Sunday, May 9, 2010

"कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ?


कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु पाकिस्तानलाही धडा शिकविला पाहिजे.

अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली. एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका कसाबप्रकरणी भारतातील पाकप्रेमी मीडियाने जणु घेतली आहे. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त नुकतेच अमेरिकेहून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
भारतीयांची कत्तल करण्यासाठी अनेक कसाब पाकिस्तान पाठवीत असतानाही पाकप्रेमाने झपाटलेल्या भारतीय मीडियाचे हृदय मात्र भारत-पाक शांतीवार्तेसाठी तीळ-तीळ तुटत आहे. एकपात्री प्रयोग करावा तसे जणु कसाबने एकट्यानेच 26/11 ची योजना आखली आणि ही स्टोरी त्याच्यासोबत सुरू झाली अन्‌ त्याच्यासोबतच संपणार असे वातावरण तयार करण्यात येत आहे. असे करून आपण मूळ प्रश्नाकडेच दुर्लक्ष करीत आहोत किंवा असे करण्याची व्यवस्था भारतविरोधी कारस्थानाला बळी पडून आपली मीडिया आणि स्वार्थी राजकारणी करीत आहेत असे वाटते.
पुढील उदाहरणावरून ही बाब अधिक स्पष्ट होईल. सकाळची वेळ आहे. बंगळूरू महामार्गावर मोठे वडाचे झाड कोसळले आहे. रस्ताच बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही बाजूंनी 8-10 किलोमीटरपर्यंत वाहने थांबली आहेत. तिथे एकच चर्चा आहे - वारा नाही, पाऊस नाही तरी चांगले झाड कोसळले कसे? दुसऱ्या दिवशी छायाचित्रासहित प्रथम पृष्ठावर वृत्त झळकले आहे. काही दिवसांनी याविषयी एक चार ओळींचे वृत्त आतील पानात प्रसिद्ध झाले आहे. झाडाला खूप दिवसांपूर्वी वाळवी लागली होती, असा अहवाल वनस्पती शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिल्याचे दुसऱ्या वृत्तात म्हटले आहे.
पहिल्या वृत्ताची खूप चर्चा झाली, पण दुसऱ्या वृत्ताची नाही. असेच असते. "परिणाम' मोठे असतात आणि "कारण' सूक्ष्म. परिणामांची चर्चा खूप होते, कारणांची नाही. कसाबची खूप चर्चा होईल, परंतु कसाब निर्माण झालाच कसा याची चर्चा होत नाही. पाकिस्तानातील ओकारा जिल्ह्यातील फरीदकोट या छोट्या गावातील एक पोर असं कृत्य करण्यास तयार होतंच कसं?
दहा हजार "कसाब' तयार होताहेत, त्यांची प्रेरणा काय?
इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, असे विचारी लोक म्हणतात, परंतु पाकिस्तानातून भारतात येणारे अतिरेकी त्यांना शिकविलेल्या "इस्लाम'साठीच जीवावर उदार होऊन येतात, हे का समजून घेतले जात नाही. आजारच समजला नाही तर उपचार कसे करणार?
आजार समजला नाही तर स्वत:ला धर्मनिरपेक्षवादी समजणारे, अतिरेक्यांना धर्म नसतो म्हणणारे स्वार्थी राजकारणी अफजल गुरूसारख्या देशद्रोह्याला मुस्लिमांची मते जातील या भयाने फासावर लटकविण्यासाठी घाई करणार नाहीत. कसाबचा फासावर जाण्याचा क्रमांक 30 वा की 50 वा, यावर घोळ घालतील. कसाबची देखभाल करण्यावर 35 कोटी खर्च केल्याची लाजही वाटणार नाही. कसाबला भर चौकात फाशी झाली पाहिजे, असे म्हणत निवडणुकीत मात्र कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांना मतं द्यायला संकोच वाटणार नाही. केवळ चर्चा होत राहील. वृत्तपत्रांची पाने कसाबविषयीच्या वृत्ताने रंगत जातील. चर्चा... 24 तास बातम्या... अन्‌ केवळ शब्दांचे बुडबुडे...
मीडियातली चर्चा वांझ असते. आता येथेच पाहा ना. आयपीएल वरून केवढा हंगामा झाला. क्रिकेटच्या खेळाविषयी असलेल्या भारतीयांच्या वेडेपणाचे शोषण करीत अरबो रुपयांचा काळा धंदा. या धंद्यात सहभागी मोठे राजकीय नेते, उद्योगपती, चित्रपटातील अभिनेते, सट्टेबाज सारेच ग्लॅमर आणि मादक चिअरबालांचे आस्वाद घेत होते. क्रीडा राज्यमंत्री शशी थरूर आणि ललित मोदी यांचा बळी गेल्यानंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे वस्त्रहरण होण्याची पाळी आली तेव्हा चर्चा एकाएकी थांबली. आता कोठे दिसतात का आयपीएल घोटाळ्याच्या बातम्या?
होय काही दिवसांत अफजल गुरूप्रमाणे कसाबही चर्चेतून मागे पडेल. पुन्हा एखादा हल्ला... पुन्हा नवीन कसाब... हे चक्र. हा प्रश्न गेल्या 1200 वर्षांपासून आपल्या देशाला छळत आहे. घौरी-अब्दालीसारख्यांनी हजारोंची कत्तल केली. बाबराने भारतीयांचे श्रद्धाकेंद्र उद्‌ध्वस्त केले. अफजल खानाने तुळजाभवानीवर आघात केला. 1920 साली केरळात मोपल्यांनी केलेल्या नरसंहाराने प्रेते कुजून विहिरी आणि तळ्यांना दुर्गंधी सुटली. मंदिरे चक्काचूर झाली. 1947 साली लाखो भारतीयांना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले.
या देशाचे तुकडे पडले. हजारोंची कत्तल झाली. भारताच्याच भूमीवर उगवलेल्या बांगलादेशात गेल्या 60 वर्षांत 25 प्रतिशत असलेले हिंदू 5 प्रतिशतवर आले. संसदेवर हल्ला, अक्षरधामवर हल्ला, संकटमोचन हनुमान मंदिरावर हल्ला, दिल्ली बंगळूरू, पुणे, मुंबई... या प्रश्नाचे वास्तव स्वरूप आणि तो सुटण्याचा व्यावहारिक मार्ग याचे इतिहासाच्या प्रकाशात आम्ही चिंतन केलेच नाही.
दुसऱ्यांच्या धर्माचा, उपासनापद्धतीचा आदर केलाच पाहिजे, नव्हे तीच आपली संस्कृती आहे, परंतु इस्लामचे नाव घेत मानवतेवर घाला घातला जात असेल तर भारताने या स्वयंघोषित इस्लामी धर्मयोद्धयांना अल्लाच्या घरी (यमसदनी नव्हे) पाठविण्याची व्यापक रणनीती आखली पाहिजे. खऱ्या अर्थाने शांतताप्रिय असणाऱ्या मुस्लिमांना बळ दिले पाहिजे. अफजल गुरूसारख्याला फाशी दिल्याने मुसलमान दुखावतील असे येथील राज्यकर्ते समजत असतील तर तो इस्लामचा अपमान आहे. या अपमानाविरुद्ध त्याच त्वेषाने (जसे की पैगंबरांचे व्यंगचित्र काढल्यावरून गुरुवारी धुळ्यात दंगल घडवली गेली.) मुसलमानांनी समोर आले पाहिजे, परंतु हे सारे तेव्हाच वास्तवात येईल जेव्हा दहशतवादाची गटार असलेल्या पाकिस्तानविरोधात आणि आपल्या देशातही जिहादची विषवेल पोसणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलू.
पाकिस्तान जोवर आपली बिघडलेली पोरं प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज करून भारतात पाठविणे आणि प्रशिक्षण केंद्रे थांबत नाही तोवर भारताने सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार बंद केले पाहिजेत. चांगलं बोलता येणाऱ्या प्रवक्त्यांना प्रशिक्षण देऊन जागतिक स्तरावर पाकिस्तानला उघडं पाडलं पाहिजे. काश्मिरात आणि भारतात इतरत्र सुरू असलेले हिंसेचे थैमान पाकने कसे सुरू ठेवले आहे, हे योग्यप्रकारे जगासमोर आणले गेले पाहिजे. चित्रपट, मीडिया आणि इतर माध्यमांतून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला पाहिजे.
भारत आणि अमेरिकी जनतेसाठी पाकिस्तान धोकादायक कसा आहे हे अमेरिकी जनतेला तेथील माध्यमांतून प्रभावीपणे सांगत राहिले पाहिजे. नकली ओबामांपेक्षा त्या देशातील जनता हा धोका चांगल्यारीतीने समजू शकते. तेथील जनतेचा विरोध सुरू झाला की, व्हाईट हाऊसला धोरण ठरवताना दहादा विचार करावा लागेल.
भारतीय कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करीत देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसाठी स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली पाहिजे. रामदेवबाबा म्हणतात त्याप्रमाणे फाशी झालेल्यांवर दया दाखविण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाही असता कामा नये.
भारतीय गुप्तचर खात्यात नव्याने प्राण फुंकले पाहिजे. पोलीस दलालाही अतिरेकी विरोधी कारवायांसाठी प्रभावी प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. अमेरिकी पोलिसांनी टाईम्स चौकातील बॉंबप्रकरणी काही सेकंदांत विमानतळावर पाकी अतिरेक्याला ताब्यात घेतले. कराचीत जाऊन मशिदीतून अतिरेक्याला जेरबंद केले. अमेरिकेकडून भारतीय पोलिसांनी शिकण्यासारखा हा बिंदू आहे.
अतिरेकीविरोधी जाळे भक्कम करण्यासाठी इस्त्राईलची मदतही घेता येईल. हे सर्व करण्याची जबाबदारी अर्थातच आपल्या राज्यकर्त्यांची आहे, परंतु कोणत्याही देशाला जे राज्यकर्ते मिळतात, ते त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या लायकीनुसारच. म्हणूनच भारतीय लोकांमध्ये पातळ होत असलेली राष्ट्रनिष्ठा आणखी प्रबळ करण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. अन्यथा लव्ह जिहादला बळी पडून माधुरी गुप्तासारखे महत्त्वाच्या स्थानावरील या देशाचे अधिकारीही भारताचा जन्मजात शत्रू असलेल्या पाकिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित महत्त्वाची माहिती देत राहतील आणि यातून भारतीयांचे मुडदे पडतील. भारतात दर सहा तासाला एक तरुणी लव्ह जिहादला बळी पडत असतानाही आपण डोळ्यांवर "सर्व धर्म समान'ची कातडी पांघरून बसू. "माय नेम इज खान'पासून स्लॅमडॉगमिलेनियर चित्रपटापर्यंत हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणांच्या प्रेमकथा सजतील. याचे कोणाला काहीही वाटणार नाही.
थोडक्यात सांगायचे तर शत्रू विविध रूपाने, विविध माध्यमांतून या देशाचे लचके तोडू पाहतोय. एका कसाबला शिक्षा दिल्याने भारतात सुख-शांती नांदेल असे बिलकुल नाही. कसाबला फाशी म्हणजे "कसाब'च्या केसाला फाशी दिल्यासारखे आहे. पाकिस्तानातील आणि भारतातील "कसाब' निर्माण करणारे कारखाने बंद करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्यथा असे अनेक कसाब पाकिस्तानच्या जिहादी डोक्यातून उगवतच राहतील. कसाबसारख्या देशद्रोह्यांना त्वरित फासावर लटकविण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी ठरवले तर एका दिवसात तसा विशेष नियम बनविता येईल, पण सर्वपक्षीय खासदार तसे करतील? तसे झाले तर ती समस्त भारतविरोधी शक्तींसाठी मृत्यूघंंटाच ठरेल.
www.psiddharam.blogspot.com
9325306283
kasab, islam, 26/11

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी