Thursday, February 4, 2016

पुस्तकातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर आहे "म'


भाषाशास्त्रातील नावीन्यपूर्णप्रयोग
विज्ञान, तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग होतात, त्याप्रमाणे भाषेच्या प्रांतातही प्रयोग होत असतात. मराठी साहित्यामध्ये असाच एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. सोलापुरातील लेखक गोवर्धनलाल बजाज यांनी. मराठी भाषा लवचीक आहे. या वैशिष्ट्याचा कौशल्याने वापर करत श्री. बजाज यांनी सुमारे १०० पानांचे एक पुस्तक लिहिले आहे. मंगलम् मंगलम् मधुचंद्रम्! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील प्रत्येक शब्दाची सुरुवात "म’ या अक्षराने होते. अनुप्रास अलंकाराने नटलेले हे पुस्तक विश्वविक्रमी ठरावे असे आहे.शब्दाला शब्द जोडून अर्थहीन वाक्ये बनवत तयार केलेले हे पुस्तक नाही. लेखकाने अतिशय आशयसंपन्न कथा सादर केली आहे. या कथेची मांडणी करताना गझल, भजन यांचा समावेश केला असून, लालित्यही टिकवले आहे. मानवी भावभावनांचे कांगोरे टिपताना मानवी मनावर संस्कार होतील, याची काळजी या पुस्तकात घेतली गेली आहे. ५०२५ शब्दांचा, एकाच आद्याक्षरात प्रदीर्घ अनुप्रास, तोही कथा स्वरूपात, पहिल्यांदाच लिहिला गेला आहे. कोणत्याही भारतीय किंवा अन्य भाषेत अशा विक्रमाची नोंद आढळत नाही. आपल्या या प्रयोगाबद्दल लेखक श्री. बजाज म्हणतात, "आजपर्यंत दिग्गज अशा कथाकार, कलाकार आणि कवीमंडळींनी अनेकानेक प्रसाधने वापरून मराठी भाषेचे रूप खुलवले. मी देखील मायबोलीस "म’ने समृद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. "मम’ कार्याची दखल घेण्यात यावी, ही अपेक्षा.'
हे पुस्तक लिहायला घेतल्यानंतर जणू "म’चा नादच जडला. यासाठी अनेक रात्री जागून काढल्या. मनोरंजनातून कौटुंबिक मूल्य बिंबवणारे हे पुस्तक पूर्ण होण्यास तब्बल पाच वर्षे लागल्याचे लेखकांनी सांगितले. कथेच्या सुरुवातीला मांडलेल्या मनोगतात लेखकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, "मूलतत्त्ववादी मनूने मनुस्मृतीत मानवधर्मशास्त्राचा मूलाधार मांडलाय. म्हणूनच "महामानवा’नी म्हटल्याप्रमाणे माणसांच्या मनातील मतभेद मिटावेत. मनं मिळावीत. माया, ममतेस महत्त्व मिळावे. मद, मोह, मत्सरासम मनोविकार मिटावेत. मांस, मीन, मुद्रा, मैथुन, मद्याचा मुक्तसंचार मुळापासून मिटावा. मनमानी, मानहानी, मारहाणीपासून मानवाने मुक्ती मिळवावी. मातृभूमीस मातृदैवत मानावे. मुख्य म्हणजे महिलांनाही मानसन्मान मिळावा. मूळ मानवजातीसच महत्त्व मिळावे.’
मथुरेच्या मंदिरातील मकरसंक्रांत महोत्सवाचे मोहक वर्णन भजनरूपाने मोहनलीलामृतामध्ये करून लेखक मूळ कथानकाकडे वळतात. मराठमोळा मदन मालुसरे आणि मदनबाधित मोनिका मर्दा यांच्यातील प्रेमाचे बंध हळूवार फुलवत कथा पुढे सरकते. संपूर्ण पुस्तकात जागोजागी आलेल्या शब्दांतून लेखकाची बहुश्रुतता आणि आधुनिक जगाची चौफेर जाण जाणवत राहते. मोनिका मदनचे मनोमिलन, मॅलेज मुबारक, मित्रांची मौजमस्ती, महाफिले मुशाहिरा, मालट्रकमधील मधुचंद्र या प्रकरणातून विविध स्वभाववैशिष्ट्यांची माणसे डोळ्यासमोर उभी राहतात. मधुचंद्रानंतर मोनिकाला मदनच्या घरात स्वीकारल्याने निर्माण होणारा पेच, परदेशवारी, मॅन्चेस्टरमध्ये मिळालेली नोकरी, तेथे मॅनेजमेंट विषयावर मदनने ठोकलेले भाषण आणि शेवटी मदनच्या मिळकतीमुळे मोनिकाचा सहजस्वीकार होऊन कथेचा समारोप होतो. संपूर्ण कथेमध्ये अनेक ठिकाणी चपखल शब्दयोजनेमुळे सौंदर्यस्थळे निर्माण झाली आहेत. 
पुस्तकातील निवडक ओळी
{मितभाषी मदननेमहत्त्वपूर्ण मते मांडली. माॅडर्न म्हणवणाऱ्या मोठमोठ्या मॅनेजर्सनी माणसांत, मजुरांत, मुला-मुलींत मिसळावे. माणुसकीने, मिनतवारीने माणसं मिळवावीत. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, मार्केटिंगमध्ये मुख्यत: मनं मिळवावीत. मान मुरगाळून, माल माथी मारून मिळकत मर्यादितच मिळते. मुखी मिठास म्हणजेच मार्केटिंगची मुहूर्तमेढ.
{मोठेपणाच्यामहाभारतातमुलाकडचे म्हणतात, मी मोठा, मुलीकडचे म्हणतात मी मोठा ! "मीपणा’च्या मंचावर मानापमानाचे महानाट्य! मैना मोरापेक्षा, मासे मगरीपेक्षा, मांजर म्हशीपेक्षा मोठी? "महाराष्ट्र माझा’मध्ये मेंदुधारी माणसांपेक्षा मदोन्मत्त, मख्ख, मठ्ठ, मतिमंदच "मोठेपणा’ मिरवतात.

लेखक गोवर्धनलाल बजाज यांच्याविषयी थोडेसे
:
मारवाडी मातृभाषा असणारे ६६ वर्षीय श्री. बजाज यांचे शब्दांवर असलेले प्रभुत्व स्तिमित करून टाकणारे आहे. मंगलम् मंगलम् मधुचंद्रम् या पुस्तकाशिवाय "लव्ह बिगेट्स वेल्थ' आणि "वाॅण्टेड ब्राइड फाॅल माय हजबंड' ही त्यांची दोन पुस्तके आता मराठीतही येत आहेत. त्यांच्या "झूला भोजन’ या प्रकल्पाला लिम्का बुकमध्ये स्थान मिळाले आहे.
{सिद्धाराम भै.पाटील, सोलापूर

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी