Friday, April 12, 2013

लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट



भारतीय स्त्रिया पाश्‍चिमात्यांप्रमाणेच विचारक्षम व्हाव्यात, परंतु त्यांच्या चारित्र्याची किंमत देऊन मात्र नव्हे ! विचारक्षमता हे काही श्रेष्ठतम इप्सित नाही. नैतिक बल आणि अध्यात्मबल आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते. आमच्याकडील स्त्रिया काही फार शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे आचरण अत्यंत पवित्र असते. स्त्री, पुरुष हा भेद विसरून आपण केवळ माणसे आहोत, अशा भूमिकेतून काम करायला शिकल्याशिवाय स्त्रियांचा खरा विकास होणार नाही. एरवी स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. घटस्फोटांचे मुख्य कारण हेच आहे. जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधीच एका पंखाने उडू शकत नाही.                        - स्वामी विवेकानंद


वाचक बंधू-भगिनी,
सध्या आपल्या देशातील घडामोडी आणि देशाची धुरा वाहण्याची जबाबदारी असलेल्यांचे वर्तन पाहा. देशाच्या हिताला नख लावणार्‍या शक्ती प्रबळ झाल्याचे दिसून येत आहे. संस्कार आणि नीतीमूल्ये यापासून दूर गेल्याने समाजाची होत असलेली घसरण रोखण्याऐवजी भारत सरकारमध्ये बसलेल्या मुखंडांनी अध:पतनाची परीसीमाच गाठल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय १६ वर्षे करण्याचे विधेयक संसदेसमोर आणले गेले. रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतात, तसला हा प्रकार. समाजात अनाचार माजवण्याचाच हा प्रयत्न.
भारतामध्ये लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट आहे विवाह.विवाहाला भारतीय संस्कृतीत संस्कार मानले गेले आहे.
परकीय आक्रमण काळात बालविवाहसारख्या प्रथा रुढ झाल्या. नंतरच्या काळात याचे दुष्परिणाम ध्यानात घेऊन विवाहासाठीचे वय १८ वर्षे करण्यात आले. भारतीय समाजात लैंगिक सहमतीसाठी मुख्य अट (अपवाद वगळता) विवाहच राहिली आहे. त्यात आरोग्यशास्त्राचा विचार करून १८ वर्षे वयाच्या अटीचा समाजाने स्वीकार केला. असे असताना लैंगिक संबंधासाठी विवाहाऐवजी ङ्गक्त १६ वर्षे पूर्ण असण्याला प्राधान्य देणे समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठीचीच चाल असली पाहिजे. अनेक शहरांतील महाविद्यालयानजिकच्या लॉजमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी कुकर्म करताना आढळल्याच्या बातम्या आता नवीन राहिल्या नाहीत. लैंगिक अत्याचार आणि भोगवादावर नियंत्रण आणण्यासाठी संस्कारांची तसेच कठोर कायद्याची आवश्यकता असते. त्याऐवजी भोगवादाला प्रोत्साहन देणे आणि त्याला कायदेशीर आधार मिळवून देणे यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत आहे. सरकारची मती अशा प्रकारे भ्रष्ट करण्याचे काम करणारी मंडळी कोण आहेत याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
कुटुंबव्यवस्था आणि भारतीय समाज उध्वस्त करणार्‍या प्रवृत्ती, भोगवादाला प्रवृत्त करणारे उद्योग चालवणार्‍या विचारधारा यांना उघडे पाडण्याचे काम विख्यात कन्नड लेख डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी तडा या कादंबरीतून अत्यंत प्रभावीपणे केली आहे. नुकतेच प्रकाशित झालेले मेहता पब्लिकेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक आवर्जून वाचलेच पाहिजे, असे यानिमित्ताने सुचवावे वाटते.

( विवेक विचार एप्रिल 2014 च्या अंकातून )


1 comment:

  1. अटी लागू आहेतच, पण अति लागू होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्नशील असावेत बहुदा...

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी