Sunday, October 30, 2011

टीम अण्णा आणि rss - मा. गो. वैद्य यांचे भाष्य


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सामान्य जनमानस प्रभावित झाले असतानाच, त्यांच्या चमूतील दौर्बल्य प्रकट होऊ लागले. या दौर्बल्याचा, त्यांच्या आंदोलनाच्या परिणामकारकतेवर फार विपरीत परिणाम होईल, असे मला वाटत नाही. परंतु, अण्णांच्या विरोधकांना मात्र, त्यांच्यावर आघात करण्यासाठी एक शस्त्र मिळाले, हे मान्य करावे लागेल.
उपोषण पर्व
प्रथम सर्वांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, अण्णांची चमू ही काही अनेक वर्षांच्या संघटित कामातून तयार झालेली नाही. अण्णांचे विरोधक हे ध्यानात घ्यावयाचे नाहीत; कारण त्यांचे उद्दिष्ट येन केन प्रकारेण, अण्णांना बदनाम करणे हे आहे. या विरोधकांमध्ये कॉंग्रेस आणि त्यांचे धुरीण अग्रणी आहेत. रामदेव बाबांच्या आंदोलनासारखीच, अण्णांच्याही आंदोलनाची त्यांना वासलात लावायची होती. पण ते शक्य झाले नाही. कॉंग्रेस सरकारने, त्यांना कायदाभंग केला म्हणून पकडले आणि तुरुंगातही पाठविले. पण सरकारचीच फजिती झाली; आणि अण्णांना एक दिवसाच्या आत मुक्त करावे लागले. नंतर, अण्णांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झाले. त्याची व्यापकता सरकारचे डोळे दिपवून गेले. सरकारने अण्णांना पकडले काय, पण परिणामी सरकारच कोंडीत अडकले गेले. त्यातून समझोत्याचा मार्ग निघाला; व ते उपोषण संपले.
सूडाची मानसिकता
पण, याचा अर्थ सरकार आपली नामुष्की विसरले असा करणे चुकीचे होईल. सरकार विसरले नाही. अण्णा आणि त्यांची चमू यांनी हे पक्के ध्यानात घ्यावे की, सरकार आपल्या नामुष्कीचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे; तत्पर आहे. त्यांनी पोसलेले नेहमीचे भुंकणारे लोक तर संधीची वाटच पाहत राहणार. संधी दिसली नाही, तर कृत्रिम रीतीने तयार करणार. मात्र अण्णांनी, त्यांच्या टीकास्त्रांनी गलबलून जाण्याचे कारण नाही.

आपण अण्णांच्या चमूबद्दल विचार करीत होतो. हे समजून घेतले पाहिजे की, विभिन्न क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेली ही मंडळी आहे. ती प्रामाणिक आहेत. पण, अनेक प्रश्‍नांवर त्यांची मते भिन्न असू शकतात. अण्णांच्या आंदोलनाचे मुख्य लक्ष्य जनलोकपाल बिल संसदेकडून पारित करून घेणे आहे. त्याचा एक निश्‍चित उद्देश आहे. तो म्हणजे सरकारी कारभारातील भ्रष्टाचार थांबविणे आणि भ्रष्टाचारप्रवण व्यक्तींसाठी दंडाचा धाक निर्माण करणे. सरकार भ्रष्टाचाराने लिप्त आहे, याविषयी दोन मते नाहीत. विधायिकांचे सदस्यही भ्रष्टाचारलिप्त आहेत. ज्यांची खरेदी-विक्री होऊ शकते, असा विकाऊ मालही त्यांच्यामध्येही आहे. तो तसा माल आहे, म्हणून तर २००८ सालच्या विश्‍वासमत ठरावाच्या संकटातून मनमोहनसिंगांचे सरकार टिकले. या सरकारमध्ये शरमेच्या संवेदनेचा कण जरी शिल्लक असता, तर त्याने, खासदारांना भ्रष्ट करण्याऐवजी पदत्याग केला असता. न्यायपालिकाही या बिमारीतून मुक्त नाही. कर्नाटकातील दोन लोकायुक्तांची प्रकरणे ताजी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशही आरोपांच्या धुळवडीपासून मुक्त नाहीत. या सर्वांवर वचक असावा, कार्यपालिका, विधिपालिका आणि न्यायपालिका हे जे लोकशाही राज्यप्रणालीचे तीन स्तंभ आहेत, ते यथासंभव निर्दोष असावेत व दोषींना कठोर शासन व्हावे, यासाठी जनलोकपाल बिलाची आखणी आहे व ते बिल संसदेने मंजूर करावे, यासाठी अण्णांच्या आंदोलनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय आयाम आहेच.
उद्देश राजकीय
गेल्या सात वर्षांपासून कॉंग्रेसप्रणीत संपुआचे सरकार राज्य करीत आहे. त्याच्या कारकीर्दीतच विधिपालिका व कार्यपालका यांच्याकडून भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे घडलेले आहेत. स्वाभाविकच, अण्णांचे आघातलक्ष्य कॉंग्रेस पक्ष व त्याचे सरकारच राहणार. भाजपा, केंद्रस्थानी सत्तेत असती व तिच्याही कार्यकाळात अशी भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे घडली असती, तर अण्णांच्या आंदोलनाचा रोख त्या पक्षाकडेही गेला असता. सध्या तो कॉंग्रेस पक्षाकडे आणि कॉंग्रेस पक्षाकडेच असणे स्वाभाविक आहे. कारण, कॉंग्रेसप्रणीत आघाडीचेच संसदेत बहुमत आहे. त्यामुळे, राजस्थानातील वाळवंटात पाण्याचा ओलावा निर्माण करणारे राजेंद्रसिंग किंवा वनवासी क्षेत्रांमध्ये चांगले कार्य करणारे राजगोपाल, यांच्या राजकारणाचे निमित्त सांगून अण्णांच्या चमूतून बाहेर पडण्याला अर्थ नाही. तसे म्हटले तर 'भ्रष्टाचाराचा विरोध' हे नकारात्मक कार्य आहे. स्वच्छ, पारदर्शक समाजजीवनाची निर्मिती हे भावात्मक लक्ष्य आहे. अण्णांच्या चमूचे अंतिम लक्ष्य ते असले, तरी सरकारी यंत्रणांतून भ्रष्टाचार निर्मूलन हे त्यांच्या आंदोलनाचे तात्कालिक लक्ष्य आहे; आणि ते प्राप्त होण्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा कॉंग्रेस पक्षाचाच आहे. राजेंद्रसिंग आणि राजगोपाल यांच्यासारख्या शहाण्यांच्या हे ध्यानात येऊ नये, याचे आश्‍चर्य वाटते. आपल्या निवेदनात राजगोपल यांनी एक सत्य कथन केले आहे की, ''(अण्णांची) ही चमू परस्परांशी सुसंगतता राखणारी कधी नव्हतीच. या समूहाला 'टीम' म्हणणेही बरोबर नव्हते. विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारी ही मंडळी आहेत.'' श्री राजगोपाल यांचे हे विश्‍लेषण तंतोतंत खरे आहे. पण त्यांना हे कळावयाला हवे होते की अण्णांच्या आंदोलनाचा उद्देश राजकीय आहे. त्यामुळे, अण्णांच्या चमूने हिस्सारच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मते देऊ नका, असे सांगण्यात काहीही गैर नव्हते. अण्णा-चमूने या पक्षाला मत द्या अथवा त्याला द्या, हे काही सांगितले नाही. कॉंग्रेसला पराभूत करा, हेच सांगितले आणि हरयाणातील जनतेने ते मानले. कॉंग्रेस उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली.
प्रेरक शक्ती
अण्णा-चमूतील एक मान्यवर सदस्य प्रशांत भूषणही वादाच्या भोवर्‍यात सापडले. त्यांनी काश्मीरसंबंधी मत व्यक्त केले. ते अण्णा-चमूचे मत कसे असू शकते? काश्मीरच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी तर अण्णांचे आंदोलन नव्हते. अण्णांनी आपली स्वत:ची भूमिका सडेतोडपणे स्पष्ट केली, हे चांगले झाले. त्याने सर्व वादळ शमले. हां, प्रशांत भूषण यांच्यावर लोकांचा रोष असू शकतो. पण त्यांच्यासारखेेच मत असणारे इतरही तथाकथित विचारवंत आपल्या देशात आहेत. त्यांच्यावर असा जनरोष का बरसला नाही? आणि प्रशांत भूषण यांच्यावरच का? कारण, अण्णांच्या चमूतील अग्रगामी सदस्यत्वामुळे, प्रशांत भूषण लोकांच्या सन्मानाचे व आदराचे भाजन बनले होते. ती त्यांची नैतिक उंची कमी करण्यासाठी, अत्यंत निषेधार्ह मार्गाचा अवलंब काही अविचारी लोकांनी केला. त्या मार्गाची घोर निंदाच कुणीही समंजस देशहितैषी व्यक्ती करील. पण प्रशांत भूषण यांनी नकळत का होईना अण्णा-विरोधकांच्या हातात शस्त्र दिले. पुढे दुसरे एक महत्त्वाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्या अंगावरही चप्पल भिरकवण्यात आली. ज्याने चप्पल फेकली त्याला पकडण्यात आले. पण तो आपल्या कृत्याचे समर्थन करू शकला नाही. ''केजरीवाल, आंदोलनाला भलत्या दिशेने घेऊन जात आहेत, त्यांनी संसदेचे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत थांबायला हवे होते'', असे तो म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पण ही सर्व पढवलेली पोपटपंची वाटते. माझा तर संशय असा आहे की, प्रशांत भूषण किंवा केजरीवाल यांच्यावर हल्ला करणार्‍या लोकांमागची प्रेरकशक्ती दुसरीच कोणती तरी असली पाहिजे.
किरण बेदी प्रकरण
प्रशांत भूषण आणि केजरीवाल यांच्यानंतर आता किरण बेदी यांचा क्रमांक आला आहे. त्यांनी सामान्य श्रेणीतून विमानप्रवास केला. शौर्यपदक विजेत्या म्हणून त्यांना विमान तिकिटाच्या सामान्य श्रेणीच्या तिकिटात ७५ टक्के सूट मिळते. पण ज्या संस्थांनी त्यांना निमंत्रित केले होते, त्यांच्याकडून त्यांनी पूर्ण भाडे घेतले, असा या तक्रारीचा आशय आहे. श्रीमती बेदी यांनीही हे मान्य केले आहे. त्यांचे स्पष्टीकरण हे आहे की, त्यांनी बचत केलेली रक्कम स्वत:साठी वापरली नाही; त्यांची जी गैरसरकारी सेवा संस्था (एनजीओ) आहे, त्यासाठी वापरली. पण बचावाचा हा युक्तिवाद ठिसूळ आहे. आपल्या सेवासंस्थेसाठी पैसे मिळविण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यासाठी खोटेपणा करण्याचे कारण नाही. दुसरा असेही म्हणू शकतो की, मी लाच घेतली, पण स्वत:साठी नाही, आपल्या पक्षासाठी घेतली. पण हे त्याचे स्पष्टीकरण समर्थनीय ठरत नाही. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने, एका 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये एक मोठी रक्कम स्वीकारली होती. त्याचेही स्पष्टीकरण हेच होते की, मी ते पैसे स्वत:साठी घेतले नव्हते; आपल्या पक्षासाठी घेतले होते. पण हे स्पष्टीकरण चालले नाही. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. श्रीमती बेदींनी वाचविलेली रक्कम फार मोठी नसावी. २-३ लाखांच्या आतच असेल. ती त्यांना परत करून आपले नाव स्वच्छ करून घेणे योग्य राहील.
आरएसएस
अण्णा आणि त्यांची चमू यांना बदनाम करण्याची मोहीम अगदी प्रारंभापासून सुरू आहे. त्यांच्या जंतरमंतर मैदानावरील उपोषण मंडपात भारत मातेचा फोटो लावण्यात आला होता. त्यालाच आक्षेप घेण्यात आला की, हे रा. स्व. संघाचे (आरएसएस)चे प्रतीक आहे; म्हणून अण्णांचे आंदोलन संघप्रेरित आहे. या आक्षेपाने अण्णा विनाकारण नरमले. त्यांनी तो फोटो तेथून हटविला. कॉंग्रेसच्या वतीने भुंकणार्‍यांच्या ध्यानात आले की, अण्णांची ही नाजूक नस आहे. मग संघाला धरून हल्ले सुरू झाले. कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी बेछूट तोफा डागणे सुरू केले. अण्णा आरएसएसचा मुखवटा आहे; आरएसएसचे ते राष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत इ. संघाला, कोणत्याही आंदोलनाशी जोडले की अल्पसंख्यकांचा एक मोठा गट त्याच्यापासून दूर होतो हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणून संघाला घसीटण्याचे काम चालू असते. 'भारत माता की जय' किंवा 'वंदे मातरम्' या संपूर्ण राष्ट्राच्या भावविश्‍वाचे प्रकटीकरण करणार्‍या घोषणा आहेत. त्या फक्त संघाशी जोडणे, यात संघाचा गौरवच आहे. पण त्या भारतव्यापी घोषणांना कोणत्याही एक संघटनेशी जोडणे व त्यावर आक्षेप घेणे, हा राष्ट्रद्रोह आहे, हे या मंडळींच्या ध्यानात येत नाही, ही फार खेदाची गोष्ट आहे आणि चिंतेचीही आहे. कुठल्या तरी इमामाने मग फतवा काढला की, 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' या घोषणा देणे इस्लामविरोधी आहे, म्हणून मुसलमानांनी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. हा फतवा मुस्लिम बांधवांनी मानला नाही, हा भाग वेगळा. पण त्यावर कॉंग्रेसची किंवा बडबोले दिग्विजयसिंगांची प्रतिक्रिया आली काय? नाव नको. कारण हेच की मुसलमानांना अण्णांच्या आंदोलनापासून दूर करण्याच्या त्यांच्या उद्दिष्टासाठी ते अनुकूल होते.
संघाची रीत
पुढे आणखी एक मौज झाली. दिनांक ६ ऑक्टोबरच्या विजयादशमीच्या उत्सवात भाषण करताना सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी भ्रष्टाचाराचाही मुद्दा चर्चेला घेतला. ते एवढेच म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात निरपेक्ष बुद्धीने, कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न करता, स्वभावानुकूल सहभागी झाले. मोहनरावांच्या भाषणातील तिन्ही वैशिष्ट्ये काळजीपूर्वक ध्यानात घेतली पाहिजेत. 'निरपेक्ष बुद्धीने' हे पहिले वैशिष्ट्य. संघाला या आंदोलनातून स्वत:साठी काय मिळवायचे होते? आणि व्यतिरेक पद्धतीने विचार केला तर असेही विचारता येईल की, संघाच्या स्वयंसेवकांनी अशा आंदोलनात सक्रिय भाग घेतला नसता, तर संघाचे काय बिघडले असते? दुसरे वैशिष्ट्य हे आहे की, 'श्रेयाची अपेक्षा न करता.' संघाने कधी आभाराचीही अपेक्षा केली नाही. व्यासपीठावर आरूढ होण्याची मनीषा धरली नाही. तो आपल्याच कामाचाही गाजावाजा करीत नाही. म्हणून संघविरोधक, ही गुप्त संघटना आहे, असा गैरसमज करून घेतात व पसरवीत असतात. किती लोकांना ही कल्पना आहे की संघात 'प्रचार विभाग' १९९४ साली सुरू झाला. म्हणजे स्थापनेनंतर तब्बल ६९ वर्षांनी! संघाला प्रसिद्धीची हाव तर सोडाच, पण इच्छाही नसते; आणि तिसरे वैशिष्ट्य आहे 'स्वभावानुकूल'. काही दिवसांपूर्वी सिक्कीममध्ये भूकंप झाला. संघाचे स्वयंसेवक धावून गेले. केला काय संघाने त्याचा गाजावाजा? अगदी परवा झारखंडात विमान अपघात झाला. संघाचे स्वयंसेवक धावून गेले. हाफ पँटमध्ये दिसले म्हणून लोकांना कळले की ते संघाचे स्वयंसेवक आहेत. संकटाच्या वेळी धावून जाणे, ही स्वयंसेवकांची स्वाभाविक कार्यरीत आहे; आणि तीच मोहनरावांनी विजयादशमीच्या भाषणात अधोरेखित केली.
अण्णांची प्रतिक्रिया
झाले! दिग्विजयसिंग प्रभृती उथळ आणि उठवळ अण्णा-विरोधकांना वाटले की, अण्णांवर वार करण्यासाठी एक धारदार शस्त्र त्यांच्या हाती आले. मला त्यांच्या आघातांचे आश्‍चर्य वाटले नाही. अण्णांच्या प्रतिक्रियेचे मात्र नवल वाटले. त्यांना यात कारस्थानाचा वास आला. कशाला, अण्णा, संघाने हे कारस्थान करायचे? अण्णांचे किंवा रामदेव बाबांचे उपोषणपर्व सुरू होण्याच्या कमीत कमी एक महिन्यापूर्वी झालेल्या संघाच्या अ. भा. प्रतिनिधिसभेने एक प्रस्ताव पारित करून भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांना आवाहन केले होते. त्यांना हातात संघाचा फलक घेऊन किंवा गणवेष घालून जायला सांगितले नव्हते. दिल्लीच्या दोघातिघा कार्यकर्त्यांनी मला सांगितले होते की, रामलीला मैदानावर रोजची २५-३० हजारांची जी प्रचंड गर्दी असे, ती सांभाळण्यात, तेथे कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अन्य गैरप्रकार होऊ न देण्यात, संघाच्या स्वयंसेवकांनी हातभार लावला.

पण अण्णा विरोधकांच्या लक्षात आले की, संघ ही अण्णांची नाजूक नस आहे; ती दाबली की अण्णा चिडतात. त्याच चिडेतून, दिग्विजयसिंगांना पागलखान्यात भरती करावे, असे ते म्हणाले असावेत. संघाचे यथार्थ आकलन नसणे हेही एक कारण असू शकते. म्हणूनच 'कारस्थाना'सारखा हास्यास्पद आरोप ते करू शकले. अण्णा असे सहज म्हणू शकले असते की, १२० कोटी भारतीयांसाठी माझे आंदोलन आहे; या १२० कोटींमध्ये संघाचेही स्वयंसेवक संमिलित आहेत; ते आंदोलनात सहभागी होऊ शकतात; असे वक्तव्य त्यांच्या व्यापक प्रगल्भतेला शोभून दिसले असते. पण ते व्हायचे नव्हते. जाता जाता एक सांगू- जंतरमंतरवरील उपोषणाच्या संदर्भात नागपुरात जी सार्वजनिक सभा झाली, तीत माझे भाषण झाले; आणि तेव्हा माझ्या डोक्यावर संघाची काळी टोपी होती. कारण मी ही काळी टोपी घालूनच वावरत असतो आणि रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या काळात, नागपुरात ज्यांनी सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले, त्यातले प्रमुख कार्यकर्ते संघाचे स्वयंसेवकच आहेत. अण्णा हजारे हे समजून घेतील तर दिग्विजयसिंग सारख्यांच्या बेताल वक्तव्यांची उपेक्षा करून ते त्यांना केराची टोपली दाखवितील. अण्णा, आपण खात्री बाळगा. सारा भारत आपल्या पाठीशी उभा आहे आणि भारतात आमच्यासारख्या संघाच्या स्वयंसेवकांचाही अंतर्भाव आहे ना!

-मा. गो. वैद्य

नागपूर
दि. २२-१०-२०११
http://www.mgvaidya.blogspot.com/

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी