युवाशक्तीला घातलेली साद
31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि. बुलढाणा) येथे महाशिबीर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून 1377 तरुण-तरुणी या शिबिरात सहभागी झाले होते. युवा शक्तीला सकारात्मक साद घालणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.
स्थळ : शेगावजवळील आनंदसागर विसावा.
दि. 31 डिसेंबर 2008 ची संध्याकाळ.
18 ते 25 वयोगटांतील तरुण-तरुणी झुंडी-झुंडीने, घोळक्याने दाखल होत आहेत. यात सांगली-कोल्हापूरचे तरुण-तरुणी आहेत, तसे ठाणे-मुंबई-रत्नागिरीचेही आहेत. नागपूर-गडचिरोली-वर्ध्याचे आहेत तसे सोलापूर-लातूर-धाराशिवचेही आहेत. पुणे-नगरचे आहेत तसे अकोला-भंडारा-नांदेड-संभाजीनगर-परभणीचेही आहेत. एसटी बस आणि रेल्वेने आलेल्या तरुणांची एकच लगबग सुरू आहे.
प्रवेशद्वारात नोंदणी सुरू आहे. झुंडी-झुंडीने येणारे विविध गणांमध्ये विभागून शिस्तीच्या कोंदणात बसत आहेत. 25-25 जणांचे गण आपल्या गणप्रमुखाच्या मार्गदर्शनानुसार सभामंडपाकडे कूच करीत आहेत. "भारत माता की - जय', "जय भवानी- जय शिवाजी', "कौन चले भाय कौन चले- स्वीमीजी के वीर चले' या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मुख्य सभामंडपात गणश: आणि क्षेत्रश: शिबिरार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. उभ्या रांगा आणि आडव्या ओळीत बसलेले 1500 तरुण ॐकार उच्चारण करीत भजनसंध्येत सहभागी झालेत. येथूनच चार दिवसांच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. उद्यापासून या साऱ्यांना पहाटे 4.30 वा. उठून पहाटेच्या योगसत्रासाठी तयार व्हायचंय. सगळेजणं आपले भ्रमणध्वनी बंद करून आपापल्या गणप्रमुखांकडे दिले आहेत. शरीर, मनाने स्वत:च्या घडणीसाठी सिद्ध झालेत. ( photos http://poornvijay.blogspot.com/search?updated-max=2009-02-06T02%3A43%3A00-08%3A00&max-results=6)