Tuesday, September 15, 2015

डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल

व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे..
रराष्ट्र, संरक्षण, संस्कृती आणि शेजारी देश या विषयांवर राष्ट्रीय भूमिकेतून मूलभूत व सखोल संशोधन आणि विश्वस्तरावर संवादातून शांतता हे ब्रीद घेऊन कार्य करणारी भारतातील संस्था म्हणजे विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन (व्हीआयएफ). नवी दिल्ली येथील चाणक्यपुरी म्हणजे विविध देशांच्या दूतावासाची कार्यालये असलेला भाग. याच भागात सन मार्टिन मार्गावर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचा एक प्रकल्प असलेल्या विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचे कार्यालय आहे. नरसिंह राव सरकारच्या काळात 1993मध्ये केंद्राला ही जागा देण्यात आली आणि त्यानंतर 2009मध्ये व्हीआयएफची स्थापना झाली. सुरुवातीच्या वर्षांमध्ये भारतीय गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख आणि मुत्सद्दी म्हणून प्रसिध्द असलेल्या अजित डोभाल यांनी या संस्थेचे नेतृत्व केले. अल्पावधीतच आधुनिक भारताची थिंक टँक म्हणून देशविदेशात या संस्थेची ओळख निर्माण झाली. भारतीय स्थलसेनेचे माजी प्रमुख जनरल एन.सी. विज हे सध्या या संस्थेचे संचालक आहेत. व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन केले होते.
या संमेलनाचे बीज 18 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो सर्वधर्मपरिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणात आहे. 'माझा धर्म सत्य आहे, तसे इतरांचे धर्मही सत्य आहेत' हा सहिष्णू विचार हजारो वर्षांपासून जगत आलेल्या हिंदू धर्माचा मी प्रतिनिधी आहे, अशी भूमिका स्वामीजींनी मांडली होती. 'माझाच धर्म खरा, इतरांचे धर्म खोटे' असा अट्टाहास धरणाऱ्या एकांतिक धर्मीयांमुळे ही पृथ्वी अनेकदा नररक्ताने न्हाऊन निघाली आहे. आगामी काळात जगात शांती नांदायची असेल, तर इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करावेच लागेल, हा विचार वेदान्तामध्ये आहे. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. त्यामुळेच इस्लामी स्टेटसारखे गट रक्ताला चटावलेले आहेत. मिशनऱ्यांच्या टोळया धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी कोणत्याही थराला चालले आहेत. अशा वेळी जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे.
ईश्वर हा एकच आहे आणि तो विविध रूपातून प्रकट होतो हा विचार जगाला देणे हेच भारताचे नियत कार्य आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. यासाठी भारताचे ऐक्य म्हणजे येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. भारतात जन्मास आलेले एकत्वाचे तत्त्वज्ञान, सर्व उपासनापध्दतींना सामावून घेणारे सहिष्णू तत्त्वज्ञान जगाला देण्यातूनच जगातील संघर्ष टाळता येणार आहे. यासाठी हिंदू-बौध्द धर्मीयांनी दिल्लीच्या संमेलनातून पुढाकार घेतल्याचे दिसले.
या संमेलनाच्या आयोजनामागे दोन शक्तिशाली देशांच्या (भारत आणि जपान यांच्या) पंतप्रधानांची दूरदृष्टी होती. वर्षभरापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेचे फलित म्हणजे हे संमेलन होते. या परिसंवादात जपान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, मंगोलिया, भूतान, नेपाळ, रशिया, व्हिएतनाम आणि तैवान या देशांतील राजकीय नेते, बौध्दांचे सर्वोच्च धर्मगुरू आणि तपस्वी विद्वान सहभागी होते. तसेच भारतातील हिंदू धर्मगुरू आणि विद्वान होते.
जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्या प्रक्षेपित भाषणाने परिसंवादाची सुरुवात झाली. सन 2007च्या ऑगस्ट महिन्यात जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी भारतीय संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित केले होते. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक विचार केवळ भारत आणि जपान या दोनच देशांकडे आहे. त्यामुळे जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपानने पुढे आले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. स्वत: शिंझो ऍबे हे स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. स्वामीजींनी सांगितलेल्या विश्वबंधुत्वाच्या संदेशाच्या आधारावर पुढे जावे लागेल, असे शिंझो यांनी सांगितले. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिसंवादाची मुख्य भूमिका मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौध्द धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले. या वेळी व्यासपीठावर श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपती चंद्रिका कुमारतुंगा, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, बौध्दांच्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष लामा लॅब्झांग, जनरल विज, टोकिओ फाउंडेशनचे संचालक मसाहिरो अकियामा, सितागु इंटरनॅशनल बुध्दिस्ट अकॅडमीचे संस्थापक कुलगुरू डॉ. न्यानीसारा, भारताचे सांस्कृतिक मंत्री, जपानचे परराष्ट्रमंत्री, भूतानचे अर्थमंत्री, नेपाळचे सांस्कृतिक मंत्री आणि अन्य अनेक देशांचे राजकीय धुरीण, सुधा मूर्ती, आचार्य गोविंददेव गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी बौध्द आणि हिंदू धर्म हे उपसनापध्दती कमी अन् तत्त्वज्ञान अधिक असल्याचे सांगितले. विचारधारा फूट पाडते, तर तत्त्वज्ञान जोडून ठेवते. संवादातूनच जोडणे शक्य होते. सगळी उपनिषदे ही संवादातूनच निर्माण झाली आहेत. पूर्वी सैन्य हे शक्तीचे प्रतीक मानले जात असे. आता शक्ती ही विचारांची शक्ती आणि प्रभावी संवादातून निर्माण होते, हे स्पष्ट झाले आहे. सर्व प्रकारचे संघर्ष दूर करण्याची ताकद संवादात आहे. मनुष्य आणि निसर्ग, निसर्ग आणि विकास, निसर्ग आणि विज्ञान या प्रकारचे संघर्ष टाळण्याची मूल्ये हिंदू आणि बौध्द परंपरेत खोलवर रुजलेली आहेत. ही मूल्ये आपल्याला संघर्ष टाळण्यासाठी, शांततेकडे जाण्यासाठी आणि स्वच्छ, सुंदर पर्यावरणासाठी प्रेरक ठरतील, असे ते म्हणाले.
दोन दिवसांच्या परिसंवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोधगया येथे परिसंवादासाठी जगभरातून आलेल्या सर्व बौध्द धर्मगुरू, विद्वान, राजकीय नेते यांचे स्वागत केले. बोधगया ही भारत आणि बौध्द जगतामधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगून बोधगयेला आध्यात्मिक राजधानी म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'गौतम बुध्दांनी उपासनेच्या अनेक पध्दती स्वीकारल्या. त्यांनी केवळ हिंदू तत्त्वज्ञानाचीच फेरमांडणी केली नाही, तर जगाचा दृष्टीकोनही बदलला. जगाला नवा दृष्टीकोन दिला. हिंदू तत्त्वज्ञानातून अनेक आध्यात्मिक तत्त्ववेत्ते निर्माण झाले. त्यात गौतम बुध्द अग्रस्थानी म्हटले पाहिजेत. देशात अनेक धर्मनिरपेक्ष आणि शाश्वत घटकांना स्थान मिळाले आहे. हेच भारतीय आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे महान वैशिष्टय मानले पाहिजे'' असे विचार त्यांनी मांडले.
'इतर धर्मही सत्य आहेत. त्या मार्गानेही ईश्वरापर्यंत पोहोचता येते' हे तत्त्वज्ञान केवळ भारतीय धर्मांकडेच आहे. हा सहिष्णुतेचा भाव पसरवताना सारी पृथ्वी आपल्याच धर्माचे करण्याच्या धर्मवेडाने पछाडलेल्या गटांविषयी जगातील प्रमुख देशांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे यासाठी पुढाकार घेणे, हा एक प्रमुख उद्देश या परिसंवादाच्या आयोजनामागे असल्याचे, गेली सहा महिने अथक परिश्रम घेत या आयोजनाला मूर्त रूप देणारी एक प्रमुख व्यक्ती स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी सांगितले.
वातावरणातील बदलाच्या आणि पृथ्वीवरील ढासळत्या पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सजगता आणण्याची गरज आहे. स्वच्छ ऊर्जा, कार्बन उत्सर्जन आदी आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारी पुढाकारासोबतच सामाजिक आणि धार्मिक परंपरा, तत्त्वज्ञानाचाही आधार घ्यावा लागणार आहे. ही सृष्टी, निसर्ग आपल्या गरजा भागवू शकते, हाव नाही. ही सृष्टी, पृथ्वी म्हणजे आपल्या अस्तित्वाचेच विस्तारित रूप आहे. याची वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेली मांडणी, पर्यावरणस्नेही जीवनशैली जगण्याची असंख्य सूत्रे बौध्द आणि हिंदू ग्रंथांमध्ये विखुरलेली आहेत. त्यांना उजाळा देत पर्यावरणाविषयी जागृती करणे हाही एक मुख्य उद्देश या आयोजनामागे होता. परिसंवादाचा पहिला दिवस जगातील संघर्ष टाळणे या विषयाला, तर दुसरा दिवस पर्यावरण सजगतेला वाहिलेला होता.
बौध्द धर्मीयांची मोठी संख्या असलेल्या जगभरातील सर्वच देशांमध्ये बुध्दाची जन्मभूमी म्हणून भारताविषयी सुप्त श्रध्दाभाव असतो. तोच धागा पकडत या दोन्ही धर्मीयांना एकत्र आणण्याचा हा प्रयोग होता. स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत दिलेल्या संदेशाचे कृतिशील रूप म्हणून या घटनेकडे पाहिले पाहिजे. म्हणूनच या घटनेकडे ऑर्गनायझेन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनसारखा एखादा हिंदू-बौध्दांचा एक गट अशा संकुचित दृष्टीकोनातून पाहता येणार नाही. जगाच्या कल्याणासाठी हिंदू आणि बौध्द धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंना आणि प्रभावी नेत्यांना एका व्यासपीठावर आणणारे हे आयोजन गेल्या 2500 वर्षांत पहिल्यांदाच झाले असावे. दरम्यान, पुढील वर्षी 2006मध्ये हे संमेलन जपानमध्ये घेण्याचे टोकिओ फाउंडेशनने घोषित केले आहे.
भारताशी पूर्वेचे दृढ नाते
भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी म्हणजे गौतम बुध्द. पण आजवर आपण आग्नेय आणि पूर्वेकडील आशियाई देशांशी संबंध ठेवताना बौध्द परंपरेकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वेकडील सर्व देश हे धार्मिक आणि सांस्कृतिक धाग्याने भारताशी अतिशय दृढपणे बांधले गेले आहेत. या देशांमध्ये हिंदू आणि बौध्द परंपरा एकरस होऊन नांदताहेत. हाच आधार आपल्याला एकत्र आणू शकतो. त्या दृष्टीने नवी दिल्लीतील परिसंवाद मैलाचा दगड ठरणार आहे. चीनला निमंत्रण देऊनही तो देश अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रातही शक्य आहे असा प्रयोग
महाराष्ट्रातही परस्परांच्या श्रध्दास्थानांचा आदर राखून हिंदू अन् नवबौध्दांना एकत्र आणण्याचे प्रयत्न झाल्यास येथील समाजजीवनाला ऐतिहासिक कलाटणी मिळू शकते. अर्थातच हे खूप कठीण आहे. दोन्ही बाजूने दोन पावले पुढे पडण्याची आवश्यकता आहे. महाष्ट्रात हिंदू-नवबौध्द संबंधाला अनेक कं गोरे आहेत. राजकीय समीकरणेही जोडली गेली आहेत. त्यामुळे या साऱ्यापासून दूर राहून दोन्ही समाजातील सकारात्मक विचारांचे, तळमळीचे लोक धाडसाने पुढे आल्यास एक नवी सुरुवात होऊ शकते. पूजनीय डॉ. बाबासाहेबांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरू आहे. या वर्षात ही नवी सुरुवात होईल काय?
सिध्दाराम भै. पाटील
8806555588
http://evivek.com//Encyc/2015/9/14/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2.aspx#.VfhU51Lm7Rs 
hindu buddhist initiative / vivek, 20 sept. 2015, pg 41

hindu buddhist initiative / vivek, 20 sept. 2015, pg 42

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी