Sunday, June 21, 2015

इतिहास योगशास्त्राचा

योगशास्त्राची मुळं
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित झाल्यापासून संपूर्ण जगभरात योगाविषयीची जिज्ञासा वाढली आहे. योग आहे तरी काय, हे मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. योगामुळे आपल्या धर्माला धक्का पोहोचेल या भीतीपोटी काही प्रमाणात विरोधाचा सूरही उमटत आहे. पण योग हा कट्टरतावादी किंवा सांप्रदायिक नाही. तो ईश्वराचे एक विशिष्ट नाव किंवा रूपाबद्दल सांगत नाही. तो आदेश किंवा फतवे काढत नाही. योगसाधनेने जीवन ईश्वराशी लीन होते, पावित्र्याने भरून जाते. योग तत्त्वज्ञान विकसित झाले तेव्हा जगात आजच्याप्रमाणे एकांतिक पंथांचा उदय झालेला नव्हता. त्यामुळे योग हा विशिष्ट पंथाच्या (रिलिजन) लोकांना समोर ठेवून विकसित झालेला नाही. योग हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे.


योगशास्त्र हे या सहा दर्शनातील एक
भारतात उगम पावलेल्या सर्व पंथ आणि संप्रदायांमध्ये योगसाधनेला महत्त्वाचेस्थान मिळाल्याचे दिसते. योगशास्त्र हे या सहा दर्शनातील एक. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत हे सहा दर्शने. जैन, बौद्ध आणि चार्वाक दर्शनांमध्येही योगशास्त्राला तेवढेच महत्त्व आहे. अर्थात वेद मानणारे आणि न मानणारे दोघेही योगशास्त्र मानतात. योगशास्त्र हे मानवसृष्टीइतकेच प्राचीन मानले गेले आहे. योगसिद्ध ऋषींना ध्यानावस्थेत सृष्टीची अनेक रहस्ये उलगडली. वेद आणि वेदांगामध्ये योगाचे अनेक संदर्भ मिळतात. वेदांच्या अंतिम भागात अर्थात वेदांतामध्ये - कठोपनिषद, श्वेताश्वर आणि मैत्रायणी उपनिषदांमध्ये योग आणि साधनेसंबंधी मोठ्या प्रमाणात संदर्भ मिळतात.

योग शास्त्राचा उद््गाता
भगवान शिव यांना योग शास्त्राचा उद््गाता आणि प्रवर्तक मानण्यात येेते. आपली अर्धांगिनी देवी पार्वतीला त्यांनी परमतत्त्व, सत्य जाणून घेण्याचा मार्ग सांगितला. हे गूढ ज्ञान म्हणजेच योग. विज्ञान भैरव तंत्रात भगवान शिवाने पार्वतीला सांगितलेल्या ११२ ध्यानसूत्रांचा समावेश आहे. पुराणांमधील उल्लेखानुसार सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात शिव, ॠषभदेव, सनत्कुमार, नारद, कर्दम, कपिल आणि वेद ऋचांचे द्रष्टा अत्रि, वशिष्ठ, कश्यप आदि अनेक योगसिद्ध साधकांनी योग शास्त्राचा विस्तार केला.

भगवदगीतेत योगशास्त्राविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं,
विवस्वान्मनवे प्राह, मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्।
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः,
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप॥ (गीता ४-२)

अर्थात हे अर्जुन! मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला आणि मनुने इक्ष्वाकुला सांगितला. हा योग इतका प्राचीन आहे की मधल्या कालावधीमध्ये तो लुप्त झाला होता. आता पुन्हा योग्य समयी मी तुला सांगत आहे.

अशा रीतीने योगशास्त्राचे अध्ययन गुरू शिष्य परंपरेतून हजारो वर्षे चालत राहिले. त्रेतायुगात महर्षि वाल्मिकी यांनी योगसाधनेवरील योग-वशिष्ठ हा ग्रंथ लिहिला.

योगसूत्रांची रचना- महर्षी पतंजली
भगवान दत्तात्रेय हे योगसिद्ध महात्मा होते. भगवान परशुराम यांनी योगसाधना करून अनेक सिद्धी प्राप्त केल्याचे संदर्भ मिळतात. यानंतरच्या काळात महर्षी पतंजली यांनी योगशास्त्राला क्रमबद्ध करून योगसूत्रांची रचना केली. योगशास्त्राच्या इतिहासामध्ये महर्षी पतंजली यांचे कार्य सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. केवळ १९५ सूत्रांमध्ये त्यांनी संपूर्ण योगशास्त्राची - अष्टांगयोगाची मांडणी केली आहे. पतंजली ऋषींच्या या योग सूत्रांवरील स्वामी विवेकानंद यांचे भाष्य राजयोग या ग्रंथाच्या रूपात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. आधुनिक काळामध्ये भारताबाहेर, युरोप आणि अमेरिकेत योगशास्त्राच्या प्रचाराला स्वामी विवेकानंदांनी राजयोगावरील व्याख्यानांद्वारे सुरूवात केली.

भगवदगीतेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, जपयोग आदीचे विस्ताराने वर्णन आहे. योगशास्त्रावरील हे भाष्य शाश्वत रचना आहे. यावर गेल्या पाच हजार वर्षांपासून अनेक योगी आणि विद्वान भाष्य, विवरण करत अनेक ग्रंथांची रचना करत आहेत. आज याच माध्यमातून आपल्यापर्यंत योगशास्त्राचे ज्ञान उपलब्ध होत आहे.

जैन धर्मातील योगसाधना
भगवान श्रीकृष्ण यांचे वर्णन योगीराज या विशेषणाने करण्यात येते. जैनांचे २२ वे तीर्थंकर अरिष्टनेमी (नेमीनाथ) हे श्रीकृष्णाचे चुलत बंधू होते. सौराष्ट्रातील गिरनार पर्वतावर योगसाधना करत त्यांनी मोक्षप्राप्ती केली. २३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ हेही या काळातील विख्यात योगी होते. २४ वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचे शिष्य आर्य सुधर्मा, स्थविर संभूति विजय, भद्रबाहू आदी जैन मुनी योगशास्त्राचे मोठे जाणकार होते. याच काळात श्वेतांबर आणि दिगंबर जैन साधकांनी योगशास्त्राचा विकास केला. महर्षी वेदव्यास यांच्यापासून ते महात्मा गौतम बुद्ध यांच्यापर्यंत दीड हजार वर्षांच्या काळात योगशास्त्रावर पुरसे संशोधन झाले. प्रयोग झाले. अनेकानेक प्रकारच्या योगपद्धतींचा विकास झाला. ब्रह्मपुराण, शिवपुराण, अग्निपुराण, विष्णुपुराण आणि पंचरात्र आदी तांत्रिक ग्रंथांमध्ये योगसाधनेच्या अनेक पद्धतींचे वर्णन मिळते.

बौद्ध धर्मातील अष्टांगयोग
भारतीय ऐतिहासिक संदर्भानुसार भगवान बुद्ध आणि महावीर यांचा काळ जवळजवळ ३५०० हजार वर्षे प्राचीन आहे. बौद्ध आणि जैन दर्शन हे संन्यास आणि मोक्ष दर्शन आहेत. या काळात चार आश्रमांच्या जीवनशैलीऐवजी संन्यास आणि मोक्षाचे महत्त्व वाढले होते. या काळात मंत्रयोग आणि यंत्र योगाचा विकास वेगाने झाला. याच काळात शाक्तमुनी सिद्धार्थ, मेघंकल, शरणंकर, दीपंकर, कौडिन्य, मंगल, सुमन, रैवत, शोभित, अनामदर्शी, पद्म, नारद, सुमेध, सुजात, प्रियदर्शी, अर्थदर्शी, पुष्य, विपश्यिन, विश्वभू, कुसंधि, कनकमुनि, काश्यप आणि गौतम या २४ बुद्धांनी योग साधनेद्वारा निर्वाण प्राप्त केले. हीनयानी बौद्ध ध्यानमार्ग तर महायानी बौद्ध अष्टांग योगाची साधना करत होते. जाबालोपनिषद, योगशिखोपनिषद, अद्वयतारकोउपनिषद, तेजबिन्दु उपनिषद, योगतत्वोपनिषद, अमृतबिन्दोपनिषद आदी योगशास्त्रावरील ग्रंथांची निर्मिती याच काळातली मानली जाते.

नाथपंथी आणि नवनाथ
सुमारे २५०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्य यांनी आस्तिक आणि नास्तिक दर्शनांत प्रचलित, निराकार आणि साकार साधना, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, बुद्धयोग, जैनयोग आदींचा समन्वय घडवून आणला. त्यांनी देशाच्या चार भागात चार मठांची स्थापना करून योग साधना परंपरेला स्थायी रूप दिले. यापुढील काळात गुरू मत्स्येन्द्र नाथ आदी तांत्रिक, गुरू गोरखनाथ आदी योगी, भर्तृहरि आदी नाथपंथी, बौद्ध योगी, व्रजयानी तांत्रिक, सिद्ध सरहपाद आदी नवनाथ, जैनमुनी कुंदकुंदाचार्य, उमास्वाति, हरिभद्रसूरी आदींनी योगशास्त्राचा विस्तार केला.

शैव आणि वैष्णव संत
सातव्या शतकामध्ये दक्षिण भारतात शैव आणि वैष्णव संतांनी भक्तियोगाची स्थापना केली. याच काळात वाचस्पती मिश्र यांनी योगशास्त्राच्या व्यासभाष्यावर तत्ववैशारदी टीका लिहून योगशास्त्राला पुन्हा उर्जितावस्था आणून दिली. या काळात हटयोग मोठ्या प्रमाणात प्रचलित होते. ‘शिवसंहिता’, ‘घेरंडसंहिता’, ‘सिद्ध-सिध्दांत-पद्धति’, ‘योगसिध्दांत पद्धति’, ‘अवधूतगीता’, ‘हठसंहिता’, ‘हठदीपिका’, ‘कौलज्ञान निर्णय’, ‘कुलार्णव-तंत्र’, ‘विद्यार्णव-तंत्र’ आदी अनेक ग्रंथ याच काळात रचले गेले. आधुनिक काळातील प्रसारभक्तीयोग, वामयोग, हटयोग, अष्टांगयोग, कर्मयोग असे योगशास्त्राचे विविध प्रवाह विविध काळात विकसित होत गेले.
गेल्या शतकात स्वामी दयानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, महर्षि अरविंद, महर्षि रमण असे अनेक योगसाधक होऊन गेले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीपद प्रभुपाद, आचार्य रजनीश, महर्षि महेश योगी, जैन आचार्य श्री महाप्रज्ञ, बाबा रामदेव आदी महान विभूतींनी भारतीय योगसाधना आणि दर्शनाचा हिरीरीने प्रसार प्रचार केला. परिणामी योग आज देश, पंथ (रिलीजन), पूजापद्धतीच्या सीमा पार करत आस्तिक, नास्तिकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. शरीर आणि मनाला शांती देणारी ही जीवनशैली केवळ आसन आणि प्राणायाम यापुरती मर्यादित नाही. जीवनाला उन्नत करणारे हे शास्त्र सर्व वाद-विवाद पचवून मानवी जीवनाला शाश्वताकडे घेऊन जाणार, हीच नियती आहे.

योग आणि ओम
तस्य वाचक: प्रणव: । तदजप: तदर्थभावनम् । (पातंजल योगसूत्र, समाधिपाद, सूत्र २७,२८)
त्याचे (ईश्वरीय) स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे ओम. या ओमकाराचा जप व त्याच्या अर्थाचे मनन हाच समाधिलाभाचा उपाय.
ओमकार म्हणजे चराचरात आहे ते सर्व. म्हणून सर्व देवांची आणि देवतांची नावे त्या समाविष्ट आहेत. एखादी व्यक्ती ध्यानधारणेत ख्रिस्त किंवा अल्ला यांचे ध्यान लावू शकते, किंवा जप करू शकते. त्याने एखाद्याच्या साधनेत अडथळा येत नाही. पण मनात कोठेतरी ईश्वराची इतर रूपे नाकारत असेल, ओमकाराचा जप नाकारत असेल, तर अशी व्यक्ती योगसाधना कशी करू शकेल ? अमर्यादित चेतना किंवा विस्तारित चेतना म्हणजे योग. मुख्य तत्त्व आहे "एकात्मभाव'. तो (ईश्वर) एक आहे, अनेक रूपातून व्यक्त होतो. एकात्मभाव स्वीकारला की धर्मांधता समाप्त होते. ईश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग असू शकतात, यावर श्रद्धा बसते. आणि यातूनच माझाच धर्म खरा हा गंड गळून पडतो. मग धर्मांतरासारख्या बाबीतून संख्याबळ वाढवण्याची शर्यत थांबते. योग जगाला जोडणारा आहे तो असा.


लेखासाठी आधार :
१. योग : एकात्मदर्शनावर आधारित जीवनपद्धती, लेखिका - बी. निवेदिता, विवेकानंद केंद्र प्रकाशन
२. श्री श्री रविशंकर यांची व्याख्याने, लेख

*****
विवेकानंद केंद्राचे मासिक
विवेक विचार
जून २०१५ चा
संपूर्ण अंक
वाचण्यासाठी
पुढील लिंकवर क्लिक करा...
विवेक विचार जून २०१५

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी