Sunday, June 8, 2014

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

विवेकानंदांच्या विचारप्रकाशात नरेंद्र मोदी 

स्वाभिमानी. कणखर. भारतीय संस्कृतीचा कट्टर अभिमानी. भारताला जगद्गुरूपदी विराजमान करण्याची तीव्र तळमळ असलेला. देशभक्त. त्याग आणि सेवा या मूल्यांवर श्रद्धा ठेवून संपूर्ण जीवन कळत्या वयातच राष्ट्रार्पण केलेला. गरिबांप्रती ईश्वरी भाव बाळगणारा. प्रसंगी लीन होणारा अन्‌ आवश्यक तेव्हा वज्राहून कठोरता दाखवणारा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपले जीवन घडवलेला. हिंदुत्वाप्रती मनात गौरवाची भावना मिरवणारा आणि त्याच वेळी अन्य धर्मांप्रती हृदयात सद्भाव धारण करणारा नेता देशाच्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. 


घटना सन 1914 मधली
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात ते काही खोटे नाही. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एक सतरा वर्षांचा मुलगा स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून भारावतो. घर सोडून जातो. वाराणसीत पोहोचतो. रामकृष्ण मठाचा संन्याशी बनण्याची भावना त्याच्यात प्रबळ झालेली असते. पण रामकृष्ण मिशनचे पहिले अध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी हे त्या कुमारवयीन मुलाला संन्याशी बनण्यापासून परावृत्त करतात. त्याने आपले जीवन राष्ट्रासाठी समर्पित करावे असा सल्ला देतात. तो सल्ला शिरोधार्य मानून तो तरुण देशभक्तीच्या मार्गावरून वाटचाल सुरू ठेवतो आणि देशाच्या शीर्षस्थानी पोहोचतो. तो सतरा वर्षांचा मुलगा म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. 1914 मधली ही घटना.
नेताजी म्हणतात, ‘‘श्रीरामकृष्ण आणि विवेकानंदांचे माझ्यावरील ऋण व्यक्त करायला माझ्याजवळ शब्द अपुरे आहेत. त्यांच्या पवित्र प्रभावानेच माझ्यात सर्वप्रथम जागृतीचे स्फुल्लिंग प्रदीप्त झाले. स्वामी विवेकानंद आज असते तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती आणि अनन्य भावाने त्यांचे शिष्यत्व पत्करले असते.’’

घटना सन 1967 मधली 
1914 नंतर बरोबर 53 वर्षांनी दुसरा एक विद्यार्थी 17 वर्षांचा असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घर सोडतो आणि रामकृष्ण मठाचा संन्याशी बनण्यासाठी राजकोटला येतो. पण रामकृष्ण आश्रम राजकोटचे तेव्हाचे अध्यक्ष आणि रामकृष्ण मिशन बेलूर मठाचे विद्यमान अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंदजी त्याला संन्याशी होण्यास मान्यता देत नाहीत. तो मुलगा आज देशाचे नेतृत्व करीत आहे. त्याचे नाव नरेंद्र मोदी.

तुम्ही मला संन्याशी होण्यापासून रोखलंत  
9 एप्रिल 2013 रोजी श्री. नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेश्वरचे काली मंदिर आणि बेलूर मठाला भेट दिली. बेलूर मठात ते दोन तास थांबले. जतन करून ठेवलेल्या स्वामी विवेकानंदांच्या खोलीत त्यांनी काही काळ ध्यान केले. स्वामी आत्मस्थानंदजींसमवेत त्यांनी काही काळ घालवला. त्यांच्यात झालेल्या विस्मयकारक संवादाचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. 
श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वामी आत्मस्थानंदजी यांना मिश्किलपणे म्हटले की, ‘हे पाहा स्वामीजी, मी तुमचा आज्ञाधारक शिष्य आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा राजकोट येथे भेटलो होतो. तेव्हा तुम्हीच मला म्हणाले होता की दाढी करू नको. त्यामुळे मी अद्यापही दाढी ठेवली आहे.’ आणि पुढे ते मिश्किलपणे म्हणाले, ‘उद्या जर मला कोणते मोठे पद मिळाले तर त्याचे सारे श्रेय तुम्हालाच असेल. कारण तुम्ही मला संन्याशी होण्यापासून रोखलंत.’ 
स्वामी निखिलेश्वरानंद यांच्या फेसबुक पानावरून

सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या गुलामीतील भारताने आपला स्वाभिमान हरवला होता. तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ऐतिहासिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माची ध्वजा फडकावून भारतीयांमध्ये आत्मविश्वास जागवला होता. सर्वच धर्म सत्य आहेत, अशी हिंदू धर्माची शिकवण असल्याचे स्वामीजींनी जगाच्या व्यासपीठावर सांगितले होते. परंतु अलीकडच्या काळात केवळ राजकीय लाभ-हानीचा विचार करत प्राचीन भारतीय विचारधारेची अर्थात हिंदुत्वाची अवहेलना करण्याचा प्रमाद देशाची धुरा वाहणारे करताना दिसले. अशा वेळी ‘धर्म हा भारताचा प्राण आहे. देशाची अवनती झाली ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे नीट पालन झाले नाही म्हूणन’, हे स्वामी विवेकानंदांचे अमूल्य वचन हृदयात धारण करणारा नेता पंतप्रधानपदी विराजमान होतो आहे, याला विशेष महत्त्व आहे.

मोदीच सुभाषचंद्र बनू शकतात : कर्नल निजामुद्दीन
‘मोदी इज अ गुड फेलो’, हे म्हणणे आहे एकेकाळी आझाद हिंद सेनेत काम केलेल्या 103 वर्षीय कर्नल निजामुद्दीन यांचे. 
8 मे रोजी वाराणसीत झालेल्या प्रचार सभेत नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर निजामुद्दीन यांचा चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला होता. नेताजींचे अंगरक्षक आणि ड्रायव्हर राहिलेले निजामुद्दीन यांना दहा वर्षे नेताजींचा सहवास लाभला. त्यांना किमान दहा भाषा अवगत आहेत. 
निजामुद्दीन यांचे पुत्र आणि स्वत: निजामुद्दीन यांनी सांगितले की, ‘आम्ही स्वत:हूनच मोदींच्या सभेसाठी आलो.’ कर्नल यांचे पुत्र अकरम म्हणाले, ‘वालिद साहब जब भी टेलीविज़न देखते हैं तो कहते हैं अगर कोई भी नेता, नेताजी की तरह है तो वे नरेंद्र मोदी हैं. इसलिए हम मोदी की रैली में पहुंचे थे.’
 (संदर्भ: बीबीसी, वृत्तसंकेतस्थळ)

 विवेकानंदांचे गुणगाण गायले, पण…  
महात्मा गांधी यांनी म्हटले आहे, ‘मी स्वामी विवेकानंदांच्या समग्र साहित्याचे वाचन केले आहे. आणि त्यामुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेम एक हजारपटीने वाढले आहे.’ 
‘भारताच्या पुनर्निर्माण कार्याचे विवेकानंद हे जनक आहेत’ असे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. 
स्वातंत्र्य लढ्यातल्या आणि स्वातंत्र्यानंतरच्या जवळजवळ सर्व नेत्यांनी विवेकानंदांचे गुणगाण गायले. 
इंदिरा गांधी यांचा पुढाकार आणि राजीव गांधी यांच्या निर्णयाने विवेकानंदांच्या जयंतीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित करण्यात आले. 
असे असले तरी राष्ट्रीय धोरण ठरवण्याच्या निर्णयात बहुतेक वेळा स्वामी विवेकानंदांच्या विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्याचेच दिसून आले आहे. त्याग आणि सेवा या मूल्यांच्याऐवजी स्वार्थ आणि भोग या बाबींना राष्ट्रीय जीवनात प्राधान्य दिले गेले. 
धर्माच्या नावाखाली ही मातृभूमी खंडित झाली तरी त्या गोष्टीची सल देशाची धुरा वाहणार्‍यांमध्ये दिसून आली नाही. 
अशा स्थितीत राष्ट्रीय जीवनात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या शाश्वत मूल्यांचा आग्रह धरणारा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. ही बाब उल्लेखनीय आहे आणि नरेंद्र मोदी यांना झालेल्या तीव्र विरोधाचे मूळही.

विवेकानंदांचा अमीट प्रभाव 
नरेंद्र मोदी यांची हजारो भाषणे, त्यांनी लिहिलेले ज्योतीपुंजसारखे ग्रंथ यांचे अवलोकन केले तर स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयाचा त्यांच्या वाणी आणि कृतीवर असलेला अमिट प्रभाव आपल्या ध्यानी येऊ शकतो. नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वाच्या धारणेबद्दल चौफेर टीका होऊनही ते जराही विचलित झाले नाहीत, हे पाहिले की विवेकानंदांच्या पुढील उद्धरणाची आठवण होते.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘आपण हिंदू आहोत. हिंदू या शब्दातून मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करावयाचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळामध्ये सिंधूच्या एका बाजूला राहणारे ते हिंदू इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करीत आले त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिकटविला असेल. पण त्याचे काय! हिंदू या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा; अथवा जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडविले गेलेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशाचा बोध व्हावा हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदू या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकांत अधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊया.’’ 

स्वधर्माचे पालन
‘स्वधर्माचे पालन आणि इतर धर्मांबद्दल आदर’ हे नरेंद्र मोदी यांचे तत्त्वज्ञानही विवेकानंदांपासूनच आले आहे. इतर धर्मांचा आदर म्हणजे आपल्या धर्मावरील आक्रमणे मूकपणे सहन करणे नाही, ही स्वामी विवेकानंदांची शिकवण. आज ज्या ज्या कारणांसाठी हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केले जातात, त्याच कारणांसाठी शंभर वर्षांपूर्वीही प्रश्न उपस्थित केले जायचे. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा अतिशय प्रभावीपणे हिंदुत्व आणि देशहित यावर आघात करणार्‍याना उघडे पाडले होते.
आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागराला जाऊन मिळते. त्याप्रमाणे कोणत्याही ईश्वराची केलेली उपासना एकाच ईश्वराला पोहोचते, असे हिंदू धर्म सांगतो. सर्वच धर्म सत्य आहेत यावर हिंदू धर्मियांचा विश्वास आहे. ही विचारधारा (अर्थात वेदान्त) जगात शांती आणू शकेल आणि वेदान्त हाच भावी जगासाठी उपयुक्त असेल, असे विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेच्या जगप्रसिद्ध भाषणांतून मांडले.
इस्लामच्या आक्रमणाने स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी पळून आलेल्या पारसी लोकांना हृदयाशी धरणार्‍या आणि ख्रिस्ती लोकांच्या अत्याचाराने देशोधडीला लागलेल्या यहुदी लोकांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणार्‍या हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी अभिमानाने सांगितले. हिंदूने चांगला हिंदू होण्याचा, मुसलमानाने चांगला मुसलमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदूने मुसलमान किंवा मुसलमानाने हिंदू होण्याची आवश्यकता नाही, असे स्वामी विवेकानंदांनी आवर्जून सांगितले.
विवेकानंदांच्या संदेशाचा गाभा
स्वामी विवेकानंदांनी युरोप आणि अमेरिकेत अनेक चर्चमध्ये व्याख्याने दिली. येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या मानवी मूल्यांचा गौरव केला. जगाच्या पाठीवर आजवर झालेल्या सर्व महापुरुषांमध्ये मानवी विकासाचा समान धागा असल्याचे दाखवून दिले. परंतु याचवेळी संपूर्ण जगाला ख्रिश्चन करण्याच्या वेडाने पछाडलेल्या मिशनर्‍यांवर प्रहार करायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु जगाच्या पाठीवर त्याचे अस्तित्व अबाधित राहिले तर या सहिष्णुतेला अर्थ आहे. संपूर्ण जग माझ्याच पंथाचे झाले पाहिजे या एकांगी विचारातून जगभर सुरू असलेल्या मतांतराचा धोका स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखला होता. विवेकानंद म्हणतात, ‘‘हिंदुत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो, एवढेच नव्हे तर शत्रूची एकाने वाढवितो.’’
सिन्हाजी नामक शिष्यासोबतचा स्वामी विवेकानंदांचा संवाद खूपच बोलका आहे. ‘‘सिन्हाजी, तुमच्या आईचा कुणी अपमान केला तर तुम्ही काय कराल?’’
‘‘मी त्याच्यावर तुटून पडेन स्वामीजी, आणि चांगला धडा शिकवीन त्याला.’’
‘‘बरोबर बोललात. तुम्ही आपल्या धर्माला आईइतकेच मानत असाल, तर कोणाही हिंदू बांधवाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ते पाहून तुम्हाला मरणप्राय दु:ख व्हायला हवे. हे तर प्रतिदिनी घडताना तुम्ही पाहात आहात आणि त्याचे काहीच सोयरसुतक तुम्हाला नाही ? कुठे गेली तुमची श्रद्धा ? कुठे गेली तुमची देशभक्ती ? रोज ख्रिस्ती पाद्री तुमच्या तोंडावर तुमच्या धर्माची निंदा करतात. पण तुमच्या कोणाचेच रक्त तापत कसे नाही? तुम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी उभे का राहात नाही?’’
विविध धर्मासंबंधीचे उपरोक्त विचार म्हणजे विवेकानंदांच्या संदेशाचा गाभा. यासंदर्भात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि थोर विचारवंत पी. परमेश्वरन्‌ म्हणतात, ‘‘आमचे राजकीय नेते स्वामीजींना अपेक्षित आशय समजून घेऊ शकले नाहीत. त्यातील प्रत्येकाने त्यांना सुंदर शब्दांत श्रद्धांजली तर वाहिली परंतु वास्तव जीवनात मात्र त्यांना बाजूला सारले. आमच्या स्वातंत्र्य चळवळीतील हा अत्यंत दु:खद अध्याय होता. स्वातंत्र्यानंतरचा अध्याय आणखीनच वेदनादायी आहे.’’

भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र 

 आज नरेंद्र मोदी हे खर्‍या अर्थाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पर्यायाने भारतीय विचारांचे वाहक बनले आहेत. प्रस्थापित सेक्युलॅरिझमच्या धारणेला उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. ब्रिटनमधील द गार्डियन या विख्यात वर्तमानपत्राने मोदी यांच्या विजयावर अतिशय धाडसी भाष्य केले आहे. द गार्डियनने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, ‘‘16 मे पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला.’’ गार्डियनच्या या विश्लेषणाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. 

‘माझे सव्वाशे करोड भारतवासी’
  नरेंद्र मोदी यांच्या ‘माझे सव्वाशे करोड भारतवासी’, या संबोधनातून ‘आत्मवत सर्वभूतेषु’ हा हिंदू विचारच व्यक्त होताना दिसतो. हिंदू विचारदर्शन सर्वांना समान भावनेतून पाहते. ‘सबका साथ, सबका विकास’ हे सूत्रही धर्माच्या नावाने भेद होणार नाही, ही बाब ठळक करते. हा विचारच हिंदुत्वाचा गाभा आहे. विश्वबंधत्वाचा हा विचार अर्थात वेदान्तच शांती आणू शकेल असे विवेकानंदांनी जगाला सांगितले. पण, त्यासाठी अन्य धर्मीयांनी धर्मवेडाचा त्याग केला पाहिजे, यावरही विवेकानंदांनी भर दिला. मोेदी यांची कृती याच मार्गाने जाणारी आहे.

धर्म (रिलिजन या अर्थाने नव्हे) आणि विकास यांचा समन्वय, देवालयाआधी शौचालय, दरिद्रीनारायणाची सेवा, आक्रमक बाणा, वीजिगिषू वृत्ती, मुत्सद्दीपणा या अंगाने नरेंद्र मोदी यांचा विचार केला तर विवेकानंदांच्या पुढील उद्धरणाचे स्मरण नक्कीच होते. धार्मिकतेच्या नावाखाली निष्क्रियता जोपासणार्‍यांचा स्वामी विवेकानंदांनी अतिशय प्रखर शब्दांमध्ये धिक्कार केलाय.
  स्वामीजी म्हणतात, ‘‘वीरपुरुषच पृथ्वीतलावरची सुखे भोगतात. तुमचे पौरुष दाखवा; साम, दाम, दंड आणि भेद, तसेच खुले युद्ध या सर्वांचा उपयोग करून तुमच्या विरोधकांवर मात करा, विजयी व्हा आणि जगातील सुखांचा आस्वाद घ्या - तरच तुम्ही धार्मिक आहात. अपमान मुकाट्याने गिळून, लोकांच्या लाथा खात जगणे हे शरमेचे जिणे होय. तो साक्षात नरक होय, असे शास्त्रांचे म्हणणे आहे. स्वधर्म हे सत्यांचे सत्य आहे. माझ्या धर्मबांधवांनो, माझे तुम्हाला हेच सांगणे आहे. अन्याय करू नका. कोणाला अकारण दुखवू नका. इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करा. पण दुसरे कोणी अत्याचार करत असतील, तर ते मुकाट्याने सहन करणे हे गृहस्थधर्माच्या दृष्टीने मोठे पाप होय. ठकाशी तिथल्या तिथे महाठकच झाले पाहिजे. गृहस्थाश्रमी लोकांनी खूप प्रयत्न करून उत्साहाने संपत्ती मिळवली पाहिजे. आपल्या कुटुंबाचे आणि इतरांचे उत्तम पोषण केले पहिजे. त्यांच्या सुखसोयींकडे लक्ष दिले पाहिजे. शक्यतो लोकहिताची कामे केली पाहिजेत. एवढेही तुम्ही करू शकला नाही तर मग स्वत:ला माणूस कसले म्हणवता ? तुम्ही साधे गृहस्थधर्मी सुद्धा नाही; मग मोक्षाच्या पोकळ गोष्टी कशासाठी?’’
संपूर्ण जीवन मातृभूमीचरणी 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वामी विवेकानंदांच्या वाङमयाचे आकलन करून घेतल्याशिवाय नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ मूल्यमापन करणे केवळ अशक्य आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन मातृभूमीचरणी अर्पण केले. स्वार्थ आणि भोगवादी विचारांनी लिप्त राजकारणात समर्पित परंतु व्यवहारचतुर नेत्याचे मूल्यमापन रूढ पद्धतीने करणे अपूर्ण ठरेल. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंदांचा असलेला प्रभावही ध्यानात घेणे आवश्यक आहे. कन्याकुमारी येथील तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या जगप्रसिद्ध विवेकानंद स्मारकाचे निर्माते माननीय एकनाथजी म्हणतात, ‘‘मी रा. स्व. संघात होतो. संघाचा सरकार्यवाह होतो. विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानानेच मला रा. स्व. संघाचा कार्यकर्ता बनवले. मी लहानपणापासूनच स्वामीजींमुळे प्रेरित झालो होतो. त्यामुळेच मी रा. स्व. संघात सहभागी होण्यास उद्युक्त झालो. वस्तुत: रा. स्व. संघ हा स्वामीजींच्याच कार्याचा विस्तार आहे.’’

स्वामी विवेकानंद यांनी शंभर वर्षांपूर्वी लोकांमधील भारतीयत्व जागवले होते. ‘मी तुम्हाला नवीन काही सांगत नसून आपल्या प्राचीन ग्रंथांतील उदात्त विचारच आधुनिक परिभाषेत सांगत आहे’, असे त्यांचे म्हणणे होते. भारतीयता आणि विवेकानंद जणू पर्यायवाची शब्द बनले. म्हणूनच नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणाले, ‘तुम्हाला भारत जाणून घ्यायचंय, तर आधी विवेकानंद वाचा.’
याच भारतीयत्वाला नरेंद्र मोदींनी हाक दिली. हजारो वर्षांच्या गुलामी मानसिकतेचा पगडा असलेल्या बुद्धीजीवींना, त्याग आणि सेवा या मूल्यांशी नाते कमकुवत झालेल्यांना देशातील परिवर्तन एक आपत्ती वाटली. देशात मोठा वैचारिक संघर्षही झाला. ‘संघर्ष जितका मोठा, तितकाच विजयही भव्यदिव्य असतो’, या स्वामीजींच्या वचनाची प्रचिती आली.

यह कृपा होती है क्या?
  स्वामी विवेकानंद यांची देशभक्ती भावात्मक (पॉझिटिव्ह) आणि भावनात्मक (इमोशनल) दोन्ही होती. एका बाजूला परदेशातून परतल्यावर मायभूमीवर उत्कटतेने लोळण घेणारे स्वामीजी दुसर्‍या बाजूने सामाजिक दोषांवारही कठोर प्रहार करीत होते आणि उद्यमशीलतेची तसेच वैज्ञानिकतेची कास धरून देशाच्या प्रगतीची आकांक्षा जागवित होते. ‘मां की सेवा करना यह कृपा होती है क्या?’ असे भावूक होऊन म्हणणार्‍या मोदींच्या व्यक्तिमत्वात आणि विचारात अशीच बीजे दिसत नाहीत काय?

ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी गंगा आरती करताना केलेले आवाहन, संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दिलेला संदेश पाहता देशात सकारात्मक आणि आशादायी वातावरण निर्मिर्ती करण्याचा त्यांचा मनोदय दिसून येतो. येथे विवेकानंदांच्या वचनाची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याविना थांबू नका. भारतीयांनो, दौर्बल्य आणि तमोगुणाच्या मोहनिद्रेतून जागे व्हा. ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. आपल्यातल्या सुप्त आत्मशक्तीला आवाहन करा. मग पाहा ती कशी जागृत होऊन उठते ते! ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे काय आहे? सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, शुचिता येईल! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे येईल!
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात्‌ उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे.
शांतीमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया!’’
एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय
व्यापार, शेती, आधुनिकता, विज्ञान, समाजशास्त्र, विषमता व अंधरुढी निर्मूलन, परराष्ट्र संबंध, देशभक्ती, क्रीडा, धर्म, आध्यात्म, मानसिक आरोग्य, संघटन, समाजिक सुधारणा, इतिहास, विश्वबंधुत्व, कारखाने, मार्केटिंग, तर्कशास्त्र, संवादकला, वक्तृत्व अशा एक ना अनेक बाबतीत स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा अमिट प्रभाव नरेंद्र मोदींच्या कृतीतून कसा व्यक्त होतो, याचे विवेचन हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे.

 - सिद्धाराम भै. पाटील
psiddharam@gmail.com
www.psiddharam.com


.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी