Sunday, October 30, 2011

अण्णा, rss तुमच्यासाठी अस्पृश्य आहे ?

नुकतीच टीम अण्णाची पत्रकार परिषद tv वर पाहत होतो. rss विषयावर बोलताना प्रशांत भूषण म्हणाले की, आम्ही आमच्या मंचावर rss च्या लोकांना येवू दिले नाही. टीम अण्णाने कोणाला सोबत घ्यावे, कोणाला घेवू नये, हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे खरेच. पण तरीही मनात प्रश्न येतो की, यांना जामा मशिदीचे इमाम बुखारी आपल्या मंचावर आणावे वाटले ( किरण बेदी यांनी बुखारी यांच्या घरी जावून त्यांना विनवण्या केल्या होत्या. 'भारत मत की जय', 'वंदे मातरम' म्हणणार नाही, असे आश्वासन दिल्यास राम लीलावर येण्याचा विचार करेन असे ते म्हणाले. ), अफझल गुरु याला फाशी होऊ नये असे मनापासून वाटणाऱ्या मेधाबाई पाटकर टीम अण्णात असू शकतात (पाटकर बाईंच्या पत्रकार परिषदेला मी सोलापूर पत्रकार संघात उपस्थित होतो, तेंव्हा त्या अरुंधती रॉय यांचा बचाव करताना अफझल गुरुची कड घेताना दिसल्या होत्या.), नक्सलवादी कारवायांशी जवळीक ठेवणारे, अतिरेक्यांविषयी मनात 'करुणा' असणारे स्वामी अग्निवेश टीम अण्णात चालले, स्वत: प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी जिहादींची कड घेणारी भूमिका घेतली... ही यादी आणखी वाढविता येईल... असे असताना देशभक्ती जागविणाऱ्या rss विषयी अस्पृश्यता का ?
स्वामी विवेकानंद म्हणतात, 'जेंव्हा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी लाज वाटू लागते तेंव्हा आपला नाश जवळ आले असे समजा. आपण हिंदू असल्याचा अभिमान बाळगा.' rss हिंदूंमध्ये स्वाभिमान जागविण्याचे काम करीत आहे. टीम अण्णातील आत्मविस्मृत हिंदूंना हिंदू शब्दाची लाज वाटणे समजू शकते. पण अण्णांचे काय ? अण्णा तुम्हाला तर स्वामी विवेकानंदांच्या विचाराने नवजीवन मिळाले ना ? 
हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे म्हणजे अन्य धर्मियांचा विरोध नाही; उलट हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे, असे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना का सांगत नाही ?
स्वामी विवेकानंद म्हणतात, 'एका हिंदूने धर्मांतर केले तर हिंदूंची एकाने संख्या कमी होतेच शिवाय शत्रूची संख्या एकाने वाढते.' rss हिंदूंचे धर्मांतर होऊ नये यासाठी काम करते त्यात चुकीचे काय ? या जगात फक्त हिंदू धर्मच इतर धर्मियांचा द्वेष करीत नाही. म्हणूनच हिंदू लोक कधी इतर धर्मियांच्या धर्मांतरासाठी प्रयत्न करीत नाहीत. 'सर्व धर्म सारखे आहेत' अशी हिंदूंची श्रद्धा असते. इतर धर्मीय लोक कसे धर्मांतर करतात, हे आपल्याला माहीतच आहे. कारण त्यांचे म्हणणे असते की, त्यांचाच धर्म खरा. ही वस्तुस्थिती माहित असताना आपल्याला 'गांधी' होता यावे म्हणून तर अण्णा तुम्ही या rss विषयी अस्पृश्यता नाही ना ?
अण्णा तुम्ही रोखठोक विचार मांडा... अन्यथा मिळमिळीत भूमिकेने स्थायी कार्य शक्य नाही. rss तुमच्यासाठी अस्पृश्य आहे ? प्रशांत भूषण, मेधा पाटकर आणि तथाकथित लोकांनासोबत ठेवण्यासाठीच तुम्ही ही अस्पृश्यता पाळत असाल तर अण्णा तुम्ही 'महान' आहात. तुमच्या 'गांधी' होण्याच्या वाटचालीस शुभेच्छा...

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी