Friday, November 20, 2015

वादळाशी केला संसार : अपर्णा अरुण रामतीर्थकर


व्यासंगी व ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर यांचे ६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांनी जागवलेल्या काही आठवणी.


 लग्नासाठी यांनी दोन दिवसांची रजा घेतली. तिसऱ्या िदवशी यांची नाइट. मी विचारले, आज ड्युटी? तर म्हणाले, “पहिलं पान माझ्याकडेय. तू पत्रकाराची बायको आहेस. संध्याकाळी फिरायला चला, यायला उशीर का केला, अशी चौकशी करत जाऊ नको.” एक विषय क्लोज झाला. खरं तर मी एका वादळाशी संसार केला. आता शांत झाल्यावर वाटू लागलंय, माझा आधार निघून गेलाय.

बायकोने नवऱ्याच्या पाया पडणे, ही प्रथा यांना मान्य नव्हती. पण मीही हट्ट सोडला नाही. गुरुपौर्णिमेचा दिवस होता. “मला इतकं शिकवलंत. गुरू म्हणून तरी नमस्कार स्वीकारा
असं घरात लिहून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पाहिले. त्याखाली पुढील ओळी होत्या. “तू उत्तम गृहिणी आहेस आणि तू माझी बुद्धिमान मैत्रीण आहेस. त्यामुळे नमस्कार नको.’

हे पुणे तरुण भारतला होते, तेव्हा उत्तर प्रदेशातील मुरादाबादला मोठी दंगल झाली. आॅफिसने दिलेले तुटपुंजे पैसे घेऊन रिपोर्टिंगसाठी गेले. आजच्यासारखे मोबाइल, फोन काही सोय नाही. हे पोचले की नाही, कळायला मार्ग नाही. आॅफिसमध्ये रोज विचारत होते. चौथ्या दिवशी बातमी आली “मुरादाबाद । विशेष प्रतिनिधी
. त्यांनी सांगून ठेवलं होतं, विशेष प्रतिनिधी या नावाने बातमी आली की समजायचं मी सुखरूप पोचलो.

मला आठवा महिना होता. खूप त्रास होत होता. टेन्शन होतं. तीन तास प्रयत्न करून ट्रंक काॅल लागला. तेव्हा देशात आणीबाणी होती. वि. स. खांडेकर सिरियस होते. त्या बातमीसाठी हे गेलेले. माझ्या वडिलांना हे म्हणाले, “तुम्ही आहात. डाॅक्टर आहेत. तुम्ही सही करा.’ वि. स. खांडेकर दोन िदवस गेले नाहीत. ती बातमी करूनच आले. मला राग आला. त्यावर म्हणाले, “पत्रकाराने हातातली जबाबदारी पूर्ण करूनच थांबले पाहिजे.’ टिळक अग्रलेख लिहिताना पत्नी गेल्याची बातमी आली तेव्हा त्यांनी अग्रलेख पूर्ण होईतोपर्यंत व्यत्यय आणू नका, असे सांगितल्याची आठवण करून दिली. आयुष्यात कुठे तडजोडच नाही.

सोलापुरात आल्यावर केसरीने यांना एम फिफ्टी ही गाडी दिली. लक्ष्मी मंडईला भाजी आणण्यासाठी चला असा मी आग्रह केला. त्यावर म्हणाले, “रिक्षा आहे नं?” “पटकन जाऊन येता येतं. पेट्रोल आपण घालूया.’ त्यावर यांचे म्हणणे, “लोकांना गाडी दिसते, पेट्रोल नाही.’ निस्पृहपणामुळे ते अतिशय निर्भय होते. परखडपणा कधी सोडला नाही. कधी कोणाची लाचारी पत्करली नाही. पुरस्कारासाठी कात्रणे कधी जमवली नाही.

आठवणी तर खूप आहेत. शेवटच्या दिवशीची आठवण मला अधिक महत्त्वाची वाटते. मतांच्या स्वार्थासाठी राजकीय पक्ष भेदभाव करतात अन् मीडियाही पक्षपात करते, हे त्यांना मान्य नव्हते. मीडियाचा पक्षपात चव्हाट्यावर आणणे आणि अन्यायाला वाचा फोडणे हेच त्यांचे जीवनध्येय बनले होते.
 
कुटुंबाबद्दल, माझ्याबद्दल काहीही चिंता त्यांना नव्हती. प्राण त्यागण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द होते, “एक दादरी झाली तर अख्ख्या देशात गदारोळ सुरू आहे. कर्नाटकात गोरक्षा करणाऱ्या प्रशांत पुजारीचा निर्घृण खून झाला. पण त्यावर निषेधाचा एक शब्द नाही. किमान सोलापुरात तरी प्रशांत पुजारीसाठी एखादा मोर्चा निघावा.’ त्यांचे ध्येयनिष्ठ जीवन अनेकांना प्रेरणा देत राहील, हा विचार मनात येतो, तेव्हा त्यांचा अभिमान वाटत राहतो. त्यांचे विचार हेच आता माझ्या जगण्याची प्रेरणा असेल.
 शब्दांकन : सिद्धाराम भै. पाटील
८ नोव्हेंबर, दिव्य सिटी पान ४

दिव्य मराठी, अपर्णा अरुण रामतीर्थकर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी