Sunday, August 22, 2010

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल


"जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2

रोगापासून मनुष्याला वाचविण्याचे उपाय शोधण्याच्या कामापेक्षा मनुष्याचे जीवन नष्ट करणारी असंख्य निमित्ते जगात असूनही "मनुष्य जगतो कसा?' याचे अध्ययन जास्त गुंतागुंतीचे आणि चित्तवेधक आहे.- स्टीफन बॉईड (शरीरविकृती शास्त्रज्ञ)

प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो। डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं...


सहा-सात वर्षांपूर्वी मी बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला शिकत होतो तेव्हाची गोष्ट आहे. घरचा दुधाचा व्यवसाय तोट्यात गेला होता. मी सोलापुरात खोली करून शिक्षण घेत होतो. वडील नेहमीप्रमाणे भेटायला आले होते. नेहमी परत जाताना वडील माझ्या हातावर दोन-चारशे रुपये टेकवायचे; आज त्यांनी खिशात हात घातला, परंतु खिसा रिकामा होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्या पोटात कालवाकालव झाली. केवळ 20-25 रुपयांसाठी वडील आता दिवसभर राबत होते. जवळच्याच लोकांनी फसवल्यामुळे दुधाचा व्यवसाय पार निकालात निघाला होता. नागपंचमीला बहिणीला घरी आणायचे तरी प्रवासासाठीचे शंभर-दोनशे रुपये उसने घ्यावे लागत होते. अशा स्थितीत घरचा भार आता आपण घ्यायचा असे मी ठरविले आणि मिळेल ती नोकरी करू लागलो होतो.
सावकाराचे कर्ज फेडून शेत आमच्या नावे करून घेतले. बहिणींच्या लग्नाचे कर्ज फेडले. चारही बाजूंनी पडलेले घर बांधून घेतले. शेतातल्या विहिरींचे पाईपलाईन्स केले. दरम्यान पत्रकारिता पदवीचे शिक्षण घेतले. भावकीच्या जीवघेण्या छळाशी दोन हात केले. सहा-सात वर्षे यातच गेली. आता कुठे मोकळा श्वास घेतोय असे वाटेपर्यंत "जीबीएस'ने घेरले होते. आता माझ्या खात्यात 761 रुपये शिल्लक होते आणि तरुण भारत-विवेकानंद केंद्रातील जीवभावाचे सहकारी साथीला होते.
चार-पाच हजार रुपये खर्च येईल असा सुरुवातीचा अंदाज होता, तो आता तीन-चार लाखांपर्यंत जाईल असे समजले होते. एकीकडे पैशांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गंभीर होत असलेली स्थिती असे हे दुहेरी आव्हान होते. मोकळेपणाने सांगायचे तर रुग्ण आता वाचणे अवघड आहे याची बहुतेकांना कल्पना आली होती. त्यामुळे निकराचे प्रयत्न सुरू होते.
"जीबीएस' हा आजार कोणालाही, कधीही, कोणत्याही वयात होऊ शकतो. या आजारात रोगप्रतिकारक शक्तीच आपल्यावर हल्ला करते. या हल्ल्याचा सर्व रोख मज्जासंस्थेवर असतो. हा आजार मज्जासंस्थेवर चढत्या क्रमाने हल्ला करतो. त्यामुळे मज्जातंतू मेंदूकडून येणाऱ्या कोणत्याही हालचालीसंबंधी आज्ञा मानण्यास असमर्थ ठरतात. स्वत:चीच रोगप्रतिकारक शक्ती बंड करीत असल्याने त्यासाठी रोगनिवारण करणारी कोणतीही प्रतिजैविकं असणारी औषधोपचार यंत्रणा नाही.
आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षक आहे. रात्री घरात दरोडेखोर शिरले आहेत म्हणून रक्षक गोळ्या झाडतोय, परंतु घरातल्याच लोकांचा बळी जातोय असाच काहीसा प्रकार इथे आहे.
आपल्या शरीरात बाहेरून एखादा विषाणू आला तर आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी सैनिक तयार करतात, म्हणजे प्रतिजैविके (ऍंटिबॉडीज्‌) तयार करतात. ही प्रतिजैविके बाहेरून आलेल्या विषाणूंवर हल्ला करून त्यांचा नाश करतात, परंतु जीबीएस या आजारात मात्र प्रतिजैविके विषाणूंवर हल्ला करण्याऐवजी आपल्या मज्जातंतूंवर हल्ला करतात. मज्जातंतूंवर मायलीन नावाचा एक थर असतो. तो या हल्ल्याने विरघळू लागतो म्हणजेच हा आजार.
सुरुवातीला इम्युनोग्लोब्युलीन थेरपी देणार असल्याची चर्चा होती. यामध्ये देण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सचीच किंमत दीड-दोन लाखांपर्यंत असते. पहिल्याच दिवशी किशोरजींनी गुजरात राज्याच्या व्हायरोलॉजी संस्थेचे प्रमुख डॉ. उपाध्याय यांच्याशी बोलणी केली होती. (किशोरजी हे जीवनव्रती कार्यकर्ते असून, ते विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय सहमहासचिव आहेत.) तिकडून इंजेक्शन्स पाठविण्याची व्यवस्था झाली होती. मज्जातंतूंवर होणारा हल्ला त्वरित रोखण्यासाठी ही थेरपी वापरली जाते, परंतु याचे "साईड इफेक्टस्‌' असतात. त्यामुळे कदाचित "प्लाजमा फेरसिस' उपचार करायचे ठरले असावे.
प्लाजमा फेरसिस या उपचार पद्धतीमध्ये रक्तातून प्लाजमा बाजूला केला जातो आणि नवीन प्लाजमा दिला जातो. दोन-तीन दिवसांच्या अंतराने तीन ते सातवेळा प्लाजमा फेरसिस केला जातो. मला एकूण सात वेळा प्लाजमा फेरसिसला सामोरं जावं लागलं. ही प्लाजमा फेरसिस म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पाहणंच असतं, असा माझा अनुभव आहे.
15 ऑगस्टची संध्याकाळ. शेवटंचं पाहून घ्यावं, म्हणून गावाकडचे परिचित, नातेवाईक आणि इतर लोक येऊन पाहून जाताहेत. अतिदक्षता विभाग असल्याने सुरक्षा रक्षक दोन मिनिटांपेक्षा अधिक वेळ कुणाला थांबू द्यायला तयार नाही. माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्‌कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने घालण्यात आली. याला डॉक्टरी भाषेत "सेंट्रल लाईन' टाकणे म्हणतात. हृदयाकडे रक्त घेऊन येणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये या नळीचे दुसरे टोक होते, हे मला नंतर एक-दोन महिन्यांनी एक्स रे पाहिल्यानंतर समजले. परंतु तेव्हा मला नळी "इन्सर्ट' करताना तेवढा त्रास झाला नाही. कदाचित तेवढ्याच भागाला भूल दिली असण्याची शक्यता आहे.
"सेंट्रल लाईन' टाकल्यानंतर माझ्या बेडजवळ एक मशिनरी आणण्यात आली. हीच ती प्लाजमा फेरसिसची मशीन. डायलेसिस करण्यासाठीही याच मशीनचा वापर करण्यात येतो, हे मला नंतर समजलं. वैद्यकीय क्षेत्राशी माझा तसा फारसा संबंध याआधी आलाच नव्हता. कुणी आजारी असेल आणि भेटायला गेलो की, पंधरा मिनिटे-अर्धा तास इतकाच तो संबंध. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची ही माझी पहिलीच वेळ. याआधी कधी सलाईन लावल्याचंही आठवत नाही. त्यामुळे आता पडल्या पडल्या वैद्यकीय परिभाषा, हॉस्पिटलमधली यंत्रणा समजावून घेण्याचा प्रयत्न करीत होतो.
गळ्यातून जी नलिका खुपसण्यात आली होती, तिला दोन नलिका जोडण्यात आल्या. एक त्या मशिनरीकडे जाणारी आणि दुसरी परतणारी. मशिनरी सुरू झाली. एका नळीतून वेगाने रक्त मशिनरीत जात आहे आणि दुसरीतून पुन्हा शरीरात. याचवेळी सलाईनही सुरू आहे. साधारण अर्ध्या तासाने काही क्षण ही प्रक्रिया थांबली आणि प्लाजमाच्या तपकिरी रंगाच्या पिशव्या एकामागोमाग एक अशा जोडण्यात येऊ लागल्या. त्रास होऊ लागला की सांगा, असं सांगण्यात आलं. प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो. डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होतं. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, शरीराचे सारे अवयव तुटून हृदयात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. शरीर कागदाप्रमाणे "टू डायमेन्शनल' बनत आहे, असं प्रकर्षाने वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत आहे, हे ध्यानात आलं, परंतु संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं. ही स्थिती मी सहनच करू शकत नव्हतो. परंतु यातून सुटण्याचाही काही मार्ग नव्हता. तेव्हा ते सहन करण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. ही स्थिती आता संपेल मग संपेल म्हणून वाट पाहू लागलो. शेवटचे ब्रह्मास्त्र काढले- शरीराकडे त्रयस्थपणे पाहायचे. श्वास घेताना आणि सोडताना मनातल्या मनात ओम्‌ म्हणायचे. साधारण पाऊण तासापर्यंत ही स्थिती होती. देव करो अशी स्थिती अनुभवण्याची वेळ कुणावर येऊ नये, परंतु ही स्थिती किती वेदनादायी आणि मृत्यूची तोंडओळख करून देणारी आहे हे त्या स्थितीत गेल्याशिवाय इतरांना कळणे शक्य नाही.
यात नेमकं काय होतं की, शरीरातून रक्त जेव्हा त्या मशिनरीत जाते तेव्हा तिथे रक्तातून केवळ प्लाजमा की ज्यात अँटीबॉडीज आहेत ते रक्तापासून वेगळं केलं जातं आणि उर्वरित द्रव शरीरात पाठविला जातो. मग नवीन प्लाजमा शरीरात सोडला जातो. नवीन प्लाजमा कमी तापमानात साठविलेलं असतं. ते शरीरात पाठवताना रुग्णाला खूप थंडी वाजू लागते. प्रचंड त्रास होतो. हे खरं असलं तरी तिथल्या टेक्निशियनसाठीही हा युद्धाचाच प्रसंग असतो. मिनिटामिनिटाला रुग्णाचा रक्तदाब तपासावा लागतो. कारण या स्थितीत रक्तदाब स्थिर ठेवणंही एक आव्हान असतं. रक्तदाब कमी होऊ लागला की सलाईनचं प्रमाण अधिक केलं जातं. याचवेळी 25 हजार युनिट्‌स हिपॅरिन नावाचं अँटीकोऍग्युलंट शरीरात सोडलं जातं. रक्ताच्या गाठी होऊ नयेत यासाठी याचा उपयोग होतो.
अशा रीतीने प्लाजमा फेरसिसचे पहिले दिव्य यथासांग पार पडले. प्लाजमाचे पाच पॅक पहिल्या दिवशी कामी आले. पूर्ण सात वेळा फेरसिस करेपर्यंत 34 पॅक लागले. प्लाजमा वेळेत उपलब्ध होणं सर्वात महत्त्वाची निकड होती. डॉ. हेडगेवार रक्तपेढी यावेळी धावून आली. आमचे मित्र राजेश तोळबंदे, डॉ. संजय देशपांडे आणि रक्तपेढी व्यवस्थापन यांची मोलाची मदत यावेळी झाली.
आता प्लाजमा फेरसिसचा पहिला राऊंड पार पडला होता. "जीबीएस' हल्ला रोखून धरण्यात आता यश येत होतं, परंतु अजून खूप मोठा पल्ला पार करायचा होता. डॉ. बसवराज कोलूर दररोज येऊन भेटून विचारपूस करायचे. डॉ. शिवपुजे दिवसातून दोनदा भेटायचे. त्यांच्या भेटण्याने थोडा आधार वाटायचा. धीर यायचा. ज्यांचे जीवन पाहून आम्हाला योग्य मार्गावर चालायची प्रेरणा मिळत आलीय ते आदरणीय किशोरजी आणि भानुदासजी (विवेकानंद केंद्राचे महासचिव) यांची भेट या काळात मानसिक आधार देणारी ठरली.
धावून आले मदतीचे हात
उपचार खर्चाचा फुगणारा आकडा सर्वसामान्य कुटुंबाला न पेलणाराच होता. यावेळी मदतीचे अनेक हात धावून आले. आजाराच्या विळख्यातून बाहेर आल्यानंतर थोडा मागोवा घेतला तेव्हा ध्यानात आले की, मदतीला धावून आलेल्यांमध्ये परिचित आहेत तसे अपरिचितही आहेत. ज्या व्यक्तीचा मासिक पगार 3 हजार रुपयेही नाही तिने तीन हजारांची मदत आपले नाव कुठेही येणार नाही या रीतीने केली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेकांनी यथाशक्ती मदत पाठविली होती. राष्ट्रीय विचारासाठी काम करणाऱ्या एका तरुणाला मदत करावी हीच त्यामागची त्यांची भावना होती. मुंबईच्या एका सद्‌गृहस्थाने पदरचे 30 हजार रुपये देऊन नंतर आपल्या परिचितांकडून मदत एकत्र केल्याचेही कळले. मदतीला धावून आलेल्या या संघ परिवारातील व विवेकानंद केंद्र परिवारातील कार्यकर्त्यांची नावे येथे देऊन त्यांना मी अपमानीत करू इच्छित नाही, परंतु ते ऋण कसे विसरू?
राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास-नवी दिल्ली, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, प्रिसिजन उद्योग आदी संस्थाही मदतीला धावून आल्या. विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आणि तरुण भारतच्या संपादक-संचालकांसह सहकारी पत्रकार बंधू सतत 12 महिने साथीला होते म्हणूनच माझा हा पुनर्जन्म सुखकर झाला.
या 12 महिन्यांतल्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. त्या साऱ्याच कागदावर उतविणे योग्यही होणार नाही, म्हणून काही निवडक आठवणी सांगून पुढील आसमंतमध्ये या लेखमालेला पूर्णविराम देणार आहे.
(क्रमश:)

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने   (जीबीएस'च्या विळख्यात भाग -1)

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल  (जीबीएस'च्या विळख्यात भाग - 2)

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो  (जीबीएस'च्या विळख्यात भाग -3 )

1 comment:

  1. madhav deshpande23.8.10

    anubhav kathan khupach chhan hote. etaranahi tyatun prerana milele ... apaplya sankatanvar mat karnyachi.
    shubhechha!!
    tabyetichi kalaj ghya!

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी