Sunday, October 25, 2020

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द

Veershaiv Lingayat Hindu

वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.


वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन 

सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावे‌ळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी 

 आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत. लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ 

 काय आहे पुस्तकात ? 

 महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.
पृष्ठे ३६, मूल्य ३०/ 
पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल

  

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी