Friday, August 13, 2010

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने


हा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.ऑक्टोबर 2009 चा महिना असावा. सकाळी 8 ची वेळ. समोरच्या खिडकीत वृत्तपत्र खोचल्याचं दिसलं. एकटाच होतो. समोरच्या खुर्चीच्या आधाराने खाटेवरून तोल सांभाळत उभा राहिलो, पण त्यासाठी सर्व शक्ती एकवटावी लागली. डोंबाऱ्याच्या मुलीने दोरीवरून तोल सांभाळत चालावे तसे सर्व लक्ष केंद्रित करून 5 फुटांचं अंतर दहा पावलांत कापलं. तरुण भारतचा अंक हाती घेतला. एक खोली ओलांडून पलीकडच्या कार्यालयाच्या खुर्चीत बसून वाचावं म्हणून चालू लागलो. कार्यालयाच्या दरवाजाच्या आधी कॉम्प्युटर ठेवलेला आहे. तिथे आल्याबरोबर मी कॉम्प्युटरच्या स्टॅबिलायझरवर कोसळल्याचं ध्यानात आलं. डोक्याला लागलं नाही, पण त्या टेबलाच्या खालच्या भागात अडकलो होतो. हळूहळू अंग काढून घेतलं. बसण्याचा प्रयत्न करू लागलो, पण बसता आले नाही. उभे राहण्याचा तर प्रश्नच नव्हता. पलंगावरून आधार घेऊन उठता येऊ लागलं होतं, पण जमिनीवर नाही. आता कार्यालयात निम्मं आणि कॉम्प्युटर रूममध्ये निम्मं शरीर टाकून पालथं पडून राहिलो, शेजारी पडलेल्या वृत्तपत्रावरून नजर टाकत. या स्थितीचं राहून राहून मलाच हसू येत होतं. कुणी कार्यकर्ता येईपर्यंत मला असंच पडून राहावं लागणार होतं. पंधराएक मिनिटांनी श्रीनिवास दादा आला. त्याने उचलून उभं केलं. जीबीएसचा आजार होऊन आता मला दोन-अडीच महिने होत आले होते.
हा जीबीएसचा आजार मोठाच चमत्कारिक आहे! सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो. गेल्या वर्षभरात मी ज्या स्थितीतून गेलो. त्याबद्दल काही सांगावं म्हणून हा लेखन प्रपंच.
दिल्लीची राष्ट्रीय पत्रकार कल्याण न्यास नावाची संस्था आहे. राष्ट्रीय विचारधारेच्या प्रेरणेने पत्रकारितेत समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी न्यासतर्फे पुरस्कार दिला जातो. 8 ऑगस्ट रोजी सोलापुरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाची तयारी, स्मरणिकेची तयारी, निमंत्रण पत्रं, स्थानिक संयोजन समितीतील मान्यवरांच्या भेटीगाठी... एकूणच धावपळ सुरू होती.
रविवार पुरवणी "आसमंत' आणि रोजचं संपादकीय पान हे कामही होतंच. विवेक विचार मासिकाचंही काम. अशातच 7 ऑगस्टला ताप भरला. आजारी पडून थोडंच चालणार होतं. त्यामुळे आजार पुढे ढकलला. कार्यक्रम थाटात पार पडला. त्यानंतर दोन दिवसांनी 11 ऑगस्ट रोजी पहाटे समजलं की, जवळचा मित्र मदगोंडा पुजारीचे वडील हृदयविकाराने गेलेत. मदगोंडा सांगलीत होता नोकरीसाठी. तो निघाला होता. 12 वाजेपर्यंत सोलापुरात पोहोचल्यानंतर त्याला सोलापूरपासून 25 कि.मी.वर असलेल्या गंगाधर कणबस गावी न्यायचं होतं. म्हणून सकाळी 7.30 वाजताच तरुण भारतमध्ये पोहोचलो. 12 पर्यंत पान 4 ओके केलं. मदगोंडाला घेऊन बाईकवरून गावी पोचलो. अंत्यसंस्कार व्हायला रात्र झाली. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अशा वातावरणात ते शक्य तरी होतं का? रात्री थोडा थकवा जाणवला. दुसऱ्या दिवशी हातापायातून थोडी शक्ती कमी झाल्यासारखं वाटलं. कालच्या दगदगीमुळे असेल कदाचित म्हणून दुर्लक्ष केलं.
