भारतीय स्त्रिया पाश्चिमात्यांप्रमाणेच विचारक्षम व्हाव्यात, परंतु त्यांच्या चारित्र्याची किंमत देऊन मात्र नव्हे ! विचारक्षमता हे काही श्रेष्ठतम इप्सित नाही. नैतिक बल आणि अध्यात्मबल आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते. आमच्याकडील स्त्रिया काही फार शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे आचरण अत्यंत पवित्र असते. स्त्री, पुरुष हा भेद विसरून आपण केवळ माणसे आहोत, अशा भूमिकेतून काम करायला शिकल्याशिवाय स्त्रियांचा खरा विकास होणार नाही. एरवी स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. घटस्फोटांचे मुख्य कारण हेच आहे. जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधीच एका पंखाने उडू शकत नाही. - स्वामी विवेकानंद
वाचक बंधू-भगिनी,
सध्या आपल्या देशातील घडामोडी आणि देशाची धुरा वाहण्याची जबाबदारी असलेल्यांचे वर्तन पाहा. देशाच्या हिताला नख लावणार्या शक्ती प्रबळ झाल्याचे दिसून येत आहे. संस्कार आणि नीतीमूल्ये यापासून दूर गेल्याने समाजाची होत असलेली घसरण रोखण्याऐवजी भारत सरकारमध्ये बसलेल्या मुखंडांनी अध:पतनाची परीसीमाच गाठल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय १६ वर्षे करण्याचे विधेयक संसदेसमोर आणले गेले. रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतात, तसला हा प्रकार. समाजात अनाचार माजवण्याचाच हा प्रयत्न.
भारतामध्ये लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट आहे विवाह.विवाहाला भारतीय संस्कृतीत संस्कार मानले गेले आहे.