Saturday, May 4, 2013

ब. ना. जोग : उत्तम संघटक व व्यासंगी लेखक

लेखक आणि कार्यकर्ता या दोन भूमिका रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर धावणार्‍या आहेत. त्या दोन्ही एकत्र आल्या तर त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व समाजात उठून दिसते. त्याचे वेगळेपण सहजपणाने जाणवते. पण अशी उदाहरणे विरळच होत. तशा अपवादांपैकी एक आहेत बळवंत नारायण तथा ब. ना. जोग, रा. स्व. संघाचे सर्मपित कार्यकर्ते. उत्तम संघटक म्हणून ब. ना. जोग यांचा जेवढय़ा गौरवाने उल्लेख केला जातो, तेवढाच त्यांचा व्यासंगी लेखक व स्पष्टवक्ते, परखड विचारवंत म्हणून लौकिक आहे. साप्ताहिक विवेकचे सात वर्षे संपादक या नात्याने त्यांनी विवेकमधून व नंतर विविध नियतकालिकांमधून राष्ट्रीय प्रश्नांवर विपुल लेखन केले. वैचारिक मांडणी करणारी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या सडेतोड लेखनाचे चाहते श्री. गोळवलकर गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वा. सावरकर, वाजपेयी-अडवाणी यांच्यासारखी अनेक नामवंत मंडळी होती. ‘जोग तुम्ही चांगले लिहिता’, या शब्दांत सावरकरांनी त्यांना अनेकदा प्रशस्तिपत्र दिले आहे. यावरून जोग यांच्या लेखनाची व त्यांची अभ्यासू वृत्ती ध्यानात यावी.

ब. ना. यांचा जन्म सोलापूरचा, पण ते पक्के मुंबईकर. लहानपणीच वडील वारल्याने काकांनी त्यांचा व त्यांच्या तीन भावंडांचा सांभाळ केला. मुंबईच्या छबिलदास शाळेत त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले. लहान वयातच त्यांचा संघाशी संपर्क आला आणि पुढे त्यांचे जीवनच संघमय झाले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना इच्छा असूनही सलग शिक्षण घेता आले नाही. सात वर्षे कारखान्यात काम केल्यानंतर पुढे त्यांनी खालसा महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एम. ए. पूर्ण केले. संघांचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम करत असताना १९५४ मध्ये सा. विवेकचे संपादक म्हणून काम करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. सात वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत आपल्या परखड लेखनाने विवेकला एक वेगळी ओळख त्यांनी मिळवून दिली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांचा बाळासाहेब देवरस, एकनाथजी रानडे, प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आदींशी संबंध आला आणि तो पुढे दृढ होत गेला. व्यापक जनसंपर्क हे त्यांच्यातील उत्तम संघटकाचे वैशिष्ट्य होते. संघाच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडत असतानाच ‘हिंदू एकजूट’ या आक्रमक तरुणांच्या संघटनेचे काम त्यांच्याकडे आले. दहा वर्षे त्यांच्याकडे या संघटनेचे प्रमुखपद होते व या काळात त्यांनी महाराष्ट्रात संघटनेची पक्की बांधणी करून सारा महाराष्ट्र ढवळून काढला.
तरुण वयातच त्यांनी ‘आधुनिक भारतापुढील यक्षप्रश्न’ हा ग्रंथ लिहिला आणि स्वत:च प्रकाशित केला. पुढे त्याचा हिंदी-गुजरातीमध्ये अनुवाद होऊन तो राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावला. चीनचे बकासुरी आक्रमण आणि भारताची वज्रमूठ, बांगलादेशाचा स्वातंत्र्यलढा, राष्ट्रकारणासाठी राजकारण (पं. दीनदयाळ उपाध्यक्ष विचारदर्शन) हिंदू-मुस्लीम ऐक्य : भ्रम आणि सत्य, टिपू सुलतान भेट ऑफ इस्लाम, लढा हिंदूंचा, हिंदुस्थानसाठी आदी त्यांचे इतर ग्रंथ आहेत. लढा हिंदूंचा.. हे पुस्तक तर त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी लिहिले. जोग हे आज ८९ वर्षांचे आहेत. या पुरस्कारानिमित्ताने ब. ना. जोग यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो ही सदिच्छा!
भारतीय विचार साधना प्रकाशनातर्फे पहिला डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले स्मृती लेखन पुरस्कार व्यासंगी लेखक व सा. विवेकचे माजी संपादक ब. ना. जोग यांना पुण्यात दिला जात आहे. रविवार, दि. ५ मे रोजी होणार्‍या या समारंभास रा. स्व. संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी प्रमुख अतिथी म्हणून येत असून, स्वामी गोविंद देवगिरी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. यानिमित्त ब. ना. जोग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला छोटासा वेध..
-मनोहर कुलकर्णी
 साभार - दैनिक लोकमत
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=EditorialEdition-16-1-03-05-2013-ebd20&ndate=2013-05-04&editionname=editorial

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी