Monday, December 7, 2015

पुनश्‍च एकदा सडेतोड

आमचे मित्र सागर सुरवसे यांनी तरुण भारतमध्ये सडेतोड या नावाने स्तंभ लेखनाला सुरुवात केली आहे. रामतीर्थकर सरांनी पेटवलेली मशाल अधिक प्रखर होत जावो या शुभेच्छा....


६ नोव्हेंबर २०१५. सडेतोड लेखणी थबकली. मराठी पत्रकार जगतावर आपल्या लेखणी आणि वाणीने खोलवर ठसा उमटवलेले व्यासंगी पत्रकार अरुण रामतीर्थकर आपल्याला सोडून गेले. आज त्यांची मासिक स्मृती.
रविवार आला की आसमंत पुरवणीत रामतीर्थकर सरांनी कोणत्या विषयावर सडेतोड लिहिलंय? याची उत्कंठा. मनाला अस्वस्थ करणार्‍या घटनांचे अनेक पदर भेदकपणे उलगडून दाखवणारा संवाद व्हायचा. सहज आणि सोपी भाषा. साधारणपणे ज्यावर कोणीच भाष्य करत नाही, अशा मुद्द्यांवरील आवरण बाजूला सारणारी सरांची लेखनशैली. सत्य झाकोळून टाकणार्‍या प्रवृत्तींना ते अक्षरश: विवस्त्र करत.

ते निर्भय होते. निस्पृहपणामुळेच ही निर्भयता त्यांच्यात आलेली होती. परखडपणा कधी सोडला नाही. कधी कोणाची लाचारी पत्करली नाही. फ्लॅट, पुरस्कार, मानसन्मान यासाठी कधी कोणाची हुजरेगिरी केली नाही. ते व्रतस्त होते. ते तपस्वी होते. पालपाचोळ्यांच्या गुरुकुलात राहणारे, कंदमुळे खाणारे आणि तरीही धर्मासाठी राजसत्ता हलवून सोडणाची शक्ती बाळगणार्‍या ऋषींच्या परंपरेतले होते रामतीर्थकर सर.
ते आम्हा पत्रकारांमधील गूगल होते. पस्तीस, चाळीस वर्षांपूर्वीच्या घटनाही संदर्भ आणि बारकाव्यांसह त्यांच्या ओठावर असायचे. ते जुन्या पिढीतील पत्रकार होते. जुनी आणि नवीन पत्रकारिता यांचा समन्वय त्यांनी घडवला. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्यांचे प्रभुत्व होते. सोलापूरसारख्या ठिकाणी मुद्रित क्षेत्रातील पत्रकारांना टीव्ही जर्नालिझमची ओळख करून देणारे अग्रणी तेच होते. त्यांनी शेकडो पत्रकार घडवले. त्यांच्या लेखणी, वाणीने लक्षावधी सोलापूरकरांची मने घडवली. सत्तांतर घडवून आणण्याचा त्यांच्या वाणीचा चमत्कारही सोलापूरने अनुभवला.
अनेक जण संधी मिळत नाही म्हणून सज्जन असतात. सर अशा प्रकारातील नव्हते. त्यांचा प्रभाव व्यापक होता. एका रात्रीत अनेक कोटींचे मालक होण्याची आमिषेही त्यांच्यासमोर चालून आली. पण सरांनी पत्रकारिता धर्माला कधी बट्टा लावला नाही. ते शेवटपर्यंत सर्वसामान्य माणसाचे जीवन जगले. स्वत:वर कधी किरकोळ उपचार करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी दोन - पाच हजारांची जुळवाजुळव करतानाही त्यांना कसरत करावी लागायची. आयुष्याच्या अखेरीस रुग्णालयात दाखल झाले तेव्हा ते निश्‍चिंत होते, कारण त्यांनी काही महिन्यांपूर्वीच विमा उतरवला होता. असे धवल चरित्र होते त्यांचे.
प्राण त्याग करण्यापूर्वी अर्धांगिणी अपर्णाताई यांच्याशी त्यांचा संवाद झाला. माझ्यानंतर तुझं कसं होईल, मुलाचं कसं होईल, अशा प्रकारचा संवाद नव्हताच तो. त्यांचे शेवटचे शब्द होते, ‘देशात एक दादरी झाली तर अख्ख्या देशात गदारोळ सुरू आहे. कर्नाटक राज्यात गोरक्षा करणार्‍या प्रशांत पुजारीचा धर्मांधांनी निर्घृण खून केला. पण त्यावर निषेधाचा एक सूरही नाही. किमान सोलापुरात तरी प्रशांत पुजारीसाठी एखादा मोर्चा निघावा.
’हिंदुत्व हा त्यांचा श्‍वास बनला होता. धर्माच्या नावाखाली या मातृभूमीचे तुकडे झाले, तरीही वैचारिक सुंता झालेले बुद्धीजीवी सतत हिंदूंचाच तेजोभंग करतात. या पार्श्‍वभूमीवर रामतीर्थकर सर यांच्यासारख्या बौद्धीक योद्ध्याची उणीव तरुण भारतच्या वाचकांना नक्कीच जाणवेल. येथे मला स्वामी विवेकानंद यांच्या एका वचनाची आठवण होते. स्वामीजी म्हणतात, विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा; कोणा व्यक्तीसाठी नव्हे. रामतीर्थकर सरांचे जीवन या वचनांना सार्थ करणारे होते. त्यामुळे आपण असेपर्यंत सारे ठीक होते, आपण गेल्यानंतर सारे कोलमडले - असा विचार करून स्वत:च्या महत्त्वाने हुरळून जाणार्‍यांतील ते नव्हते. आपण गेलो तरी आपले काम सुुरू राहिले पाहिजे, अशी माणसे त्यांनी घडवली.
रामतीर्थकर सरांच्या पश्‍चातही सडेतोडची मशाल धगधगत राहिली पाहिजे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकेल. त्यामुळेच सडेतोडचे शिवधनुष्य उचलण्याचे मी ठरवले आहे. हे खरेच की, रामतीर्थकर सरांचा अनुभव, तपस्या याची सर मला येणार नाही. नव्या सडेतोड स्तंभाची सरांच्या लेखणाशी सतत तुलना होत राहील. यातून अनेक गोष्टी मला शिकता येईल. मीही विकसित होत जाईन. यासाठी वाचक बंधू - भगिनींनी आपल्या सूचना आणि अभिप्राय अवश्य कळवत राहावे.
सडेतोडसारख्या ऐतिहासिक स्तंभाची धुरा दैनिक तरुण भारतने माझ्या हाती दिली. या क्षणी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करायला माझे शब्द असमर्थ आहेत. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत माझी भावना पुढील शब्दांत व्यक्त करता येईल. स्वामीजी म्हणतात, ‘काही थोड्या लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य. असा त्याग तुम्ही करू शकत असला, तर दृढपणे उभे राहा. हे धर्मयुद्ध आहे. यात शंभर योद्धे कोसळले तर त्यांच्या हातीची ध्वजा घ्या आणि ती पुढे न्या. जो पडतो त्याने आपल्या हातीची ध्वजा दुसर्‍याच्या हाती द्यावी. ती कधी खाली येणार नाही. कोणीही पडले तरी ईश्‍वरी सत्ता अढळ राहणार आहे.’
धन्यवाद.
सागर सुरवसे
9769179823
sagar.suravase@gmail.com
published in daily Tarun Bharat, Aasmant, 6th Dec. 2015

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी