतीही असोत, त्या सांप्रदायिक गुंडगिरीचे अयोध्येतील चिन्ह मिटले गेले, याचा आनंद मानायचा की दु:खाने छाती पिटायची?परिणामांसाठी तयारी हवीहां, असे म्हणता येईल की, विद्यमान कायद्याचे उल्लंघन झाले. अडवाणी किंवा त्यावेळी उपस्थित असलेल्या कोणत्याही मान्यवराने ढाचा पाडण्यासाठी चिथावणी दिली नव्हती. पण सरकार म्हणते की, अडवाणी प्रभृती मंडळींच्या चिथावणीमुळे कायद्याचे उल्लंघन झाले, तर त्याची शिक्षा भोगायची तयारी असली पाहिजे. गांधीजीही कायदा मोडीत असत. त्यांच्या अभियानाचे नावच उर्ळींळश्र ऊळीेलशवळशपलश (म्हणजे शांततेच्या मार्गाने कायद्याचे उल्लंघन) असे होते. त्याबद्दल ते शिक्षा भोगीत. अडवाणी प्रभृतींनी, तो ढाचा पाडण्यासाठी लोकांना चिथावले नाही, हे खरे आहे. म्हणून खालच्या न्यायालयाने त्या आरोपातून त्यांची सुटका केली. सर्वोच्च न्यायालय काय ठरविते, ते दिसेलच. आपण कल्पना करू की, ते या सर्वांना दोषी ठरवील आणि शिक्षाही सुनावेल, तर ती शिक्षा भोगायला तयारी असली पाहिजे. विचार हा असला पाहिजे की, जे झाले ते चांगले झाले की, वाईट झाले? राममंदिर उभारण्याच्या उद्दिष्टाला ते पूरक ठरले की घातक ठरले? आम्ही असे समजतो आणि सारा देशही हेच समजतो की, राममंदिराला विध्वंसून मशीद बांधण्यात आली होती. जेव्हा ढाचा पाडला गेला, तेव्हा तेथे मशीदही नव्हती. एक ढाचा तेवढा होता. १९३४ पासून तेथे नमाज पढला गेला नव्हता. १९४९ पासून त्या ढाचात रामललाची मूर्ती विराजमान होती. त्या मूर्तीची नियमित पूजा-अर्चा होत होती. आमची अशी समजूत की, अडवाणींना या जागेवरच राममंदिराची उभारणी अभिप्रेत होती. ही समजूत चूक असेल, तर तसे अडवाणींनी सांगावे. आणि त्याच बरोबर राममंदिर कुठे उभारायचे त्यांच्या कल्पनेत होते, तेही स्पष्ट करावे.प्रश्‍नाचे उत्तर हवेअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय आला आहे की, तेथे मंदिर होते. या न्यायालयाने दिलेला संपूर्ण निकाल समाधानकारक आहे, असे नाही. पण जेथे रामलला सध्या विराजमान आहे, तेथे मंदिर होते, हे तिन्ही न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले आहे. या तिघांमध्ये एक न्यायमूर्ती इस्लामधर्मीयही होते. त्यांनीही मशिदीच्या रचनेत, ‘भग्न’ मंदिराचे अवशेष वापरले गेले, हे मान्य केले. ते ‘भग्न’ मंदिर कोणते तरी पूर्वीचे, अगोदरच भग्न झालेले होते, एवढेच परन्तुक त्यांनी जोडले आहे. या न्यायालयाचा हा जो निकाल लागला, त्याला कारणीभूत, या ढाचाच्या खाली जे उत्खनन करण्यात आले, त्या उत्खननातून मिळालेली प्रमाणे आहेत. तो ढाचा उभा असता, तर उत्खनन करता आले असते काय? आणि त्यातून प्रमाणे हाती तरी आली असती काय? ढाचा पाडण्याचा, तुमच्या अभियानाचा उद्देश असो की नसो, तो पडला म्हणून तर उत्खनन होऊ शकले आणि मंदिराच्या पूर्व-अस्तित्वाची प्रमाणे हाती आली. मग त्या ढाचा पडल्याच्या किंवा पाडल्याच्या कृत्याचे, अभिनंदन करायचे की, त्यासाठी जाहीर अश्रुपात करावयाचा? विश्‍वासार्हता वाढलीअडवाणी म्हणतात की, ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेमुळे, भाजपाच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला आहे. ही खोटी गोष्ट आहे. अडवाणींचे हे मूल्यांकन चूक आहे. या कालखंडात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जे यश मिळाले, ते याचा पुरावा आहे. १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ८५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी अडवाणींची रथयात्रा निघाली नव्हती. ती १९९० मध्ये निघाली. १९९१ च्या निवडणुकीत पक्षाच्या जिंकलेल्या जागांची संख्या १२० झाली. म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १९९२ च्या डिसेंबरात ढाचा पडला. त्यानंतर तीन-सव्वातीन वर्षांनी म्हणजे १९९६ मध्ये भाजपाने १६१ जागा जिंकल्या. पहिल्यांदा आपल्या राजकीय वाटचालीत भाजपा, लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनला. हे विश्‍वसनीयता वाढल्याचे की कमी झाल्याचे चिन्ह समजावे? भाजपाने विनाकारण सत्ता ग्रहण करण्याची घाई केली; आणि केवळ तेरा दिवसांमध्ये भाजपाचे सरकार कोसळले. तेव्हाच, विरोधी पक्षात बसण्याचे त्याने ठरविले असते, तरीही कुणाचेही सरकार टिकले नसते आणि पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती तरी भाजपालाच सत्ताग्रहणाची संधी मिळाली असती. अटलबिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेगौडा आणि गुजराल यांची अल्पकालीन सरकारे सत्तेवर आली. ती टिकणारी नव्हती आणि टिकलीही नाहीत. १९९८ साली परत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्याला १८० जागा मिळाल्या. या निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या जाहीरनाम्यात, अयोध्येत भव्य राममंदिर निर्माण करण्याचे आश्‍वासन होते, म्हणून अशी वृद्धी झाली. लगेच एक वर्षाने पुन: निवडणूक आली. कारण, एका क्षुल्लक मुद्यावरून जयललिता यांच्या अद्रमुकने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला आणि एका मताने सरकार पडले. १९९८ साली, सत्ता ग्रहण करण्यासाठी, जो कार्यक्रम स्वीकारला, त्यात भाजपाच्या घोषणापत्रातील राममंदिराचा तसेच पक्षाचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण जे मुद्दे होते, त्यांना तिलांजली देण्यात आली. तथापि, रामरथयात्रा काढणारे अडवाणी मंत्रिमंडळात आहेत, गृहखात्यासारखे महत्त्वाचे खाते, त्यांच्याकडे आहे, तेव्हा ते यातून नक्कीच काही तरी मार्ग काढतील, अशी लोकांची समजूत होती. १९९९ साली पुन: निवडणूक आली आणि त्या निवडणुकीसाठी पक्षाचा वैशिष्ट्यपूर्ण जाहीरनामा बाजूला ठेवण्यात आला. सामूहिक जाहीरनामा स्वीकारण्यात आला आणि त्यात राममंदिराचा मुद्दा अधिकृत रीत्या वगळण्यात आला. त्यामुळे भाजपाच्या लोकसभेतील संख्येत खूप वाढ झाली, असे दिसले नाही. फक्त दोनने संख्या वाढली. हे सरकार पाच वर्षे टिकले, पण राममंदिर निर्माण करण्यासाठी एक पाऊलही ते पुढे सरकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अविवादित जमिनीसंबंधी जे मतप्रदर्शन केले होते, त्याचे अध्ययन करून, अविवादित भूमी तिच्या पूर्वमालकांना दिली गेली असती, तरी लोकांचे समाधान झाले असते. यासाठी संसदेच्या ठरावाची आवश्यकता नव्हती. केवळ सरकारचा आदेश पुरेसा ठरला असता. पण तेवढेही सरकारने केले नाही. लोक हेच समजले आणि अजूनही असे समजणार्‍यांची प्रचंड संख्या आहे की, केवळ सत्तेसाठी भाजपाने राममंदिराचा मुद्दा अंगीकारला होता. त्यासंबंधी त्याला मनापासून आस्था नाही.विश्‍वसनीयतेला तडाया काळात तर अडवाणीजी उपप्रधानमंत्री झाले होते. पण त्यांनीही काही हालचाल केली नाही. आपल्या तथाकथित सेक्युलर सहयोगी पक्षांच्या सोबतीने त्यांनाही त्या छद्म सेक्युलॅरिझम्‌चे आकर्षण कदाचित वाटले असेल. यानंतरच्या म्हणजे २००४ च्या निवडणुकीच्या काळात ‘चमकणारा भारता’चा (इंडिया शायनिंग) उदोउदो झाला. मदरशांमध्ये इतक्या संख्येत मुसलमानांना नोकर्‍या दिल्या जातील, अशी घोषणा झाली. राममंदिर, समान नागरी कायदा, हे पक्षाचे खास मुद्दे बाजूला पडले. परिणामी, भाजपाला आस्थेने व अग्रक्रमाने मतदान करणारा वर्ग तटस्थ बनला. त्याचा परिणाम २००४ च्या निवडणुकीत दिसून आला. कोणत्याही सर्वेक्षणाने भाजपा पुन: नंबर दोनवर फेकला जाईल असे भाकीत केले नव्हते. सर्वांचे हेच भाकीत होते की, भाजपाच पुन: सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. पण भाजपा आपल्या पूर्वक्रमांकावर फेकला गेला. या ‘सेक्युलर’ बनण्याच्या नादात, त्याने आपला परंपरागत मतदार गमाविला आणि नवे काय मिळाले? बहुधा काहीच नाही. एक मार्मिक सुभाषित आहे की,यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं हि निषेवतेध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च॥

अर्थ- जो स्थिर गोष्टींचा त्याग करून चंचल गोष्टींच्या मागे पळतो, त्याच्या स्थिर गोष्टी नष्ट होतात आणि चंचल तर हाती लागतच नसते. २००४ मध्ये भाजपाची अशीच स्थिती झाली. २००४ च्या निवडणुकीनंतर, त्या वर्षाच्या मे महिन्यात मी उत्तरप्रदेशात होतो. दोनदा भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या खासदाराला मी प्रश्‍न केला की, १९९९ साली, कल्याणसिंग भाजपाच्या विरोधात गेलेले असतानाही व त्यांच्या पक्षाने भाजपा-उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले असतानाही, भाजपाने ८० पैकी २९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी म्हणजे २००४ मध्ये, कल्याणसिंग पक्षात परतले असताना व त्यांनी पक्षासाठी प्रचारात सक्रिय भाग घेतला असतानाही भाजपाला अवघ्या दहाच जागा का जिंकता आल्या? त्यांचे तात्काळ उत्तर होते, ‘‘अटलबिहारींनी किसनगंज येथे केलेल्या भाषणात, मुसलमानांच्या तुष्टीकरणाच्या केलेल्या घोषणांनी सारे वातावरणच बदलून गेले. पक्षाचा प्रचार करण्याचा आमचा उत्साहच संपला. लोक मतदानाला गेलेच नाहीत. प्रत्यक्ष अटलजींच्या लखनौ मतदारसंघात फक्त ३६ टक्के मतदान झाले होते.’’ अडवाणीजी, भाजपाच्या या नीतीने पक्षाच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला. ६ डिसेंबर १९९२ च्या घटनेने नव्हे. म्हणून ज्या उ. प्र.त एका वेळी भाजपाचे ५२ खासदार लोकसभेत निवडून आले होते, तेेथे २००४ मध्ये आणि २००९ मध्ये त्याचे फक्त १० उमेदवार विजयी झाले.जिनाप्रशंसा भोवली२००९ साली तर आणखी कहर झाला. तोही अडवाणींच्या कडून. २००५ साली, त्यांनी देशाच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्या बॅ. महमदअली जिनांची चक्क प्रशंसा केली! बॅ. जिनांच्या मनात काय होते, पाकिस्तानसंबंधी त्यांचे कोणते धोरण होते, त्यांच्या पाकिस्तानच्या संविधानसभेतील भाषणाचे संदर्भ कोणते, हे सारे सामान्य माणसाने लक्षात घेण्याचे प्रयोजनच नव्हते. भारताची फाळणी करणारा, त्यासाठी डायरेक्ट ऍक्शनचा फतवा काढून हजारो निरपराध हिंदूंच्या रक्ताने कत्तकत्त्याच्या सडका लांछित करणारा, पाकिस्तानचा गव्हर्नर जनरल बनल्यानंतरही हिंदूंच्या क्रूर कत्तलीसाठी, त्यांच्या महिलांच्या घोर विटंबनेसाठी आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या निर्वासनासाठी जबाबदार असलेला मतांध नेता हीच जिनांची प्रतिमा भारतीय मनावर अंकित आहे. अडवाणी किंवा जसवंतसिंग यांच्या जिनास्तोत्रांनी ती मिटावयाची नाही. पाकिस्तानचे राज्यकर्तेच त्यांची नवी छबी प्रस्तुत करू शकतात,पण ते त्याविषयी मौन बाळगून आहेत. मग त्यांचे काम आपण करण्याचे कारण काय? अडवाणीजी, आपल्या जिनाप्रशंसेने पक्षाच्या विश्‍वासार्हतेला प्रचंड तडा दिला. भाजपाने आपणांस आपला भावी प्रधानमंत्री म्हणून समोर केले. परिणाम जो होणार होता तोच झाला. भाजपाच्या लोकसभेतील जागा आणखी कमी झाल्या. कोण होते, २००९ च्या निवडणुकीत अडवाणींच्या प्रचारयंत्रणेची धुरा सांभाळणारे? श्री. सुधींद्र कुळकर्णी. त्यांचा हिंदू, हिंदुत्व, राममंदिर, समान नागरी संहिता- यावर विश्‍वासच नाही. हे त्यांनी लपवूनही ठेवले नाही. २००९ च्या पराभवानंतर, त्यांनी केलेल्या विश्‍लेषणात त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.भाजपाची भूमिका कोणती?मी ‘सेक्युलर’ शब्दाचा उल्लेख केला आहे, पण तो आज स्वत:ला ‘सेक्युलर’ समजणारे पण जे एका विशिष्ट संप्रदायाला समोर ठेवून राजकारण करीत आहेत, त्यांच्या संदर्भात आहे. त्यांना खर्‍या सेक्युलॅरिझम्‌शी कसलेही देणेघेणे नाही. त्यांच्या दृष्टीत ‘सेक्युलॅरिझम्’ म्हणजे अल्पसंख्यकांचा अनुनय आणि बहुसंख्य हिंदूंचा वेळी-अवेळी अपमान, हेच बिंबलेले आहे. हिंदूंच्या म्हणा, हिंदुत्वाच्या म्हणा विचारधारेत राज्य सेक्युलर म्हणजे पंथनिरपेक्षच असले पाहिजे, हेच तत्त्व आहे. आपल्या संविधानालाही हेच अभिप्रेत आहे. आपले संविधान १९४९ मध्ये पारित झाले. तेव्हा त्याच्या प्रस्थापनेत (प्रि-ऍम्बल्) ‘सेक्युलर’ शब्द नव्हता. तो १९७६ साली घालण्यात आला. तेव्हा तत्पूर्वीच्या २७ वर्षे काय आपले राज्य ‘सेक्युलर’ नव्हते? पण ‘सेक्युलर’ याचा जगात कुठेही वापरात नसलेला ‘विशिष्ट संप्रदायांची खुशामत’ हा अर्थ आपल्या देशात रूढ झाला आहे. तो आम्हाला मान्य नाही. राज्य पंथनिरपेक्षच असले पाहिजे आणि तरी सर्व पंथसंप्रदायांना आपापली उपासना करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, असेच राज्य पंथनिरपेक्ष राहील, अशी आमची मूलभूत धारणा आहे. कारण, आम्ही विविधतेचा सन्मान करणारे आहोत.आम्ही असेच समजतो की, श्री. अडवाणी यांनी व्यक्त केलेली दु:खभावना त्यांची एकट्याची असावी. ती कशी अनाठायी आहे, हे वरील विवेचनात पुरेसे स्पष्ट झाले आहे. ६ डिसेंबरच्या घटनेबाबत भाजपाचे अधिकृत मत काय आहे, हेही जनतेला कळले पाहिजे. मौन पाळून चालावयाचे नाही. सध्या सत्तारूढ असलेला कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचाराच्या आरोपांनी असा काही ग्रस्त आहे की, पुढे येणार्‍या निवडणुकीत त्याला यशाची आशा नाही. कॉंग्रेसचा पर्याय भाजपाच असू शकतो. आहेही. त्याची भूमिका राष्ट्रजीवनाशी संबंधित असलेल्या मूलभूत मुद्द्यांसंबंधी निश्‍चित आणि नि:संदिग्ध असली पाहिजे. म्हणून तिचे प्रकटीकरण अपेक्षित आहे. ते झाले नाही आणि तथाकथित सेक्युलरवादाने तेही ग्रस्त असलेले दिसले तर स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याची संधी हातून निसटण्याचा धोका आहे.

मा. गो. वैद्य
साभार : तरुण भारत, सोलापूर.

आत्मविश्‍वास देणारी संस्था - तरुण भारत

रामदेव बाबा यांच्यासमवेत सिद्धाराम पाटील(स्वत:), माजी संपादक अरुण करमरकर आणि विजयकुमार पिसे. (छाया: शिवकुमार पाटील)

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. रामदेव बाबा सोलापुरात आले होते. त्यांचे शिबीर सुरू होते. दुपारी आम्ही त्यांच्या भेटीस गेलो होतो. संपादक अरुण करमरकर आणि आम्ही सहकारी पत्रकार रामदेव बाबांना भेटलो. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला.रामदेव बाबा म्हणाले,

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी