माघी वारीसाठी गावातील भाविकांसमवेत एक आठरा वर्षीय तरुणी पंढरीला जाते. तिथे गावतीलच उनाड पोरं तिची छेड काढतात, इतकेच नाही तर वारीतून गावी परतल्यानंतर ही पोरं त्या घटनेची वाच्यता करतात आणि त्यामुळे घडल्या घटनेची गावात कुजबूज सुरू होते. यामुळे होणारा मनस्ताप सहन न होऊन ती तरुणी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करते, ही मोहोळ तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील दुर्घटना समाजासाठी लज्जास्पदच आहे. ही तरुणी त्या कामांधांचा डटून मुकाबला करते यासाठी तिचा गौरव करून गावकर्यांनी त्या उनाड पोरांना दंडित केले पाहिजे होते. परंतु तसे काहीच झाले नाही. उलट त्या कन्येवर आत्महत्या करण्याची नामुष्की आली. आपला समाज आतून तुटत चालल्याचे हे लक्षण आहे. असा आतून तुटलेला समाज पंढरीच्या कितीही वार्या केल्या तरी पदरी पुण्य पडणे कसे शक्य आहे? आज आमच्या ग्रामीण समाजाला संकुचिततेचा रोग जडला आहे. त्याचे कान खूपच हलके झाले आहेत. पूर्वी गावांमध्ये असलेला एकोपा आता राहिलेला नाही. 'मी आणि माझं घर' या पलिकडे त्याला दिसेनासे झाले आहे. माणूस जेवढा स्वार्थी तेवढा तो अनीतीमान बनतो. तो ऐकीव गोष्टींची चर्चामिटक्या मारून करू लागतो आणि त्यातून असे प्रकार घडतात. त्यामुळे वारीला जाऊनही गावातील दुष्ट शक्तींना दंडित करण्याची धमक ग्रामस्थांत येत नसेल तर ही वारी, चंद्रभागास्नान, भजन-पूजन काय कामाचे?
दुसरी कडे स्वत:ला सुशिक्षित समजणारा शहरी समाज मात्र स्वैर आणि कोडगा झाल्याचे दिसत आहे. देशातील एका नामवंत इंग्रजी दैनिकाच्या कालच्या रविवार पुरवणीच्या मुखपृष्ठावर तीन उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्या मध्यमवयीन महिलांची छायाचित्रे आहेत. त्या म्हणतात, 'माझा मुलगा समलिंगी आहे, याचा मला अभिमान आहे.' आणि हे मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांत छापले आहे. आतील पानांत यावर विस्तृत लेख आहे. जे अनैसर्गिक आहे, जे विकृत आहे, जे लज्जास्पद आहे ते मिरविण्याची ही घातक पद्धत आहे. याने समाजाचे काहीही भले होणार नाही. ठळकपणे समोर आलेले हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. समाजप्रबोधनाची बाब दूर राहिली, या विकृत 'बाळां'चा अभिमान बाळगणार्या माता या 'धाडसी आणि समजूतदार' असल्याचे प्रशस्तीपत्रक प्रस्तुत संपादकाने दिले आहे. ही अधोगती रोखलीच पाहिजे, त्यासाठी समाजातील विचारी लोक सक्रिय होतील ?
-सिद्धाराम भै. पाटील
... तर मग पती-पत्नी बनून राहू लागतील दोन महिला !