गुरुवार, दि. 13 ऑगस्ट. सकाळी 11 ची वेळ. "अरे सुनील, पायातून शक्ती कमी झाल्यासारखी वाटतेय. गाडी चालवता येईल असं वाटत नाही. चल डॉ. रायतेंकडे जाऊ', मी म्हणालो. तो "चल' म्हणाला. पुन्हा मीच म्हटले, "थांब, मी पाहतो गाडी चालवायला येते का' म्हणून मी गाडी चालू केली अन्‌ एकटाच डॉ. रायतेंकडे पोचलो. पायऱ्या चढणं त्रासदायक वाटत होतं. डॉक्टरांनी तपासणी केली. जुलाब लागले होते का? असे विचारले. हातपाय ढकलायला सांगितले. काही नाही कमी होईल. "इलेक्ट्रॉल' घ्या दोन दिवस, कमी होईल म्हणाले. क्षार कमी झालेत असं त्यांना वाटलं असावं. दरम्यान, ताप आला, तर फोन करा म्हणाले. आज मला "मुस्लिम जगत' स्तंभाचं अनुवाद करून सर्व आवृत्त्यांना पाठवायचं असल्यानं कार्यालयात पोहोचलो. 3 वाजेपर्यंत अनुवाद करून झाला. आता मात्र चालायला आणखी त्रास होत होता. संपादक साहेबांना फोन करून सांगितलं की, बहुधा चिकन गुनिया झालाय. निवास ठिकाणी केंद्रात पोहोचलो. सुनील मुंबईला बैठकीला जाणार होता, पण न जाता तो थांबला होता. रात्री इलेक्ट्रॉल घेऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी दिवसभर इलेक्ट्रॉल घ्यायचं, लघुशंकेला जायचं सुरू. दिवसभरात अधिकच परिणाम झाला होता. रात्री 10 च्या सुमारास बसुदादा (विवेकानंद केंद्राचे ज्येष्ठ कार्यकर्ते) व शोभाताई (स्त्रीरोगतज्ज्ञ) आले. डॉ. किरण पाटीलकडे ऍडमिट करू म्हणाले. स्वाईन फ्ल्यूची शहरात हवा होती. म्हणून दोघेही मास्क लाऊन आले होते. मी म्हणालो, "सकाळपर्यंत बघूया.' ते गेले. रात्री मात्र जास्तच झालं. आता मला हातात पेलासुद्धा धरता येईनासे झाले. उठून उभे राहायलाही येईनासे झाले. क्षार वाढावेत म्हणून पुन्हा पुन्हा इलेक्ट्रॉल पीत राहिलो आणि बिचारा सुनील अर्ध्या-अर्ध्या तासाला उचलून बाथरूममध्ये नेऊ लागला. प्रकरण गंभीर असल्याचं आता त्याच्या ध्यानात आलं होतं.
सकाळी झाली. बसुदादा, शोभाताई, श्रीकांत हजर झाले. आता दवाखान्याला पर्याय नव्हताच. रिक्षा मागविली गेली. सुनीलनं पाठीवर उचलून घेतलं अन्‌ पायऱ्या उतरू लागला. शेवटच्या पायरीवर अडखळून तो पडला अन्‌ त्याच्यावर मी. मी काहीच करू शकत नव्हतो. रिक्षात दोन्ही बाजूला श्रीकांत-सुनील. रिक्षा धावू लागली. 15 ऑगस्ट- स्वातंत्र्यदिनाची सकाळ असल्याने देशभक्तीचे वातावरण रस्त्यावरून दिसत होते. रिक्षा युनिक्‌ हॉस्पिटलसमोर थांबली. तोवर संपादक श्री. अनिल कुलकर्णी, दशरथ वडतिले, शांतवीरदादा तिथे पोहोचले होते. चाक असलेल्या खुर्चीवर मला उचलून बसविण्यात आलं. एका खाटेवर तात्पुरतं डॉक्टर येईपर्यंत झोपवण्यात आलं. शोभाताईंनी संपर्क केल्यानं पाचच मिनिटांत डॉक्टर करकमकर पोहोचले. त्यांनी जुजबी चाचणी केली अन्‌ सांगितलं, हा गियाबारी सिंड्रोम आहे. तत्काळ यशोधरा किंवा वळसंगकर हॉस्पिटलला हलवा. डॉ. वळसंगकर गोव्यात होते. म्हणून "यशोधरा'ला न्यायचं ठरलं. मला आताही ताप नव्हता. आवाजही खणखणीत होता. लुळं शरीर सोडलं तर आजाराची कोणतीच लक्षणं नव्हती. त्यामुळेच मलाच काय इतरांनाही आधीचे दोन दिवस आजाराचं गांभीर्य समजलं नव्हतं.
आता मात्र सगळेच गंभीर झाल्याचं दिसत होतं. रुग्णवाहिका आली आणि यशोधरात पोहोचलो. काही दिवसांपूर्वीच मी डॉ. बसवराज कोलूर आणि डॉ. शिवपुजे यांची मुलाखत घेऊन गेलो होतो. त्यानंतर आज. सुरुवातीला तपासणी करतात तिथे समोर डॉ. शिवपुजे दिसले. "तुम्ही 25% खाता आणि त्याच्या दुप्पट काम. असं चालणार नाही', हे त्यांचे शब्द त्याक्षणी आठवले, पण त्याक्षणी समोर "आपला' डॉक्टर आहे याचा आधारही वाटला. तातडीने अतिदक्षता विभागाकडे चारचाकी टेबलवरून नेण्यात येऊ लागलं. मला फक्त बोलताच येत होतं, हालचाल नाही, पण वातावरण गंभीर झालं होतं. अतिदक्षता विभागात नेताना पाहात होतो, आई-बाबा शेतातली कामं तशीच टाकून धावत पळत आलेत. मातीने माखलेले कपडे तसेच आहेत.
अतिदक्षता विभागात विविध चाचण्या सुरू झाल्या होत्या. जीबीएस आजाराची लक्षणे दिसत असली, तरी डॉक्टरांना तशी खात्री करून घेण्यासाठी काही चाचण्या करायच्या होत्या. "एम.आर.आय.'द्वारे पाठीचा मणका स्कॅन केला जातो. तिथल्या डॉक्टरांच्या चर्चेवरून मला समजलं होतं की, पाठीच्या मणक्याला काही इजा झालेली नसेल, तर "जीबीएस'चे उपचार सुरू करायचे. दरम्यान एक दीर्घ श्वास घेऊन मला 1, 2, 3... असे अंक मोजायला सांगण्यात आले. मी 45 पर्यंत म्हटले. हे चांगलं लक्षण होतं, पण समजा पाठीच्या मणक्यात काही दोष निर्माण झाला असेल, तर मात्र कायमचं पंगुत्व येणं शक्य होतं. कायमस्वरूपी आपल्या हाता-पायात शक्ती नसणार? ही कल्पनाच खूप धक्कादायक होती. सतत फिरणाऱ्या माझ्यासारख्यावर असा विचार करणंही आघात होता. माझ्या मनाची स्थिती मी नेमकेपणाने सांगू शकणार नाही, पण मी पुरता हादरून गेलो होतो. "वैरी न चिंती ते मन चिंती' असं म्हणतात ते खरंच आहे. मनात वेगाने विचार येऊ लागले... समजा आपले पाय कायमस्वरूपी निकामी झाले तर.... आपल्याला संगणकाच्या आधारे वाचन, लिखाण आदी करता येईलच, त्यामुळे काही अडचण नाही. परंतु समजा हात आणि पाय दोन्ही निकामी झाले, तर जीवन कसं जगायचं? हा विचार छळत होता. मला उत्तर मिळालं.... प्रायोपवेषन्‌. होय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा अवलंब केला होता. आपलं शरीर जेव्हा स्वत:च्या आणि समाजाच्या उपयोगाचं राहात नाही तेव्हा अन्न, पाणी, औषधं त्यागून मृत्यूला अलिंगन द्यायचं. असं करणं इथे लिहिलंय इतकं निश्चितच सोपं नाहीय; परंतु त्याक्षणी मला या विचाराने बळ दिलं आणि मी चिंतामुक्त झालो. तोपर्यंत एमआरआय स्कॅनिंगसाठी मला अश्विनी रुग्णालयात नेलं होतं. स्कॅनिंगच्या त्या कराल जबड्यात बंद करण्यात आलं. प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्य म्हणजे मला झोप लागली. स्कॅनिंगनंतर पुन्हा "यशोधरा'त आणलं गेलं. दरम्यान भेटायला येणाऱ्यांची वर्दळ सुरू झाली होती. रामतीर्थकर पती-पत्नी पायऱ्या चढतच दाखल झाले होते. (रामतीर्थकर सरांना संधीवातामुळे चालताना अडचण येते.) बहिणी, भाऊ परमेश्वर बघताक्षणी रडू लागले. आई-बाबांची अवस्था तर कशी सांगू.
नंतर बहीण सांगत होती, "सुनील काळवंडला होता. सतत फोनवरून विविध लोकांना माहिती देत होता. चेहऱ्यावर सन्नाटा. धनंजय दादा, संपादक, नाना, शांतवीरदादा, भावजी या साऱ्यांची स्थिती अशीच होती. डॉ. प्रार्थना भावजी आणि नातेवाईकांना कमी होईल म्हणून धीर देत होती. सगळं विवेकानंद केंद्रच यशोधरात गोळा झालं होतं.'
संध्याकाळी श्वास घेऊन आकडे मोजायला सांगण्यात आले. आता मी 23-24 पर्यंतच एका श्वासात आकडे मोजू शकत होतो. आजाराने श्वसनसंस्थेवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती. दरम्यान "एमआरआय'चा रिपोर्ट आला. नॉर्मल. मात्र ध्यानात आलं की, आता उशिराने का होईना आपण पुन्हा चालू-फिरू शकणार आहे, पण मला वाटलं तेवढं सोपं नव्हतं हे माझ्या ध्यानात नंतरनं आलं.
"जीबीएस'चा आजार आहे हे आता निश्चित झालं होतं. "जीबीएस' या आजारात बोटं, पाय, हात अशा क्रमाने परिणाम होतो. शेवटी श्वसनसंस्थेवर हल्ला होतो. श्वसनसंस्थेवर हल्ला होणं गंभीर असतं. रुग्ण कधीकधी यात दगावू सुद्धा शकतो. आता माझ्या श्वसनसंस्थेवर परिणाम व्हायला सुरुवात झाली होती. आता जीबीएसच्या व्हायरसचा प्रभाव रोखणं अत्यंत गरजेचं होतं.
(पूर्वार्ध)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे   दिव्य मराठीत प्रकाशित

हाणामारी-दंगली टाळता येऊ शकतील

सोलापुरातील दत्त चौक भागात मंगळवारी रात्री दोन गटांत हाणामारी झाली. लागलीच सगळीकडे दंगल पेटल्याची "अफवा' पसरली. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हैदराबादेत राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला. दत्त चौकात काही गडबड आहे पाहा, असे त्याने सुचविले. चौकशी करून मी सिव्हिल हॉस्पिटलला पोचलो. जखमी असलेल्या कुरेशी गटातील तरुणांवर उपचार सुरू होते. बाहेरील बाजूला कुरेशी नावाचे एक साठीतले दाढीधारी गृहस्थ पत्रकारांना माहिती देत होते.
"खाटीक मशीद भागात आमच्या (मुस्लिम) समाजाची फक्त 50 घरे आहेत. (5-10 घरॉं हंई, दुसरा म्हणतो.) त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्यायाची सीमा ओलांडून अन्याय केला आहे. अल्पसंख्याकांवर दहशत बसविण्यासाठीच आम्ही पुरुष मंडळी घरात नसताना ठरवून हा हल्ला केला गेला. अल्लाताला त्यांना धडा शिकवीलच. आम्हीही कायदेशीररीत्या त्यांना सोडणार नाही... भारी पडू... आमदार आमच्याकडे फिरकलेही नाहीत पण "भाऊ' मात्र आमच्या मोहल्ल्यात घरी येऊन धीर देऊन गेले...' वगैरे माहिती कुरेशी महोदय देत होते.
दत्त चौक-सोन्या मारुती भागात त्यांच्या समाजाची कमी घरे आहेत म्हणून त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी हल्ला झाल्याचे कुरेशी म्हणत आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत मुस्लिमांची संख्या अचानक कृत्रिमरीत्या वाढल्याची या भागातील हिंदू समाजाची भावना आहे. काही बांगलादेशी घुसखोर या भागात बस्तान थाटत असल्याचीही चर्चा आहे. नेमका काय प्रकार आहे हे पोलिसांनीच खोलात जाऊन चौकशी केली तर ध्यानात येऊ शकेल, पण कालच्या हाणामारीचा मूळ मुद्दा वेगळाच आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली आहे. म्हणजेच त्या दोन्ही गटांतील ठराविक मंडळींचा या हाणामारीत सहभाग आहे, परंतु कुरेशी गट मात्र याला हिंदू-मुस्लिम असे रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे काय, हे तपासले पाहिजे. तसे असेल तर ही बाब हाणामारीपेक्षाही अधिक गंभीर आहे.
त्या भागात केवळ पन्नासच घरे मुस्लिमांची आहेत म्हणून त्यांच्यावर दुसऱ्या समाजाने म्हणजे हिंदूंनी दहशत बसविण्याचा प्रयत्न केला, असे म्हणणे अपरिपक्वपणाचे आहे. तसे पाहिले तर कितीतरी खेड्यांमध्ये 2-4 घरे मुस्लिमांची आणि बाकी सर्व हिंदूंची, असे असूनही कधी हिंदूंनी त्यांच्यावर दहशत बसविल्याच्या वार्ता नाहीत. उलट खेड्यातील मुस्लिमांचे सण हिंदूच पुढाकार घेऊन साजरे करताना दिसतात. शहरातही हिंदुबहुल भागातील मुस्लिम दहशतीत राहतात असे दिसत नाही. मात्र याउलट अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी (2 ऑक्टो. 2008) लक्ष्मी मंडईजवळील मुस्लिमबहुल भागात शिलाई दुकान मुस्लिमांच्या सणाच्या दिवशी का चालू ठेवला असे विचारत काहींनी लोखंडी सळयांनी गंभीर हल्ला केला होता.
2002 साली अमेरिकेतील कोण एक ख्रिस्ती पाद्री मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केला म्हणून सोलापुरातील मुस्लिमबहुल भागात देवीची मूर्ती फोडून दंगल घडविण्यात आली होती. गेल्यावर्षी आसरा चौकाजवळ रिक्षावाल्याने मागून मोटरसायकलीला धडक दिली. चूक रिक्षावाल्याची असूनही रिक्षावाल्याने "मॉं की ---' शिवी हासडली. वाद वाढतोय असे दिसताच, दोन-चार मिनिटांत 10-12 जण रिक्षावाल्याच्या बाजूने धावून आले आणि त्या मोटरसायकलवाल्या दोन्ही मुलांना बदडले. रिक्षावाला त्या परिसरातील नसताना आणि त्याची चूक असतानाही त्याच्या बाजूने त्याचे समाजबांधव धावून आले.
हिम्मतराव देशभ्रतार यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेऊन चार दिवस होत नाहीत तोपर्यंत विजापूर वेस येथील घड्याळाच्या दुकानावर 100-125 जणांच्या जमावाने हल्ला केला. एक दारू प्यालेला मुस्लिम गृहस्थ घड्याळाचे पैसे कमी घे असे दुकानदाराला दरडावतो. दुकानदार ऐकत नाही म्हटल्यावर बाहेर येऊन गोंधळ करतो. 5-10 मिनिटांत 100-125 समाजबांधव त्याची कड घेऊन दुकानावर हल्ला करतात, हे काय दर्शविते?
या आणि अशा गोष्टींचा कुरेशी साहेब तुम्ही विचार करणार आहात काय? पूर्ववैमनस्यातून जर हाणामारी झाली असेल, तर त्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देणे चुकीचे आहे. अशा अफवांमधूनच दंगली होतात असे आम्हास वाटते. समजा या दोन गटांतील हाणामारी पूर्ववैमनस्यातून नसेल तर ती का झाली याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
दत्त चौक परिसरात एक शाळा आहे. या भागात हिंदू तरुणींची नेहमीच छेड काढली जाते. कुणी जाब विचारायला गेले की, झुंडशाही निर्माण करून तरुणींच्या पालकांनाच गप्प केले जाते. या प्रकारातूनच असंतोष वाढत जाऊन कालची हाणामारी झाली असे म्हटले जात आहे. मध्यंतरी "लव्ह जिहाद'ची चर्चा होती. तसा प्रकार तर येथे नाही ना, याचीही शहानिशा झाली पाहिजे. दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे.
हा विषय फक्त सोलापुरपुरता मर्यादित नाही. संदर्भ सोलापूरचा असला तरी कमी-अधिक फरकाने सगळीकडे अशा घटना घडत असतात. सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला दंगल, हाणामारी नकोच असते, परंतु काही मंडळी वैयक्तिक वैमनस्याला हिंदू-मुस्लिम वादाचे रूप देत असतील तर संबंधित समाजातील विचारी लोकांनी असे प्रकार थांबविले पाहिजे. मुलींची छेडछाड करून हिंदू समाजाला डिवचण्याचे प्रकारही थांबले पाहिजेत. महाविद्यालये, मोहल्ले यांमधून असे प्रकार होणार नाहीत यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा किंवा पथकच असले पाहिजेत. असे झाले तर वेळ हाणामारीपर्यंत येणारच नाही. याचबरोबर दोन्ही समाजांत सुसंवाद निर्माण होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. असे झाले तर हाणामारी-दंगली टाळता येतील.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी