Friday, August 27, 2010

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो

जीबीएस'च्या विळख्यात भाग -3
महिन्याभराने माझं मला स्वत:ला बेडवरून उठता येऊ लागलं होतं. पाय बेडवरून खाली सोडून बसता येत होतं, पण जमिनीवर अजून बसता येत नव्हतं. पाठीवर झोपून झोपून डोक्याचे मागील केस उडाले होते. सेरेना मॅडम चिकाटीने आवश्यक ते व्यायाम प्रकार करवून घेत होत्या. महिन्याभराने मला मोबाईलवर दोन-चार अक्षरं दाबायला येऊ लागलं होतं. हातात अजूनही पेन धरता येत नव्हतं. स्वत:च्या हाताने जेवताही यायचं नाही.

साधारणपणे सुरुवातीचे 5 दिवस अतिदक्षता विभागात होतो. 24 तास विनाहालचाल पडून राहायचे. इच्छा असूनही केवळ मानेचीच थोडी हालचाल करू शकत होतो. मानेतून वीतभर लांब नळी आत खुपसलेली आणि मानेवर त्याच्या आऊटलेटचे गाठाडे यामुळे मानेची अधिक हालचाल केली तर आतल्या बाजूस इजा होईल काय, असे वाटायचे. सतत निपचित पडून राहिल्याने शरीराची थोडी हालचाल करावी वाटायची, पण शरीराचे कुठलेच अवयव माझे आदेश पाळण्यास समर्थ नव्हते. सतत लाईटस्‌ चालू त्यामुळे दिवस-रात्र-वेळ कळायची नाही. शेजारील बेडस्‌वर जगण्यासाठी धडपडणारे माझ्यासारखेच जीव आणि त्यांचे गांजलेले नातेवाईक.
आमचे माजी संपादक विवेक घळसासी, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह अनेकांनी या काळात भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. सनातन संस्थेचे संस्थापक पू.डॉ. जयंत आठवले यांच्यासारख्या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीने आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केल्याचे सनातनच्या स्थानिक साधकांनी सांगितले. सनातनच्या साधकांनी या काळात भगवान श्रीकृष्ण आणि गणपतीच्या नामजपाचा आग्रह धरला. विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती आदरणीय सतीशजी यांनी चेनै येथे माझ्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी तेथूनच महामृत्युंजय जप सुरू ठेवला आणि श्रीमत्‌ हनुमान वडवानल स्तोत्र पठण करण्यासाठी धनंजयदादांना सांगितले. बालाजी, मादुलिंग, पवन, प्रणव, श्रीकांत हे सारे तरुण मित्र सुनीलच्या शेड्युलनुसार 24 तास सोबत असायचे. प्रेमात प्रचंड सामर्थ्य असते. हृदयापासून प्रेम करणाऱ्या या जीवलगांमुळे मला आजरपणात एकटेपणा वाटलाच नाही. भेटायला येणारे सारेच या काळात मानसिक बळ पुरवत होते.
सुरुवातीच्या 4-5 दिवसांनंतर संपूर्ण शरीरात असह्य वेदना व्हायच्या. येथे असह्य हा शब्दही कमी तीव्रतेचा आहे. खासकरून दोन्ही खांदे आणि दंड यांमध्ये प्रचंड वेदना व्हायच्या. या स्थितीत भेटायला येणाऱ्यांमुळे काही काळ वेदना कमी झाल्यासारखे वाटायचे. रात्री प्रचंड वेदना व्हायच्या. वेदना कमी होण्यासाठी डॉ. सेरेना मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे मादुलिंग आणि बालाजी दोघेही पाच-पाच मिनिटाला जाऊन बर्फाच्या लाद्या आणून दंड आणि खांद्यावर ठेवायचे. कितीतरी वेळा वेदना कमी व्हाव्यात यासाठी मी मला येत असलेली भजनं म्हणत असे किंवा सनातन साधकांनी सांगितल्याप्रमाणे जप करीत असे.
मला त्रास होऊ नये म्हणून मला बोलू दिलं जायचं नाही. धनंजयदादांनी तशी खास योजनाच केली होती. पण मला मात्र त्या काळात खूप बोलावं वाटायचं. या काळात माझे मनोधैर्य टिकवून ठेवण्यात दोन व्यक्ती सहाय्यभूत ठरल्या- एक डॉ. प्रसन्न कासेगांवकर आणि दोन- डॉ. सेरेना रोच. डॉ. कासेगांवकर हे प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे डॉक्टर खूपच ऊर्जावान आहेत. यांच्या मार्गदर्शनाखालीच माझ्यावर उपचार सुरू होते. फारतर दीड-दोन मिनिटांची त्यांची भेट असे, पण उत्साहाने भारलेले. तज्ज्ञ आणि हुशार डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या बोलण्यातून आपण लवकरच बरे होणार याची हमी मिळत असे.
जीबीएस या आजारात हात, पाय, बोटं... सारं शरीरंच नवजात बाळासारखं झालेलं असतं. बाळ किमान हातापायांची हालचाल तरी करते. स्वत: कूस बदलते. स्वत: शी-शू करते. मला मात्र यातलं काहीच येत नव्हतं. मूत्रमार्गातून शरीरात एक नळी (कॅथेटर) टाकलेली. आता या आजारातून बाहेर येताना टप्प्याटप्प्याने शारीरिक हालचाली शास्त्रशुद्धरीत्या करवून घ्यायच्या असतात आणि हा कालावधी अनेक महिन्यांचा. शास्त्रशुद्ध हालचाली करवून घेणाऱ्या डॉक्टरांना फिजिओथेरपिस्ट म्हटले जाते. माझ्यावर उपचार करणाऱ्या फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांचं नाव आहे-डॉ. सेरेना रोच. 24-25 वर्षांची ही मुलगी, पण आपल्या विषयाची समज मोठी असलेली. पहिल्या दोन दिवसांतच आमची मैत्री झाली, त्यामुळे पुढील सारे उपचार आपण आपल्या एका जवळच्या मित्रावर उपचार करतोय याच भावनेने त्यांनी उपचार केले.
तीनदा प्लाजमा फेरसिस झाले होते. एकदा सिद्धू नावाच्या तरुण टेक्निशियनने केले. प्लाजमा फेरसिसचा प्रचंड त्रास असायचा, पण सिद्धूने केला तेव्हा वेळही कमी लागला आणि त्रासही थोडा कमी झाला. त्यानंतर मी सेरेना मॅडमच्या माध्यमातून पुढील प्लाजमा फेरसिस सिद्धूनेच करावे यासाठी आग्रह धरला आणि ते मान्यही झाले. या काळात माझ्या दंडांना साधा स्पर्श केला तरी जीवघेण्या वेदना व्हायच्या. फेरसिस करताना दीड-दोन तास दोन-दोन मिनिटाला रक्तदाब तपासावे लागायचे. यावेळी दंडाला खूप वेदना व्हायच्या. पण सिद्धू प्लाजमा फेरसिस करायचा तेव्हा तो मनगटाजवळ बोटांनीच नाडी तपासून बीपी ओळखायचा.
तीन प्लाजमा फेरसिस झाल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर परिणाम झाला. दोन ओठांमध्ये अर्धा-एक सेंटीमीटरचे अंतर राहू लागले. ओठ मिटता येत नव्हते. प आणि फ सारखी अक्षरे उच्चारायला येईनासे झाले. डोळ्यांचे स्नायूही दुर्बल झाले. डोळे घट्ट मिटता येईनासे झाले. यावेळी फिजिओथेरपी कामी आली. डॉ. सेरेना मॅडम स्टिम्युलेटर नावाच्या उपकरणाद्वारे चेहऱ्यांच्या स्नायूंमध्ये संवेदना आणायच्या. दोन आठवड्यांनी ओठ पूर्ववत झाले, परंतु नंतर दोन महिन्यांपर्यंत ओठात शक्ती नव्हती.
सहा प्लाजमा फेरसिस झाले तेव्हा मला कष्टपूर्वक स्वत: एका बाजूला वळता येऊ लागले होते. हातापायांत किंचित त्राणही आले. बेडवरून खाली पाय सोडून 10 मिनिटांपर्यंत बसताही येऊ लागले. खाली लोंबकळणाऱ्या पायांत त्राण यावा म्हणून दोन फूट व्यास असणाऱ्या मोठ्या चेंडूला पायाने ढकलण्याचा व्यायाम सुरू झाला. बसलेल्या स्थितीतून झोपवताना आणि उठवताना तीघं-चौघं लागायचे. कारण पायाच्या शिरा थोड्या जरी ताणल्या तरी प्रचंड वेदना व्हायच्या. दरम्यान चाकवाली खूर्ची मागवून त्यावर हळूवारपणे बसविण्यात आले. हॉस्पिटलच्या परिसरात फेरफटका मारला. हा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. तो आनंदच वेगळा होता.
आता मला हॉस्पिटलच्या गच्चीवरही नेण्यात येऊ लागले होते. दोन्ही हातांनी वॉकर पकडून काही पावलं टाकता येऊ लागली होती, परंतु सोबत तीन-चार जण उभे करायला आणि तोल सांभाळायला लागत होते. हे सारं डॉ. सेरेना यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतं.
सतरा दिवसांनी 2 सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला. नारायणपेठकर सरांच्या गाडीतून सातरस्त्याजवळच्या विवेकानंद केंद्रात आणण्यात आले. सासरी गेलेली कन्या पहिल्यांदाच माहेरी आल्यानंतर घरी जसे स्वागत होते तसे वातावरण होते केंद्रात. खास वॉटर बेड आणला होता. स्वच्छता टापटीप. दिवसातून तीन वेळा रूम डेटॉलच्या पाण्याने पुसले जायचे.
इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा प्राध्यापक सुनील. त्याचा दिवस पहाटे चारलाच सुरू होत होता. उठल्या उठल्या सगळी खोली झाडून डेटॉलच्या पाण्याने पुसून घेणे. स्वत:ची आवराआवर. मला दिवसभर पिण्यासाठी पाणी तापवून ठेवणे. नंतर माझे दात घासणे. मला आंघोळ घालणे. अंग पुसणे. कपडे घालणे. फळं कापून ताटात घालून समोर ठेवणे आणि सकाळी आपल्या कॉलेजला रवाना. का करत होता तो हे सगळं? आम्ही एका विचाराने बांधलो होतो. विवेकानंद केंद्राचे आम्ही कार्यकर्ते. आपल्या मातृभूमीचे आपल्यावर ऋण आहे आणि आपल्या देशासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे, हा स्वामी विवेकानंदांचा विचारच आम्हा साऱ्यांना एका धाग्याने बांधलेला. असे अनेक सुनील या काळात धावून आले होते.
केंद्रात आल्यानंतर दोन-चार दिवसांनी मूत्रमार्गातील कॅथेटर काढण्यात आली. मला खूप हायसं वाटलं.
कोण लक्ष्मण जमादार. बेडर पूल भागात राहणारा एक सामान्य माणूस. आमची ओळखही नाही. रोज दोनदा येऊन मशाज करून जायचा. मी विचारले, काका तुम्ही हे का करता? तर म्हणे मी तुमचे तरुण भारतमधले लेख वाचलेत. हिंदुत्वासाठी लिहिणारे तुमच्यासारखे तरुण हवेत. मला पुन्हा एकदा तुम्हाला पळताना पाहायचंय.
याच विचाराने बांधलेले आमचे शांतवीरदादा. स्वत:च्या वकिलीच्या कामाच्या धबडग्यातून गव्हाची हिरवी पाने आणि पिठाची गंजी घेऊन रोज सकाळी 8 वाजता हजर असायचे. त्यांचे मोठे बंधू क्रांतिवीरदादा आणि युद्धवीरदादा यांनी आपल्या अंगणात गव्हाची रोपवाटिकाच बनविलेली.
डॉ. मठकर यांच्याशी ओळख ना पाळख. ते होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत. ते शोधत आले आणि होमिओपॅथीच्या गोळ्या देऊ लागले. साईड इफेक्ट नाही, झाला तर फायदाच आहे. घ्या म्हणाले आणि नियमित खुशाली विचारायलाही आले.
देवस्थळी काका, श्रीरामदादा, नारायणपेठकर, धनंजयदादा, शोभाताई, गुंडमीकाका, शोभाताई अशा अनेकांकडून चार-पाच महिने रोजचा प्रेमाचा ताजा डबा यायचा. मधुकर आनंदाने सायकलीवर जाऊन डबा आणायचा. तर कधी नारायणपेठकर सर विद्यापीठाला जाताना डबा देऊन जायचे.
विवेकानंद केंद्राचे काम का करतो, सोडून दे. तरुण भारतचं काम सोडून दे. तुझं बी.एस्सी. मॅथ्स आहे. पैसे कमवायचं बघ. कोण कुणाचं नसतं. आपण अडचणीत राहिलो की, कोणी येत नाही. समाजाचं, देशाचं काम वगैरे या फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात, वगैर प्रकारे मला नेहमी उपदेश करणारे माझे एक जवळचे नातेवाईक आले आणि आज वेगळेच सांगू लागले. अरे केवळ पैशामुळेच साऱ्या गोष्टी होतात असा माझा भ्रम होता. मी गेले कित्येक दिवस पाहतोय, जे पैशानेही शक्य होणार नाही ते सारं मी पाहतोय. मला सांग, काय आहे हे विवेकानंद केंद्र? ही माणसं का करताहेत तुझ्यासाठी एवढं?
काय सांगणार होतो मी त्यांना. माझ्या डोळ्यात फक्त अश्रू आले आणि मी त्यांना "सेवा साधना' हे विवेकानंद केंद्राचे शिल्पकार मा. एकनाथजी यांचं पुस्तक वाचायला दिलं.
महिन्याभराने माझं मला स्वत:ला बेडवरून उठता येऊ लागलं होतं. पाय बेडवरून खाली सोडून बसता येत होतं, पण जमिनीवर अजून बसता येत नव्हतं. पाठीवर झोपून झोपून डोक्याचे मागील केस उडाले होते. सेरेना मॅडम चिकाटीने आवश्यक ते व्यायामप्रकार करवून घेत होत्या. महिन्याभराने मला मोबाईलवर दोन-चार अक्षरं दाबायला येऊ लागलं होतं. हातात अजूनही पेन धरता येत नव्हतं. स्वत:च्या हाताने जेवताही यायचं नाही.
दोन्ही हात अजूनही सरळ करता यायचे नाहीत की उचलता यायचे नाही. आई-वडील, भाऊ, बहिणी, भावजी आणि इतर नातेवाईक अधूनमधून येऊन जायचे. अजूनही आपल्या लेकराला स्वत:च्या पायावर उभारता येत नाही हे पाहून आईला अश्रू आवरणे कठीण व्हायचे. तिनं कुठं नवस बोललं तर कुठे दंडवत घालीन म्हणाली. कुठे अक्कलकोटजवळ बाबा राहतो, तिकडे जीप करून जाऊ म्हणाली. आग्रहही धरला. बुवा-बाजीवर माझा विश्वास नसल्यामुळे मी तिला टाळत राहिलो. हा आजार हळूहळू कमी होईल म्हणून तिला पटविण्याचा प्रयत्न केला.
दोन महिन्यांनी माझं मला खुर्चीवरून उठता येऊ लागलं. फिजिओथेरपी सुरूच होती. थोडं-थोडं वाचन करायलाही सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांचा गोतावळा नेहमीच असायचा. कधी पेठे-देसाईसाहेब, कधी माजी संपादक अरुण करमरकर, कधी अभयजी तर कधी वडतिले काका आणि संपादक, नाना भेटायला यायचे. केंद्राच्या मागे सुंदर हिरवळ आहे. बाग आहे. तिथे सकाळ संध्याकाळ सेरेना मॅडमच्या मार्गदर्शनाखाली जाऊ लागलो. तिथे हळू हळू पावलं टाकू लागलो. मध्येच गुडघ्यात दुमडून खाली कोसळायचो, पण हिरवळ असल्याने दुखापत व्हायची नाही.
दरम्यान नारायणपेठकर सरांची कन्या यशस्वीनीताई हिने मर्म चिकित्सा केली. त्या आयुर्वेदिक डॉक्टर असून, श्रीश्री रविशंकर यांच्या सेवाकार्यात आहेत. बंगळूरूला असतात त्या. आता मी पेन धरायला शिकू लागलो होतो. दोन-चार ओळी लिहिलो की, हातातून त्राण संपायचा. पायात वाळूच्या एक-दोन किलोच्या पिशव्या बांधून पाय पुढे-मागे करणे वगैरे प्रकार सुरू होते. आता कठडा धरून पायऱ्या उतरणे-चढणे करू लागलो होतो.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत्या. श्रीरामदादांसोबत सोलापूरपासून 15 किमीवर असलेल्या आमच्या शिर्पनहळ्ळी या गावी जाऊन मतदान करून आलो. सोबत डॉ. सेरेनाही होत्या.
मज्जातंतूंवर मायलीन हा थर खूप संथ गतीने तयार होतो. तो जसे जसे तयार होतो, तसे तसे शरीरात शक्ती येऊ लागते. फळफळावळांसोबत प्रोटीन पावडर सुरू होते. जानेवारीच्या सुमारास मला जमिनीवर बसून माझे मला कोणाच्याही आधाराशिवाय उठता येऊ लागले होते. आता मला टू व्हीलर गाडी चालविण्याची घाई झाली होती. सेरेना मॅडम यांची स्कूटी हळूहळू केंद्राच्या आवारात शिकू लागलो. एकदा श्रीकांतची स्प्लेंडर ही गाडी घेतली अन्‌ चार-पाच फूट जाऊन पडलो-गाडी एकीकडे आणि मी एकीकडे. सुदैवाने हाडं शाबूत राहिली. मॅडमला आणि श्रीकांतला विनंती केली की, कोणाला सांगू नका. त्यानंतर दोन महिने हातात गाडी धरली नाही. आता मी 95 टक्के बरा झालोय. फेब्रुवारी-मार्चपासून तरुण भारतला जाऊ लागलोय. सोलापूर विद्यापीठात एम.ए. पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्गात प्रवेश घेतलाय. कधी अजित बिराजदारच्या गाडीवर तर कधी स्वत:च्या गाडीवरून विद्यापीठात चाललोय. आसमंत, विवेक विचार, संपादकीय पान आणि इतर उपद्‌व्यापही सुरू केलेत. एक गोष्ट राहून गेलीय ती म्हणजे अपर्णाताई आणि अरुण रामतीर्थकर सर यांनी एक-दोन आठवडे तरी घरी रहायला यायचा आग्रह अनेकदा केला, मी येण्याचं आश्वासनही दिलं, पण आश्वासनच राहिलंय.
हा शेवटचा भाग ओझरता लिहिला आहे. तीन-चार लाखांत एखाद्याला होणारा हा गूलियन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीस खूपच दुर्मिळ आजार आहे. त्या आजाराची आणि त्या काळातील अनुभवाची एक पुस्तिका लिहावी यासाठी आमचे माजी संपादक अरुणजी करमरकर, चपराक प्रकाशन पुणेचे घनश्याम पाटील, सुविद्याचे बाबूराव मैंदर्गीकर यांनी सुचविले. विवेकानंद केंद्राच्या निवेदिताताईंनीही एक-दोनदा अनुभव लिहिण्याविषयी विचारणा केली. त्यामुळे व्यक्तिगत अनुभव कसे लिहायचे, या संकोचातून बाहेर येऊन हे अनुभव मांडले. यावर प्रिय वाचकांच्या पुस्तक लिखाणाच्या दृष्टीने काही सूचना आल्या तर पुस्तक लिहिताना त्याचा निश्चत उपयोग होईल.
मी आजारी पडण्यापूर्वी हातांवर चालायचा, वृश्चिकासन करायचो. मला वाटतं ती स्थिती यायला आणखी सहा महिने लागतील; पण हातांवर चालेन हे निश्चित. आता हाताची बोटं आणि पिंडऱ्या व मांड्यांच्या स्नायूमध्ये थोडी दुर्बलता आहे. सकाळी नियमित व्यायाम सुरू आहे. पुढील थंडीचे चार महिने व्यायामासाठी चांगले आहेत. पुस्तक लिहून होईपर्यंत आजारही पळून जाईल अशी आशा आहे.
(समाप्त)

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी