Thursday, August 22, 2013

संस्कृत सिखने से क्या मिलता है?

म्हणतात, रेल्वेतून वातानुकूलित डब्यातून प्रवास सर्वांत बोअर आहे. त्यातून प्रवास करणारे लोक इंग्रजी वर्तमानपत्र किंवा इंग्रजी मासिकपत्रिकेतच व्यस्त असतात. इंग्रजी संस्कृतीच्या आहारी गेलेले हे लोक, इतर सामान्य लोकांकडे पाहतही नाही. म्हणून आपलं साधं शयनयानच बरं. कसही राहा. प्रवास छान होतो. परंतु, त्याबाबतचा माझा अनुभव वेगळा होता.पुणे-नागपूर ३ टिअर वातानुकूल शयनयानेत मी व पत्नी प्रवास करत असताना, इतर काही मंडळी प्रवास करीत होती. आम्ही दोघंही आपसात संस्कृत भाषेत संभाषण करीत होतो. इतर लोक आपलं मासिक घेऊन खूप व्यस्त आहेत, तर कुणी लॅपटॉपवर खूप काहीतरी करीत आहे,असं दर्शवीत होते. आमच्या गप्पा बराच वेळ चालू होत्या.

 एक-दोन तासांनंतर त्यातील एकाने माझ्या हातातील संस्कृत मासिक पत्रिका पाहिली. त्याने विचारले, ‘‘आप संस्कृतमे वार्तालाप कर रहे हो क्या?’’ मी उत्तरलो, ‘‘अर्थातच!’’ मग त्याने माझ्या हातातून संस्कृत पत्रिका घेतली. किंचित पाहून दोन मिनिटाने परत केली आणि तो म्हणाला, ‘‘वैसे संस्कृत ठीक है
| लेकिन ये सिखने से क्या मिलता है? मॅथेमॅटिक, सायन्स के सामने ये कुछ भी नही है.’’ त्याच्या अशा भडिमार प्रश्‍नांवर मग मी उत्तरलो.
मी विचारलं, ‘‘आप गणित, विज्ञान जानते है क्या?’’ तो म्हणाला, ‘‘मै खूद हायस्कूल टीचर हूँ
| दसवी, बारवी तक की क्लासेस भी लेता हूँ.’’ मग, मी त्या गृहस्थाला विचारलं, ‘‘पायथागोरस का प्रमेय मालूम होगा?’’ त्याने पट्‌कन इंग्रजीत प्रमेय सांगितला.
मग मी त्याला हाच प्रमेय संस्कृत भाषेत सांगितला, ‘‘दीर्घचतुरसस्याक्षणया रज्जु: पार्श्‍वमानी तिर्थंक्‌मानी च यत् पृथक्‌भृते कुरुतस्तदुभयं करोति
|’’काटकोन-त्रिकोणातील कर्णावरील भूजेचा वर्ग हा इतर संलग्न भूजेच्या वर्गाच्या बेरजेएवढा असतो. या सूत्राचा शोध बोधायन ऋषींनी खूप वर्षांआधी लावला. म्हणून हे सूत्र ‘बोधायन सूत्र’ या नावाने ओळखलं जातं.परंतु सर्वत्र गणिततज्ज्ञ पायथागोरस नावाच्या गणिततज्ज्ञचाच बोलबाला होतोय्. हे आपलं दुर्दैव! पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञ लिओनार्ड व्हॅन स्कारॅडर यांनीदेखील कबूल केलं की,मूळ प्रमेय बोधायनचं आहे.
 बरं! हे सोडा. बॅटरी किंवा सेलमध्ये विद्युत कशी तयार होते, ते आपल्या ग्रंथात लिहिले आहे. बघा-
 संस्थाप्य मृण्मयं पात्रं ताम्रपात्रं सुसंस्कृतम्‌
|छादयेत् शिखिग्रीवेन यार्द्राभि: काष्ठपांसुभि:॥
 दन्तालोष्टो निधात्व: पारदाच्छादितस्तत:
|उत्पादयति तन्मित्रं संयोगस्ताम्रदस्तयो:॥
 संयोगाज्जायमे तेजो यन्मित्रमिति कथ्यते
|एवं शतानां कुम्भानां संयोग: कार्यकृत् स्मत:
|१४ व्या शतकातील अगस्त्य संहितेमधील वरील श्‍लोक आहे. साध्या विद्युत घटामध्ये स्थिर ऊर्जा कशी निर्माण होते, त्याचे विवरण त्यात आहे. श्‍लोकाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत असा- मातीचं व तांब्याचं भांडं घेऊन त्यावर शिखिग्रीवा म्हणजे मोरचूद टाकून ओलसर भुसा (काष्ठपांसुभि:) टाकावा.(पान १ वरून)
 त्यावर पारा आच्छादावा. ताम्र व इतर आच्छादलेल्या वस्तूंच्या संयोगाने जी ऊर्जा तयार होते,त्यालाच मित्र म्हटले आहे. संस्कृतमध्ये सूर्याला मित्र म्हणतात. म्हणून म्हटले आहे ‘मित्राय नम:!’ असे १०० कुंभ सरळ रांगेत ठेवल्यास मोठी ऊर्जा मिळते. त्याला डायरेक्ट करंट (डीसी) म्हणतात. घरात जी वीज वापरतो ती एसी (अल्टरनेटिंग करंट) होय. प्रत्येक बॅटरी वा छोट्या सेलमध्ये डीसी ऊर्जा असते.
 बरं हेही सोडा. भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रकाशाचा वेग विचारल्यास उत्तर मिळेल १,८६,००० मैल प्रतिसेकंद. याचा शोध कुणी लावला? असा प्रश्‍न केल्यास साहजिकच पश्‍चात्त्य वैज्ञानिकाचे नाव ओठावर येईल. यात काही नवल नाही. परंतु, मी जर ‘याचा शोध आपल्या ऋषी-मुनींनी लावला’ असे म्हटल्यास,मला वेडाच समजतील! परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्या ‘ऋग्वेद’ ग्रंथातील पहिल्या खंडातील ५० व्या मंडलात चौथे सूक्त असे आहे-
 तथा च स्मर्यते योजनाना सहस्रं
 द्वे द्वे शते द्वे च योजने
|एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोऽस्तु ते॥ इति॥
 तरणिर्विश्‍वदर्शतो ज्योतिष्कुदसि सूर्य
|विश्‍वमाभासि रोचनम्‌
|याचा अर्थ असा की, सूर्याचा प्रकाश अर्ध्या निमिषात २२०२ योजन इतका प्रवास करतो.
 १ योजन = ९ १/८ मैल
 २२०२ योजन = २१,१४४.७ मैल
 १ निमेष = ०.२२८४ सेकंद
 १/२ निमेश = ०.११४२ सेकंद
 प्रकाशाचा वेग १,८५,०१६.१६९ मैल/सेकंद.
 प्रकाशाचा आधुनिक वेग १,८६,००० मैल/सेकंद हा अगदी जुळता आहे. मायकेल्सन व मोरले या पाश्‍चात्त्य वैज्ञानिकाने १९ व्या शतकात प्रकाशाचा वेग शोधला.आपले वेद हजारो वर्षे जुने आहेत, हे सांगायला नको.
 भूगर्भातील पाण्याबद्दल बृहत्संहितेतदेखील सांगितलं आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी दारोदारी भटकंती असते.४००-५०० फूट ड्रील मारून भूगर्भातील पाण्याचा उपसा सतत असतो. कधी कधी ५०० फुटापेक्षा जास्त ड्रील मारल्यानंतरही पाणी मिळत नाही. मेहनत वाया जाते. म्हणून बृहत्संहितेत फार पूर्वीच सांगितलं आहे की पाणी कुठे आढळते.
 स्निग्धा: प्रलम्बशाखा वामविकटद्रुमा: समीपजला:
|सुषिरा जर्जरपत्रा: रुक्षाश्‍च जलेन सन्त्यक्ता:॥
 म्हणजे ज्या भागात झाडे ठेंगणी व पसरट असून ज्यांच्या शाखा लांब लटकत असतात तिथे पाण्याचा साठा असतो. याउलट जिथे झाडांची पाने कोरडी व कोमजलेली असून, फांद्या आखूड असतात तिथे पाण्याचा साठा नसतो. भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी याच तत्त्वाचा उपयोग आजही होतो.
 आपलं आयुर्वेद म्हणजे पाचवं वेद आहे. चरकसंहिता संपूर्ण शरीरातील कफ-पित्त-वात यावर असून हृदयातील रक्ताभिसरण, आहारविहारविषयी कितीतरी सखोल ज्ञान आहे.ज्योतिष्यशास्त्र, कृषिशास्त्र, भौतिकशास्त्र, वैमानिकशास्त्र, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र असे कितीतरी शास्त्र आहेत, जे संस्कृतमधून निर्मित आहे. एवढेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रात मंत्र्याची निवडणूक कशी करावी?मंत्री कसा असावा? यासंबंधी अर्थशास्त्रात एक श्‍लोक आहे.
 जानपदोऽभिजात: स्वग्रह: कृतशिल्पश्‍चक्षुष्मान् प्राज्ञो
|धारयिष्णुर्दक्षो वाग्मी प्रगल्भ: प्रतिपतिमानुत्साहप्रभावयुक्त:॥
 क्लेशसह: शुचिमैत्री दृढभक्ती: शीलबलारोग्य-सत्त्वयुक्त:
|स्तम्भचापल्यवरिजित: सम्प्रियो वैराणामकर्तेत्यमात्यसम्पत्‌॥
 चांगल्या, सुदृढ, निष्ठावान, राष्ट्रभक्त मंत्र्यात कोणकोणते गुण असावेत? हे सर्व अर्थशास्त्रात सांगितले आहे. निष्ठावान सुदृढ मंत्रीच सशक्त राष्ट्राची निर्मिती करू शकतो. आजच्या युगात मंत्री कसे असतात? हे आपण रोज पाहतो. संसदेत कसे भांडतात? एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करून जनतेची दिशाभूल करून स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करणे, हेच ध्येय असते. राष्ट्रोन्नती फक्त भाषणापुरती मर्यादित असते. असो. हा विषय नाही. विषय आहे संस्कृतमध्ये काय आहे? असा कोणताच विषय नाही जो संस्कृतमध्ये नाही. मानवाच्या व सृष्टीच्या संवर्धनाचे सगळेच विषय संस्कृतमध्ये आहेत. आजच्या युगात संगणक क्षेत्रात जालपुट (इंटरनेटवर) संस्कृतची भरपूर माहिती उपलब्ध आहे. संस्कृत भाषेतील अनादि सूत्र सर्वप्रथम भगवान शंकरांनी महर्षी पाणीनींच्या कानात १४ वेळा डमरूच्या नादात स्वप्नात वाजवले. तेच स्वर टिपून पाणीनी ऋषींनी जे सूत्र लिहिले ते अनादि किंवा माहेश्‍वरी सूत्र म्हणून तेव्हापासून प्रचलित आहे. त्यावरच संपूर्ण व्याकरण आधारित आहे. पुढे त्यांनी अष्टाभ्याय ग्रंथ रचला. त्यातील सूत्र फोनोटिक व नैसर्गिक भाषा प्रक्रियेसाठी फार उपयोगी पडतात. हे आता अमेरिकेने ‘नासा’ या संस्थेनेदेखील मान्य केले आहे. म्हणून अमेरिका, जर्मन, इंग्लंड, जापान आदी राष्ट्रांत संस्कृतकडे पाहण्याची दृष्टी वेगळीच आहे. तिथे संस्कृतला सर्वोच्च स्थान आहे. वेदांचं महत्त्व त्या राष्ट्रांना कळलं असून, नित्य वेदपठन त्या अतिप्रगत राष्ट्रात होत असतं.
 आपलं काय? आपण फक्त शेराच मारत असतो. संस्कृत शिकून काय उपयोग? सगळे आध्यात्मिक ग्रंथ, वेद, उपनिषदे मूळ संस्कृत भाषेतच का? भगवद्गीता मूळ संस्कृतमध्येच का? पूजेचे मंत्र संस्कृतमध्येच का?याचा विचार करायला पाहिजे.संस्कृत न शिकल्यामुळे आपण त्या सार्‍या मौलिक ज्ञानापासून वंचित राहतो. आयुष्यभर संस्कृतची टीका करत वेळ घालवत राहतो. आयुष्याच्या शेवटी जेव्हा संस्कृतचं महत्त्व कळायला लागतं, तेव्हा बराच उशीर झालेला असतो. मग वाटतं, माझं जीवन फुकट गेलं. संस्कृत शिकलो नाही म्हणून अशा पश्‍चात्तापाची वेळ येऊ नये, म्हणून संस्कृत शिकायला हवं. मानवी जीवनाचं सार्थक कशात आहे? हे संस्कृत भाषेमुळे लवकर कळतं.म्हणून संस्कृत शिकून जीवन सार्थक करायला पाहिजे.
 ज्याप्रमाणे वर्षातील सर्व दिवस मानले जातात. पर्यावरणदिन, मातृदिन, हिंदी दिवस, मित्रदिवस वगैरे. त्याचप्रमाणे संस्कृतदिन श्रावण महिन्याच्या राखी पौर्णिमेला असतो. याला इंग्रजी तारीख निश्‍चित नसते. ज्या तारखेला नारळी पौर्णिमा असते तो दिवस संस्कृत दिन म्हणून गणला जातो. किमान या दिवसापासून प्रत्येकाने संस्कृतपासून वंचित राहणार नाही, अशी प्रतिज्ञा करून संस्कृतभाषेचे ज्ञान आत्मसात करून राष्ट्रकार्यात स्वत:चे मौलिक योगदान द्यावे, ही अपेक्षा.
 नरेश काशीनाथ पांडे
 ९४२१७१९४१७
17 Aug 2013 17:20:00 / sabhar - tarun bharat

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी