Monday, March 18, 2013

आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी


Published: Sunday, March 10, 2013
आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे..

भारतीय राजकारणात उतरायचे असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर त्या राजकीय पक्षाजवळ मनुष्यबळ आणि द्रव्यबळ असणे आवश्यक आहे. त्याशिवाय पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची एक फळीही असावी लागते. १९७० ते ८०च्या दशकात हाच विचार करून कांशिराम यांनी 'बॅकवर्ड क्लास अ‍ॅण्ड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन' अर्थात 'बामसेफ' या संघटनेची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठय़ा संघर्षांने मिळवून दिलेल्या घटनात्मक आरक्षणामुळे केंद्र व राज्य सरकारमध्ये नोकऱ्या मिळालेल्या आणि थोडय़ा प्रमाणात मध्यमवर्गीय जीवनाकडे वाटचाल करू लागलेल्या संघटित अशा नोकरदार वर्गाभोवती बामसेफने जाळे टाकले.
रिपब्लिकन पक्षातील गटबाजीला कंटाळलेल्या दलित, मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय सत्तेची स्वप्ने दाखविणाऱ्या कांशिराम यांच्या बामसेफला तन-मन-धनाने स्वीकारले. दुसरी गोष्ट अशी की, या नोकरदार वर्गाला सुरक्षितता हवी होती. तुम्ही फक्त वर्गणी द्यायची, बंद खोलीतील शिबिरात सहभागी व्हायचे, वर्षांतून एखाद दुसरे अधिवेशन घ्यायचे, बस्स. दुसरे म्हणजे रस्त्यावर उतरून संघर्ष वगैरे काही करायचा नाही, एवढेच करायचे म्हटल्यावर सामाजिक ऋण फेडल्यासारखे दाखविण्यासाठी कातडीबचाऊ नोकरदार वर्गाला बामसेफ हा उत्तम पर्याय वाटला. दलित-मागासवर्गीयांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडे हा 'बामसेफ फेम' बूझ्र्वा नोकरदार वर्ग कुचेष्टेने बघू लागला. रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता नसता तर, सरकारी सेवेतील मागासवर्गीय अधिकारी वा कर्मचारी यांच्या नोकऱ्या  सुरक्षित राहिल्या असत्या का? अनेक कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, परंतु आज हा नोकरदार वर्ग आपल्या नोकऱ्या कशा शाबूत राहतील, झटपट बढत्या कशा मिळतील याचाच फक्त विचार करत आहे. अशा  अप्पलपोटी नोकरदारांना आंबेडकरवादी म्हणता येईल का? असो. पण तरीही बघता-बघता देशभर बामसेफ फोफावली. त्याच भक्कम पायावर कांशिराम यांनी नंतर बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यानंतरची बसपची उत्तर प्रदेशातील सत्तेची वाटचाल सर्वश्रुतच आहे. अर्थात बामसेफचा व बसपचा काही संबंध नाही, असा अलीकडे दावा केला जातो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. कारण बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना आता तशी बामसेफच्या मनुष्यबळाची व द्रव्यबळाची गरज उरलेली नाही. परंतु बसपचा सदस्य कोणत्या राजकीय पक्षाचा समर्थक वा सहानुभूतीधारक आहे, तर तो फक्त बसपचाच. बसपलाही आता 'भारत मुक्ती मोर्चा' नावाने नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने मूळ बामसेफमध्ये फाटाफुटीला सुरुवात झाली. आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत २ व ३ मार्चला विविध गटांतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सध्या प्रभावी असलेल्या बामसेफच्या एका गटाच्या नेत्यावर संघटनेत हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याबद्दल टीका करण्यात आली. लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे. बामसेफचे सदस्य एकमेकांना भेटल्यानंतर किंवा सभा-बैठकांमध्ये 'जय मूलनिवासी' म्हणून एकमेकांचे स्वागत करतात. 'जयभीम'च्या जागी 'जय मूलनिवासी' हा शब्द आला. आता ही मूलनिवासी काय भानगड आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मूलनिवासी या विचाराचा सध्या जोरात प्रचार सुरू आहे. त्यावर खास पुस्तिका लिहिल्या आहेत, 'मूलनिवासी नायक' नावाचे एकपानी वृत्तपत्रही चालविले जाते. मूलनिवासी ही मांडणीच मूळात द्वेषावर आधारित आहे, म्हणून ती महाभयंकर आहे. उदाहरणार्थ, बामसेफचे उद्दिष्ट काय तर, मूलनिवासी या तथाकथित सिद्धांताच्या आधारावर या देशातील ब्राह्मण वर्ग सोडून साडेसहा हजार जातींना जोडणे. या साडेसहा हजार जातींचे कडबोळे बांधून काय करायचे तर, म्हणे राष्ट्रीय आंदोलन! म्हणजे काय, तर काहीच नाही. तर मग या मूलनिवासीचे इतके स्तोम का माजविण्यात आले आहे? फुले-आंबेडकरी विचारांना बगल देऊन राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हा सारा खटाटोप चालला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ, मूलनिवासी नायक वृत्तपत्राच्या ५ सप्टेंबर १२च्या अंकात बामसेफच्या एका प्रचारकाचे भाषण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात ते म्हणतात, परदेशी युरेशियन ब्राह्मणांची व्यवस्था उद्ध्वस्त करून मूलनिवासी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी बामसेफची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजे या देशातील ब्राह्मण हे परके आहेत व सारे अब्राह्मणी मूळ भारतीय आहेत, अशी त्यांची मांडणी आहे. त्यासाठी तथाकथिक कुणा तरी एका काल्पनिक मानववंशशास्त्रज्ञाचा आधार घेतात. त्याने म्हणे केलेल्या काही डीएनए चाचणीत ब्राह्मण परकीय असल्याचे आणि इतर साडेसहा हजार जातीच फक्त मूळ भारतीय असल्याचा शोध लावला आहे. म्हणजे ब्राह्मण सोडून सारे मूलनिवासी. जोतिबा फुले यांची या ठिकाणी आठवण होते. आपण चिरंजीव असल्याचा व आदिनारायणाचा अवतार असल्याचा दावा करणाऱ्या काल्पनिक परशुरामाला जोतिबांनी जशी त्याला सहा महिन्यांच्या आत हजर राहण्याची नोटीस बजावली होती, तशीच नोटीस या तथाकथित मानववंशशास्त्रज्ञाला बजावावी लागणार आहे.
वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजव्यवस्थेची, संस्कृतीची, धर्मग्रंथांची कठोर चिकित्सा केली आहे. मानववंशशास्त्राच्या आधाराने त्यांनी जातीय व्यवस्थेचे सैद्धांतिक विश्लेषण केले आहे. आर्य बाहेरून आले व त्यांनी मूळच्या अनार्याना जिंकून दास्य किंवा गुलाम बनविले. आर्य म्हणजे ब्राह्मण आणि बाकीचे अनार्य म्हणे शूद्र वा बहुजन अशा आजवरच्या तकलादू इतिहासाला आंबेडकरांनी शूद्र पूर्वी कोण होते आणि अस्पृश्य मूळचे कोण होते, या दोन शोधप्रबंधांत छेद देणारे नवे निष्कर्ष काढले आहेत. शूद्र हे पूर्वी आर्यच होते, शूद्रांचे हिंदू-आर्य समाजात मूळचे स्थान दुसऱ्या म्हणजे क्षत्रिय वर्णात होते. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यातील वर्चस्ववादातून शूद्रांना चौथ्या वर्णात टाकून त्यांना खालचा दर्जा देण्यात आला, असे बाबासाहेब सांगतात. आता आर्याना परकीय समजायचे तर मग पूर्वाश्रमीच्या शूद्रांना आणि आताच्या बहुजनांनाच उपरे ठरविण्यासारखे आहे. त्यानंतर अस्पृश्य मूळचे कोण, याचाही बाबासाहेबांनी शोध घेतला आहे. मूळचे आणि परके असले भेदाचे राजकारण करणाऱ्यांनी बाबासाहेब काय म्हणतात ते नीट एकदा समजून घ्यावे. ते म्हणतात, विभिन्न वंशांचा निर्णय करण्याचे वांशिक शरीररचनाशास्त्र हेच खरे शास्त्र असेल, तर हिंदू समाजातील विभिन्न जातींना या शास्त्राची कसोटी लावून पाहिल्यास अस्पृश्य हे आर्य आणि द्रविड वंशापेक्षा भिन्न वंशाचे लोक आहेत, हा सिद्धांत कोलमडून पडतो. या मोजमापावरून हे सिद्ध होत आहे की, ब्राह्मण व अस्पृश्य हे एकाच वंशाचे लोक आहेत. जर ब्राह्मण आर्य असतील तर अस्पृश्यही आर्यच आहेत. ब्राह्मण जर द्रविड असतील तर अस्पृश्यही द्रविडच आहेत. ब्राह्मण नाग वंशाचे असतील तर अस्पृश्यही नाग वंशाचे आहेत. त्या आधारावर अस्पृश्यतेला वंशभेदाचा आधार नाही, असा निष्कर्ष बाबासाहेबांनी काढला आहे. चातुर्वण्र्य व्यवस्थेत अस्पृश्य या अवर्णाची उपपत्ती कशी झाली, त्यालाही कोणता संघर्ष कारणीभूत आहे, हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. परंतु बाबासाहेबांनी येथील सर्व समाजव्यवस्थेचे मूळ शोधून काढले आहे, शूद्र पूर्वी कोण होते हे सांगितले, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचीही सैद्धांतिक उकल करून दाखविली. मग बामसेफ आता कोणत्या मूलनिवासींचा शोध घेत आहेत? बाबासाहेबांच्या संशोधनावर-सिद्धांतावर त्यांचा विश्वास आहे की नाही? दुसरे असे की, बाबासाहेबांनी आम्ही कोण याचे मूळ शोधून या समाजाच्या हातात जगाने स्वीकारलेला बुद्ध दिला. बुद्ध द्वेषाला मूठमाती द्यायला सांगतो. बुद्ध समता, न्याय, बंधुभाव, मैत्री, करुणेचा आग्रह धरतो. बुद्ध जगाच्या - मानवाच्या कल्याणाची भाषा करतो. मग एखाद्या देशात वंशभेदाच्या आधारावर मूळचे कोण व उपरे कोण अशी विभागणी करणे कितपत योग्य आहे? बाबासाहेबांना जातिव्यवस्था मोडायची होती. बामसेफला जाती मोडायच्या आहेत की जोडायच्या आहेत? फक्त जाती जोडायच्याच असतील तर ते आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहेत, असे म्हणावे लागेल.

आंबेडकरवाद विरुद्ध स्युडो आंबेडकरवाद!


Published: Sunday, March 17, 2013
१० मार्चच्या 'लोकसत्ता'मध्ये  मधु कांबळे यांनी लिहिलेला 'आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी' या लेखातील मुद्दे मूलगामी व स्युडो आंबेडकरवाद्यांचे पितळ उघडे पाडणारे आहेत. बाबासाहेबांचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांना फाटा देणारे बुद्धिजीवी, आंबेडकरवादाला कोणत्या दिशेने नेत आहेत, हे अचूकपणे दाखवण्याचे कार्य श्री. मधू कांबळे यांनी या लेखातून केलेले आहेत. हे करत असताना या स्युडो आंबेडकरवाद्यांच्या वर्गीय चरित्राचेही सटीक विश्लेषण कांबळेंनी केलेले आहे.
जातिव्यवस्थेविषयी बाबासाहेबांनी केलेल्या विश्लेषणासंदर्भात कांबळे यांनी 'शूद्र पूर्वी कोण होते?' आणि 'अस्पृश्य मूळचे कोण होते?' या दोन शोधप्रबंधांचे दाखले दिले आहेत. त्याव्यतिरिक्त बाबासाहेबांच्या ज्या दोन शोधप्रबंधांना आंबेडकरवादाचे मूलस्रोत म्हटले जाते, त्या 'भारतातील जाती' आणि 'जाती निर्मूलन' या शोधप्रबंधांमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत सखोल, वैज्ञानिक तरीही सर्वसामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीने जातींची निर्मिती कशी झाली? त्यांचे निर्मूलन करण्याचा मार्ग कोणता? या विषयी मांडणी केलेली आहे. आणि जातींच्या निर्मितीची प्रक्रिया बाबासाहेबांच्या हजारो वर्षे आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, काळानुरूप त्यात काही बदल झाला असेही म्हणता येणार नाही. याचाच अर्थ ती मांडणी नाकारून भलतेच काहीतरी मांडणाऱ्यांना एकतर बाबासाहेबांची मांडणी मान्य नाही किंवा ती त्यांना समजली नाही. म्हणूनच त्या मांडणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून 'मूलनिवासी' ही संकल्पना निर्माण करणाऱ्या विचारवंतांना स्युडो आंबेडकरवादी म्हणावे लागते.
जातींच्या उत्पत्ती संदर्भात बाबासाहेब लिहितात, ''भारतातील लोकसंख्या आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शिथिअन या वंशाच्या मिश्रणाने बनलेली आहे. हे लोकसमूह वेगवेगळ्या दिशांनी भिन्न भिन्न संस्कृतींसह शेकडो वर्षांपूर्वी भारतात आले, त्या वेळी त्यांची राहणी भटकी होती. यापकी प्रत्येक टोळी भारतात क्रमश: घुसली आणि तेथील लोकांशी लढाई करून तेथे तिने आपला जम बसविला. त्यानंतर मात्र ते शेजाऱ्याप्रमाणे शांततेने राहू लागले. नित्य संबंध आणि पारस्पारिक व्यवहारामुळे त्यांच्यात एका संस्कृतीचा उदय झाला, आणि तीत त्यांच्या भिन्न संस्कृतीचा लोप झाला. भारतात आलेल्या या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण झालेले नाही, ही गोष्ट मान्य करावीच लागते. कारण,
भारताच्या सीमांमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शरीररचनाच नव्हे, तर लोकांच्या वर्णामध्येसुद्धा लक्षात येण्याजोगा फरक आढळतो. तथापि एखाद्या लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण होणे, हा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही. वंशशास्त्रदृष्टय़ा या सर्व लोकसमूहांच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्यांच्या एकत्वाचे गमक असते. हे विधान मान्य झाल्यास मी असे धाडसी विधान करू इच्छितो, की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही. भारत केवळ भौगोलिकदृष्टय़ाच एक आहे, असे नव्हे, तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असलेली सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते. परंतु या एकतेमुळेच जातिसमस्येचे स्पष्टीकरण करणे अधिकच बिकट होते. भारतीय समाज हा जर केवळ परस्परापासून भिन्न अशा जातींचा समूह असता, तर हा विषय अतिशय सोपा झाला असता. परंतु आधीच एकसंध असलेल्या समाजाचा जात हा एक तुकडा आहे, म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते. पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, 'वस्तुत: भारतातील जातिव्यवस्था वेगवेगळ्या वंशातील रक्त आणि संस्कृती यांचे मिश्रण झाल्यानंतर अस्तित्वात आली. जातिभेद म्हणजे वंशभेद होय असे समजणे, आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे वेगवेगळे वंश होय, असे मानणे वस्तुस्थितीचा आडमुठा विपर्यास करणे होय. मद्रासच्या आणि पंजाबच्या ब्राह्मणांमध्ये असे कोणते वांशीय सादृश्य आहे? मद्रासच्या आणि बंगालच्या अस्पृश्यांमध्ये असे कोणते वंशीय सादृश्य आहे? पंजाबचा ब्राह्मण आणि पंजाबच्या चांभारामध्ये असा कोणता वंशीय भेद आहे? मद्रासचा ब्राह्मण आणि मद्रासचा परिया यामध्ये अशी कोणती वंशीय भिन्नता आहे? पंजाबचा ब्राह्मण पंजाबचा चांभार ज्या घराण्यातला आहे, त्याचाच एक वंशज आहे. आणि ज्या घराण्यातील मद्रासचा परिया आहे, त्याच घराण्याचा वंशज मद्रासचा ब्राह्मण आहे. जातिव्यवस्था वंशभेदाची परिसीमा दर्शवीत नाही. जातिभेद हे एकाच वंशाच्या लोकांचे पाडलेले सामाजिक विभाग होत.'
जाती निर्मूलनाच्या मार्गाविषयीही या लोकांच्या मांडणीचा बाबासाहेबांनी अखंड परिश्रमातून शोधून काढलेल्या मार्गाशी सुतराम संबंध नाही. बाबासाहेब आपल्या 'जाती निर्मूलन' या ग्रंथात म्हणतात, 'मला तुमच्या मनावर एक गोष्ट िबबवायची आहे, ती म्हणजे मनूने हा जातीचा कायदा तयार केला नसून, तो तसे करूही शकला नसता. अस्तित्वात असलेले जातीचे नियम संकलित करण्यात व जातिधर्माचा उपदेश करण्यातच त्याचे कार्य संपुष्टात आले. जातीचा प्रसार व वाढ करण्याचे काम इतके अवाढव्य आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या किंवा वर्गाच्या सामथ्र्य व धूर्तपणापलीकडचे आहे. ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या, या विचारसरणीतही असाच युक्तिवाद करण्यात येतो. मनूच्या बाबतीत मी जे सांगितले आहे, त्यानंतर वैचारिकदृष्टय़ा ही विचारसरणी चुकीची असून उद्देश्यत: द्वेषमूलक आहे; एवढे सांगितले म्हणजे आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही.'' व्यक्तींचा किंवा समूहाचा द्वेष करून जाती संपणार नाहीत, तर त्यांचा आधार असलेल्या धर्मशास्त्रांचे फोलपण लोकांसमोर उघडे करून ते शक्य होईल. पण आज बहुजन समाज हा ब्राह्मणांच्या विरोधात जरी एकत्र येतो आहे असे भासत असले. तरी तो हिंदू धर्मशास्त्रांकडे अधिकाधिक आकृष्ट होताना दिसतो आहे. नित्यनवीन बाबांच्या मागे तो लागताना दिसतो आहे. म्हणजे ब्राह्मणांना सत्तेपासून दूर करून त्यांच्या जागी कोणताही समूह आला आणि समाजाचा आधार मात्र त्याच धर्मशास्त्रांचा राहिला तर काय फरक पडणार. आणि मधू कांबळे म्हणतात त्याप्रमाणे या स्युडो आंबेडकरवाद्यांना जाती मोडायच्या आहेत? की केवळ जोडायच्या आहेत? यातील फरकाने काय फरक पडू शकतो हे आपण धर्माच्या संदर्भात अनुभवतच आहोत. आमचे संविधान धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मांडते. पण आम्ही 'धर्मनिरपेक्षते'ऐवजी 'सर्वधर्मसमभाव' अंगीकारला, आणि त्याची फळे गेली साठ वर्षे भोगत आहोत. धर्मनिरपेक्षतेप्रमाणे राज्यव्यवस्था, शिक्षण आणि नीतिमूल्ये या बाबतीत कुठल्याही धर्माची ढवळाढवळ नसावी. पण सर्वधर्मसमभावामुळे या तीनही बाबतींत सर्व धर्माना समान ढवळाढवळ करण्याचा अधिकार मिळतो. पण बहुसंख्येच्या बळावर कुठलाही धर्म आपले वर्चस्व गाजवू शकतो हा जगाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे जाती केवळ जोडण्याचा प्रयत्न झाला, तर त्याच जन्माधारित अधिकारांच्या शास्त्रांप्रमाणे त्यांच्यात ऐक्य कधीच होऊ शकणार नाही. आणि हेच नेमके आजच्या सत्ताधारी वर्गाना हवे आहे.

रविवार ,१० मार्च रोजीच्या 'लोकसत्ता' मध्ये मधु कांबळे यांचा 'आंबेडकर  विरुद्ध  मूलनिवासी' हा लेख प्रसिद्ध झाला होता. अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, त्या अनुषंगाने लिहिलेल्या लेखावरील या वाचकांच्या काही प्रतिक्रिया..
बामसेफ हे जातींचे कडबोळे नाही
कांबळे यांचा लेख वाचून खूप वाईट वाटले. आपण जे लिहिले, त्यामध्ये माहितीचा आपल्याजवळ अभाव आहे असा आमचा समज झाला आहे.
१. ज्या बामसेफच्या एकत्रीकरणाबद्दल आपण लिहिले आहे, ती मूळ बामसेफमधून बाजूला झालेल्या लोकांची कृती आहे. त्याची प्रचीती पुढील वेबसाइटवरून आपणास समजून येईल.
http://unitedblackuntouchablesworldwide.blogspot.in/2013/03/bamcef-unification-conference.html
दुसरी, ज्यांच्या संघटनेला तुम्ही गट म्हणालात, त्यांच्या अधिवेशनाची छायाचित्रे मूलनिवासी नायक दैनिकातून आपणास मिळतील.
२. भारत मुक्ती मोर्चा हे राजकीय संघटन नसून सामाजिक आंदोलनासाठी- राष्ट्रव्यापी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांचे संघटन आहे. ज्यांना तुम्ही कातडीबचाऊ म्हणता तेच लोक तुम्हाला रस्त्यावर दिसतील. दिल्लीला झालेल्या ३ मार्चच्या रॅलीची छायाचित्रे मूलनिवासी नायकमध्ये बघा.
३. बामसेफमधून ज्या लोकांनी पक्ष काढला, त्याचे नाव 'बहुजन मुक्ती पार्टी'असे असून त्याचे अध्यक्ष न्या. ए. के. अकोदिया हे आहेत.
४. बाबासाहेबांनी जी पुस्तके लिहिली ती उत्कृष्टच आहेत, पण तुम्ही तुमच्या सोयीची मोजकीच वाचलीत की सर्व वाचून बामनांच्या सोयीची आहेत ती मांडत आहात, याबद्दल मनात शंका होत आहे.
५. बामसेफ हे जातींचे कडबोळे नसून मूलनिवासी लोकांचा एक समूह होईल. एकदा वामन मेश्राम अध्यक्ष असलेल्या बामसेफ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या किमान एका कार्यकर्त्यांशी तरी चर्चा करा.
६. मूलनिवासीसंदर्भात तुम्ही जे लिहिलेत, ते बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या अगदी उलट दिशेने म्हणजे नाव, चेहरा मूलनिवासींचा, पण मेंदू विचार करण्यासाठी बामनाच्या ताब्यात दिल्यासारखी तुमची अवस्था आहे. ज्या वंशशास्त्रज्ञाबद्दल  त्यातील काही नावे अशी- प्रा. मायकेल बामशाद तसेच कोलकात्याचे पार्थ पी. मुजुमदार, संघमित्रा साहू, अनामिका सिंह, जी. हिमाबिंदू, झेलम बॅनर्जी, टी. सीतालक्ष्मी, सोनाली गायकवाड, आर. त्रिवेदी, फिलिप एण्डिकॉट वरील सवार्ंना बोलावण्यासाठी फक्त भारताच्या कोर्टात एक केस दाखल करा. उगाच महात्मा फुलेंचे नाव चुकीच्या संदर्भाने घेऊन बदनाम करू नका. आपण एकदा सविस्तर बामसेफच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा.  बामनांशीही  चर्चा करा आणि  DNA म्हणजे नेमके काय हे समजून घ्या, विचार करा आणि मग लिहा. असे फक्त मूलनिवासीच  तुम्हाला सांगू शकतो. तरी बामनाच्या मेंदूने विचार न करता स्वत:च्या डोक्यात मेंदू असेल तर त्याचा वापर करावा.      
- प्रवीण राजीगरे
प्रश्नच निर्थक
इतिहास असं सांगतो की मानवाची उत्पत्ती आधी आफ्रिका खंडात झाली आणि नंतर मानवाचे इतर ठिकाणी स्थलांतर झाले. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर आपण सर्वच उपरे आहोत. त्यामुळं मूलनिवासी कोण हा प्रश्नच निर्थक आहे असं मला वाटतं. ब्राह्मणांचाच काय, कुणाचाही द्वेष निव्वळ स्वार्थासाठी करू नये अशी बुद्धांची शिकवण आहे. पण हे सांगायला गेलं तर आपणच पांढरपेशे ठरतो, हीच खरी शोकांतिका आहे..
-आशित कांबळे
अयोग्य विचार फेटाळा
कांबळे यांचा लेख वाचला.  हजारो ब्राह्मणांच्या मनातील विचार तुम्ही मांडले आहेत. जातीयवादाच्या (चातुर्वण्र्य) ब्राह्मणी विचारांना आंबेडकर आणि फुले यांनी विरोध केला, सरसकट सर्व ब्राह्मणांना नव्हे. परंतु आता सर्व अयोग्य बाबींचे खापर ब्राह्मणांवरच फोडण्याची फॅशन आली आहे. मानवाच्या उत्क्रांतीत, विशेषत: सामाजिक उत्क्रांतीत हे महत्त्वाचे पाऊल असल्याने जातीयवाद आणि जुन्या धर्मग्रंथांमधील सर्व प्रकारचे अयोग्य विचार 'वसुधैवकुटुम्बकम' साध्य करण्यासाठी फेटाळले गेले पाहिजेत. आपला लेख शौर्य दर्शवितो आणि आपणच बाबासाहेब आणि फुले यांचे खरे अनुयायी असल्याचे सिद्ध करतो. आपण भारतीय म्हणून पुढील पिढीसमोर जातीचा नि:पक्षपाती इतिहास आपल्या पूर्वजांच्या चुकांसह आणि आपल्या समाज सुधारकांसह सकारात्मक पद्धतीने मांडला पाहिजे.
डॉ. मंगेश पी. मोहरील, अकोला
आंबेडकरी पद्धतीने छाननी
'मूळनिवासी विरुद्ध आंबेडकर' हा लेख वाचला. तथाकथित मूळनिवासींच्या व्याख्यानाची  कांबळे यांनी आंबेडकरी पद्धतीने छाननी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. अलीकडेच मी 'मूलनिवासीवाद का झूठ' हे समता सैनिक दलाचे पुस्तक वाचले आणि आपल्याप्रमाणेच माझे मत झाले. त्याचबरोबर आपण शूद्र आणि अस्पृश्यता या संदर्भातही ठोस आणि ऐतिहासिक दस्तऐवज वाचला. मी आंबेडकरवादी असून मीडिया आणि इतिहासाचा विद्यार्थी याची स्तुती करील, कारण माझ्या पिढीतील बहुसंख्य लोक संशोधन करीत नाहीत, केवळ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीवर प्रतिवाद करतात.
विनय सोनुले.
पटणारे विचार
आंबेडकर विरुद्ध मूळनिवासी हा आपला लेख वाचला. अत्यंत माहितीपूर्ण लेख आहे. जेव्हा २००७ मध्ये मी 'बामसेफ'च्या बैठकीला हजर होतो तेव्हा माझ्या मनात विचार होता की, 'बामसेफ'चा सदस्य 'जय भीम' म्हणण्याऐवजी 'जय मूळनिवासी' असे म्हणतो. हे आंबेडकर यांच्या विरोधातील विचार आहेत. मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे.  डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीबद्दल आपल्याकडून अधिक माहितीची अपेक्षा करतो.
नवनाथ सरवदे, अमरावती.
लेख अपुऱ्या माहितीवर
मधु कांबळे यांना अपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी माणसे आम्हाला हवी आहेत. गेल्या ३ मार्च रोजी ज्या 'बामसेफ'वाल्यांनी अखेरीला सभेचे आयोजन केले होते आणि त्याबाबत आपण ज्यांचा उल्लेख हुकूमशहा असा केला ते दिल्लीत अतिविशाल सभेला संबोधित करीत होते. आपल्या गैरसमजाला आता मूळनिवासी कधीही फसणार नाहीत.  टिळकांनी आपल्या पुस्तकांत आम्ही युरेशियातील ब्राह्मण आहोत, असे लिहिले आहे का, डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये नेहरू लिहितात की, आम्ही विदेशी ब्राह्मण आहोत, सर विल्यम जोन्स यांच्या मते ब्राह्मण हंगेरीतून आले आहेत. ऋग्वेद आणि इराणच्या ग्रंथात, ब्राह्मण अंटाक्र्टिकातून आल्याचे म्हटले आहे. जरा हे लिहा, तरच आम्ही तुम्हाला सच्चे मानू. आपण ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद या दोघांच्या विरोधात आहोत, असे १९३५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. आपण हे लिहिलेत तर मी तुम्हाला आंबेडकरवादी म्हणेन.
- मनोज साळवे.
चळवळीला प्रोत्साहन मिळेल
कांबळे यांचा लेख वाचला. आज भारतात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्याचे मूळ कारण ब्राह्मणवाद आहे. ब्राह्मणवादामुळे असमानता, जातीयवाद, गुलामगिरी, बेरोजगारी, बॉम्बस्फोट, नक्षलवाद जन्मले आहेत. 'बामसेफ' आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटनेने आम्हाला महापुरुषांनी दाखविलेल्या वाटेवरून जावयास शिकविले आहे. या महापुरुषांनी वरील समस्या सोडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले म्हणजेच ते ब्राह्मणवादाविरुद्ध लढले. आपल्या लेखात आपण 'बामसेफ'वर टीका केली आहे. त्यामुळे देशव्यापी चळवळीला प्रोत्साहन मिळेल.
- अजय कांबळे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी