Thursday, February 10, 2011

कोत्या मनोबुद्धीचा राज्यपाल

राज्यपाल हे पद खरे तर आदराचे आहे, परंतु उंच ठिकाणी जाऊन बसल्यामुळे
कावळा काही गरूड बनत नाही, तशी कर्नाटकातील राज्यपाल भारद्वाज यांची
अवस्था आहे. कर्नाटकातील विख्यात कन्नड साहित्यिक आणि इतिहास तज्ञ
चिदानंद मूर्ती यांना बंगळूर विद्यापीठाने मानद पदवी देण्याचे ठरविले
होते. निसार अहमद, बीकेएस वर्मा आणि चिदानंद मूर्ती या तिघांना ही पदवी
देण्यात येणार होती, परंतु कुलपती असलेल्या राज्यपाल एच.आर. भारद्वाज
यांनी चिदानंद मूर्ती यांचे नाव रोखून ठेवले. चिदानंद मूर्ती हे भारद्वाज
यांच्या विचारधारेतील नाहीत, हे यामागचे कारण. आपल्या विचारधारेहून वेगळी
विचारधारा असणार्‍यांचा दुस्वास करणे, वैचारिक अस्पृश्यता पाळणे आणि
परधर्मीयांच्या धर्मांधतेबद्दल चकार न बोलणे म्हणजे धर्मनिरपेक्षता अशी
आत्मघातकी वृत्ती काही परकीयांच्या उष्ट्या विचारांवर पोसलेल्या पक्षांत
दिसून येते. हुजरेगिरी करणार्‍यांनाच पुरस्कार देण्याची त्यांची परंपरा
आहे.ख्रिश्‍चन मिशनरी हे फसवून धर्मांतर करतात, त्याला चिदानंद मूर्ती
यांनी विरोध दर्शवून चूक केली आहे. त्या चुकीची शिक्षा म्हणून राज्यपाल
महोदयांनी त्यांची पदवी रोखून धरली आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की,
''देशाचा कारभार माझ्या हाती आला, तर पहिले काम मी ख्रिस्ती मिशनर्‍यांना
देशाबाहेर काढीन. मिशनर्‍यांनी धर्मांतराचे धंदे थांबविले पाहिजेत.'' बरे
झाले त्या काळात भारद्वाजसारखे पुढारी नव्हते अन्यथा लोकांनी दिलेली
'महात्मा' ही पदवी त्यांनी गांधीजींकडून काढूनच घेतली असती.राज्यपालांची
कोती वृती पाहून कर्नाटकातील अनेक संघटना निषेधासाठी पुढे सरसावल्या
आहेत. 'मी चिदानंद मूर्ती यांच्या नावाला विरोध केला नाही; नाव केवळ मागे
ठेवले', अशी बालिश सारवासारव करीत भारद्वाज यांनी आता मूर्ती यांना पदवी
देण्याची सिद्धता दर्शविली आहे. 'बूंद से गयी, हौद से नही आती' या
उक्तीप्रमाणे भारद्वाज यांची कूपमंडुक वृत्ती जगासमोर आल्याने ते चांगलेच
अडचणीत आले आहेत. उशीरा का होईना त्यांना शहाणपण सुचले हेही काही कमी
नाही. सिद्धाराम भै. पाटील

--
visit @
www.psiddharam.blogspot.com

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी